Friday, February 3, 2017

बंडखोरी आणि पक्षांतर

सदाकांत ढवण के लिए चित्र परिणाम

१९६८ सालात प्रथमच शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला; तेव्हा आजच्यापेक्षा नेमकी उलटी स्थिती होती. कारण शिवसेना निरागस तरूणांची संघटना होती आणि त्यात बहुतांश कार्यकर्त्यांचा भरणा होता. सहाजिकच त्यांना फ़क्त उमेदवारांचे काम करण्याचे ठाऊक होते. भाषणे वा प्रतिनिधीत्व करणे म्हणजे काय, त्याचाच पत्ता नव्हता. अशावेळी उमेदवार मिळवतानाही घावाधाव झालेली होती. जे उभे केले आणि निवडून आले; त्यामध्ये म्हणूनच शिक्षकांचा मोठा भरणा होता. गवंडे, हळदणकर, महाडिक, जोशी, तावडे अशा काही ट्युशन क्लासवाल्यांचा भरणा होता. लालबागमध्ये वराडकर नावाचा शाखाप्रमुख होता. त्याने उमेदवारी घेण्यापेक्षा हळदणकर यांचे काम करण्यास प्राधान्य दिले. डझनभर तरी क्लासवालेच तेव्हा सेनेचे नगरसेवक झाले. दुसरीकडे परळमधून विजय गावकर नावाचा अगदी कोवळा पोरगा नगरसेवक झाला होता. मग राजकारण हळुहळू शिवसैनिकातही भिनत गेले. त्यामुळे उमेदवारी मिळवण्याला किंवा आपले अधिकारपद टिकवण्याला प्राधान्य मिळत गेले. तेव्हाचा विभागप्रमुख असलेले दिवाकर रावते; १९८५ पर्यंत नगरसेवक होऊ शकले नाहीत, की त्यांनी कधी तिकीटही मागितले नव्हते. पण पाच वर्षात राजकारण इतके मुरत गेले, की शिवसेनेतही फ़ाटाफ़ुट व पक्षांतराचे बीज सेनेत रुजत गेले. त्या पहिल्या नगरसेवकातले अनेकजण निष्ठा वगैरे विसरून पुढल्या पालिका निवडणूकीत शिवसेना सोडून गेले होते. त्यामध्ये दादर नायगावचे दादा परब, पार्ल्याचे नागवेकर, गिरगावचे सोमेश्वर गोखले इत्यादींचा समावेश होता. मात्र अपवादानेच शिवसेनेतून पक्षांतर करणार्‍यांना पुन्हा निवडणूका जिंकता आल्या. आज तिकीट मागण्याच्या हाणामारीमुळे ह्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

शिवसेनेच्या उदयानंतर देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली, ती इंदिराजींचा उदय! इंदिराजींनी कॉग्रेस फ़ोडली आणि नंतर इंदिरालाट आली. लोकसभा व विधानसभेतही इंदिरालाट चालली आणि त्यात सेनाही वाहून गेली होती. त्या लाटेतच अनेक सेना नगरसेवक कॉग्रेसमध्ये दाखल झाले होते. पण या लाटेत त्यापैकी कोणाला निवडून येणे शक्य झाले असेल, तर बहुधा पार्ल्याचे नागवेकर आणि सातरस्त्याचे रमेश लब्दे यांना! तसे लब्दे ६८ सालात पहिल्या फ़ेरीत पराभूत झाले होते आणि नगरसेवक प्रथम़च झाले कॉग्रेसकडून! बाकी कोणाला पक्षांतराचा लाभ झाला नव्हता. बंडखोरी मात्र शिवसेनेच्या पहिल्याच पालिका निवडणूकीपासून झालेली होती. त्या १९६८ च्या निवडणूकीत सेना व प्रजा समाजवादी पक्षाची युती झालेली होती. त्यात नायगावच्या भोईवाडा भागाची जागा प्रसपला मिळालेली होती. इथल्या शाखाप्रमुख सदाकांत ढवण व अन्य शिवसैनिकांना ते मानवले नाही. त्यांनी ढवणला अपक्ष म्हणून उभे केले होते. त्यात युतीला ती जागा गमवावी लागली. पुढे कसल्या तरी कारणाने झालेल्या हाणामारीत ढवणची हत्या झाली. अपना बाजार समोरच्या भोईवाडा मैदानाला त्याच सदाकांत ढवणच्या नावाने आज ओळखले जाते. दुसरी गोष्ट, त्या पहिल्या फ़ेरीत नगरसेवक झालेले प्रमोद नवलकर १९७२ सालात आमदार झाले. त्यांनी पुन्हा पालिका निवडणूक लढवली नाही. १९७७ सालातल्या जनता लाटेत अनेकजण सेनेतून जनता पक्षात गेले, त्यात सेनेचे पहिले महापौर माहिमचे डॉ. हेमचंद्र गुप्ते यांचा समावेश होता. ते जनता पक्षाचे आमदारही झाले. तर दत्ता प्रधान हे जनता पक्षातून प्रथमच नगरसेवक झाले. तेव्हा तिसरी पालिका निवडणूक १९७८ सालात सेनेला खुप धक्का देऊन गेली. किंबहूना त्यानंतर सेनेमधली पहिल्या फ़ळीची नेतामंडळी पालिका राजकारणातून बाजुला पडली होती.

शिवसेनेचे गाजलेले नगरसेवक नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे नेहमी बघितले जाते. पण त्यांना १९६८ सालात अपयश आले होते. ७३ सालातल्या दुसर्‍या फ़ेरीत त्यांनी प्रथमच नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पुढल्या काळात सतत सेनेतून बंडखोरी व पक्षांतरे होत राहिली. १९८५ सालात राजीव लाटेने शिवसेनेला फ़टका बसला होता. अगदी गिरणगावाच्या बालेकिल्ल्यातही सेनेला विधानसभेत डॉ. दत्ता सामंतांनी दणका दिलेला होता. तेव्हा घाटकोपरचे पा. रा कदमही पक्षांतर करून कॉग्रेसमध्य गेले होते, तर भांडुपचे रा. वि. पडवळ दत्ता सामंतांच्या आघाडीत दाखल झाले होते. यापैकी कदम विजयी झाले. पण त्यांची रया गेलेली होती. पा. रा. कदम यांची ख्याती अशी होती, की प्रत्येक विजयानंतर नव्याने पालिकेत दाखल होताना; हा शिवसैनिक भगवा फ़ेटा बांधून यायचा. पण जेव्हा सेनेला स्वबळावर सत्ता लाभली, तेव्हा तो निवडून आला तरी सेनेत नव्हता. आजकाल कुठल्याही सोहळ्यात फ़ेटे बांधलेल्या लोकांची गर्दी दिसते. पण सेनेचा हा मराठमोळा साज प्रथम पालिकेत आणला, तो कदमांनी. जनता लाटेत सेना सोडणार्‍यांमध्ये सांताक्रुजचे दाभोळकर व ताडदेवचे प्रभाकर निकळंकर यांचा समावेश होता. तेही जनता पक्षातर्फ़े निवडून आले. पण पुढल्या राजकारणात त्यांचे नामोनिशाण राहिले नाही. १९८५ मध्ये सर्वच शाखाप्रमुखांना उमेदवार करण्याचा डाव बाळासाहेबांनी टाकला. त्यातून पालिकेतील सेनेचे रंगरूप बदलून गेले. दत्ता नलावडे, छगन भुजबळ, शरद आचार्य अशा पहिल्या जुने मुठभर नगरसेवक नेते झाले होते आणि नवलकर-जोशी असे जुने नेते बाजूला पडले होते. आज नेता म्हणून दिसणारे दिवाकर रावते, नारायण राणे, अनंत गीते ही १९८५ सालात निवडून आलेली नवी नगरसेवक मंडळी. पण त्यानंतर सेनेतून नेते कार्यकर्त्यांचे जाणेयेणे कायम राहिले.

हिंदमाता नायगाव येथील शिवसेनेच्या शाखेला टाळे ठोकून संताप व्यक्त करणार्‍या महिला कार्यकर्त्यांचा घोळका वाहिनीच्या बातमीत बघितला, तेव्हा स्नेहलता कोरडे यांचे स्मरण झाले. आता पालिकेत निम्मे जागा महिलांना राखीव केलेल्या आहेत. पण आरंभीच्या काळात शिवसेनेत फ़ारशा महिला नव्हत्या. अशा काळात १९६८ सालात स्नेहलता कोरडे या पहिल्या महिला शिवसेना नगरसेवक झाल्या. त्याही त्याच नायगाव हिंदमाता परिसरातून! आज तिथे घोषणा देणार्‍या शिवसेनेच्या महिलांना कोरडे ठाऊक तरी असतील किंवा नाही याची शंका आहे. स्नेहलता कोरडे सोडल्या तर दिर्घकाळ शिवसेनेच्या खात्यात कोणी महिला नगरसेविका नव्ह्ती. मग पवारांनी महिलांचे सशक्तीकरण म्हणून स्थानिक संस्थांमध्ये निम्मे जागा महिलांना राखीव केल्या आणि सेनेला मैदानात रणरागिणी आणाव्या लागल्या. सहाजिकच १९९२ नंतर सेनेनेही मोठ्या संख्येने महिलांना उमेदवारी दिली. आता तर पुरूषांच्या तुलनेत शिवसेनेच्या महिलाही उमेदवारीसाठी भांडताना दिसत आहेत. काहीजणी महापौरपद भूषवूनही झाल्या आहेत आणि त्यापैकी अनेकांनी पक्षांतराचेही धाडस केलेले आहे. त्यापैकी बहुतेकांना शिवसेनेच्या पहिल्या महिला आघाडीच्या खाणाखुणाही माहिती असतील की नाही, याची शंका आहे. एक काळ असा होता की कोणी शाखाप्रमुखही संघटना सोडून जाण्याचे धाडस करीत नव्हता. तसे झाले तर त्याला आपल्या विभागातील संतप्त शिवसैनिकाचा रोष पत्करावा लागे. त्याचे जगणे अशक्य होत असे. आजकाल कोणी आमदार नगरसेवकही शिवसेना सोडून पक्षांतर करतात. कोणी जातात आणि परत येऊन उमेदवारीही मिळवतात. अन्य पक्ष आणि शिवसेनेत फ़ारसा फ़रक राहिलेला नाही. शिवसेना आता लोकशाही राजकारणात पुर्नपने मुरलेली आहे. सेनेतही आता शिवबंधन बांधून कोणीही केव्हाही शिवसैनिक होणे सोपे होऊन गेले आहे.

1 comment: