Wednesday, February 22, 2017

परिवर्तन कशाला होणार?

mumbai slums के लिए चित्र परिणाम

मंगळवारी दुपारी दिड वाजेपर्यंत दहा महापालिकांच्या क्षेत्रात झालेल्या मतदानाचे आकडे जाहिर झाले होते. सगळीकडे ३० टक्केच्या आसपास मतदान झालेले होते. म्हणजे सकाळी मतदानाला आरंभ झाल्यापासून सहा तासात अवघे ३० टक्के मतदान पार पडले. बहूधा वेळ संपण्यापर्यंत ५०-६० टक्केपर्यंत मतदान जाऊ शकेल. यावेळी विविध संस्था व निवडणूक आयोगानेही मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध आमिषे दाखवलेली होती. कोणी आपल्या भागातल्या हॉटेल वा दुकानांशी संगनमत करून मतदान करणार्‍यांना किंमतीच्या सवलती दिल्या होत्या, तर कोणी अन्य काही लालूच दाखवली होती. कारण मुंबईत तर कायम मतदानाची टक्केवारी किमानच राहिलेली आहे. पुर्वी म्हणजे मागल्या तीन महापालिका निवडणूकांमध्ये मुंबईत ४०-४५ टक्केच मतदान होत राहिले. मजेची गोष्ट अशी, की लोकसभा व विधानसभेसाठी मुंबईकर जितका उत्साह दाखवतो, तितका सहसा पालिका मतदानात दाखवत नाही, असा अनुभव आहे. गेल्या लोकसभा मतदानात नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची रणधुमळी उडवली होती. तरी मुंबईतले मतदान ५३ टक्के झाले. तर विधानसभेला सेना-भाजपा एकमेकांच्या उरावर बसले असतानाही मतांची टक्केवारी ५१ इतकीच राहिली. पाच वर्षापुर्वी मुंबईत पालिकेसाठी केवळ ४५ टक्के लोकांनीच मतदान केलेले होते. याचा अर्थ मुंबईकर देशाची चिंता जितकी करतो, तितकी त्याला आपल्या रहात्या मुंबई महानगराविषयी आस्था नसावी. मुंबईचे काय होईल वा व्हावे, याची चिंता मुंबईकराने राजकीय नेते आणि पत्रकारांवर सोपवलेली असावी. मागल्या दोनचार महिन्यांपासून मुंबईचे काय-काय झाले आहे, त्याची जोरदार चर्चा व आरोप-प्रत्यारोप होत राहिले. पण त्यासाठी पोटतिडकीने मतदानाला मुंबईकर बाहेर पडलेला दिसला नाही. मग परिवर्तन व्हायचे कसे? मुंबईकरांची ही मतदानाविषयी असलेली अनास्था समजून घेण्याची कोणालाही गरज वाटत नाही.

‘परिवर्तन तर होणारच’ अशी घोषणा देत भाजपाने यंदा शिवसेनेसमोर आव्हान उभे केले होते. सेनेला अशा आव्हानांची आता सवय झालेली आहे. कारण १९८५ नंतर सातत्याने कोणीतरी नवा पक्ष सेनेची पालिकेतील सत्ता उलथून पाडायला पुढाकार घेत असतो. त्या प्रत्येक निवडणूकीत चर्चा करून चोथा झालेले विषयच यंदाही चावले गेलेले आहेत. त्या प्रत्येक चर्चा वा आरोपातला आवेश बघितला, तर मुंबईकराने किमान ९०-९५ टक्के मतदान करून मुंबईत उलथापालथच घडवायला हवी. परंतु तसे कित्येक वर्षात कधी घडले नाही. अगदी मुंबईत कसाब टोळीच्या हल्ल्यात शेकडो लोक मारले गेल्यानंतरही घडलेले नव्हते. जो मुंबईकर जिवावर बेतले म्हणूनही सरकार पाडायला पुढे सरसावत नाही, तो रस्त्यावरचे खड्डे वा तुंबलेली गटारे यासाठी परिवर्तन घडवणार, अशी आशा बाळगण्यात काहीतरी गडबड आहे. मुंबई पालिकेच्या भ्रष्टाचार वा अनागोंदी कारभाराविषयी मागल्या तीनचार महिन्यात खुप बोलले गेले. पण तो तसा कारभार होत नसता, तर अनेकांना मुंबईत आपले नाव मतदार यादीतही नोंदता आलेच नसते. मुंबईत दिर्घकाळ अनागोंदी वा गैरकारभार चालू नसता, तर मुंबईची लोकसंख्या इतकी अफ़ाट व बेफ़ाट वेगाने विस्तारली नसती. ती वाढतेय आणि त्या महानगराचा नरक होतोय. पण त्याविषयी कोणीही बोलत नाही. मुंबईत पैसा आहे म्हणून जे मानवी लोंढे येऊन धडकत असतात, त्यांना इथल्या भ्रष्टाचारी कारभाराने सामावून घेतलेले आहे. सहाजिकच अशा मुंबईकरांचे हित गुळगुळीत टिकावू रस्ते वा साफ़सफ़ाईत नसून, इथल्या अनागोंदीत सामावलेले आहे. ही बाब लक्षात घेतली जात नाही. मुंबईत चांगले रस्ते व निर्दोष कारभार असावा ही ज्यांची अपेक्षा आहे, तशी लोकसंख्या आता २० टक्केही उरलेली नाही. उलट ज्यांना इथे अनागोंदी हवी, अशीच लोकसंख्या ८० टक्के आहे. मग परिवर्तन कसे होणार व कोण करणार?

मुंबईच्या विकासाची व आदर्श महानगराची स्वप्ने रंगवणार्‍यांना मुंबईकर म्हणजे कोण, तेही ठाऊक नसते. आज गलिच्छ वस्त्या व झोपडपट्ट्य़ा समजल्या जातात, अशा वस्तीत मुंबईची ७५ टक्के लोकसंख्या वास्तव्य करते, हे कितीजणांना ठाऊक आहे? तशा अवस्थेत जे लोक जगतात, त्यांना ते पक्के ठाऊक आहे. पण मुंबईच्या भवितव्याविषयी तावातावाने बोलणार्‍या मुठभर लोकांनाही ही मुंबईकरांची टक्केवारी माहिती नाही. प्रत्येक गोष्ट कायदे व नियनामुसार करायची असे मानले, तर निम्मेहून अधिक मुंबईकरांना चंबुगबाळे गुंडाळून मुंबई सोडावी लागेल. इथल्या भ्रष्टाचाराने त्यांना बेकायदा झोपडी वा चाळवस्त्या बांधून दिल्या आहेत. तशा वस्त्यांना अभय दिले आहे. प्रत्येक कायदा व नियम धाब्यावर बसवून त्यांना दिवाबत्ती, पाणीपुरवठा केलेला आहे. रस्त्यावर बसून पोटपाण्याचा रोजगार मिळवण्यास भ्रष्टाचाराने हात दिला आहे. ज्याच्याकडे परिवर्तनवादी अतिक्रमण म्हणून बघतात, त्यातच ७० टक्के मुंबईकर सामावलेला आहे. अशा मुंबईकराला रस्त्यात खड्डे असल्याने बिघडत नाही. कारण त्याच्यापाशी गाड्या बाईक नसतात. त्याला बस वा लोकलने प्रवास करावा लागतो. म्हणूनच रस्त्यावरच्या खाचखळग्याचा त्याला त्रास होत नाही. त्यापेक्षा आपल्या वस्र्तीत चाळीत दोन तासापेक्षा अधिक एक तास पाणी आल्यास त्याला हवे असते. कुठे नियम धाब्यावर बसवून पोटमाळा चढवून आपल्या घराचे चटईक्षेत्र त्याला वाढवून हवे असते. त्यासाठी नियमाच्या जंजाळात न फ़सता, कोणी पैसे खाऊन सोय करत असेल, तोच त्याला प्रेषित भासत असतो. थोडक्यात मुंबईकर म्हणून ओळखली जाणारी ७० टक्केहून अधिक लोकसंख्या भ्रष्टाचाराच्या मेहरबानीवर जगत असते आणि आपापल्या जगण्यातल्या गरजा भागवून घेत असते. त्यावर नियमांची गदा आली तर त्याचे आयुष्यच विस्कटून जाण्याचा धोका आहे. पण हे परिवर्तनवाद्यांना कसे उमजायचे?

मंगळवारी मतदान झाले, तेव्हा खड्ड्याविषयी प्रवचन करणारा मुठभर मुंबईकरही मतदानकेंद्राकडे फ़िरकला नाही. पण भ्रष्टाचारावर विसंबून जीवन कंठणारा मुंबईकर मात्र सवड काढून मतदानाला हजर झालेला होता. जर मतदानात हिरीरीने भाग घेणाराच भ्रष्टाचाराला आधार मानत असेल, तर त्याने परिवर्तनाला साथ कशी द्यावी? त्याला मोदी-फ़डणवीस वा उद्धव यांच्याशी काडीमात्र कर्तव्य नसते. त्याला पक्ष वा झेंड्याच्या रंगाशी देणेघेणे नसते. त्याच्यासाठी चाळ झोपडीच्या नित्यजीवनातील समस्या तातडीने सुटण्याला प्राधान्य असते. ते कुठल्याही पक्ष वा नेत्याकडून होणारे काम नाही. ते काम आपल्या विभागातील चतूर व्यवहारी अशा उपलब्ध व्यक्तीकडून होत असते. तुंबलेली गटारे वा फ़ुटलेले पाण्याचे नळ वेळीच हस्तक्षेप करून दुरूस्त करणार्‍या सहाय्यकाची मुंबईकराला रात्रंदिन गरज असते. मग त्याने पालिकेत जाऊन कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात हात धुवून घेतले, म्हणून कोणाला कर्तव्य नसते. तो कोट्यवधीचा भ्रष्टाचार हा बुद्धीमंत लोकांच्या अभ्यासाचा चमचमीत विषय असतो. मुंबईकराच्या जगण्याला भेडसावणारा विषय नसतो. मुंबईकराला महापालिका वा तिथल्या कारभाराविषयी आपुलकी नसते. तर आपल्याच परिसरातील व्यक्तीगत वा कौटुंबिक समस्यांचा निचरा करणारा नगरसेवक हवा असतो. तसे जे चारपा़च होतकरू लोक परिसरात कार्यरत असतात, त्यातूनच एखादा निवडून द्यावा, अशी मुंबईकराची ठरलेली भूमिका आहे. त्यात परिवर्तन कुठलाही पक्ष घडवू शकत नाही. म्हणूनच निम्मेहून अधिक मुंबईकर मतदानाला जात नाहीत आणि जे कोणी जातात, त्यापैकी कोणाला परिवर्तनाची उबळ आलेली नसते. मुंबई आणि मुंबईकराच्या जीवनातील ही वास्तविकता समजून घेतली, तर होणारे किमान मतदान व त्यातून लागणारे निकाल यांचा अर्थ उलगडू शकतो.

(लेख मंगळवारी मतदान चालू असताना लिहीलेला आहे)

1 comment:

  1. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण त्या पक्षाबरोबर एकत्र होतो (नांदत म्हणता येणार नाही !) हे सोयीस्करपणे विसरण्यातला संभावितपणा दिसतो . ' मी नाही त्यातली ... ' या प्रसिद्ध म्हणींचे स्मरण काहींना तरी झाले असणार त्यामुळे ' नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन ' या न्यायाने सेनेला मत देणे काहींनी पसंत केले असणार

    ReplyDelete