गेल्या दोन दशकात क्रमाक्रमाने कॉग्रेस पक्षाच र्हास कशाला होत गेला, त्याची मिमांसा अनेकांनी अनेक प्रकारे केलेली आहे. पण त्यातील एका गोष्टीचा सहसा कुठेच उल्लेख येत नाही. ती गोष्ट म्हणजे कॉग्रेसचा अजेंडा! सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यापासून वा त्याच्याही आधीपासून कॉग्रेसपाशी स्वत:ची अशी विचारसरणी राहिली नाही वा कुठला अजेंडा राहिला नाही. गांधी घराण्याच्या करिष्म्यावर पक्ष निवडून येत असेल, तर गैर काहीच नाही. शेवटी पक्षाला निवडणूका जिंकून देणारा चेहरा वा नेता लागतच असतो. पण अशा नेत्याच्या भोवती गराडा घालून बसलेले काही चमचे भाट, नेत्याचा कब्जा घेतात आणि आपलाच अजेंडा नेत्याच्या माध्यमातून पक्षाच्या माथी मारू लागतात. तेव्हा त्या पक्षाचा र्हास अपरिहार्य होऊन जात असतो. ज्याचे ठळक उदाहरण म्हणून आज आपल्याला तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाकडे बघता येईल. त्या पक्षाच्या एकमुखी नेत्या जयललिता होत्या. त्यांच्या रहात्या घरापासून संपुर्ण आयुष्यावर शशिकला नावाच्या महिलेने कब्जा मिळवला आणि अम्माला अमूक हवे किंवा नको, असे परस्पर सर्व नेत्यांच्या व सहकार्यांच्या गळी उतरवत शशिकलांनी जयललितांनाच आपली कठपुतळी बनवून सोडले होते. सहाजिकच जयललितांना काय हवे ते कोणी विचारू शकला नाही आणि शशिकलाच आपली मनमानी करीत गेल्या. आज तो पक्ष तामिळनाडूच्या सत्तेत आहे आणि तुरुंगात जाऊन पडलेल्या शशिकलांच्या तालावर नाचतो आहे. खरेच शशिकलांना अम्माने आपले वारस नेमले आहे किंवा नाही, याचा थांगपत्ता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही लागलेला नाही. पण शशिकलाची मनमानी चालू आहे. कारण एका नेत्याच्या आहारी गेलेल्या पक्षाला असेच खेळवता येत असते. त्या नेत्याच्या प्रतिमेचे भांडवल करून कोणी टोळीही आपली मनमानी चालवू शकत असते. कॉग्रेसचे तेच दिर्घकाळ होऊन गेले आहे.
सोनियांना पुढे करून एका अशाच टोळीने कॉग्रेसचा कब्जा घेतला. त्याचा अल्पकालीन लाभ पक्षाला मिळाला. पण नंतर सोनियांना वा राहुलना काय हवे नको, तेही कोणी समोर विचारू शकत नव्हता. त्यांच्या नावावर कोणीही उठून कार्यकर्त्यांच्या वा नेत्यांच्या गळी मारू लागला. आज कॉग्रेस चालवणारे श्रेष्ठी म्हणून ज्यांची नावे आपल्या समोर आहेत, ती कोणती आहेत? गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, अहमद पटेल, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, मोतीलाल व्होरा! यातल्या प्रत्येकाची खरी गुणवत्ता कोणती आहे? तर लोकांमध्ये जाऊन संसदेत निवडून येण्याची क्षमता त्यांच्यात अजिबात नाही. ही आजच्या कॉग्रेस नेतृत्वाची पात्रता झाली आहे. पण पक्षाचे निर्णय सगळे त्यांच्याच हाती केंद्रीत झालेले आहेत. कारण तेच सोनिया वा राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासातले नेते मानले जातात. राज्यसभेत बसून हेच लोक पक्षाचे देशव्यापी निर्णय घेत असतात. मुंबईत संजय निरूपम सारख्या माणसाची नेमणूक कोणी केली? कशासाठी केली? त्याची लायकी काय होती? गुरूदास कामत यांच्यासारख्या नेत्याने प्रतिकुल कालखंडात मुंबईत कॉग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कष्ट घेतले. त्याच्यासारखा नेता निरूपम विरोधात तक्रार करतो किंवा बोलतो, तर त्याची दखलही दिल्लीत कोणी घेतली नाही. मुंबईत पक्षाची धुळधाण उडणार असे कामत सांगत असतानाही त्यांची दखल घेऊ दिली गेली नाही. याचा अर्थच अन्य कुणाला तरी निरूपम यांना संरक्षण द्यायचे होते आणि पक्षाचा तो अजेंडा असू शकत नाही. पण श्रेष्ठींकडे वजन असलेल्या कोणाचा तरी तो अजेंडा असणार. म्ह्णूनच इतका गलबला होऊनही निरूपम जागच्या जागी राहिला. जो अजेंडा पक्षाला घातक असला तरी अन्य कुणासाठी लाभदायक असूनही कॉग्रेसचा म्हणून कायम राखला गेला. त्याचे परिणाम आज कॉग्रेस पक्षाला भोगावे लागले आहेत.
’
विविध पक्षात असे नेते वा श्रेष्ठींपर्यंत जाऊन पोहोचणारे काही मध्यस्थ वा चाणाक्ष लोक असतात. ते वरीष्ठांचा विश्वास संपादन करून तिथे आपले बस्तान बसवतात आणि हळुहळू लोकप्रिय असलेल्या नेत्यांवर कब्जा मिळवतात. त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे असे दलाल नेत्याला सामान्य जनतेपासून तोडून टाकतात. नेत्यांपर्यंत जायचे तर आधी या मध्यस्थांची मर्जी संभाळण्याची नामुष्की कार्यकर्ता वा अनुयायांवर येते. नेता जनतेपासून तुटतो आणि जनताही तिला आवडणार्या नेत्यापासून तोडली जाते. मग जगाशी त्या लोकप्रिय व्यक्तीचा संबंध अशा मध्यस्थांशिवाय होऊ शकत नाही. तिथून मग हे मध्यस्थ आपली मनमानी सुरू करतात आणि त्यांनाच लाभदायक असलेल्या गोष्टी नेत्याच्या माथी मारू लागतात. आपले व्यक्तीगत स्वार्थ पक्षाचा अजेंडा म्हणून पुढे सरकवू लागतात. त्यात पक्षाची हानी झाली म्हणून त्यांचे काही बिघडत नाही. लाभ यांचा होत असतो. अशाच कारणाने कॉग्रेस बिनबुडाच्या लोकांनी डबघाईला नेलेली आहे. शिवसेनेचेही मध्यंतरीच्या काळात तसेच काही होत गेले आहे. तसे नसते तर मनसेचे प्रतिनिधी म्हणून बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेल्यानंतर रिकाम्या हातांनी परतले नसते. शिवसेना व मनसेची जवळीक होऊ शकली असती आणि तीच मुंबईत सेनेला थेट बहूमतापर्यंत घेऊन जाऊ शकली असती. पर्यायाने शिवसेनेची मान उंचावलेली राहिली असती व शिवसैनिकही फ़ुगल्या छातीने मिरवू शकला असता. पण दोन भाऊ जवळ येण्याने शिवसेनेचे कल्याण होत असतानाच, मातोश्रीच्या आतल्या वर्तुळात बसलेल्या अनेक भुजंगांचा कुठला लाभ होणार नव्हता. उलट शिवसेनेवर असलेली अशा लोकांची पकड आणखी ढिली पडत गेली असती. म्हणून तर बाळा नांदगावकरला रिकाम्या हाताने पिटाळुन लावले गेले व उद्धव ठाकरे यांच्याशी त्याची भेटही घडू दिली गेली नाही.
आता शिवसेना आणि शिवसैनिक यांचा अजेंडा समान राहिलेला नाही. शिवसेना ज्यांच्या मुठीत गेली आहे, त्यांचा अजेंडा भलताच आहे आणि आपल्या मतलबाचा अजेंडा असे लोक मातोश्रीच्या जवळीकीमुळे सेनेच्या माथी मारत गेले आहेत. परिणामी शिवसेनेचे नुकसान होत चालले आहे. नांदगावकर व उद्धव यांची भेट झालीच असती व मनसेशी युती वा मैत्री झाली असती; तर शिवसेनेच्या किमान ३० जागा वाढल्या असत्या आणि स्वबळावर मुंबईचा महापौर बसवता आला असता. पण त्यामुळे दोन भावातला दुरावा निकालात निघाला असता. तो दलालांना कितपत लाभदायक ठरला असता? स्वबळावर शिवसेनेचा मोठा विजय झाल्यामुळे भाजपालाही पराभूत करता आले असते आणि त्यांच्या जागा कमीच झाल्या असत्या. शिवसैनिक अत्यानंदाने नाचले असते. हा शिवसेनेचा अजेंडा असू शकतो. पण त्यात मध्यस्थ दलालांचा कोणता लाभ होता? दोघे भाऊ एकत्र आले वा शिवसेना स्वबळावर वाढली, तर मध्यस्थांची किंमत कमी होणार ना? सामान्य शिवसैनिक वा कार्यकर्ता थेट उद्धवपर्यंत पोहोचू शकला, तर मधल्या नंदीबैलाला कोण कशाला हात लावणार? सगळी गोम तिथे आहे. सुरेश गंभीर हे तीनदा नगरसेवक होते आणि तितक्याच वेळा आमदार होते. माहिममधला हाडाचा कार्यकर्ता. त्याच्या मुलीला उमेदवारी नाकारल्याने तो भाजपात गेला आणि त्याच भाजपाला आयता नगरसेवक सेनेने बहाल केला. ज्यांनी गंभीरच्या मुलीला उमेदवारी नाकारली, त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाला एक नगरसेवक बहाल केला. गंभीरचे पंख छाटणे हा सेनेचा अजेंडा नसतो. पण अन्य कुणाचा असू शकतो. नांदगावकरला रिकाम्या हाताने पाठवणे हा शिवसैनिकाचा अजेंडा नसतो. पण भलत्याच कुणाचा असू शकतो. अशा लोकांच्या अजेंड्याने आज सेनेला आपला महापौर करण्यासाठी अनेकांच्या पायर्या झिजवण्याची वेळ आली आहे. अशाच झारीतल्या शुक्राचार्यांच्या हाती शिवसेना रहाणार असेल व त्यांच्याच तालावर चालणार असेल, तर मनसेला भवितव्य नक्कीच आहे. कारण खर्या स्वाभिमानी शिवसैनिकासाठी तोच पर्याय शिल्लक उरतो ना?
Wish Mr Uddhav Thackeray at leads reads your blogs Bhau. It's a perfect analysis of sena's condition and it's causes.
ReplyDeleteBhau agreed ki kahi bhujang ahet. Pan jevha hi batami TV channels chya madhyamatun Uddhav kade geli tevha ka nahi tyane pudhakar ghetala?
ReplyDeleteUlat uddhat sarakha mhanala ki MNS umedvar ubhe karu nayet. Shevate jevada maj senetil bhujangana ahe tevdach Uddhavala pan ahe.
Zala gela Gange la milala !! Sena-Bhajapa doghahi apale ch ahet..ata mission 11 March !! Modi n chi pariksha
ReplyDeleteसाहेब,आपल्या लिखाणाचा सारांश जर वेगळा काढून सांगितला तर कधीकधी घाईघाईत किमान तेवढा वाचला जाईल असे वाटते. नाहीतर कधीकधी पूर्ण लिखाण वाचायचे राहून गेले कि हुरहूर लागून राहते.
ReplyDelete