Wednesday, February 15, 2017

मतचाचण्यांच्या अफ़वा

No automatic alt text available.

जिंकणारे उमेदवार हीच जेव्हा निवडणूकीची कसोटी होत असते, तेव्हा कुठल्याही पक्षाने आपण तत्वाच्या वा विचारांच्या आधारावर राजकारण करतो असा दावा करण्यात अर्थ उरत नसतो. आता युती भंगल्यानंतर तसेच काहीसे दावे शिवसेना व भाजपा एकमेकांवर करत आहेत. कारण आपल्यापेक्षा दुसरा किती नालायक आहे, त्यालाच भांडवल करण्याची स्पर्धा रंगलेली आहे. पण यापैकी दोघांनाही वा इतरांनाही अलिकडला राजकीय इतिहास आठवत नसावा. मजेची गोष्ट म्हणजे शरद पवार यासारख्या बुजूर्गाने तसाच गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यासा आरोप भाजपावर केलेला आहे. तर त्यांनाही काही गोष्टींचे स्मरण करून देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजपा यांची प्रथमच युती झाली, तेव्हा योगायोगाने शरद पवारच मुख्यमंत्री होते आणि लोकसभेत कॉग्रेसला मोठा दणका बसलेला होता. त्याचेच प्रतिबिंब विधानसभेत पडण्याच्या भयाने पवारांनही पछाडलेले होते. अशावेळी त्यांनी पक्षाचे विधानसभेचे उमेदवार निवडताना कोणते निकष वापरले होते? त्यांना त्याचे विस्मरण झाले आहे काय? विरार-वसई येथून हितेंद्र ठाकूर व उल्हासनगर येथून पप्पू कलानी यांना कॉग्रेसची उमे़दवारी देण्यात आल्याने माध्यमातून मोठे काहूर माजलेले होते. त्यावेळी पवारांनी खुलासा केला होता, की जिंकण्याची क्षमता ह्या निकषावर त्या दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुढे पवारांचे वारस म्हणून मुख्यमंत्रीपदी बसलेल्या सुधाकरराव नाईकांनी त्याच दोघांना टाडा लावून जेलबंद केलेले होते. पण त्या दोघांनी नंतरच्या काळातही आपली क्षमता अनेकदा सिद्ध केलेली होती. नंतरच्या अनेक विधानसभा मतदानात त्या दोघांना कॉग्रेसने उमेदवारी दिली नसतानाही ते आपल्या बळावर अपक्ष म्हणून निवडून आले होते. मुद्दा इतकाच, की आज खुद्द पवारांना जिंकण्याची कुवत हा आपलाच शब्द आठवेनासा झाला आहे.

सत्तावीस वर्षापुर्वी भारतीय निवडणूकीत उमेदवारी मिळण्याची जी पात्रता शरद पवार यांनी आणली, त्याचाच अवलंब आज भाजपा करतो आहे. कमीअधिक प्रमाणात अन्य पक्षही शरदनितीला धरूनच आपापल्या उमेदवार्‍या बहाल करीत आहेत. त्यावर इतरांनी आक्षेप घेतला तर समजू शकते. पण त्याच नितीचे जनक असलेल्या शरद पवारांनी गुंडांना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाची टवाळी करण्याचे कारण नाही. करायचेच तर भाजपाचे अभिनंदन करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षापुर्वी व्हॅलेन्टाईनडे याच दिवशी बारामतीला भेट द्यायला गेले होते आणि जाहिरपणे त्यांनी शरदनितीचे धडे गिरवल्याची घोषणा केलेली होती. आज त्याचेच प्रतिबिंब भाजपाने वितरीत केलेल्या उमेदवार यादीत पडलेले असेल, तर निदान पवारांनी नाराजी व्यक्त करणे चमत्कारीक वाटते. आपल्या शिष्यांचे त्यांना कौतुकच वाटायला नको काय? पण या निमीत्ताने निवडणूका या विचाराधिष्ठीत राहिल्या नसून जिंकण्याच्या कसोटीवर उतरल्या असल्याची साक्ष मिळते. नागपूरात भाजपाच्या संघनिष्ठांनाही बंडखोरी करावी लागलेली आहे. कारण त्यांची गुणवत्ता विजयापर्यंत जाणारी नाही, असे भाजपाला जाणवलेले आहे. त्यासाठी जिंकू शकणार्‍या अन्य पक्षातील उमेदवारांना भाजपाने सामावून घेतले आणि आजवरच्या निष्ठावंताना नाकारलेले आहे. नागपूरचेच अनुभव इतरत्रही आलेले आहेत. त्यामुळेच भाजपातील उपरे विरुद्ध मुळचे निष्ठावंत, अशी लढत अनेक शहरात व मतदारसंघात होऊ घातलेली आहे. भाजपाचीच स्थिती अनेक जागी शिवसेनेत व अन्य पक्षातही दिसते आहे. कारण आता पक्षनिष्ठा जुन्या नोटांसारखी निकामी झाली असून चलनातल्या नव्या नोटांसारखे जिंकू शकणारे उमेदवार प्रत्येक पक्षाला हवेसे झालेले आहेत. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा जिंकण्याला प्राधान्य मिळते आणि विजय हेच ध्येय बनून जाते.

Image may contain: 1 person

विजय कसा मिळवला पाहिजे याचे काहीही पवित्र्य वा सोवळेपणा शिल्लक उरत नाही, भल्याबुर्‍या मार्गाने विजयी होण्याला प्राधान्य मिळत असते. त्यासाठी नवनवे हातखंडे वापरले जातात. अलिकडल्या काळात मतचाचण्य़ा नावाचा नवा प्रकार चलाखीने मतदारांची दिशाभूल करण्यासाठी वापरला जात असतो. नेहमीच थोडा मतदार असा असतो, की त्याला जिंकणार्‍या उमेदवाराला मत देण्याची इच्छा असते. असा मतदार मतचाचण्यांच्या दिशाभुलीला बळी पडू शकत असतो. म्हणूनच मतचाचण्यांचा पत्ता वापरला जाऊ लागला. १९८० नंतर ह्या चाचण्यांचा जमाना सुरू झाला. पण साधारण विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत त्याच साधनांचा गैरवापरही सुरू झाला होता. प्रत्येक वाहिन्या व माध्यमे चाचण्या घेऊ लागली आणि आपापले अंदाज व्यक्त करू लागली. पण त्यातल्या थोड्यांनाच आपली विश्वासार्हता सिद्ध करता आली. कारण यातल्या अभ्यासकांनी आपल्या शास्त्राशी गद्दारी करून, राजकीय पक्षांना हवे तसे प्रचाराला उपयुक्त ठरणारे आकडे पेश करण्यास आरंभ केला. त्यांचे छुप्या कॅमेराने चित्रण केल्याने अनेकजण उघडे पडले. आज तामिळनाडूत राजकीय तमाशा चालू आहे. तिथे २०११ च्या विधानसभा निवडणूकीत प्रत्येक चाचणी व अंदाज जयललिता यांच्या विरोधात लोकमत जाताना दाखवत होता. पण मतमोजणी होऊन निकाल लागले, तेव्हा माध्यमे व मतचाचण्यांची विश्वासार्हता संपलेली होती. कारण तामिळनाडू राज्यातली सर्व माध्यमे व मतचाचण्य़ा द्रमुकला प्रचंड यश मिळण्याची भाकिते करीत होत्या आणि प्रत्यक्षात द्रमुकचा मतदाराने पुरता धुव्वा उडवला होता. त्यानंतर प्रणय रॉय या अभ्यासकाने व्यक्त केलेले मत लक्षणिय होते. यापुढे भारतीय निवडणूक राजकारणात माध्यमे, पत्रकार व मतचाचण्यांची विश्वासार्हता संपलेली आहे, असे ठाम मत त्याने व्यक्त केलेले होते. सातआठ वर्षात त्याची प्रचिती आलेली आहे.

प्रणय रॉय याच्या मताला महत्व इतक्यासाठीच आहे, की भारतातील मतचाचणीचे युग त्याच्याच प्रयत्नांनी व अभ्यासामुळे सुरू झाले होते. १९८० व १९८४ लोकसभा मतदानाचे इतके नेमके आकडे रॉयने आधी सांगितले होते, की मतचाचण्या हे शास्त्र असल्याची लोकांची खात्री पटलेली होती. पण नंतर वाहिन्यांचे पेव फ़ुटले आणि कोणीही उठून मतचाचण्या घेऊ लागला व भाकिते करू लागला. त्यातली बहुतांश खोटी पडून कुठला तरी एक खरा ठरू लागला. सहाजिकच मतचाचणीची विश्वासार्हता संपून गेली होती. पण अजूनही त्याविषयी उत्सुकता मोठी असते आणि त्याचा उपयोग मते मिळवण्यासाठी प्रचारात होऊ शकतो. यंदाही मुंबई महापालिकेच्या मतदानात त्याचा वापर झाला आहे. एबीपी माझा वाहिनीचा हवाला देऊन कोणी तरी मुंबईत भाजपाला १०७ जागा मिळणार असल्याची अफ़वा पसरवली आणि त्याचा खुप गवगवा झाल्यामुळे त्या वाहिनीला खुलासा द्यावा लागला आहे. आपण अशी कुठलीही चाचणी केलेली नसून, आपल्या वतीनेही कुणा संस्थेने ते काम केलेले नाही, असे एबीपी वाहिनीला जाहिर करावे लागले. आता त्यात भाजपाला झुकते माप दिलेले असल्याने तशी अफ़वा कुणा भाजपावाल्यानेच पसरवली असणार, हा आरोप होऊ लागला आहे. त्यात तथ्य नसेल असे नाही. कारण पक्षाच्या वा नेत्यांच्या उतावळ्या अनुयायांकडून असा आगावूपणा नेहमीच होत असतो. तो करणार्‍याला आपण नेत्याला वा पक्षाला मदत करत असल्याचे वाटत असते. पण प्रत्यक्षात अशीच माणसे त्या नेत्याची वा पक्षाची विश्वासार्हता धुळीस मिळवत असतात. आताही भाजपाला सर्वाधिक जागा मिळत असल्याचा हा बोगस दावा मांडणार्‍याने भाजपाचे नुकसानच केलेले आहे. पण शेलार-सोमय्या यांच्यासारखे वाचाळ मोकाट सोडले गेल्यावर बाकीच्यांना आवरायचे तरी कोणी? एकूणच जिंकण्याचा निकष अंतिम झाला, मग विचार व तत्वांचा शत-प्रतिशत बळी पडण्याला पर्याय कुठे रहातो?

No comments:

Post a Comment