Saturday, February 25, 2017

गड आला पण सिंह गेलामहापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, ती शिवसेनेसह अन्य प्रमुख राजकीय पक्षांसाठी चिंतनीय आहे. याचे पहिले कारण म्हणजे बिगरकॉग्रेसी राजकारणात आपले असलेले प्रथम स्थान सेनेने गमावले आहे. यावेळी युती संपवून सेनेने आपल्या बळावर निवडणूका लढवल्या होत्या. त्यामध्ये राज्यात अन्यत्र नाही, तरी मुंबई-ठाण्यात सेनेला आपले वर्चस्व दाखवता आले पाहिजेच होते. १९६८ सालापासून मुंबई ठाण्यातील बिगरकॉग्रेसी राजकारणाची जागा हळुहळू शिवसेनेने व्यापली होती. किंबहूना महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापुर्वी जे कॉग्रेसेतर पक्ष मुंबईत होते, त्यांना पर्याय म्हणून शिवसेना उभी रहात गेली होती. त्यामुळेच निदान महापालिकेत शिवसेनाच कॉग्रेसला पर्याय होता आणि पुढे हिंदूत्वाचे राजकारण सुरू झाल्यावर भाजपा सोबतही सेनेचाच मोठा हिस्सा राहिला होता. बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर सेनेचा दबदबा संपला, असे म्हटले जात होते. तेव्हाच सेनेच्या नव्या नेतृत्वाने सावध व्हायला हवे होते. कारण अन्य पक्षांपेक्षाही मित्र भाजपाकडूनच असे अनेकदा बोलले जात असायचे. पण सेनेचे पक्षप्रमुख जनतेत मिसळण्यापेक्षा आपल्या कंपूबाज सल्लागारांमध्ये सतत मशगुल असतात. म्हणूनच लोकसभेत यशस्वी झाल्यावर भाजपाने मोठा हिस्सेदार म्हणून भूमिका घेतल्यावर शिवसेनेची गाळण उडाली आणि आपल्या बळावर लढायची पाळी सेनेवर आली. बाळासाहेबांच्या जागी पक्षाध्यक्ष झाल्यामुळे उद्धव ठाकरे तितके अनुभवी वा मुरब्बी होऊ शकत नव्हते. पण त्याचे भान त्यांनी कधीच ठेवले नाही आणि शिवसेना सतत अडचणीत येत गेली. बाळासाहेबांचा नुसता रुबाब घेऊन चालणार नव्हते, तर त्यांच्याइतकेच लवचिकही होण्याची किमया आवश्यक होती. त्याचा विसर पडल्याने शिवसेनेची आज ही अवस्था झालेली आहे. आपला बालेकिल्लाही टिकवण्याची कसरत सेनेला करावी लागते आहे.

मागल्या पालिका निवडणूकीत मनसेचे आव्हान समोर असताना व भाजपा मित्र म्हणून सोबत असताना, उद्धव ठाकरे यांनी सेनेला पुन्हा पालिकेच्या सत्तेपर्यंत आणुन बसवले होते. पण रागावून बाजुला झालेल्या चुलत भावाने आपली शक्ती तेव्हाच दाखवून दिलेली होती. मनसे म्हणून आपला वेगळा पक्ष काढणार्‍या राज ठाकरे यांनी मुंबई स्वबळावर २८ जागा जिंकल्या होत्या आणि मुंबईबाहेरही आपला प्रभाव दाखवला होता. त्यामुळेच भाजपाने मैत्री तोडण्याचा निर्णय घेतल्यावर मनसेला जवळ घेण्याचा विचार सेनेकडून व्हायला अजिबात हरकत नव्हती. नाहीतरी मनसे ही सेनेचीच बाजूला झालेली शाखा होती आणि दोघांचा अजेंडाही समानच होता. विधानसभा संपल्यावर सेनेची खुप तारांबळ झाली. तरी त्यातून सावरण्याचे कुठलेही मोठे प्रयास शिवसेनेने केले नाहीत. म्हणूनच अधिक किंमत आता मुंबई या आपल्या हमखास बालेकिल्ल्यात मोजण्य़ाची पाळी सेनेवर आलेली आहे. जिथे हक्काने अनेक वर्षे महापौर बसवला, तिथे आज त्याच पदासाठी सेनेला आकडे जोडण्याची कसरत करावी लागत आहे. त्याला दुसरा कोणीही जबाबदार नसून पक्षप्रमुख व त्यांचे विश्वासातील सल्लागार सहकारीच काररणीभूत झाले आहेत. हे दुर्दैव त्यांनीच स्वत:वर ओढवून आणलेले आहे. नसत्या अहंकाराच्या नादी लागल्याने त्यांना या स्थितीला सामोरे जावे लागत आहे. आताही निकालानंतर कोंडी झाली असताना, इतिहासाचे दाखले देण्याची हौस गेली नसल्याने शास्ता खानाची बोटे छाटल्याचे हास्यास्पद दावे सेनेकडून करण्यात आलेले आहेत. पण त्याच पद्धतीचे एक विधानही इतिहासात नोंदले गेले आहे. ज्याला गड आला पण सिंह गेला असे म्हणतात. मुंबईचा आपला सिंहाचा अवतार सेनेला कशाला गमवावा लागला आहे? त्याला कुठला गड कारणीभूत झाला आहे? मुंबईतही सेनेची ही दुर्दशा अहंकाराने केलेली आहे.

मागल्या पालिका मतदानात शिवसेनेचा गड मानल्या जाणार्‍या दादर शिवाजीपार्क भागातून सातही नगरसेवक मनसेचे निवडून आले होते आणि त्याच पक्षाचा आमदार सुद्धा आलेला होता. यावेळी सेनेने आमदारकी जिंकली होती आणि आता सर्व सात नगरसेवक आणायचा चंग बांधला होता. त्या जागा मनसेकडे असल्याने खरी लढाई मनसेशी अशीच ठाम समजूत सेनेने करून घेतली होती. पण नुसत्या दादरच्या सात जागा महत्वाच्या नव्हत्या, तर मुंबईचा महापौर असलेला सिंह सुद्धा आपलाच हवा, याचा विसर पडला होता. तसे नसते तर भाजपाशी युती तोडल्याच्या घोषणेनंतर मनसेने मैत्रीचा पुढे केलेला हात, सेनेने हातात घेतला असता. तसे झाले असते तर सेनेवर आज बहूमत हुकण्याची वेळ आलीच नसती. कुठल्याही अटीशिवाय जागावाटपासाठी मनसेतर्फ़े बाळा नांदगावकर हा राज ठाकरेंचा निकटार्तिय सहकारी थेट मातोश्रीवर पोहोचला होता. पण त्याची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. तिथे कुठल्याही पक्षातून सेनेत दाखल व्हायला येणार्‍या किरकोळ लोकांसाठी व त्यांच्या हाती शिवबंधन बांधण्यासाठी पक्षप्रमुखांना मोकळा वेळ होता. पण चुलत भावाचा सहकारी आला, त्याला भेटण्याची सवड झाली नाही. त्यामुळे नांदगावकर यांना हात हलवत माघारी जावे लागले. त्याची किती मोठी किंमत सेनेला मतदानात मोजावी लागली, त्याचे नेमके आकडे अजून समोर आलेले नाहीत. पण एका अभ्यासू गृहस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जागी मनसेमुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्याचा अर्थ असा, की तशी मतविभागणी झाली नसती, तर सेनेला ८४+३१ म्हणजे ११५ जागा जिंकता आल्या असत्या. त्याखेरीज जागावाटपाने मनसेला गेलेल्या आणखी २०-२५ जागाही मदतीला हाताशी राहिल्या असत्या. पलिकडे तितक्याच जागा भाजपाला मिळू शकल्या नसत्या. बरोबरीने दिसणारा भाजपा ५०-५५ पर्यंत येऊन थबकला असता.

थोडक्यात मनसेच्या शांतीदूताला मातोश्रीवरून हात हलवत परत पाठवून देणार्‍यांना, दादरचा गड राखायचा होता आणि त्यासाठी मुंबईचा सिंह गमावण्याची पाळी आली तरी पर्वा नव्हती. राज वा नांदगावकर यांनी नंतर दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कुठल्या जागांचा हट्ट केलेला नव्हता की जागांच्या संख्येचाही आग्रह धरला नव्हता. भाजपाने मराठी बाण्याला उभे राहिलेले आव्हान परतून लावण्यासाठी मनसेने हा पुढाकार घेतला होता. ती मनसेची अगतिकता होती तरी त्यात सेनेचा कुठलाही तोटा नव्हता. मग मनसेचा प्रस्ताव सर्व वाहिन्यांवर थेट पोहोचला होता आणि आपल्याकडे तो आलाच नाही, असे सेना नेतृत्वाने सांगण्यात काहीही अर्थ नव्हता. त्यात फ़क्त अरेरावी किंवा उद्दामपणा सामावलेला होता. आपल्या गरजेचेही भान नव्हते, की निवडणुकीतून काय साध्य करायचे आहे, त्याचेही भान उरलेले नव्हते. सहाजिकच ही निवडणूक पुर्ण शक्तीने लढण्यात रस नसतानाही मनसेला मैदानात उतरावे लागले. त्या पक्षाने प्रामुख्याने मराठी मतांचीच विभागणी करण्याखेरीज काहीही केले नाही. किंबहूना आपल्या अहंकारासाठी सेना नेतृत्वाने मनसेला तसे करायला जणू भागच पाडले. २००९ च्या विधानसभा मतदानात सेनेला मोठा फ़टका बसला, तेव्हा याच उद्धव ठाकरे यांनी मनसेवर मतविभागणीचे पाप केल्याचा आरोप केला होता. आज त्याच पापाचे परिमार्जन करायला पुढे आलेल्या मनसेला नकार देऊन, सेनेने काय साधले? तेच पाप सेनेकडून झाले. पण फ़टका पुन्हा सेनेलाच बसला आहे. कारण यावेळी मनसेची अपेक्षा कसलीच नव्हती. पण सेनेसाठी ही लढत अटीतटीची झालेली होती. भाजपाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्याची गरज सेनेला होती आणि त्यात मिळेल त्याची साथ घेणे सेनेला लाभदायक ठरणार होते. पण त्याचे साधे भान पक्षप्रमुखांना नव्हते, की त्यांच्या भोवताली दबा धरून बसलेल्यांना नव्हते. निकाल समोर आहेत.

उत्तरप्रदेशात मायावती दलित मताची मक्तेदारी सांगतात. पण त्यांच्या जातव समाजाच्याही पलिकडे अल्पसंख्येने दुसराही दलित समाज घटक असून, त्यांचा अपना दल नावाचा छोटासा दुबळा पक्ष आहे. तो जितकी मते मिळवतो, त्यातून आमदारही निवडून येणे शक्य नसते. पण त्याला सोबत घेण्यातून भाजपाला ८० पैकी ७१ जागी जिंकणे शक्य झाले. बदल्यात त्याही पक्षाचे दोन खासदार लोकसभेत प्रथमच निवडून आले. पण भाजपाला किमान ३०-४० जागी तरी अपना दलाने विजयाची आघाडी मिळवून दिली होती. आज मुंबईचा बालेकिल्ला धोक्यात असताना मनसेला सोबत घेऊन, शिवसेना थेट बहूमतापर्यंत जाऊन धडकली असती आणि बदल्यात कदाचित मनसेही आपल्या जागांची संख्या कायम राखू शकली असती. म्हणजेच पर्यायाने भाजपाच्या विजयाचा वारू मुंबईत तरी दोघा भावांनी रोखलेला दिसला असता. परंतु संपवायचे कोणाला व कशाला प्राधान्य आहे, त्याचाच थांगपत्ता नसलेल्या सेना नेतृत्वाने मनसेला धडा शिकवताना, आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे आता मुंबईत महापौर आपलाच बसवण्यासाठी कोलांट्या उड्या मारण्याची वेळ आलेली आहे. अहंकाराला मुरड घालून मनसेला सोबत घेतले असते, तर गडही राखता आला असता आणि सिंहही खात्रीपुर्वक आलाच असता. पण ऐतिहासिक वाक्ये वा उदाहरणांचा अति सोस असलेल्या शिवसेनेच्या काही लोकांना तेच काय बोलतात, त्याचाही अर्थ उमजलेला नसतो. म्हणून आज अवघ्या महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर सेना फ़ेकली गेली आहे आणि मुंबईत पहिला क्रमांक राखतानाही भाजपापेक्षा अवघ्या दोनच जागा अधिक मिळवण्याची शेखी मिरवण्याची नामुष्की आलेली आहे. अर्थात इतके होऊनही सेनेचा पवित्रा व बडबड बघितली तर काय गमावले, त्याचेही भान कोणाला दिसत नाही. राहुल गांधींच्या थाटात सर्व काही चान चालू आहे.


4 comments:

 1. भाजपाला धडा शिकवण्याच्या नादात सेना.. हा ' निखार्यावरचा ' खेळ खेळू शकेल ...??
  ..
  ..
  मातोश्री वर गुप्त प्लॅन चालू...
  उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण

  मुंबई महापौर निवड...
  1) शिवसेना -84
  2) काँग्रेस -31
  3) राष्ट्रवादी - 9
  Total -124 (114 +बहुमतासाठी)

  त्या बदल्यात राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार
  1)शिवसेना -63
  2)काँग्रेस -42
  3) राष्ट्रवादी - 41
  Total- 146 (144 + बहुमतासाठी)

  भाजप ला मुंबई सह राज्यात धक्का

  ReplyDelete
  Replies
  1. ही शत प्रतीशतचे उद्दिष्ट असलेल्या भाजपा साठी सुसंधी असेल आणि बाकीच्या पक्षासाठी आत्मघात.

   Delete
 2. Uddhav is neither a clever politician nor a historian. He won't learn as his ego is superbig. He will only take sena to more and more low levels in future. It's unfortunate.

  ReplyDelete
 3. आज तर मी शिवसेना मनसे मिलन सिद्धांत? असा पूर्ण लेखच लिहिलेला आहे... भाऊ आपण हा वाचवा अन प्रतिक्रिया द्यावी... हे माझं मत आहे जे चूक असू शकतं... खालील लिंक वर सविस्तर वाचा...
  http://latenightedition.in/wp/?p=2399

  ReplyDelete