गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. राज्यातल्या दहा महापालिकांच्या निवडणूक प्रक्रीयेला आरंभ झाला. म्हणजेच उमेदवारांचे अर्ज भरण्यास आरंभ झाला. पण पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल करायला कोणीही उमेदवार आला नाही. अशी बातमी वृत्तवाहिनीवर बघायला मिळाली. नवलाची गोष्ट म्हणजे ती बातमी पुण्याची होती आणि त्यात पुणे महापालिकेची इमारत अगत्याने दाखवलेली होती. निवडणुकीत सहसा प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आधीपासून जाहिर होत नाहीत. त्यामुळे कुठल्याही पक्षाचा कोणी उमेदवार अर्ज भरण्यास गेला नसेल तर नवल नाही. पण कोणी अपक्षही तिकडे फ़िरकला नव्हता. त्याचे कारण त्या बातमीत सांगितले गेले ते धक्कादायक होते. त्या दिवशी म्हणे अमावास्या होती आणि म्हणून अशुभ दिवस असल्याने कोणी ते धाडस केले नाही. असे पुण्यात घडलेले आहे. जिथे साडेतीन वर्षापुर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची निर्घृण हत्या झाली होती. ती हत्या झाल्यावर अशाच वृत्तवाहिन्यांनी गदारोळ माजवून विवेकवाद आणि विज्ञानवादी दृष्टीकोनाचा गाजावाजा केलेला होता. त्यात प्रामुख्याने तमाम पुरोगामी राजकीय पक्षांनी हजेरी लावलेली होती. पण त्याच पुण्यात अजून अमावस्या हा अशुभ दिवस पाळला जात असल्याची ही प्रचिती होती. त्यातून आपल्या समाजातील पुढारलेपण किती दांभिक झाले आहे, त्याची साक्ष मिळते. पुरोगामीत्व किंवा विज्ञानवाद लोकांना शहाणपण शिकवण्यासाठी असतो. पण जेव्हा त्याचे पालन स्वत:च्या आयुष्यात करायची वेळ येते, तेव्हा माणसे किती मागास मनाची असतात, त्याचा हा दाखला होय. अर्थात त्याला मागासलेपण वा प्रतिगामीत्व म्हणावे किंवा नाही, याच्यावर खुप वाद व युक्तीवाद होऊ शकतील. पण मुद्दा तो नाही. नुसते विज्ञान शिकल्याने किंवा त्याची पोपटपंची केल्याने कोणी विज्ञानवादी होत नाही वा पुरोगामी होत नाही. उलट अशीच माणसे अधिक मागासवृत्तीची असू शकतात.
पुरोगामी म्हणजे नव्या युगाकडे डोळसपणे बघणारा असतो आणि नव्या कल्पना वा विचारांचा जागरूकपणे स्विकार करण्यात पुरोगामीत्व सामावलेले असते. पण हल्ली पुरोगामीत्व पोपटपंचीत फ़सलेले आहे आणि नव्या बदलत्या काळापासूनही पुरोगामीत्व खुप मागे पडले आहे. तसे नसते तर आजही राजकारणात विसाव्या शतकातल्या सत्तर वा नव्वदीच्या दशकातल्या कल्पना कवटाळुन बसलेल्यांना पुरोगामी मानले गेले नसते. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात, जगात व भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचा आरंभ झाला. त्या बदलाकडे अजून कित्येक पुरोगामी डोळसपणे बघू शकलेले नाहीत. त्यामुळे बोलायचे पुरोगामी आणि वागायचे प्रतिगामी; अशी स्थिती होऊन बसली आहे. माझ्या एका परिचित महिलेने तिच्या मुलाची जन्मपत्रिका संगणकावर बनवून आणली आणि अभिमानाने ती तशी बनवल्याचे कथन केले होते. त्यापेक्षा असे पुरोगामी भिन्न नसतात. संगणकाच्या युगात यायचे आणि त्याचा उपयोगही करायचा. पण व्यवहारात मात्र पाढे पाठांतराचे जीवन जगायचे; अशी चमत्कारीक स्थिती उदभवते. मुक्त अर्थव्यवस्था येऊन पाव शतकाचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम घडवला आहे. आपोआप त्याचा बहुतांश जनता व लोकांच्या जीवनशैली व विचारांवर प्रभाव पडला आहे. इतके झाले, मग सामाजिक व वैचारीक फ़रकही आमुलाग्र घडून येत असतो. तसा मूलभूत फ़रक भारतातही घडून आला आहे. पण त्याच्यावर चिंतन मनन करणार्यांना मात्र त्याकडे डोळसपणे बघता आलेले नाही. त्यामुळेच वास्तवाशी त्यांचे नाते पुरते तुटलेले आहे. तसे नसते तर पुरोगामी म्हणवणार्यांना नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पातील सकारात्मक बाजू नक्कीच बघता आल्या असत्या. त्यांनी नववर्षाच्या अर्थसंकल्पाकडे बघून नाके तरी नक्कीच मुरडली नसती.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून वा त्यांनी लोकसभेच्या प्रचारात उतरल्यापासून एक मोठा बदल भारतीय मानसिकतेमध्ये घडून आला आहे. सत्तर वर्षापुर्वी वा नंतर सतत लाचार व अगतिक असलेली जनता, गेल्या पाव शतकात बरीच सुखवस्तु झालेली आहे. तिच्या अंगावर भिक म्हणून तुकडे फ़ेकण्याचा जमाना मागे पडला आहे. सरासरी भारतीयाचे वय आज पस्तिशीच्या घरात असल्याची भाषा मोदी साडेतीन वर्षे वापरत आहेत. त्याचा अर्थच भारताची आजची पिढी ही तिशी ते चाळीशीतली आहे, असेच त्यांना सुचवायचे आहे. सहाजिकच ही बहुसंख्य जनता १९७०-८० च्या जमान्याला भूतकाळ मानते आणि एकविसाव्या शतकातल्या नव्या युगात जगणारी आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळेच अशा पिढीचे प्रश्न जुन्या जमान्यातील भूमिका व समजूतीनुसार सुटणारे नाहीत. लोकांच्या अपेक्षा नव्या युगाच्या असतील, तर त्या कालबाह्य मार्ग व विचारांनी पुर्ण करता येणार नाहीत. हे ओळखणारा अलिकडल्या काळातील एकमेव नेता मोदी होत. म्हणूनच त्यांचे आवाहन त्या नव्या पिढीला कळले आणि त्या पिढीने मोदींना प्रतिसाद देऊन सत्तेत आणुन बसवले. त्याचा थांग जुन्याजाणत्या तथाकथित पुरोगाम्यांना लागलेला नाही. तसे नसते तर मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पाकडे जुन्या चष्म्यातून बघितले गेले नसते. त्यावर कालबाह्य मापदंड लावून टिकाही झाली नसती. अन्य पक्ष काहीतरी मूल्यवान वस्तु फ़ुकट वाटण्याचे आश्वासन देऊन मते मिळवण्यात गर्क असताना, मोदींनी त्याशिवाय लोकसभा जिंकली आणि नंतर सव्वा कोटी लोकांना गॅसवर मिळणारे अनुदानही सोडायला लावले, हे शहाण्यांच्या लक्षात आले असते. अनुदान ही भीक असते आणि कायमचे पांगळे ठेवणारी फ़सवी सुविधा असते. हे ओळखलेल्या आजच्या भारतीय जनतेला आता अनुदानाची भीक नको आहे, तर कर्तृत्व दाखवण्याची संधी हवी आहे.
यावेळच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विविध अशा तरतुदी केल्या आहेत, की त्यात शक्य तितक्या मोठ्या लोकसंख्येला आपल्या कर्तृत्वावर उभे करणार्या संधी निर्माण करण्यास प्राधान्य दिलेले आहे. अधिक साक्षर व अधिक आत्मविश्वास असलेल्या आजच्या भारतीयाला, व्यक्तीगत विकासाबरोबर आपला देश व समाजाला जगात महाशक्ती बनवण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी आपणही काही योगदान केले पाहिजे असे वाटू लागलेली ही पिढी आहे. म्हणून तर नोटाबंदीचा त्रास सहन करूनही कोट्यवधी लोक मोदींच्या मोहिमेत सहभागी झाले. तर पुरोगामी शहाण्यांनी त्याला लोकांवर लादलेली नोटाबंदी म्हणून मोदींवर टिकेची झोड उठवली होती. आता नव्या अर्थसंकल्पात नव्या युगाची चाहुल त्या नव्या पिढीला लागली आहे. कारण त्या दुरगामी परिणाम घडवणार्या संकल्पात, त्या पिढीला आपल्याला सशक्त बनवण्याचे प्रयास बघता आले. पण पुरोगामी म्हणवणार्यांना त्यात अनुदान वा खिरापत किती कमी आहे, तेवढेच दिसू शकले. कारण त्यांची मानसिकता अजून अनुदानाधिष्ठीत सत्तरीच्या दशकात रेंगाळते आहे. गरीबीची बदललेली व्याख्या व गरजांमध्ये झालेले बदल, त्यांना बघता आलेले नाहीत. त्यामुळे पुरोगामी म्हणजे नव्या युगाकडे बघणारा, अशी उपाधी धारण करणारेच प्रतिगामी होऊन गेले आहेत. अमावास्येला अर्ज भरायला घाबरावे, तसे हे पुरोगामी नव्या संकल्पातील नव्या संधी बघू शकले नाहीत. त्यातून उगवणारी नव्या विकासाची पहाट त्यांना बघता आलेली नाही. विकास हा व्यक्तीला मिळणारा पैसा किंवा सुविधा यांनी होत नसतो. त्या व्यक्तीच्या व समाजाच्या पुरूषार्थाला मिळणार्या प्रोत्साहनातून विकासाचा मार्ग खुला होत असतो. व्यक्तीला व समाजाला स्वयंभू बनवण्यातून लोकशाही प्रगल्भ होत असते आणि त्याची लक्षणेही ज्यांना ओळखता येत नाहीत, ते पुरोगामी कसे असू शकतील?
No comments:
Post a Comment