Monday, February 6, 2017

शिवसेनेचा वारीस पठाण पॅटर्न

Image result for waris pathan owaisi

हैद्राबादच्या ओवायसी नामक कट्टर मुस्लिम नेत्याच्या एम आय एम या पक्षातर्फ़े गेल्या विधानसभेत निवडून आलेले आमदार वारिस पठाण, यांना आपण आजकाल अनेक वाहिन्यांवर पक्षाची बाजू मांडताना बघत असतो. मराठी, हिंदी वा इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिन्यांवर दिसणारे हे वारीस पठाण किती मतांनी निवडून आले, त्याचेही स्मरण कोणाला नसेल. फ़ार कशाला त्यांच्या मतांची वा विजयी फ़रकाचीही कोणी कधी उठाठेव केलेली नाही. मतचाचण्या किंवा निवडणूक विश्लेषण करणार्‍यांनाच त्याची गरज वाटलेली नसेल, तर सामान्य वार्तांकन करणार्‍यांनी इतकी उठाठेव करण्याचा प्रश्नच येत नाही. परिणामी सगळीकडे नुसती उथळ चर्चा वा विश्लेषणे चालू असतात. लोकशाहीत वा प्रामुख्याने उमेदवारांची गर्दी झालेली असली, मग किमान मतातही कमाल विजय कसा संपादन करता येतो, त्याचे वारीस पठाण हे अलिकडले उत्तम उदाहरण आहे. ते मुंबईच्या भायखळा या मतदारसंघातून विधानसभेत निवडून आलेले आहेत. पण झालेल्या एकूण मतांपैकी त्यांना २० टक्केही मते मिळालेली नाहीत. मुस्लिम मतदार कमी असूनही त्यांना तिथे विधानसभेची जागा जिंकता आली. याचे कारण तिथे बहुसंख्य असलेल्या बिगरमुस्लिम मतांच्या विभागणीने पठाण यांना विजयी केलेले होते. पण त्यातली खरी जादू नुसती मतांची विभागणी नसते. तर बहुसंख्य मतांची समसमान विभागणी किमान मतांना विजयापर्यंत घेऊन जाण्यात झाली आहे. म्हणूनच पठाण यांच्या विजयाचे बारकाईने विश्लेषण अगत्याचे असते. प्रामुख्याने आज विविध महापालिकांमध्ये चौरंगी वा पंचरंगी लढती होताना तरी पठाण यांच्या विजयाचा प्रत्येक पक्षाने व विश्लेषकाने अभ्यास कारायलाच हवा आहे. अन्यथा मुंबई वा अन्य पालिकांचे निकाल कसे लागतील, त्याचा अंदाज बांधणेही अशक्य आहे. वारीस पठाणांना कोणी विजयी केले होते?

भायखळा मतदारसंघात सव्वादोन वर्षापुर्वी साधारण सव्वा लाखापेक्षा थोडे अधिक मतदान झालेले होते. त्यात पठाण यांनी भाजपाचे विद्यमान प्रवक्ते मधू चव्हाण यांचा अवघ्या चौदाशे मतांनी पराभव केला होता. पण तितकाच पराभव दुसरे मधू चव्हाण जे कॉग्रेस उमेदवार व माजी मंत्री होते, त्यांचाही झाला होता. या दोन चव्हाणांच्या मतांची बेरीज ४५ हजाराहून अधिक होती. पण वारीस पठाण २५ हजार मते मिळवूनही विजयी झाले होते. अर्थात दोन चव्हाणांचीच बेरीज पठाणांना २० हजारांनी मागे टाकणारी आहे, असे म्हणून भागत नाही. त्यांच्याखेरीज आणखी दोन पराभूत उमेदवार तितकेच तुल्यबळ होते. त्यात एक अखील भारतीय सेनेच्या शिवसेना समर्थित गीता गवळी आणि मनसेचे संजय नाईक यांचाही समावेश आहे. त्या दोघांनी मिळून आणखी ४० हजार मते मिळवली होती. अशा नंतरच्या चार पराभूत उमेदवारांची मते एकत्रित केली, तर वारीस पठाण यांच्यापेक्षा साठ हजार मते अधिक होतात. थोडक्यात या चार पाठोपाठच्या उमेदवारांनी पराभूत होताना वारीस पठाण विरोधातल्या मतांना निकामी करत जवळपास ९० हजार मतांचा पराभव घडवून आणला. त्यांनी आपसात जवळपास समसमान विभागणी करून, वारीस पठाण यांच्या २५ हजार मतांना मोठे करून दाखवले आणि म्हणून पठाण विधानसभा गाठू शकले होते. सर्वाधिक मते मिळवील तोच जिंकला, अशी जी निवडणूक असते, त्यात तुल्यबळ विरोधी उमेदवारांची गर्दी घात करते. मग किमान मतेही कशी यशाच्या शिखरावर घेऊन जातात, त्याचे वारीस पठाण हे ताजे उदाहरण आहे. आज मुंबई व बहुतांश महापालिकातील उमेदवारांची लढत कमीअधिक प्रमाणात तशीच होऊ घातली आहे. त्यात आपल्या वॉर्डात किमान सर्वाधिक मते मिळवू शकणारा उमेदवार निर्णायक ठरणार आहे. त्याच्या यशाचा मानकरी कुठलाही पक्ष वा चिन्ह नसेल, तर त्याचे विरोधकच असतील.

थोडक्यात येत्या दोन आठवड्यात होऊ घातलेल्या महापालिका मतदानात सर्वत्र चौरंगी वा पंचरंगी मतदान होणार असेल, तर तिथे आपापल्या भागात किमान सर्वाधिक मते कोण मिळवू शकतो, त्याला नगरसेवक होणे सहजशक्य आहे. अशा उमेदवारांचा गोतावळा ज्या पक्षाकडे असेल, त्यालाच मोठे यश संपादन करणे शक्य आहे. मुंबईत शिवसेना गेल्या कित्येक वर्षापासून अधिक नगरसेवक कशामुळे निवडून आणू शकली, त्याचेही उत्तर यातच सामावलेले आहे. मुंबईतला मराठी टक्का घसरलाय असे दिर्घकाळ सांगितले गेले आहे. मग प्रत्येक पालिका मतदानात शिवसेनेचा भगवा कशामुळे फ़डकला, त्याचे एक महत्वाचे कारण सेनेकडे कार्यरत असलेल्या शाखा आणि सततच्या संपर्काने निर्माण झालेले किमान सर्वाधिक मतांचे पाठबळ हेच आहे. जेव्हा थेट दोन वा तीन उमेदवारांची लढत होते, तेव्हा शिवसेनेसाठी लढत कठीण होत असते. पण जितके स्पर्धक जास्त आणि लढाई जितकी अटीतटीची होते, तितके सेनेला यश अधिक मिळते. कारण प्रत्येक शाखेत शिवसेनेच्या लोकसंपर्काने एक ठराविक मतांचे हुकमी गठ्ठे निर्माण करून ठेवलेले असतात. सतत किरकोळ कामासाठी सेनेने लोकांना आपल्या शाखेचे दार ठोठावण्याची सवय लावून ठेवलेली आहे. त्यातून हा बारमाही संपर्क चालू रहातो. तोच अशा मोक्याच्या क्षणी मतदार म्हणून कामी येतो. यंदा भाजपा, कॉग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असे बहुतांश पक्ष सर्वच जागा लढवत आहेत. त्याखेरीज मुस्लिम भागात समाजवादी व ओवायसी आमनेसामने आहेत. म्हणजेच प्रत्येकाचे हक्काचे मतदार विभागले जाणार आहेत. कॉग्रेसच्या मतांमध्ये यंदा भाजपा व राष्ट्रवादी भागी करणार आहेत. शिवसेन वगळता अन्य कुठल्याही पक्षाकडे आपल्या हक्काचा पक्का मतदार नाही. हीच सेनेची सर्वाधिक जमेची बाजू आहे. त्यामुळे युती तोडण्याचा वा युतीशिवाय लढतीत उतरण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय, रणनितीचा भाग असू शकतो.

युती नाकारणे व मनसेशीही तडजोड नाकारणे, यामागे म्हणूनच एक योजलेली रणनिती असू शकते. गेल्या विधानसभेच्या निमीत्ताने युती भंगली आणि मराठीचा मुद्दा घेऊन लढताना, सेनेने मनसेचा मतदार ओढून घेतला. उलट भाजपाला मिळालेल्या यशामध्ये अमराठी मतदाराचा समावेश अधिक होता. जो परंपरेने कॉग्रेसला मतदान करणारा अमराठी वर्ग होता, त्याने भाजपाला विधानसभेत झुकते माप दिले. तो मतदार आताही भाजपाला कल देण्याची शक्यता कमी आहे. त्यातला ३०-४० टक्के जरी माघारी कॉग्रेसकडे परतला, तरी भाजपाच्या उमेदवाराला जिंकणे अशक्य आहे. अशारितीने भाजपा व कॉग्रेसचा संयुक्त मतदार जितका दुभंगणार, तितके धनुष्यबाणाचे पारडे जड होणार आहे. तशीच काहीशी स्थिती मुस्लिम मतांचीही आहे. विविध भागात ओवायसी व आझमी यांच्या मतांची समसमान विभागणी करायला, राष्ट्रवादी व कॉग्रेसचे उमेदवार आलेले आहेत. थोडक्यात यावेळी संपुर्ण मुंबईचा भायखळा होऊ घातलेला आहे. जसे विधानसभेला तिथे मतदान तुल्यबळ उमेदवारात विभागले गेले व त्याचा लाभ वारीस पठाण यांना मिळाला होता; तसाच लाभ उठवण्याच्या स्थितीत शिवसेना आहे. २२७ वॉर्डापैकी किमान शंभरावर जागी अशीच अटीतटीची लढत होणार यात शंका नाही. त्यात सेनेचे काही मोहरे भाजपाने उधार घेतलेले असले तरी त्यामुळे सेनेची मते फ़ारशी भरकटत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पंचरंगी वा अनेकरंगी लढती ज्या जागी आहेत, तिथे सेनेचे काम सोपे होऊन गेले आहे. बाळासाहेबांच्या हयातीतही मुंबई शिवसेना स्वबळावर बहुमताने केव्हाही जिंकू शकलेली नव्हती आज उद्धवच्या कालखंडात तोही विक्रम शिवसेनेच्या खात्यात जमा होऊ शकेल. तसे झाल्यास त्याला भविष्यकाळात वारीस पठाण पॅटर्न म्हणून ओळखले जायला हरकत नाही. कदाचित उद्धवनी भायखळा समजून घेऊनच युती नाकारण्याचे धाडस केलेले असावे.

1 comment:

  1. Bhau, patel + thackeray milan var pan houn jaude, BJP virodh mhanun kahihi ka ?!!! Mag JNU cha kanhaiya kadhi yetoy bhetayla tehi kalude? ...amhi vaat baghtoy

    ReplyDelete