Wednesday, February 15, 2017

बाळासाहेबांचे स्मारक कोणते?


Image result for BMC transparency DNA
मुंबईतून शिवसेनेची सत्ता संपवण्याचा चंग बांधलेल्या भाजपाने आपल्या जाहिरनाम्यात एक मोठाच विनोद करून ठेवला आहे. त्यात कारण नसताना भाजपाने अनेक आश्वासने दिली आहेत. त्यातच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या लोकांना स्मारक म्हणजे काय ते तरी कळले आहे काय? कुठल्याही नावाजलेल्या व्यक्ती वा ऐतिहासिक व्यक्तीचे स्मारक हे त्याच्या कार्याशी संबंधित असते. त्या स्मारकाची भव्यता दुय्यम असते आणि त्याच्या आयुष्यातील ध्येय उद्दीष्टाशी संबंधित कृतीला स्मारकात प्राधान्य असते. जेव्हा त्याच अपेक्षा, उद्दीष्टे व ध्येलाला सुरूंग लावला जातो, त्याला स्मारक नव्हे तर नुकसानभरपाई म्हणतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक म्हणजे त्यांनी शून्यातून निर्माण केलेली शिवसेना नावाची संघटना आहे. ही संघटना राजकारणात आली ती मुंबईवर मराठी माणसाची छाप कायम राखण्यासाठी आली. संयुक्त महाराष्ट्र समितीने तसे वेगळे मराठी राज्य मुंबईसह स्थापन झाल्यानंतर मराठी बाणा सोडून दिला. त्यानंतर शिवसेनेचा उदय झाला आहे. कुठल्याही ठराविक विचारसरणीने शिवसेनेची स्थापना झालेली नाही, तर मराठी माणसावरच मुंबईत अन्याय होऊ लागला, त्याचा प्रतिकार करण्याच्या भूमिकेने शिवसेनेला अवतार घ्यावा लागला. तेच काम समिती म्हणून कार्यरत असलेल्या राजकीय पक्षानी तसेच पुढे चालविले असते, तर शिवसेनेचा जन्मच झाला नसता. राजकारणात कुठेही लुडबुड करत नसलेल्या एका व्यंगचित्रकाराने ती जबाबदारी पत्करली आणि शिवसेना स्थापन करून मुंबईवर मराठी अस्मितेचा झेंडा कायम फ़डकत ठेवला. म्हणूनच मुंबई महापालिकेवर त्यांचा भगवा फ़डकत ठेवण्यापलिकडे बाळासाहेबांचे अन्य कुठले स्मारक असू शकत नाही. ज्यांना बाळासाहेब ठाऊक नसतील तेच स्मारकाच्या वल्गना करू शकतात.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेची राजकारणात काहीही गरज नव्हती. पण राज्य स्थापनेनंतर समितीतल्या पक्षांनी मराठी अस्मिता वार्‍यावर सोडून, आपापल्या राजकीय भूमिका व अजेंडा पुढे करीत मराठी माणसाला वार्‍यावर सोडून दिले. त्यामुळे पोरका झालेला समितीच्या मागे धावणारा मराठी तरून अस्वस्थ झाला आणि त्याला बाळासाहेबांच्या मार्मिक साप्ताहिकाने वाचा फ़ोडली. त्याच मराठी आवाजाने शिवसेनेचे रूप धारण केले. त्यानंतर राजकारणातल्या विविध पक्षांनी आपापल्या राजकीय भूमिकांसाठी शिवसेना व तिच्या मराठी अस्मितेची हेटाळणी आरंभली. म्हणूनच शिवसेनेला निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागलेले होते. आरंभी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मराठीची भूमिका ठामपणे मांडणार्‍या कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना बाळासाहेबांनी पाठींबा दिलेला होता. पण त्यातून काही साध्य झाले नाही, म्हणून त्यांनी फ़क्त पालिका निवडणूकीत उतरण्याचा पवित्रा घेतला. त्यात पहिली लढवलेली निवडणूक ठाणे नगरपालिकेची होती. शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष ठाण्यातून निवडून आला. मग मुंबई पालिकेत शिवसेनेने उडी घेतली तरी त्यांना विरोधी पक्ष होण्यापेक्षा अधिक मजल मारता आलेली नव्हती. त्यासाठी तब्बल दोन दशकांची प्रतिक्षा करावी लागली. १९६६ ते १९८५ अशा १९ वर्षात शिवसेनेने तोही पल्ला गाठला. मुंबई पालिकेवर शिवसेनेचा भगवा फ़डकावण्याचे स्वप्न बाळासाहेबांनी १९६८ सालात बघितले होते. ते १७ वर्षांनी साकार झाले, तेव्हापासून मुंबई पालिकेत शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. थोडक्यात शिवसेना म्हणूनच जगाला ज्या माणसाची ओळख झाली, त्याचे कार्यक्षेत्र वा त्याची ओळख ठाणे व मुंबई अशा महानगरांची आहे. त्या दोन्ही पालिका व त्यावर शिवसेनेची छाप हेच बाळासाहेबांचे खरे व एकमेव स्मारक असू शकते.

गेल्या दोन वर्षापासून भाजपाने त्याच दोन्ही जागी शिवसेनेचे नावनिशाण पुसून टाकण्याचा चंग बांधला आहे. अर्थात असे निर्धार वा संकल्प करणारा भाजपा पहिलाच पक्ष नाही. त्यांच्यापुर्वी अनेक पक्षांनी वा तथाकथित नेत्यांनी शिवसेना संपवण्याचे व तिच्या हातून या दोन्ही महापालिका हिसकावून घेण्याच्या गर्जना अनेकदा केल्या आहेत. सहाजिकच भाजपाने वा त्याच्या शेलार-सोमय्या नामक दुधखुळ्या नेत्यांनी तशा डरकाळ्या फ़ोडण्यात नवे काहीच नाही. नवेपणा त्यांच्या नावात व पक्षात आहे. त्यालाही कोणी हरकत घेण्याचे कारण नाही. पण तसे काही करताना त्यांनी आपल्याच जाहिरनाम्यात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या वल्गना करणे हास्यास्पद आहे. कारण बाळासाहेबांचे स्मारक म्हणजे त्यांच्या स्मृती वा आठवणी जागवण्याची जागा असते. ती जागा एका इमारतीत बंदिस्त होऊ शकत नाही वा कुठल्याही परिसरात कोंडली जाऊ शकत नाही. त्या माणसाचा अखंड वावर जिथे होता आणि त्याचा हस्तक्षेप जिथे म्हणून झाला; त्याच्याशी बाळासाहेबांच्या स्मृती जोडलेल्या असतात. अशा मुंबई महापालिका व ठाणे महापालिकेतून शिवसेनेचे नाव पुसून टाकण्यातून बाळासाहेबांच्या स्मृतीच पुसण्याचा निर्धार व्यक्त होतो ना? मग ज्यांना शिवसेनेच्या स्मृती पुसायच्या आहेत, ते बाळासाहेबांचे स्मारक उभे करणार म्हणजे काय? हा निव्वळ विनोद नव्हेतर तो अतिशय क्रुर विनोद आहे. तो नुसता शिवसेनेवर केलेला विनोद नव्हेतर मराठी अस्मितेची अवहेलना आहे. तुम्ही शिवसेनेच्या विरोधातले राजकारण करायला अजिबात हरकत नाही. पण शिवसेना म्हणजेच बाळासाहेब हे विसरून विरोध कसा करता येईल? ज्याचे नावनिशाण पुसायचा निर्धार आहे, त्याचेच स्मारक उभारण्याच्या बाता कशाला? भाजपाचे नामोनिशाण पुसून अट्लबिहारी वाजपेयी वा दीनदयाळ उपाध्याय यांचे कोणी स्मारक उभे करू शकेल काय?

आशिष शेलार वा किरीट सोमय्यांची कुवत अवघे जग ओळखते. पण ज्या जाहिरनाम्याचे स्वरूप मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी पुढाकार घेऊन तयार केलेले आहे, त्यात शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख तरी कशाला आहे? यातला विरोधाभास त्यांच्याशी लक्षात आला नाही काय? बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यातील उमेदीचा सर्व काळ मुंबई महापालिकेत आपल्या संघटनेची सत्ता व बहूमत आणण्यासाठी खर्च केला होता. त्यालाच काळिमा फ़ासण्याचा चंग बांधण्यातून आपण मुंबईवर सेनेचे नव्हेतर बाळासाहेबांचे असलेले नाव संपवायला निघालेलो आहोत, हे लक्षात कसे येत नाही? की मुंबईकर जनता पुर्णपणे मुर्ख असल्याची या लोकांची समजूत आहे? लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपले प्रभूत्व सिद्ध करण्याचा व निवडणूकीने सत्ता संपादन करण्याचा अधिकार आहे. भाजपालाही मुंबई महापालिका जिंकण्या़चा अधिकार नक्कीच आहे. पण तो मिळवताना बाळासाहेबांच्या स्मारकाने नाटक कशाला? ज्याच्या संघटनेचे नामोनिशाण संपवायचे आहे, त्याच्या स्मारकाचे आश्वासन देण्यातला ढोंगीपणा व खोटेपणा कुणाला समजत नाही काय? स्मारक हे कर्तॄत्वाचे होत असते. आपल्या हयातीत मुंबई पालिकेच्या कारभारात त्यांनी दोन दशके हस्तक्षेप केला, त्याच काळात मुंबईचा सत्यानाश झाला; असाही भाजपाच दावा आहे. पण तशाच माणसाचे मुंबईत भव्य स्मारक करण्याचाही शब्द मुंबईकरांना दिलेला आहे. यातला खोटेपणा सहज नजरेत भरणारा आहे. लोकसभेतील यशानंतर भाजपाला कशाचे भान उरलेले नसेल तरी मुंबईकर बेभान झालेला नाही. मुंबई व ठाणे महापालिका आणि त्यावर फ़डकणारा शिवसेनेचा भगवा; हेच बाळासाहेबांचे उचित स्मारक आहे. हे समजण्याइतका त्या शहरातला नागरिक जागरूक आहे. तो भाजपाइतका ‘राष्ट्रवादी’ झाला नसून अजून महाराष्ट्रवादीच आहे. तोच अशा स्मारकाच्या वल्गनांना धडा शिकवल्याखेरीज रहाणार नाही.

4 comments:

 1. Bhau,
  Tumche Shivsena prem lapta lapat nahiye. BJP Vale dhutla tandul nakkich nahit...Pan mhanun Uddhav thakre Kay Balasaheb nahit...Tyani Balasaheb Sarah kartutv siddh karav.
  Maglya lekhat tumhi Shivsena he samrthan Keller Ani ata BJP jar Balasaheb he smarak bandhen mhantey Ani tyacha rajkiy fayda (Jo Shivsena ghyyla Java HOTA ) ghetay..Tar hya potdukhiche Karan Kalat NAHI.

  ReplyDelete
  Replies
  1. Ho kharay, bhau torsekar hyanchya kadun ashi apeksha navti. Aata bhau var tika, shivsena var tika keli mag lagech aamhala bhakt mhana. Pan kahitari shikka marach.
   Tyapeksha swachh najrene ekda bagha. Bhau tumhi hya veli far apeksha bhang kelay. Nirbhid nishpaksh vichar apekshit aahet tumchya kadun mhanun aamhi blog vachto. Pudhehi vachnar, pan uddhav che andhle samarthan shobhat nahi tumhala. Ek tari, agdi ek tari vidhayak mudda uddhav thakre bolat aahet ka. Bjp virodh jarur karava pan tya sathi swata aaplya vicharanshi farkat ghet aahot hehi tyani lakshat thevave.

   Delete
 2. भाऊ तुमचे सर्वच लेख सुंदर, वाचनीय असतात पण शिवसेनेविशयी लिहीताना तुमचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जाणवत नाही.सामना वाचल्याचा भास होतो.क्षमस्व.

  ReplyDelete