Friday, February 3, 2017

बेअब्रुदारांची पत वाढली

mallya calendar के लिए चित्र परिणाम

ब्रिटनमध्ये दडी मारून बसलेल्या विजय मल्ल्या नावाच्या दिवाळखोर उद्योगपतीने आता आपल्या बिळातून भारत सरकार व इथल्या राजकारण्यांवर आरोप केलेले आहेत. कारण त्याच्या पापांचा पाढा वाचवणारी अनेक कागदपत्रे उघडकीस येत आहेत. आपल्या गुलछबू वर्तनामुळेच लोकांना ठाऊक असलेला विजय मल्ल्या, कंपनीच्या पैशावर मौजमजा मारताना सतत दिसला आहे. भारतात शेकडो लहानमोठे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या अब्जावधीची उलाढाल करणार्‍या कंपन्या आहेत. त्यापैकी कोणी अशी पैशाची उधळण करताना किंवा गुलछर्रे उडवतान दिसलेला नाही. किंबहूना इतक्याच कारणास्तव मल्ल्याच्या व्यवहाराकडे संशयाने बघण्याची गरज होती. सरकारी प्रशासकीय यंत्रणांनी, खुप आधीच या माणसाच्या केवळ वर्तनासाठी त्याचे व्यवहार भिंगातून बघायला हवे होते. शासनाच्या विविध खात्यांमध्ये दक्षता विभाग असतो. त्याला मल्ल्याच्या छानछोकी व उधळपट्टीविषयी शंका कशाला आली नाही? हा पहिला गंभीर प्रश्न आहे. कारण संशय घेणे वा शंका काढण्यासाठीच असल्या व्यवस्था व यंत्रणा उभ्या केलेल्या असतात. कालपरवा नोटाबंदीच्या कालखंडात कर्नाटकातील एक भाजपा नेता व्यापारी, जनार्दन रेड्डी याने मुलीच्या लग्न सोहळ्यावर पाचशे कोटी रुपये खर्च केल्याचा गाजावाजा झाला. तेव्हा सरकारच्या विविध यंत्रणांनी त्याची चौकशी हाती घेतली. तशीच विजय मल्ल्याच्या खर्चिक नाटकांची चौकशी दहापंधरा वर्षापुर्वी कशाला करण्यात आली नाही? एकामागून एक मोठ्या कंपन्या सुरू करून, त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी हा माणुस कशी करू शकला. त्याची शंका तशा यंत्रणांना वा तिथल्या अधिकार्‍यांना आली नसेल, तर त्यांना नालायक म्हणायला हवे. पण अनेकदा वरीष्ठांच्या आदेशामुळे कोणा जबाबदार अधिकार्‍यालाही नालायक व्हावे लागते. मल्ल्याचे प्रकरण तसेच आहे.

हा माणूस वडिलार्जित कंपनीचे अधिकार हाती आल्यावर कंपन्या व त्यांच्या आर्थिक व्यवहाराचे लाभ उठवत, वाटेल तशी उधळपट्टी व चैन करीत सुटला होता. विमान वाहतुक कंपनी काढण्यापासून क्रिकेटचा संघ खरेदी करण्यापर्यंत त्याने अब्जावधी रुपयांची उधळण केली. ती करताना राजकीय नेत्यांपासून कला-क्रिडा क्षेत्रातील व्यक्ती व पत्रकार प्रतिष्ठीतांनाही मेजवान्या दिल्या. त्याच्याहीपेक्षा जुने व नावाजलेले कोणी उद्योगपती अशी उधळपट्टी करताना देशाने कधी बघितलेले नाहीत. मग मल्ल्या ही उधळपट्टी कुठल्या पैशातून करतो आणि त्याच्या कंपन्यांचे व्यवहार कसे आहेत याची शंका; त्या मौजमजेत सहभागी होणार्‍या प्रत्येकाला यायला हवी होती. त्यामध्ये माध्यमातले नावाजलेले पत्रकारही आले. आज माध्यमातलेच पत्रकार विविध कागदपत्रे शोधून मल्ल्यावर आरोपाची आतषबाजी करीत आहेत. पण जेव्हा ही लूटमार तो इसम करीत होता, तेव्हा यापैकी कोणा पत्रकाराला असे प्रश्न कशाला पडलेले नव्हते? आज विविध पक्षाच्या राजकारण्यांना वा अधिकार्‍यांना जाब विचारणार्‍या पत्रकार प्रश्नकर्त्यांच्या मुसक्या; सहासात वर्षापुर्वी कोणी बांधल्या होत्या काय? प्रामुख्याने अर्थविषयक पत्रकारीता करणार्‍या पत्रकारांना मल्ल्याच्या दिवाळखोरीची तेव्हा कल्पनाच नव्हती, असे कोणी म्हणू शकत नाही. कारण अशी मंडळी आर्थिक व्यवहारातले जाणते असतात आणि कुठलीही कंपनी कोणते बोगस व्यवहार करते आहे, त्याची शंका घेण्याइतकी तैलबुद्धी या लोकांपाशी नक्की असते. पण मल्ल्याने आपल्या पापाच्या उधळपट्टीत अशाही लोकांना सहभागी करून घेतलेले होते. म्हणूनच संपुर्ण दिवाळे वाजेपर्यंत कोणी त्याविषयी अवाक्षर बोलायला राजी नव्हता. जोपर्यंत मल्ल्या फ़रारी झाला नव्हता, तोपर्यंत पत्रकारही चिडीचुप होते. कारण माध्यमेही त्या पापातले भागिदार होती. आता प्रत्येकजण मल्ल्याकडे बोट दाखवतो आहे.

मुद्दा एकट्या मल्ल्याचा नाही, किंवा त्याने केलेल्या लूटमारीपुरताही नाही. त्याने तर परदेशी पळून जात आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिलेली आहे. इथे त्याच्याकडे आता बोट दाखवणार्‍या प्रत्येकाचा पापातला सहभाग मल्ल्या सांगू लागला आहे. त्याच्या विरोधात आरोपांची सरबत्ती झाली, तेव्हा ती करणार्‍या माध्यमातील शहाण्यांना मल्ल्याने राजरोस धमकीही दिलेली होती. ज्यांनी आजपर्यंत आपल्याकडून विविध प्रकारचे लाभ उठवले, त्यांची फ़क्त नावे व यादीच आपल्यापाशी नाही. अशा पत्रकारांसह मान्यवरांचे पुरावेही आपल्यापाशी आहेत, असेच मल्ल्याने खुलेआम सांगून टाकले होते. पण आजपर्यंत कोणाही एका शहाण्याने मल्ल्याच्या आरोपाचा इन्कार केला नाही. सरकारी बॅन्का म्हणजे पर्यायाने जनतेचा पैसा मल्ल्या लुटत होता आणि त्यातून जी मौजमजा करीत होता, त्यात त्याने सर्वांना सहभागी करून घेतले होते. म्हणूनच त्याच्या चोरीमारीविषयी इतके मौन राखले गेले. आता चाललेला गदारोळ म्हणजे, पापात सहभागी नसल्याचा निव्वळ कांगावा आहे. मल्ल्या मेजवान्या देत होता आणि विविध आलिशान सुविधाही पुरवत होता. त्याचे लाभ सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उचलले. पण ते घेताना पैसा पापाचा आहे किंवा प्रामाणिक आहे; त्याविषयी मौन धारण केलेले होते. अशी आजच्या भारतीय अभिजन वर्गाची कहाणी आहे. पण असे लोक एका बाजूला मल्ल्याला जाब विचारत आहेत आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांनाही जाब विचारत आहेत. चिदंबरम वा मनमोहन सिंग यांनी भले मल्ल्याच्या पापाला प्रोत्साहन दिलेले असेल. पण त्याविषयी तेव्हाच जाब विचारण्याचे कोणाचे कर्तव्य होते? अर्थविषयक पत्रकारिता करणार्‍यांची ती जबाबदारी नव्हती काय? किती पत्रकार व अर्थशास्त्री त्या कर्तव्याला जागलेले आहेत? नसतील, तर त्यांनी आज मल्ल्या वा राजकारण्यांना जाब विचारण्याचा त्यांना नैतिक अधिकार उरतो काय?

भारतातला अवघा अभिजनवर्ग किती बेशरम व कोडगा झाला आहे, त्याचे मुर्तिमंत प्रतिक म्हणजे विजय मल्ल्या व त्याच्या किंगफ़िशर कंपनीने केलेली दिवाळखोरी आहे. सामान्य शेतकरी काही हजाराचे कर्ज घेतो आणि ठरलेल्या मुदतीमध्ये फ़ेडता आले नाही, तर घरावर जप्तीची वेळ आली म्हणून गळफ़ास लावून आत्महत्याही करीत असतो. त्याला आपल्या देशात सामान्य जनता म्हणतात. त्याला समाजात कुठली प्रतिष्ठा नसते की बाजारात त्याची कुठली पत नसते. पण अब्रु हीच त्याची खरी प्रतिष्ठा असते आणि तिला कुठल्याही अधिकृत बॅन्क व्यवहारात तारण म्हणून स्विकारले जात नाही. विजय मल्ल्या किंवा त्याचा पाहुणचार घेतलेले समाजातील बहुसंख्य प्रतिष्ठीत, तसे अब्रुदार नसतात. म्हणूनच बहुधा त्यांना बॅन्क व्यवहारात पत असावी. अब्रु नसणे ही आजच्या आर्थिक व्यवहारातील सर्वात मोठी पत झालेली आहे. तसे नसते तर विजय मल्ल्या दिवाळखोर असूनही त्याला आणखी कर्ज देण्यासाठी मनमोहन वा चिदंबरम यांनी शिफ़ारशी केल्या नसत्या. किंवा बॅन्कांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनीही त्याला पुढले कर्ज दिले नसते. अब्रु शेतकर्‍याकडे वा कुठल्याही सामान्य गरीब भारतीयाकडे असते. मुलीचे लग्न व्हावे किंवा मुलाला उच्चशिक्षण घेता यावे, म्हणून तो शेती गहाण टाकून कर्ज घेतो आणि फ़ेडता आले नाही म्हणून गळफ़ास लावून मरतो. बुडवेगिरी हे त्याला पाप वाटते. मल्ल्या व त्याच्याकडे खास मेजवान्या झोडणार्‍यांना मात्र बुडवेगिरी ही़च प्रतिष्ठा वाटते. सर्वक्षेत्रातील मान्यवरांनाही असे बुडवेच प्रतिष्ठीत वाटतात. किंबहूना बुडवेगिरी व कायदेशीर दरोडेखोरी, हल्ली आपल्या समाजातील प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे आणि तीच बॅन्क व्यवहारातील पत झाली आहे. तसे नसते तर विजय मल्ल्या इतक्या उजळमाथ्याने नऊ हजार कोटी रुपयांची दरोडेखोरी कशाला करू शकला असता?

1 comment: