उत्साह आणि उतावळेपणा नेहमीच अंगलट येत असतो. आजचे वास्तव बघणार्यांना इतिहास ठाऊक नसतो. त्यामुळे आजच्यापेक्षा उद्याच्या पोटात काय दडाले आहे, त्याची अशा उतावळ्यांना कधीच फ़िकीर नसते. लोकसभा प्रचाराच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी एक गोष्ट अनेकदा ऐकवली होती. जो शेतकरी झटपट कमावण्याच्या मागे धावत असतो, तो काही महिन्यात येणारे पीक काढत असतो. ज्याला त्याच्यापेक्षा अधिक धीर असतो, असा शेतकरी वर्षभरात येणारे पीक घेत असतो. पण ज्याच्यापाशी दिर्घदृष्टी असते, असा शेतकरी फ़ळबागायत करतो आणि कित्येक वर्षे त्याची फ़ळे चाखत असतो. आजच्या भाजपाच्या उतावळ्यांनाच त्यातले सार कळले नसेल, तर भाजपाने नजिकच्या काळात काय होईल, ते आज अशा उतावळ्यांनाही ऐकायला आवडणार नाही. त्यात नवे असे काहीच नाही. दहा वर्षे मागे गेल्यास राहुल वा सोनिया गांधींच्या पुरस्कर्त्यांना तरी असे भविष्य ऐकायला कुठे आवडत होते? त्यांना तेव्हा मिळालेली देशाची सत्ताच अंतिम सत्य भासत होते. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा नेता भाजपातून भक्कम पर्याय उभा करू शकला नाही, ही कॉग्रेसची शक्ती नव्हती. शिवाय अन्य तमाम सेक्युलर पक्षांना भाजपा विरोधासाठी एकत्रित केल्याने कॉग्रेसच्या हाती अनिर्बंध सत्ता आलेली होती. लोकसभेत कॉग्रेसचे अवघे १४६ खासदार निवडून आलेले होते आणि कुठलाही अन्य पक्ष भाजपाच्या सोबत जायला राजी नव्हता. तो भाजपाचा दुबळेपणा नक्कीच होता. म्हणून ती कॉग्रेसची ताकद अजिबात नव्हती. म्हणूनच मग पुढल्या काळात कॉग्रेसचे नेते आपल्या पाठीशी अफ़ाट लोकमत व बहूमत असल्याच्या मस्तीत वागत गेले होते. त्याचे परिणाम त्यांना २०१४ सालात दहा वर्षानंतर दिसले. कारण ज्याला ते आपली शक्ती समजून बसले होते, तोच त्यांचा दुबळेपणा ठरला होता. पण हे सर्व २००४ सालात त्यांच्यापैकी कोणाला तरी ऐकायला आवडत होते काय?
सत्तेची मस्तीच अशी असते, की ती सारसार विचार करू देत नाही. मित्रांमध्ये शत्रू शोधायला प्रवृत्त करत असते. लोकसभेत भाजपाला एकहाती बहूमत मिळाल्यापासून त्या पक्षात दबून असलेल्या दिग्विजयसिंग, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या प्रवृत्ती उफ़ाळून बाहेर आल्या आहेत. त्यामुळे आज त्यांना काहीही समजून घेण्याची गरज वाटली नाही, तर नवल नाही. कारण तेही माणूसच आहेत आणि ज्यांच्यामध्ये कसलीही कुवत नसते, अशीच माणसे अन्य कुणाच्यातरी यशावर स्वार होऊन अरेरावी करीत असतात. मणिशंकर वा दिग्विजय यांच्यापाशी पक्षाला बळ देण्याची कुवत केव्हाही नव्हती. श्रेष्ठींच्या मेहरबानीवर सत्तेपर्यंत पोहोचणारी अशी मंडळी, बोलघेवडी असतात आणि नेत्याने मिळवलेल्या लोकांच्या सदिच्छा मातीमोल करण्यापलिकडे त्यांच्याकडून कुठलेही कार्य होऊ शकत नसते. भाजपामध्ये अलिकडल्या कालखंडात व मोदीपर्वात अशा लोकांना खुपच प्रोत्साहन मिळालेले आहे. जोवर पक्षाचा मुखभंग होत नाही, तोपर्यंत त्यांना कोणी रोखूही शकणार नाही. मुंबई महाराष्ट्रातील आपल्या शक्ती वा ताकदीच्या गमजा करणार्या किरीट सोमय्या वा आशिष शेलार, यांना मोदींच्या उदयापुर्वी कधी स्वबळावर कुठली निवडणूक जिंकता आलेली होती काय? फ़ार कशाला, २००९ मध्ये हेच किरीट सोमय्या इशान्य मुंबईतून लोकसभेसाठी किती मतांनी पराभूत झाले होते? आज दादरमधून शिवसेनेचा पराभव करायची खुमखुमी त्यांना आलेली आहे. ती खुमखुमी आठ वर्षापुर्वी कुठल्या शीतगृहात गोठवून ठेवलेली होती? पराक्रम हा प्रतिकुल स्थितीत बाहेर येत असतो. कर्तृत्व विपरीत परिस्थितीत अनुभवास येत असते. मनसेमुळे २००९ विधानसभेत शिवसेनेला दणका बसला होता, तेव्हा सेनेचा बालेकिल्ला नसलेल्या खेरवाडीतून बाळा सावंत हा सेनेचा नगरसेवक विधानसभेत निवडून आला. त्याला पराक्रम म्हणतात. सोमय्या शेलारांनी असा कुठला पराक्रम आजवर केला आहे?
नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन फ़ुशारक्या मारणारे पक्षाचे बळ वाढवत नसतात, तर त्याच लोकप्रियतेला वाळवी लावत असतात. तसे नसते तर दिल्ली वा बिहारमध्ये मोदींवर नामुष्कीची वेळ आली नसती. मुंबई ठाण्यात उद्या भाजपाचे नाक कापले जाईल, तेव्हा त्याचे खापर या शहाण्यांवर फ़ुटणार नाही. राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फ़डणवीस यांची नामुष्की होणार आहे. त्यालाही पर्याय नसतोच. कारण विजय शिवसेनेचा होईल वा तिला बहूमत मिळेल, हा मुद्दाच नाही. लोकांचा मतदानाचा कल उर्मटपणाला धडा शिकवण्याचा असतो. दिल्लीत लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला निवडून दिलेच नव्हते. त्यापेक्षाही लोकांना भाजपाची मस्ती उतरवण्यासाठी मतदान करावे लागले होते. परिणाम म्हणून केजरीवाल अफ़ाट मते मिळवून विजयी झाले. त्याचे खापर पंतप्रधानांच्या माथी फ़ुटले. लोकसभेत ४४ टक्के लोकांनी भाजपाला मते दिलेली होती. पण अवघ्या नऊ महिन्यात त्याच दिल्लीकरांनी भाजपा ३३ टक्क्यावर आणून ठेवले. तो राग मोदींवर व्यक्त झाला नव्हता. तर मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन दिल्लीत मस्तवालपणा करणार्या भाजपाच्या नेत्यांना धडा शिकवायला मतदार घराबाहेर पडला होता. त्या मतदाराने कुठले कर्तृत्व नसतानाही केजरीवाल यांना ५३ टक्के मते दिली. त्याचे एकमेव कारण भाजपा पराभूत करणे होते. विजय कोणाचा होतो, याच्याशी लोकांना कर्तव्य नव्हते आणि नसते. अनेकदा मतदार मस्तवालपणा खच्ची करण्याला प्राधान्य देतो आणि तेच दिल्लीत घडले होते. त्याचा लाभ मग कोण नेमका मस्तवाल पक्षाला मोठे आव्हान देऊन उभा आहे, त्या पक्षाला मिळत असतो. तितकी त्या पक्षाची गुणवता वा शक्तीही असतेच असे नाही. ज्याचा विजय होतो, तो केवळ परिणामांचा लाभार्थी असतो. आज मुंबईत त्यापेक्षा वेगळे काहीही होऊ घातलेले नाही.
जितक्या तावातावाने भाजपाचे शेलार सोमय्या निंदानालस्ती करणार आहेत, तितका म्हणूनच शिवसेनेला लाभ मिळणार आहे. त्या़चा अर्थ शिवसेनेची ती लोकप्रियता नसेल, की सेनेपाशी तितकी गुणवत्ता आहे, असेही मानायचे कारण नाही. काही प्रसंग असे येतात, की आपल्याला आवडत्याची निवड करण्यापेक्षाही नावडत्याला पराभूत करण्याला प्राधान्य देण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळेच आपला पक्ष वा संघटना नावडती मस्तवाल ठरू नये, याची काळजी घेण्याची गरज असते. भाजपाच्या नेते मंडळीला याचेही भान राहिलेले नाही. सेनेने ११४ जागांची मागणी मान्य केली असती, तर भाजपाला पारदर्शक कारभाराची आठवण तरी राहिली असती काय? रस्त्यात खड्डे असल्याचे विस्मरण जागावाटपाची बोलणी करताना का नव्हते? असा विचार सामान्य मतदार करीत असतो. त्याचा थांगपत्ता भाजपाच्या आजच्या नेत्यांना उरलेला नाही. म्हणूनच त्यांना २००९ मधले हिरमूसलेले अडवाणी आठवत नाहीत. दिल्लीत केजरीवाल कशामुळे जिंकले, त्याचाची विचार करण्याची गरज वाटलेली नाही. त्यातूनच अशा नेत्यांचा मस्तवालपणा अधिक स्पष्ट होत असतो आणि त्याच्या विरोधात मतदार डिवचला जात असतो. अशा मस्तवालांना धडा शिकवण्याच्या वृत्तीनेच प्रत्येकवेळी मुंबई पालिकेत शिवसेनेला मोठे यश मिळवून दिले आहे. कधी मुरली देवरा, कधी कृपाशंकर शिवसेनेसाठी लाभदायक ठरले. आज तीच भूमिका शेलार व सोमय्या पार पाडत आहेत. आज अनेक भाजपा समर्थकांना हे शब्द आवडणारे नसतील. पण त्यांनी २३ तारखेपर्यंत कळ काढावी. त्यांना तसा अनुभव येईल. अर्थात तेव्हा दुरूस्तीची वेळ गेलेली असेल. कारण हा सततचा अनुभव आहे. पक्ष व नेत्यांची नावे बदलत राहिलेली आहेत. मस्तवालपणाला मतदार धडा शिकवतो, हेच कायम सत्य आहे. स्विकारले नाही, म्हणुन सत्य कधी बदलत नसते.
Apratim....hya varun ajun ek arth kadhata yeu shakato to mhanje rajkaran karnya saathi tyachi jaan asan mahatvach ahe...nusat uchha shikshit asun (degree che kagad jama karun) upyoug nahi
ReplyDeleteआदरणीय भाऊ, मी तुमचे लेख नियमित वाचतो. तुमचे लेख नेहमीच संतुलित असतात. पण जेव्हा विषय शिवसेनेशी संबंधित असतो, तेव्हा मात्र तुम्ही अत्यंत एकतर्फी होता. यावरुन तुम्ही मला भाजप समर्थक समजणार नाही, अशी अपेक्षा करतो. मी एक सामान्य वाचक म्हणून भावना व्यक्त करीत आहे. भाजपाच्या नेत्यांचा बेतालपणा, मस्तवालपणा याविषयी लिहिता याबाबत काहीही आक्षेप नाही. पण जर त्यांचे चुक असेल तर त्यांच्यापेक्षा जास्त आचकट विचकट बोलणारे सेना नेत्यांचे काय? त्याबद्दल आपले काय मत आहे. ठाकरी भाषा म्हणून ते सर्व पवित्र असे आपल्याला वाटते का? शिवसेना नेत्यांच्या अचाट वक्तव्यांबाबत आपण मूग गिळून गप्प का बसता? का लोक भाजपच्या मस्तवालपणाला धडा शिकवतात पण शिवसेनेच्या मस्तवालपणा लोकांना आवडतो असे आपल्याला वाटते? यालाच निरपेक्ष पत्रकारीता म्हणतात का?
ReplyDelete- अनिरुद्ध जोशी
Khup chham, 100% sahmat.
DeletePurviche june bhau pahayche aahet.
Shivsene baddal lihita yet nasel tar ek kam kara bhau tumhi maharashtra baddal lihu naka. Deshachya politics baddal liha. Mhanje aamhala pragalbh ase kahi vachta yeil.
Ek dam barobar
Delete