Tuesday, February 7, 2017

स्वत:साठी खणलेला खड्डा

अम्मासारखे हुबेहुब दिसण्याचा भाचीचा प्रयास?

deepa jayakumar के लिए चित्र परिणाम

पाण्याचा प्रवाह आपल्याला हवा त्याच दिशेने वहात असेल, तेव्हा हातपाय मारण्याची गरज नसते. नुसते तरंगत राहिले तरी आपल्याला मदत मिळत असते. पण जेव्हा पाण्याचा प्रवाह विरोधात वहात असेल, तेव्हा तरंगत रहाण्यासाठीच धडपड करायची असते. तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्या सखी किंवा सध्या चिन्नम्मा म्हणून ओळखल्या जाणार्‍या शशिकला नटराजन, यांनी अम्माच्या निधनानंतर सर्व सत्ता आपल्या हाती केंद्रीत करण्याची चालविलेली धावपळ बघता, प्रवाह आपल्याच विरोधात असल्याचा त्यांचा आत्मविश्वास लपून रहात नाही. तसे नसते तर अम्माच्या निधनाचा प्रभाव ओसरून जाण्यापर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली असती आणि संयमाने परिस्थिती हाताळली असती. मात्र तितका आत्मविश्वास त्यांच्यापाशी नाही. म्हणूनच अम्मा आजारी असल्यापासून त्यांनी स्वत:कडे लोकांनी संशयानेच बघावे, यासाठी खास प्रयत्न केले असेच वाटू लागते. पहिली बाब म्हणजे त्यांनी अम्माच्या आजारपणाविषयी अकारण गोपनीयता राखली. त्यातून गदारोळ झाला. मग जयललितांची प्रकृती ढासळत गेल्यावर पुन्हा इतकी गोपनीयता राखली, की त्यातून आधीच्या संशयाला बळ मिळाले. पुढे अम्माच्या जागी आपलीच सरचिटणिसपदी नेमणूक करून घेण्याची घाई त्यांना झालेली होती. त्याची काहीही गरज नव्हती. नाहीतरी पक्षाच्या बहुतांश निर्णयांवर त्यांचीच छाप होती. अम्मा हयात असतानाही कोणी पक्षनेताही परस्पर अम्मांना भेटू शकत नव्हता. चिन्नम्माच्या विरोधात कोणी अम्माकडे तक्रारही करू शकत नव्हता. मग त्यांच्या मृत्यूनंतर तरी शशिकला यांना कोण नेता आव्हान देऊ शकणार होता? सहाजिकच पाचसहा महिने सरचिटणिसपद मोकळे राहिल्याने फ़रक पडला नसता. पण यांना तितकाही आत्मविश्वास नाही. म्हणूनच चिन्नम्माने मुख्यमंत्री होण्याची घाई केली, ती आता अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आधीच त्यांच्याविषयी संशयाचे धुके होते. कारण एकदा अम्मानेच त्यांना घरातून हाकलून लावलेले होते. मग अम्माने माफ़ केलेले असले, म्हणून अम्माच्या भक्तांना ते पचत नसते. त्याची खात्री असल्यानेच शशिकला यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झालेली आहे. जितके दिवस सरकत जातील, तितकी पक्षातून बंडाळी होण्याची भिती त्यांना पछाडते आहे. कारण अम्मा़ची भाची दीपा जयकुमार हिने ते आव्हान उभे केलेले आहे. अम्माच्या निधनानंतर त्याच भाचीला चिन्नम्माने मृतदेशाच्या जवळपास फ़िरकू दिलेले नव्हते, की इस्पितळातही घुसू दिलेले नव्हते. ही अम्माची भाची हेच आपले भविष्यातले आव्हान असल्याचे पाताळयंत्री शशिकला यांनी नेमके ओळखले आहे. सहाजिकच दीपाच्या बाजूला जाऊ शकतील वा उद्या बंडाळी करू शकतील; अशा लोकांना त्यांना सत्तेपासून व पक्षातून दूर करायची घाई झालेली आहे. कारण दीपा ही हुशार मुलगी आहे आणि तिच्यामध्ये चिन्नम्माला आव्हान उभे करण्याची कुवत आहे. अम्माच्या निधनानंतर जितके वाद होत आहेत, त्यात माध्यमांना सामोरे जाताना या मध्यमवयीन मुलीने अतिशय धुर्तपणाने उत्तरे दिलीत. प्रत्येक फ़ोटोमध्ये आपण नेमके अम्माचे प्रतिबिंब दिसावे, म्हणून कसोशीचा प्रयत्न केलेला आहे. आता शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाचा वाद निर्माण होताच, दीपाने प्रथमच पत्रकार परिषद घेऊन आपण राजकारणात व निवडणूकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यातून या मुलीने कोणता संदेश दिला, तेही लक्षात घेतलेम पाहिजे. ज्यांना चिन्नम्मा आवडत नाही वा कारस्थानी वाटते; अशा अम्माच्या भक्तांनी आपल्याभोवती गोळा व्हावे, असा तो संदेश आहे. पक्षातील ज्यांना चिन्नम्मा नकोय, त्यांचे आपण नेतृत्व करणार असल्याची ती घोषणा आहे. त्याचे पुढले पाऊल काय असेल, त्याचीही चाचपणी करायला हरकत नसावी.

मुख्यमंत्री होणार म्हणजे शशिकला यांना नजिकच्या काळात विधानसभेत आमदार म्हणून निवडून येणे भाग आहे. आजवर त्यांनी कधी कुठल्या सभेत दणाणून भाषण केलेले नाही, किंवा कुठली पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्वच्छ मांडलेली नाही. तामिळी वगळता त्यांना अन्य भाषा येत नाहीत. पण मंगळवारी दीपाने घेतलेली पत्रकार परिषद बघितली तर अम्माच्याच अविर्भावात व शब्दात ही मुलगी बोलत होती. आपणच पुढली अम्मा आहोत, असा आभास निर्माण करणारी दिपा, पुढे कोणते पाऊल टाकणार आहे? शशिकला यांना आमदारांच्या बहुसंख्येमुळे मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य आहे. पण सहा महिन्यात आमदार म्हणून निवडून यावे लागणार आहे. ती जागा अर्थातच अम्मा रिकामी करून गेल्या आहेत. आंदीपट्टी या मतदारसंघातून अम्मा निवडून आल्या होत्या आणि त्यांच्याच निधनाने ती जागा रिकामी झालेली आहे. तिथे लौकरच पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. सहाजिकच तिथूनच शशिकला यांना मतदारांचा कौल मागणे भाग आहे. अन्य जागी गेल्यास लोक पळपुटी म्हणून आरोप करतील. अम्माचा वारसा तिथूनच अधिक सिद्ध होऊ शकेल. अशा जागी चिन्नमा मतदाराचा कौल घ्यायला उभ्या ठाकल्या, तर दीपाही तिथूनच आपली राजकीय कारकिर्द सुरू करू शकेल. म्हणजे चिन्नम्माच्या विरोधात दीपा उमेदवारी करणार आहे. तिने तितके धाडस केल्यास द्रमुकही उमेदवार न टाकता या मुलीला समर्थन देऊ शकतो. कारण चिन्नम्माचा आंदीपट्टी येथे पराभव झाल्यास, त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेलच. पण त्यामुळेच अण्णाद्रमुकची अधिक राजकिय बेअब्रु होऊ शकेल. म्हणजे दीपा व द्रमुक असे दोघेही आपापल्या स्वार्थासाठीच एकत्र येतील. मुख्यमंत्रीपदाचा हव्यास धरून चिन्नम्माने अशा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी अपुर्व संधीच निर्माण करून दिली आहे.

आताच घाई केली नसती आणि पन्नीरसेल्व्हम यांनाच मुख्यमंत्रीपदी राहू दिले असते; तरी शशिकला यांचे अधिकार कुठेही कमी होत नव्हते. कारण पक्षासह सरकारही त्यांच्याच मर्जीने चालणार होते. जो मुख्यमंत्री त्यांच्या इशार्‍यावर पदाचा राजिनामा देतो, त्याच्याकडून कुठलेली काम घरबसल्या चिन्नम्मा करून घेऊ शकत होत्या आणि कुठलेही राजकीय आव्हान अंगावर घेण्याचा प्रसंग आला नसता. दीपा असो किंवा द्रमुक असो, त्यांना चिन्नम्माच्या विरोधात काहीही डाव खेळण्याची सोय राहिली नसती. पण त्यांना हवी असलेली संधी शशिकला यांनीच निर्माण करून दिली आहे. अर्थात सुप्रिम कोर्टाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला नाही, तरच पुढले सर्व राजकारण घडू शकते. कोर्टानेच त्यांना दोषी ठरवले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कारभार आधीच आटोपू शकतो. पण कुठल्याही स्थितीत अण्णाद्रमुक पक्षाची व्हायची ती नाचक्की नक्कीच होणार आहे. मात्र चिन्नम्माला त्यासाठी दोषी धरता येणार नाही. पराकोटीच्या असुरक्षिततेने पछाडलेली माणसे, अशीच पाताळयंत्री वागत असतात. त्यांचा कोणावरही विश्वास नसतो आणि स्वत:वरही नसतो. आपल्या हुकूमतीपुढे अवघा राजकीय पक्ष मान डोलावत असताना, सत्तापदाची इतकी घाई अनावश्यक होती. पण आज आहे ते उद्या असेल, याची खात्री नसल्यानेच चिन्नम्माला इतका उतावळेपणा करावा लागला आहे. त्यातून त्यांनी दीपा जयकुमार नावाचे खरेखुरे मोठे आव्हान उभे करण्यास हातभार लावला आहे. ते आव्हान त्यांना पेलवणारे नाही. जो पक्ष व त्याचे आमदार खासदार इतक्या फ़ुसक्या चिन्नम्मा समोर नतमस्तक होतात, त्यांना नमवायला दीपाला वेळ लागणार नाही. कारण तिचा आत्न्मविश्वास तिच्या बोलण्यातून व देहबोलीतून स्पष्टपणे जाणवतो. मुख्यमंत्रीपदाचा हव्यास धरून चिन्नम्माने आपल्यासाठीच खड्डा खणला इतकेच म्हणणे भाग आहे.

1 comment:

  1. भाऊ .. एक सुधारणा करतो.. जयललिथा या २०१६ मध्ये तामिळनाडू विधान सभेमध्ये राधाकृष्णानगर(R.K.Nagar) या मतदार संघातून निवडून गेल्या ..आंदीपट्टी नाही

    ReplyDelete