Thursday, February 23, 2017

खिशातले राजिनामे बाहेर काढा

Image result for shivsena resignations in pocket

मागल्या महिनाभरात शिवसेनेने आपली सर्व शक्ती मुंबईत पणाला लावली होती. असे असूनही त्या पक्षाला मुंबईत बहूमत नाही, तरी निदान शंभरी ओलांडता आलेली नाही. ही वस्तुस्थिती बघता शिवसेनेच्या नेतृत्वाला आपल्या भविष्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत ही तिसरी निवडणूक सेना लढवत होती आणि त्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कसोटीला लागलेले होते. त्यात त्यांनी युती फ़ेटाळून लावण्याचे धाडस दाखवले यात शंका नाही. पण नुसतेच धाडस कामाचे नसते, तर तितक्या इर्षेने लढण्याची क्षमताही दाखवण्याची गरज असते. किंबहूना बोलण्यापेक्षा कृतीनेच आपला पराक्रम सिद्ध होत असतो. आजकाल शिवसेना त्यातच तोकडी पडू लागली आहे आणि ताज्या निकालांनी त्याचीच साक्ष दिलेली आहे. त्यामुळे निदान आपल्या शब्दाला जागण्यासाठी आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्या खिशातले राजिनामे बाहेर काढायला हवेत. मध्यंतरी जेव्हा अटीतटीचे प्रसंग आले, तेव्हा एका सेना मंत्र्याने आपण खिशातच राजिनामे घेऊन फ़िरतो, असली भाषा केलेली होती. नंतर मुख्यमंत्र्यांना भेटायला सेनेचे मंत्री गेलेले असताना दिवाकर रावते यांनी राजिनामा खिशातच असल्याचा पुरावाच दाखवला होता. म्हणूनच आता सेनेच्या खर्‍या लढावू बाण्याची कसोटी लागणार आहे. भाजपाने मुंबईत दुसर्‍यांदा मुंबईत सेनेच्या तुल्यबळ यश मिळवले असेल, तर शिवसेनेची भाषा पोकळच ठरली आहे. त्यांनी आपल्या शब्दाला जागून राजिनामे फ़ेकण्याची हिंमत दाखवली पाहिजे. किंबहूना विधानसभेत वेगवेगळे लढून नंतर सत्तेत सहभागी झालेल्या सेनेने नेमके काय गमावले, त्याचीच प्रचिती पालिका निकालातून समोर आलेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असे म्हटले जाते; त्याचा पुरावाच सेनेच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी जणू सादर केलेला आहे. म्हणूनच अब्रु राखण्यासाठी आता खिशातले राजिनामे बाहेर काढायला हरकत नसावी.

सत्ता आमच्यासाठी असते आणि आम्ही सत्तेसाठी नव्हेत; अशी बाष्कळ बडबड करणार्‍याच्या हाती शिवसेना आज सापडली आहे. तसे नसते तर दोन वर्षापुर्वीच शिवसेना सत्तेत सहभागी झाली नसती. त्यापेक्षा शिवसेनेने सरकारला बाहेरून पाठींबा दिला असता. सत्तेसाठी आपण हापापलेले नाहीत, हे दाखवण्याचा तोच उत्तम मार्ग होता. त्यापेक्षा सत्तेतला मिळेल तो हिस्सा घेऊन, प्रथम सेनेच्या नेत्यांनीच आपल्या कडव्या पाठीराख्यांचा मुखभंग केलेला होता. बरे सत्तेत सहभागी झाल्यावर निदान कर्तव्यबुद्धीने सरकारमध्ये आपल्या जबाबदर्‍या पार पाडायला हव्या होत्या. सेनेचे जे नेते सत्तेत सहभागी झाले, त्यांनी सत्तेचा उपयोग करून मध्यंतरीच्या दोन वर्षात राज्यभर आपल्या संघटनेला अधिक बळकट करण्याचे काम तरी करायला हवे होते. पण त्यातही बोंब होती. प्रत्येक सेना नेता नुसता पोकळ वल्गना करण्यात गर्क होता. त्यातून लोकांचे मनोरंजन होते. पण पक्षाची लोकप्रियता वा संघटनात्मक बळ वाढत नाही. विधानसभेत सेनेला मुंबईत कशामुळे कमी जागा मिळाल्या आणि भाजपाला एक जागा तरी अधिक कशामुळे मिळाली; त्याचे कुठलेही आत्मपरिक्षण मध्यंतरीच्या काळात झाले नाही. ते झाले असते तर एकहाती मुंबई पालिका जिंकण्याची पुर्ण सज्जता झाली असती. पण त्यातले काहीही न करता नेतृत्वाला अंधारात ठेवणार्‍या वल्गना चालू राहिल्या. त्याचेच परिणाम पालिका मतदानातून समोर आलेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला सगळा वेळ मुंबईला दिलेला होता. बाकीच्या राज्याकडे त्यांनी जवळपास पाठ फ़िरवलेली होती. त्यात गैर काही म्हणता येणार नाही. कारण मुंबईत नेत्रदिपक यश मिळवल्यास महाराष्ट्राचे दरवाजे उघडतात. पण मुंबईत सेनापती लढत होता आणि बाकीचे सरदार नुसत्याच वल्गना करण्यात दंग झालेले होते. या सत्याशी ‘सामना’ करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस राज्यभर एकाकी फ़िरत होते आणि अधिकाधिक सभा घेत होते. त्यांनी केंद्रातल्या कुठल्याही नेत्याची प्रतिक्षा न करता राज्यातले पक्षांतर्गत व संघटनात्मक निर्णय एकहाती घेतले. तितका बोजा सेनेच्या पक्षप्रमुखांवर नव्हता. त्यांनी स्वत:ला मुंबईत केंद्रीत केलेले होते. मग मुंबईत शिवसेनेला आपल्या बळाचे प्रदर्शन का करता आले नाही? त्याचे उत्तर विधानसभेत मिळालेल्या अपयशाची मिमांसा न करण्यात सामावलेले आहे. तेव्हा भाजपाला मुंबईत मोठे यश मिळाले नव्हते तर सेनेच्या आळसाचा लाभ भाजपाला मिळालेला होता. त्याची फ़ळे सेनेच्या नेत्यांना भोगायला लावण्यापासून सुरूवात झाली असती, तर आज पालिकेच्या निकालात सेनेला तोंडघशी पडावे लागले नसते. सत्तेत सहभागी झाली नाही तर शिवसेनेत फ़ुट पडेल, अशा तेव्हा खुप बातम्या आलेल्या होत्या. याचा अर्थच सत्तेत जायला लाचार झालेल्या नेत्यांच्याच दबावाखाली सेनेला तसा निर्णय घ्यावा लागला होता. त्यात ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागली, त्यापैकी बहुतांश विधानसभेत पडलेले वा विधान परिषद सदस्यांचा भरणा आहे. म्हणजेच आपल्या कार्यक्षेत्रात अपेशी ठरणार्‍यांना शिवसेनेच्या निर्णय प्रक्रीयेत महत्वाचे स्थान असावे. अशा लोकांनी निर्णय घ्यायचे आणि मग मैदानात लढणार्‍यांनी कर्तव्याचा बोजा उचलायचा, असा प्रकार सेनेत वाढल्याचे हे परिणाम आहेत. त्याचा दुहेरी परिणाम सेनेच्या मतांवर झालेला आहे. निकालानंतर पुन्हा सेना सत्तेसाठी भाजपा सोबत जाणार, असे लोकांना वाटले असेल तर त्यांनी थेट भाजपाला मते दिलेली असू शकतात. सत्तेत हिस्सा घ्यायचा आणि विरोधातही असल्याचे नाटक रंगवायचे, असा खेळ सेनेवर उलटला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकमताशी असलेली सेनेची नाळ तुटल्याचा हा दाखला आहे. मुंबईत भाजपापेक्षा कार्यकर्त्यांचे बळ सेनेपाशी असताना कुठे कमी पडलो; तेही तपासण्याची अनिच्छा या पराभवाचे खरे कारण आहे.

पहिली गोष्ट म्हणजे सत्तेत सहभागी न होताही सेना देवेंद्र सरकारला पाठींबा देऊ शकत होती. मग सरकारवर अधिक दबाव ठेवता आला असता. कुठल्याही क्षणी सेना पाठींबा काढून घेईल, अशा दडपणाखाली भाजपाला सतत सेनेची मर्जी संभाळत बसावे लागले असते. सत्तेत सहभागापेक्षाही बाहेरून पाठींबा देण्यात अधिक प्रभावशाली राजकारण खेळता आले असते. शिवाय आपण सत्तेचे भुकेले नसल्याचा दाखला म्हणूनही तोच पुरावा जनतेसमोर ठेवता आला असता. पण ती संधी गमावताना सेनेने अधिकाधिक अपमानित होऊन सत्तेत टिकण्याची लाचारी पत्करली, हे विसरता कामा नये. हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडा, असे प्रतिआव्हान दिल्यावरही सेनेचे मंत्री राजिनामे खिशात असल्याची शाब्दिक कसरत करत बसले, त्यामुळे सेनेच्याच पाठीराख्यांचा भ्रमनिरास होत राहिला. त्यात जी त्रुटी असेल ती ‘सामना’च्या उथळ टिकेने भरून काढली जात होती. त्याचा विपरीत परिणाम काय संभवतो, याचाही विचार झाला नाही. राजकारण राज्यातले असताना अकारण वारंवार पंतप्रधानांवर तोफ़ा डागून आपलीच प्रतिमा सेना सातत्याने बिघडवून घेत गेली. बाळासाहेबांनी आपल्या कालखंडात कॉग्रेसला यथेच्छ झोडपले, तरी पंतप्रधान इंदिराजी वा राजीव इत्यादींना कधी अपमानित केलेले नव्हते. हा फ़रक सेनेच्या नव्या नेतृत्वाला आजवर उलगडलेला नाही. कुठल्याही विषयात भाजपा वा मोदींना लक्ष्य करण्याचा हव्यास शिवसेनेला महागात पडलेला आहे. एका बाजूला संघटना सुरळीत व सज्ज करण्याकडे दुर्लक्ष व दुसरीकडे वाचाळांना मोकाट रान; यातून सेनेने मुंबईतीलही आपले निर्विवाद वर्चस्व खिळखिळे करून टाकले आहे. भाजपाला त्याचा फ़क्त लाभ मिळाला. त्याचे आताही आत्मपरिक्षण झाले तरी सेनेला भविष्य असेल. अन्यथा सेनेची राष्ट्रवादी कॉग्रेस व्हायला अधिक वेळ लागणार नाही. म्हणून म्हटले खिशातले राजिनामे बाहेर काढा.

7 comments:

  1. शिवसेना पक्षप्रमुख कोण? संजय राऊत की उद्धव? हा प्रश्न नेहमी पडतोय.कालची शायिस्ताखानाची बोटं तुटल्याची बाष्कळ प्रतिक्रिया देणारा हा बेजबाबदार संपादक स्वत:ला बाळासाहेब समजू लागला आहे आणि उदेधव त्याच्यामागे फरपटत चालले आहेत असे वाटते.हा राऊत दिल्लीत असताना पवारांच्या पायाशी बसतो आणि सामान्य सेना कार्यकर्त्याला लढायला सांगतो.युतीत बिब्बा घालणारे जसे भाजप मथ्ये आहेत तसे सेनेतले पवारांचे अनौरस कार्यकर्तेही आहेत.निवडून येण्याची लायकी नसताना सर्व सत्ता या आयतोबांनी मातोश्रीला कोणत्यातरी मार्गाने खुश ठेवले अलावे असे दिसते.आताही बहुमताची कसर कॉंग्रेसकडून भरून काढून सरकार अस्थिर करण्याचा आत्मघातकी खेळ रंगतोय.महापौर आणि मुख्यमंत्री सेनेचाच अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे देतात यात सगळे आले.पवारांची खेळी यशस्वी होताना दिसतेय.

    ReplyDelete
  2. ऊत्तम.....

    फक्त "मुंबईत सेनापती लढत होता आणि बाकीचे सरदार नुसत्याच वल्गना करण्यात दंग झालेले होते." ह्या वाक्याला एक अपवाद आहे.

    ठाणे... तिथल्या शिवसेनेच्या नेत्यांनि आणि शिवसैनिकांनी bjp आणि ncp दोघां विरोधात लढुन पहीला क्रमांकच नाही तर बहुमत मिळवुन दिले..

    सेनेने मात्र आत्मपरीक्षण करायची वेळ आली आहे....

    ReplyDelete
  3. Bhau jase apan roj BJP chya vachal virancha samachar ghetat tasa ata senetil Sanjay rautan sarakhya vachal virana pan samachar ghya

    ReplyDelete
  4. नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सेनेच्या हातातून गेलेच. काय उत्तर आहे उद्धव ठाकरेंकडे? मुंबई त नाक कापले गेले असताना नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, येथे पराजय मिळाला असताना उद्धव ठाकरे पुढचा
    मुख्यमंत्री सेनेचा असेल म्हणतात ह्याला तोड नाही. पुढचा
    मुख्यमंत्री सेनेचा असेल म्हणतात ना? कसा होईल पुढचा
    मुख्यमंत्री सेनेचा? लोक येडे वाटले का? शिवसेनेचा वाघ गेला आहे. ओळखा.

    ReplyDelete
    Replies
    1. हे स्टेटस fb वर एका शिवसेना शाखाप्रमुखाचे आहे

      Delete
  5. bhau mala vatat jevha raj thakareni uticha prastav dila tevha to swikaarayala pahije hota.....asa asat tar aaj chitra khup vegale asate ani ek hati satta aali asati..

    ReplyDelete
  6. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या सत्तेपुढे अनेक गड कोसळले... 50 वर्षे कॉंग्रेसचा पाठीराखा असलेला लातूर, सोलापूर, बुलढाणा मध्ये त्या पक्षांची वाताहत झाली... अशक्य वाटणार्‍या पुणे-पिंपरी अन सांगली मध्ये NCP पार रसातळाला गेली... मी किती शहाणा म्हणणार्‍या राज यांची नाशिक मधील स्थिती पहा... महाराष्ट्रात केवळ मुंबई अन ठाणे येथेच भाजप रोखल्या गेला आहे... तोही प्रतिकूल परिस्थितीत... तोही अवघ्या फरकाने... मुंबईत सेनेला भाजप पेक्षा एक लाख मते जास्त मिळाली आहेत... राग व्यक्त करायचा असेल तर मराठी माणसावर करा ज्याला अजूनही भौतिक विकास अन अस्मिता यातून काय निवडावे हे समजत नाही आणि एकसंध मतदान करता येत नाही...

    ReplyDelete