प्रचारात शिमगाही असतोच. तिथे कुठलेही मुद्दे मांडण्यापेक्षा आपले विरोधक कसे नाकर्ते आहेत, तेच सांगण्याची स्पर्धा चालत असते. म्हणूनच राजकीय मंचावरून आपल्या प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे, अशी कोणाची अपेक्षा नसते. पण विरोधात बोलताना वा निंदा करतानाही काही तरी लक्ष्मणरेषा राखली जावी, इतकी अपेक्षा नक्की असते. उत्तरप्रदेशाच्या प्रचारात अशा लक्ष्मण्रेषा रोजच्यारोज ओलांडल्या जात आहेत. अर्थात त्याला माध्यमेही तितकीच जबाबदार आहेत. कारण कुठल्याही पक्षाच्या नेत्याने कधी उत्तम व मुद्देसूद भाषण केल्यास त्याला प्रसिद्धी मिळतेच असे नाही. उलट कोणी काही वाह्यात बडबड केली, तर त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळत असते. बहूधा त्यामुळेच काहीतरी वावगे बोलण्याकडे राजकीय वक्ते प्रवक्त्यांच्या कल अलिकडे वाढलेला असावा. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: गुजरातचे असल्याने वा्राणशी उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र म्हटल्याने कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नव्हते. तरीही त्यावरून विपरीत भाष्ये झालीच. मोदींना बाहेरचे वा उपरे ठरवण्यामुळे असला प्रकार सुरू झाला. अखिलेशच्या जोडीला राहुल गांधी आले आणि आता त्यांना ‘युपीके लडके’ म्हणून पेश केले जात आहे. पण मग हे राहुल गांधी अन्य कुठल्या राज्यात प्रचार करायला कशाला जातात? उत्तराखंडात वा बिहार, आसाममध्ये त्यांचे काम काय? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशाचा पंतप्रधान असूनही मोदी उत्तरप्रदेशचे कोणी नसतील, तर राहुलचा अन्य राज्यांची संबंध काय? त्याला जन्म देणार्या इटालीच्या कन्येचा भारताशी संबंध काय, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण त्याविषयी बोलले तरी गदारोळ करण्यात आला होता. मात्र तेच कल्लोळ करणारे कोणी आज उलटून प्रियंका दत्तकपुत्रा विषयी बोलल्यानंतर जाब विचारताना दिसले नाहीत. ही भारतीय बुद्धीवादाची शोकांतिका आहे.
सोनिया गांधी या जन्माने भारतीय नाहीत, म्हणून त्यांना कॉग्रेसचे नेतृत्व देण्याविषयी प्रश्न विचारले गेले होते. पुढे त्याच देशाच्या पंतप्रधान व्हायला सरसावल्या, तेव्हा ज्यांनी कोणी जन्मस्थानाचा प्रश्न विचारला, त्यांना संकुचित ठरवण्याची बौद्धिक स्पर्धा रंगलेली होती. म्हणजे कोणी सोळा वर्षे भारतात वास्तव्य करूनही नागरिकत्व घेत नाही आणि नवरा पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर भारतीयत्व स्विकारतो, तो अधिक अस्सल भारतीय असतो. पण भारतीय मातेच्या पोटी जन्म घेतलेला एक गुजराती भूमीपुत्र, उत्तरप्रदेशात येऊन उभा राहिला, तर उपरा असतो. तसा अरोप झाल्यावर त्यातला संकुचितपणा दिसत नसतो, त्याला बुद्धीवादी दृष्टी म्हणतात ना? अन्यथा प्रियंकाच्या विधानावरून काहूर माजले असते. पण प्रियंकाने मोदींना उपरे ठरवण्यापर्यंत देशातल्या तमाम पुरोगामी शहाण्यांच्या बुद्धीला उपरा वा घरचा यातला फ़रक कळत नसतो. आपल्याच आईच्या बाबतीत हा विषय झालेला आहे, याचेही भान ज्या मुलीला राखता येत नाही, तिचे कौतुक करण्यात रमलेल्यांना शहाणे म्हणायचे काय? तुमची बुद्धी शाबुत असेल तर सोनियांवर प्रश्नचिन्ह लावण्यावेळी जी गोष्ट खटकली, तीच गोष्ट मोदींच्या दत्तक विधानानंतर खटकली पाहिजे. पण तसे होऊ शकले नाही, होणारही नाही. शिव्याशाप खाण्यासाठीच मोदींचा जन्म झालेला असतो आणि गांधी खानदानात जन्मलेल्या कोणीही काहीही अपशब्द बोलल्यास ते सुविधार असतात. असा युक्तीवाद करण्याला शहाणपणा मानण्याची प्रथा आहे. म्हणूनच प्रियंकाच्या असभ्य बोलण्याचेही कौतुक झाले. असाच शहाणपणा देशात प्रचलीत झालेला असेल, तर गाढवपणा कशाला मागे राहिल? उत्तरप्रदेशच्या विद्यमान तरूण मुख्यमंत्र्याने आपलाही गाढवपणा शहाणपणाच्या पंगतीत आणून बसवला, तर नवल कुठले?
उत्तरप्रदेशात सध्या भाजपाची लढाई दोन नेते लढवत आहेत आणि योगयोगाने ते दोघेही गुजराती आहेत. त्यातला एक भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तर दुसरा देशाचा पंतप्रधान आहे. अशा दोन राष्ट्रीय नेत्यांना गाढव ठरवण्यापर्यंत अखिलेश यादव यांनी मजल मारली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच पर्यटन विकासाला त्यांनी प्राधान्य दिले आणि त्यासाठी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांची मदत मागितली होती. त्यांनीही मोठ्या मनाने गुजरातच्या पर्यटन विकासाला हातभार म्हणून या जाहिराती केल्या. त्यात गुजरातमध्ये बघण्यासारख्या प्रेक्षणिय परिसराची जाहिरातीतून ओळख करून देण्याला हातभार लावला आहे. त्यामध्ये कच्छ या वाळवंटी प्रदेशात जंगली गाढवांच्या झुंडी आहेत आणि त्याच्यासाठीही अभयारण्य उभारलेले असल्याची माहिती जगाला झालेली आहे. अन्यथा गाढवांचीही जंगली जमात असते, हे किती लोकांना ठाऊक होते? तर अशा जाहिरातीचा संदर्भ घेऊन अखिलेश यादव यांनी मोदी व शहा यांना गाढव ठरवण्यापर्यंत मजल मारलेली आहे. अमिताभ यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार बंद करावा, असे आवाहन या तरूण मुख्यमंत्र्याने केलेले आहे. टिका वा विनोदही समजू शकतो. पण तो नेमका व बोचरा असला तरी व्यक्तीगत हेटाळणी व अवहेलना करणारा नसावा. याचे भान प्रियंकाला उरलेले नसेल तर अखिलेशलाही असायचे कारण नाही. अर्थात राहुलच्या संगतीत आल्यावर या मुख्यमंत्र्याने बेताल होण्यालाही पर्याय नव्हता. अन्यथा त्याने पंतप्रधानाला गुजरातचे गाढव ठरवण्यापर्यंत खालची पातळी नक्कीच गाठली नसती. राहुल त्या पातळीला कधीच गेलेले आहेत. त्यांनी खुन की दलाली अशी शेलकी भाषा वापरून आपली गुणवत्ता सिद्ध केलेलीच होती. आता अखिलेशनेही आपला गाढवपणा सिद्ध केला, इतकेच म्हणता येईल.
अमिताभ बच्चन राजकारणात नाहीत. पण त्यांची पत्नी राजकारणात आहे आणि अखिलेशच्याच समाजवादी पक्षाची राज्यसभेतील सदस्य आहे. दहा वर्षापुर्वी उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि तेव्हाही अमिताभ बच्चन यांची एक जाहिरात सर्वच वाहिन्यांवर झळकत होती. त्यातला अमिताभ मुलायमच्या राज्यालाच ‘उत्तमप्रदेश’ असे संबोधत असल्याने टिका झाली होती. कारण तेव्हा उत्तरप्रदेशात गुंडगिरीने उच्छाद मांडल्याचा गाजावाजा अखंड चालू होता. किंबहूना त्यामुळे समाजवादी गुंडगिरीला कंटाळलेल्या व ग्रासलेल्या मतदाराने राज्याची सत्ता मायावती यांच्याकडे सोपवण्याचा कौल दिला होता. तेव्हा अमिताभने कोणत्या गुंडाचा प्रचार केला, असे अखिलेशला म्हणायचे आहे? गुजरातच्या गाढवांची जाहिरात बोलणार्यांना त्याच अमिताभच्या उत्तमप्रदेशची जाहिरात का आठवत नाही? अशा विधानातून व भाषेतून पायाखालची वाळू सरकल्याचीच साक्ष दिली जात असते. मोदी सरकार वा त्याचा कारभार याविषयी बोलण्यापेक्षा गुजरातच्या गाढवांचा आडोसा अखिलेशला घ्यायची वेळ आली असेल, तर कसली धडकी भरली आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. ‘काम बोलता है’ अशी आपल्या प्रचाराची जाहिरात या तरूण मुख्यमंत्र्याने केली आहे. आपल्या कामाविषयी अधिक बोलले तर गुजरातच्या गाढवावर बसण्याची पाळी कशाला आली असती? पण राहुल गांधींना सोबत घेतल्यापासून अखिलेश सायकल चालवायचे विसरून गेले आहेत. सायकलने लखनौला पोहोचण्याचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे. म्हणूनच त्यांना गुजरातची गाढवे आणुन त्यावर स्वार होण्याचा मोह टाळता आलेला नसावा. अन्यथा गुजरातची जाहिरात बघण्यापेक्षा आपल्याच उत्तमप्रदेशच्या जाहिरातीचे स्मरण झाले असते आणि त्यांनी निंदानालस्तीपेक्षाही आपल्याच कामाचे प्रचारात अधिक भांडवल केले असते.
No comments:
Post a Comment