Tuesday, February 14, 2017

तामिळी डाव आणि पेच

अम्माची तिच्यासारखीच तंतोतंत दिसणारी भाची दीपा सेल्व्हम सोबत


Deepa Jayakumar

दहा दिवसापुर्वी पन्नीरसेल्व्हम यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला, तेव्हा पुढल्या घडामोडीचा त्यांनाही अंदाज नव्हता. पण त्यांना पदाचा राजिनामा द्यायला भाग पाडणार्‍या शशिकला नटराजन यांचा डावपेच आधीपासून शिजलेला होता. अगोदर त्यांनी स्वत:ची पक्षाच्या सरचिटणिस म्हणून नेमणूक करून घेतलेली होती. त्यामुळे पक्षाच्या संघटनेवर आपलीच पोलादी पकड बसणार हे गणित होते. त्यात कोणी बाधा आणण्याची शक्यता नव्हती. पक्षाच्या सर्वच नेत्यांना जयललिता यांच्यासमोर नतमस्तक होताना बघितलेल्या शशिकला यांना, अम्माच्या जवळिकीमुळे जनमानसात एक स्थान होते. त्यापेक्षा त्यांचे प्रभावी स्थान पक्षाच्या रचनेमध्ये होते. अम्माच्या घरी वा सान्निध्यात कोणी असावे किंवा नाही, त्याचे निर्णयच शशिकला घेत असल्याने, प्रत्येक पक्षनेता या महिलेशी संभाळून होता. तिला वचकून होता. म्हणून तर अम्माच्या आजारपणात कोणालाही त्यांना बघता आले नाही. तरी अवघा पक्ष एकजुटीने एकत्र राहिला होता. त्याचीच परिणती मग अम्माच्या निधनानंतर सुत्रे शशिकलाच्या हाती जाण्यात झाली. कुठूनही विरुद्ध आवाज उठला नाही. पण जेव्हा इतकी हुकूमत प्रस्थापित होते, तेव्हा ती पचवण्याचीही कुवत असावी लागते. ती जयललिता यांच्यापाशी असली तरी शशिकला यांच्यापाशी नाही. म्हणूनच प्रत्येक अधिकारपद आपल्याच हाती केंद्रीत करण्याची त्यांना घाई झालेली होती. कारण जे आमदार बहूमतात आहेत, त्यांच्या बळावर आणखी चार वर्षे तरी पक्षाचे राज्य अबाधित होते. म्हणूनच त्यांनी आमदारांच्या बहूमतावर मुख्यमंत्री होण्याची घाई केली होती. पण सगळेच डाव यशस्वी होत नाहीत आणि त्यातले काही डाव पेच म्हणूनही उलटू शकतात. आताही तेच झाले. आपल्या विरोधात कोणी नसताना विरोधातला खंबीर नेता शशिकलांनीच उभा केला. पुढे काय वाढून ठेवले आहे?

एकदा शशिकला मुख्यमंत्री झाल्या असत्या तर पन्नीरसेल्व्हम यांची किंमत संपुष्टात आली असती. कुठलीही महत्वाकांक्षा नसलेला हा अम्माभक्त पादुका संभाळण्यात धन्यता मानणारा असल्याने, अम्मानंतर शशिकलांनीही त्यालाच आपल्या पदावर कायम ठेवण्यात शहाणपणा होता. पण त्यालाच संपवायला निघालेल्या शशिकलांनी आता पक्षाच्या आमदार व अन्य नेत्यांना नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एका रात्री अकस्मात राजिनामा दिलेले पन्नीरसेल्व्हम अम्माच्या समाधीपाशी जाऊन ध्यान करीत बसले आणि त्यांनी आपल्याला अम्माने सत्य कथन करायला सांगितल्याचे जाहिर करून टाकले. तिथून अण्णाद्रमुकमध्ये वंडाचा झेंडा रोवला गेला, तेव्हा तरी सेल्व्हम यांच्या पाठीशी एकही आमदार नव्हता आणि सर्व आमदारांनी शशिकला यांना बिनविरोध निवडलेले होते. त्या घटनेनंतर शशिकला यांचा धीर सुटला आणि त्यांनी सर्व आमदार गोळा करून त्यांना एका खास जागी नेऊन लपवून ठेवले. तुरूंगात गेलेल्या जयललितांना तेही करावे लागले नव्हते. तिथे हुकूमत कशी असावी त्याचा दाखला मिळतो. आमदारांवर तितकी हुकूमत असती, तर शशिकलांना आमदार गोळा करून लपवावे लागले नसते. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सेल्व्हम बंडाला उभे राहिले, तेव्हा कसल्याही पाठींब्याशिवाय त्यांनी इतकी हिंमत कसल्या बळावर केली होती? त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलेले होते आणि तेही जाणार असेल तर गमावणयसारखे त्यांच्यापाशी काहीही उरले नव्हते. पण डाव उलटला तर ते मोठे धुर्त राजकारणी ठरणार होते. पाठीशी एकही आमदार नसताना जनता आपल्या पाठीशी असल्याच्या बळावर हा नेता हिंमत करून उभा राहिला. तेव्हाही त्याच्या डोक्यात एक गणित नक्की होते. बहूमताने पक्षाचे आमदार आपल्याच पाठीशी येण्याची त्याला खात्री होती. त्याचे रहस्य समजून घेण्यासारखे आहे.

आज भले पक्षाला विधानसभेत बहूमत आहे आणि सत्तेची साठमारी नेत्यांमध्ये आहे. सामान्य आमदाराला आपली आमदारकी पाच वर्षे टिकली तरी खुप आहे, त्यामुळेच असे बहुतांश आमदार लगेच निवडणूक व्हायला घाबरत असतात. कारण पुन्हा निवडून येण्याची त्यांना खात्री नसते. बाकी सत्तापदे कोणालाही मिळोत, पण आपल्यासाठी आमदारकी टिकली तरी त्यांना पुरेशी असते. थोडक्यात तत्वासाठी वा नेत्यांच्या लढाईसाठी कुठलाही आमदार नव्याने निवडणूकीला सामोरा जायला राजी नसतो. इथेही तेच गणित आहे. समजा शशिकलांच्या विरोधात निकाल गेला नसता, किंवा आता निकाल गेल्यामुळे जे बहूमताचे गणित आहे, ते फ़सले तर विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणुक घेण्याचाच पर्याय शिल्लक उरतो. याचा अर्थ वर्षभरातच सर्वांना पुन्हा आमदारकीची लढत द्यावी लागणार आणि पुन्हा निवडून येण्याची खात्री अजिबात नाही. त्यामुळे प्रत्येक आमदारासाठी याक्षणी आमदारकी वाचवण्याला प्राधान्य आहे. त्याचा अर्थच असलेली विधानसभा बरखास्त होऊ नये, यासाठी बहुतेक आमदार बांधलेले आहेत. समजा विधानसभेत शशिकला वा त्यांच्या गटाला आपले बहूमत सिद्ध करता आले नाही, तर राज्यपालांना विरोधातील द्रमुकला पर्यायासाठी विचारावे लागेल. त्याच्यापाशी बहूमत नाही आणि सेल्व्हम गटही त्याला पाठींबा देणार नाही. म्हणजेच बरखास्ती इतकाच पर्याय शिल्लक उरतो. त्यामुळेच सेल्व्हम यांचे गणित बहूमताचे आमदार जमवण्याचे कधीच नव्हते, शशिकलाच्या गोटातील आमदारसंख्या ११७च्या खाली आणण्यावर त्यांचे लक्ष लागलेले होते. एकदा शशिकलांचा बहूमताचा दावा निकालात निघाला व द्रमुकही सरकार बनवण्याच्या स्थितीत नसेल, तर विधानसभा बरखास्तीचा पर्याय उरतो. तसे नको असेल, तर अण्णाद्रमुकच्या आमदारांना सेल्व्हम यांच्या नेतृत्वाखाली एकवटून विधानसभा व पक्षाची सत्ता टिकवण्याला पर्याय उरत नाही.

थोडक्यात पाठीशी मुठभर आमदार नसताना सेल्व्हम यांनी केलेला जुगार चमत्कारीक तरी धुर्त होता. शशिकला यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही आणि आमदारांच्या समोर विधानसभा बरखास्तीचा बागुलबुवा उभा करायचा, असा पेच सेल्व्हम यांनी उभा करून ठेवला होता. शशिकला यांनी आपल्या पाताळयंत्री स्वभावाच्या आहारी जाऊन जे काही डाव खेळले, त्यात सेल्व्हम सारखा साधा माणूस मुठभर आमदारांच्या पाठींब्याने पेच निर्माण करू शकतो, अशा विचारही केला नव्हता, म्हणूनच आता त्या पेचप्रसंगात फ़सल्या आहेत. आज जो शशिकला म्हणून गट दिसतो आहे, त्या्त जितके आमदार आहेत, त्यापैकी बहुतेकांना पुन्हा लगेच निवडणूकीला सामोरे जायचे नसेल, तर शशिकला यांची साथ सोडून सेल्व्हम यांच्याच गटात दाखल होणे भाग आहे. कारण शशिकला यांच्या चेहर्‍याने वा नेतॄत्वाने पुन्हा निवडून येणे शक्य नाही, हे त्यातला प्रत्येकजण पक्के ओळखून आहे. पण त्यापेक्षा सेल्व्हम यांची प्रतिमा उजळ आहे आणि तेच सत्तेत राहिले तर आमदारकी टिकतेच. अधिक निवडणूक पुन्हा जिंकण्याची शक्यताही कायम रहाते. ही बहुतांश आमदारांची अगतिकता सेल्व्हम यांचे राजकीय भांडवल ठरू शकते, पण तसा विचारही शशिकला यांनी आपल्या धुर्त डावपेचात केला नाही. तिथेच त्या फ़सत गेल्या. पण जेव्हा त्यातला पेच लक्षात येत गेला तसे शशिकला गोटातील जुनेजाणते नेते एक एक करून सेल्व्हम गोटामध्ये दाखल होत गेले. बचावाचा पवित्रा घेऊन शशिकला मोठा जुगार खेळायला गेल्या आणि फ़सत गेल्या, उलट सर्वकाही गमावणारच असल्याने सेल्व्हम यांनी आक्रमक पवित्रा घेऊन चिन्नम्माचेच डाव तिच्यावर पेच करून उलटून दाखवले आहेत. विध्वंसाचे भय बाळगणार्‍याला जिंकता येत नाही, की विध्वंस थांबवता येत नाही, सेल्व्हम यांनी गमावण्याची तयारी ठेवून चिन्नम्माचा सगळा डाव तिच्यावरच पेच म्हणून उलटवला आहे.

1 comment:

  1. Bhau Sarvang Sunder visleshana baddal dhanyawad..
    साऊथ चे राजकारणा वरून अनेकदा साऊथ व्यतीरीक्त ईतर ठीकाणी राहणाऱ्या साऊथ वाल्याना तिथे चालणाऱ्या राजकारणाची लाज वाटते.
    त्यामुळे साऊथ मधील राहिलेले मतदार फिल्मी वारस्या च्या राजकारण्याना निवडुन कीती मागासलेले आहोत याची साक्ष देतो.
    खरच तिथे सुक्षीक्षीत नसले तरी किमान शीक्षित मतदार पण नाहीत याची खात्री होते.
    आशा परम स्वार्थि लोकाना द्रवीड नव्हे दरिद्री म्हणावे लागेल. कारण हेच दशका नु दशके चालु आहे.
    या दरीद्री पणातुन बाहेर काढायला युपीतुन राम जाउन पुराणाची पुर्नार्वुत्ती होणे आवश्यक आहे.
    केवळ पाखंडी, प्रादेशीक व राक्षसी स्वखर्था मुळे हा भाग भारताचा भाग असल्या सारखे कधीच वाटत नाही.
    यासाठी सर्व भारतात पसरलेल्या साऊथ ईन्डियन नी ईतर भारताचा वारसा घेऊन जोपर्यँत आशा फिल्मी राजकारण्याची जागा देश भक्त राजकारणी घेत नाहीत तो पर्यँत तीथेच रहाणे देश हीताचे आहे.
    साऊथ वाले मुड of नेशन पणे कधी वागतील देव जाणे.
    तसेच आशा भारत भर पसरलेले साऊथ वाले स्वार्था पोटी देशाचे कीती नुकसान (आपली घोडी दामटत) करत असतील याची सखोल तपासणी करायला पाहिजे.
    Aks

    ReplyDelete