Saturday, February 4, 2017

निवडणूकीतले मॅगी नुडल्स

just 2 minute के लिए चित्र परिणाम

सध्या संपुर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा निवडणूकीची धामधूम चालू आहे. कारण दहा महापालिका आणि २५ जिल्हा व तालुका संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा निवडणुका हे राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या प्रत्येकासाठी प्राथमिक परिक्षा असते. पुर्वी प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांची फ़ळी असायची आणि अशा फ़ळीतूनच कनिष्ठ नेतृत्व आकार घेत होते. अशा नेतृत्वाची या स्थानिक मतदानातून जडणघडण केली जायची. तेव्हा राजकारण म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या भाजणे अशी समजूत होती. हल्ली राजकारण म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग मानला जातो. कुठलीही जबाबदारी नसलेला अधिकार मिळणार, म्हणून प्रत्येकाला थेट राजकारणात नाव कमावणे अगत्याचे वाटू लागले आहे. अन्य कुठल्याही क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवण्याची कुवत नसेल किंवा कुशलता नसेल, त्याने राजकारणात जावे, अशीही एक समजुत झालेली आहे. त्यामुळेच राजकारणाचे आकर्षण वाढले आहे. पण कोणी एका दिवसात वा पहिल्याच प्रयत्नात राजकीय नेता होऊ शकत नाही. त्याला अनेक कसोट्या पार पाडाव्या लागतात. काही लोक जन्मानेच राजकारणी होतात. पुढार्‍याच्या पोटी जन्माला आले, मग आपोआप राजकीय वारसा मिळत असतो. ज्यांना तसा वारसा मिळणार नसेल, त्यांना शून्यापासून आरंभ करावा लागतो. अशी शून्यापासून सुरूवात करणार्‍याला इच्छुक उमेदवार म्हटले जाते. प्रत्येक पक्षाकडे अशा इच्छुकांची झुंबड उडालेली असते आणि प्रामुख्याने ज्या पक्षाला आधीच्या मतदानात मोठे यश मिळालेले असते, त्यांच्याकडे अशी गर्दी अधिक असते. त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. कुठल्याही पक्षात सध्या कार्यकर्ते वा नेते घडवण्याची प्रक्रीया कार्यरत नसल्याने, त्यांना उपलब्ध इच्छुकांमधून उमेदवार शोधावे व निवडावे लागत असतात. मग हे इच्छुक कुठून व कसे जन्म घेतात, हे तपासणे मंनोरंजक ठरावे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे पक्ष होते, ते विचारांनी बांधील होते आणि देशाची वाटचाल एका ठराविक भूमिका व विचारांनी व्हावी; अशी संकल्पना घेऊन ते पक्ष निर्माण झालेले होते. म्हणूनच त्या विचारांचे कार्यकर्ते व नेते घडवण्याला प्राधान्य होते. त्या विचारांना जनमानसात बिंबवण्याने पक्षाचा विस्तार करणे. त्या विचाराला जनतेमध्ये पाठींबा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या कटीबद्ध लोकांचा समूह; म्हणजे पक्ष असे मानले जात होते. आता तसा कुठलाही पक्ष शिल्लक उरलेला नसून, कुठल्याही मार्गाने सत्तेपर्यंत पोहोचण्याची धडपड करणार्‍या घोळक्याला, पक्ष असे मानले जाते. जो घोळका त्यात यशस्वी होतो, त्याला तांत्रिक कारणाने पक्ष म्हटले जात असते. पण कुठल्याही पक्षाची काही ठराविक विचारसरणी उरलेली नाही, की बांधिकली राहिलेली नाही. त्यामुळेच पक्षांना वा त्यांच्या नेत्यांना निवडून येऊ शकणार्‍या इच्छुकांची वा उमेदवारांची निकड भासत असते. अशी स्थिती साधारण १९८० नंतरच्या काळात आली आणि आता सार्वत्रिक होऊन गेलेली आहे. अशा राजकीय प्रवाहात हातपाय पसरायचे असतील, तर मते मिळवणे व निवडून येणे ही अगत्याची बाब होऊन जाते. ते काम सामान्य जनतेमध्ये मतपरिवर्तन घडवून शक्य नसते. कारण त्यासाठी जेवढा वेळ लागेल, त्यात सदरहू इच्छुक म्हातारा होऊन जाण्याची भिती असते. त्यामुळेच विचारांपेक्षा मिळणारी मते हीच राजकीय कुवतीची मोजपट्टी झालेली आहे. अशा उमेदवारांची पक्षांना गरज असते आणि म्हणूनच तशा कुवतीचे होण्यासाठी नव्या पिढीतले अनेक तरूण कुशलता संपादन करून मगच राजकीय आखाड्यात उडी घेत असतात. त्यांची पहिली कसोटी पालिका वा पंचायतीच्या मतदानातून लागत असते. तिथे त्यांनी ठराविक मत्ते मिळवण्याची कुवत सिद्ध केली, मग त्यांना पक्षांकडून ऑफ़र मिळायला आरंभ होतो. अशा लोकांना इच्छुक म्हणतात.

सहाजिकच अनेकजण आपापल्या विभागात खिशातले पैसे खर्च करून वा दंडुकेशाहीने; आपला दरारा निर्माण करतात. त्याचा आरंभ कुठल्याही गावात वा गल्लीत फ़लक झळकावून होत असतो. असा महत्वाकांक्षी माणूस आपल्या परिसरात संस्था काबीज करतो, किंवा नव्या संस्था स्थापन करून लोकसेवेचा मुखवटा पांघरतो. कुठल्याही सणासुदीला लोकांना शुभेच्छा देण्यापासून, स्पर्धांचे आयोजन वा यात्रा जत्रांमध्ये लोकांना सुविधा पुरवून तो आपला मनोदय जाहिर करत असतो. त्यातून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा हेतू असतोच. पण त्या भागात लोकप्रतिनिधीत्व करण्यात कोणाला स्वारस्य आहे, त्याची कुणकुण राजकीय पक्षांना लागत असते. त्याची प्रगती व उपयुक्तता, विविध पक्षाचे नेते बघत असतात. त्यामुळेच या इच्छुकाला निवडणुकांचे वेध लागताच चाचपणी करावी लागत असते. त्याचा प्रभाव निर्विवाद असेल, तर प्रत्येक पक्षाकडून त्याला उमेदवारीची ऑफ़र मिळत असते. तसे नसेल तर त्याला स्वत:च पक्षांकडे पायर्‍या झिजवाव्या लागत असतात. कधीकधी तिथे आधीपासून प्रस्थापित असलेल्या कुणा नेत्याशी वैर पत्करून, आपले स्थान अशा इच्छुकाला निर्माण करावे लागते. मग त्या प्रस्थापित नेत्याच्या जागी या नवागताची वर्णी लागते. किंवा प्रतिस्पर्धी पक्ष प्रस्थापित नेत्याला शह देण्यासाठी नवागताला हाताशी धरतो. त्याची ठराविक भागात मते मिळवण्याची कुवत असण्यावर सर्व काही अवलंबून असते. असे इच्छुक कुठल्याही विचारांना बांधील नसतात, तर आपल्याच महत्वाकांक्षेला बांधील असतात. म्हणूनच जिथे उमेदवारी वा सत्तापद मिळेल, तिथे त्यांचा ओढा असतो. म्हणूनच कुठल्याही क्षणी पक्षांतर वा पक्षप्रवेशाला ते एका पायावर सज्ज असतात. असा तयार रेडीमेड माल बाजारात सहज उपलब्ध असल्याने, पक्ष चालवणार्‍या नेत्यांच्या टोळ्यांनी आता कार्यकर्ते नेते घडवणे वा त्यांचे प्रशिक्षण करण्याचा कष्टप्रद मार्ग सोडून दिला आहे.

पक्षांचा ढाचा चालवणारे काही मुठभर ज्येष्ठ वा श्रेष्ठी असतात. त्यांच्या इशार्‍यावर चालणारा कनिष्ठ नेत्यांचा एक जमाव असतो. त्याला आजकाल राजकीय पक्ष असे संबोधले जाते. ज्यांच्यापाशी स्वकष्टाने आपले प्रभावक्षेत्र निर्माण करण्याची कुवत नसते, पण श्रेष्ठींना खुश करून पद मिळवण्याची श्रीमंती वा कला असते; त्यांना गल्लीबोळातून आरंभ करावा लागत नाही. कुठल्याही मार्गाने नेत्याच्या आतल्या गोटात स्थान मिळवले, की त्यांना राजकारणात थेट प्रवेश मिळत असतो. अशा रितीने वरून लादल्या जाणार्‍या वशिल्याच्या नेत्यांचाही एक वर्ग आहे. त्यात प्रस्थापित नेत्यांचे वारस वंशजही असू शकतात. जिथे पक्षाला आपल्या संघटनात्मक बळावर मते मिळवता येतात, तिथे अशा वंशज वा वशिल्याच्या तट्टांची सोय लावली जाते. उलट जिथे पक्षाला स्थान वा बळ नाही, तिथे मात्र स्वबळावर निवडून येणार्‍या होतकरूंना प्राधान्य देणे भाग असते. तो अधिकार ज्यांच्या हाती सामावलेला असतो, त्यांना श्रेष्ठी संबोधले जाते. कुठल्याही निवडणुका आल्या, मग म्हणूनच श्रेष्ठींकडे झुंबड उडत असते. कुवत असो किंवा नसो, पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी श्रेष्ठीपर्यंत पोहोचता आले पाहिजे. ज्या ठिकाणी उमेदवाराला स्वबळावर जिंकणे शक्य असते, त्याला कुठल्या पक्षाची गरज नसते. आमदार, खासदार वा नगरसेवक अशा स्थानिक प्रभूत्वाची महत्वाकांक्षा मर्यादित असेल, तिथे पक्ष गरजेचा नसतो. पण त्यापेक्षाही पुढले पद वा अधिकारपद आवश्यक असेल, तेव्हा पक्ष वा पक्षाशी मैत्री अगत्याची होऊन जाते. त्यासाठीच मग पक्षांतर पक्षप्रवेश, अशा गोष्टींना महत्व असते. पक्षश्रेष्ठींना असे स्थानिक प्रभावी नेते उमेदवार हवेच असतात. ती पक्षाचीही गरज असते. त्यांना व्यक्तीगत मिळणारी मतेही अखेरीस पक्षा़च्या चिन्हावर मिळाल्याने, पक्षाचे बळ वाढत असल्याचे दावे पक्षाला करता येत असतात.

पक्ष म्हणून नांदणार्‍या नेत्यांच्या टोळीला आपली महत्ता राखण्यासाठी गल्लीबोळात प्रभाव टाकू शकणार्‍या नेत्यांची फ़ौज आवश्यक असते. कारण अशाच संख्याबळावर राज्याची वा देशाची सत्ता काबीज करता येत असते. अडीच वर्षापुर्वी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर भाजपाने सत्ता मिळवल्यानंतर, मोठ्या संख्येने विविध प्रांतातले आणि जिल्ह्यातले नेते त्यामुळेच भाजपात दाखल होऊ लागले. त्यांना आपल्या भागात नव्या कोणाला प्रस्थापित होऊ द्यायचे नसते आणि भाजपाला आपला विस्तार व मते वाढल्याचे दाखवायला, अशा लोकांची संख्या मदत करत असते. अशा आधुनिक राजकारणात म्हणूनच कुठल्याही पक्षाला आपली विचारसरणी अगत्याची वाटत नाही, की निष्ठावान कार्यकर्त्याची फ़िकीर राहिलेली नाही. अवघे राजकारण आता मॅगी नुडल्ससारखे झटपट यशाची पाकक्रिया होऊन बसले आहे. प्रत्येकाला विनाविलंब यश व सत्ता हवी आहे. ती मिळवताना त्यात तात्विक आव आणायचा. मॅगीच्या जाहिरातीत जशी त्यातल्या पौष्टीक पदार्थांची जंत्री सांगितली जाते, तसेच राजकीय पक्षांच्या वैचारिक तात्विक पोपटपंचीचे स्वरूप झालेले आहे. कुठल्याही पक्षाला तत्व राहिलेले नाही, तर सत्ता हेच ध्येय झाले असून, त्यासाठी कुठल्याही तत्व विचारांना पायदळी उडवायला सज्ज असेल, त्याला राजकारणात स्थान राहिलेले आहे. त्या बेशरमपणात जो वाकबगार असेल, तो अधिक लौकर यशस्वी होऊ शकतो. अशा बेशरमपणाचे धडे गिरवण्याचा श्रीगणेशा पालिका वा तालुका निवडणूकांमधुन होत असतो. क्रमाक्रमाने त्यानंतर निर्लज्जपणा अंगी भिनत जातो आणि निर्ढावलेपणातून मुरब्बी राजकारणी उदयास येण्याची प्रक्रीया चालू होते. त्यात कोणालाही काळेगोरे संबोधण्याचे कारण नाही. सामान्य जनतेनेही ही लोकशाही स्विकारलेली असून, जाणकार त्यातही पुरोगामी प्रतिगामी शोधून त्याचे शुद्धीकरण करून घेत असतात. आपण सगळेच दिवसेदिवस बेशरम होत चाललो आहोत.

2 comments:

  1. Bhau, you are spot on again. You always write which is in our mind and which others avoid to write due to being 'politically correct'. Salute to you Bhau.

    ReplyDelete
  2. यथा राजा तथा प्रजा ही म्हण बदलून यथा प्रजा तथा राजा असे म्हणायची वेळ आलेली आहे. प्रजाच तत्वशून्य होऊ लागली आहे. जे सामान्य लोक भ्रष्टाचार वाढल्याच्या तक्रार करतात तेच स्वतःचा वेळ अथवा त्रास वाचवण्यासाठी चिरी मिरी देऊन आपले काम करवून घेतात. लोकांना त्रास सहन करायला नकोय. उलटपक्षी लोक याचे समर्थन करतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व काही इन्स्टंट झालेय...

    ReplyDelete