Thursday, February 23, 2017

जखम ओली झाली

संबंधित चित्र

महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाने मोठी मुसंडी मारली त्याचा मला नक्कीच आनंद आहे. पण त्याच वेळी मुंबईत भाजपाला मिळालेल्या यशाचे मला दु:खही झाले आहे. त्याला अर्थातच भाजपा कारण नाही. त्यात शिवसेनेने शिवसैनिकाला हरवले ह्याचे मला दु:ख झाले आहे. त्यामुळे तब्बल अर्धशतकापुर्वीची जखम ओली झाली आहे. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने संघर्ष केला. त्याची सुरूवात मुंबईत झाली होती आणि त्यात कॉग्रेसचा पराभव करून मुंबई महापालिका समितीने जिंकून त्या चळवळीचा पाया घातला गेला होता. त्याचा विरोधक असलेल्या कॉग्रेसचा पराभव करण्यासाठी अवघा मराठी माणूस मुंबईत एकत्रित झाला आणि समितीत आलेल्या पक्षांना त्याने प्रचंड बहूमत देऊन मराठी अस्मितेची ध्वजा उंचावली होती. मात्र त्याच मराठी राज्याची स्थापना व्हायचा निर्णय झाला आणि समितीतले एक एक पक्ष आपले ध्येय विसरून परस्परांच्या विरोधात लढू लागले. त्यात समितीचा बोर्‍या वाजला होता. त्यामुळेच महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिली महापालिका निवडणुक झाली, त्यात कॉग्रेस पुन्हा विजयी झाली आणि समितीच्या हातून मुंबई पालिका निसटली. तेव्हा कोवळ्या वयात जी जखम माझ्या पिढीला झालेली होती, त्यावरची खपली गुरूवारच्या निकालांनी काढली गेली. कारण जसाच्या तसा इतिहास पुन्हा घडला आहे. समितीच्या नेतृत्वानतील दुफ़ळीने समितीच्या तरूण कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास केला होता. तसा शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसैनिकांचा पराभव केला आहे. म्हणूनच तो इतिहास नव्याने सांगण्याची गरज आहे. त्यातली जखम आजच्या बहुतांश शिवसैनिकांनाही ठाऊक नसेल. जी जखम होऊ नये म्हणून आचार्य अत्रे व प्रबोधनकार ठाकरे अशा दोन दिग्गजांनी आटोकाट प्रयत्न केले होते. पण विविध नेत्यांच्या अहांकारापुढे त्यांची डाळ शिजली नाही आणि मराठी अस्मितेच्या ठिकर्‍या उडाल्या होत्या.

समितीची स्थापना मराठी अस्मितेचा हुंकार जागवण्यासाठी झाली होती. पण त्यातून ज्या विविध पक्षांचे उमेदवार पालिकेत निवडून आले, त्यांच्यात नंतर आपापल्या राजकीय अजेंड्यावरून खडाजंगी सुरू झाली आणि त्यात समितीचा बळी गेला होता. त्यामुळे हजारोच्या संख्येने समितीचा कार्यकर्ता म्हणून राबलेला मराठी तरूण निराश होऊन गेला होता. कारण त्याने या नेत्यांच्या वा समितीतील विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी काबाडकष्ट उपसलेले नव्हते. पण पुढल्या काळात त्या विजयवीरांना त्या भावनांची आठवण राहिली नाही आणि त्यांनी आपापल्या राजकीय हेतूसाठी समितीचा र्‍हास घडवून आणला. समितीतील कम्युनिस्ट व समाजवादी गटांना आपापली मते पुढे सारण्याचा इतका मोह झाला, की मराठी अस्मिता कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकली गेली. कम्युनिस्टांना डिवचण्यासाठी समाजवादी पक्षाने सोवियत फ़ौजांच्या युरोप खंडातील एका कारवाईच्या निषेधाचा प्रस्ताव पालिकेत आणला आणि त्याला कॉग्रेसने पाठींबा देऊन तो संमत झाला. त्यामुळे अर्थातच समितीमध्ये फ़ुट पडली आणि नंतरच्या निवडणुका कॉग्रेसने आरामात जिंकल्या. त्यामुळे समितीच्या नेतृत्वाखाली एकवटलेला मराठी तरूण निराश हताश होऊन गेला. त्याच्या भावना ओळखलेले दोनच नेते समितीमध्ये होते. पण त्यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नव्हता. त्यातले एक होते प्रबोधनकार ठाकरे आणि दुसरे आचार्य अत्रे! त्यांनी या सर्व पक्षांना एकत्र ठेवण्याचा खुप आटापिटा केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे समितीला पर्याय होऊ शकेल व मराठी अस्मिता जपली जाऊ शकेल, अशी काही वेगळी रचना करण्याचा विचार याच दोघांच्या डोक्यात घोळत होता. त्याचीच परिणती पुढे शिवसेनेत झाली. आजची शिवसेना त्यातून जन्माला आली. पण तिच्या प्रसव वेदना सुरू झाल्या, त्या १९६० दशकाच्या आरंभी झालेल्या पालिका निवडणूकीत कॉग्रेसच्या जिंकण्याने! त्याच जखमेवरची खपली पुन्हा निघाली आहे.

कारण कॉग्रेसला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे वाटले होते आणि त्या पक्षाने पुन्हा मुंबई काबीज केल्यावर तिच्यावरचा मराठी छाप पुसण्याचा उद्योग सुरू केला होता. कॉग्रेसमध्येही अनेक मराठी नेतेच होते आणि तिच्यातर्फ़े निवडून येणार्‍यातही बहुतांश मराठीच प्रतिनिधी होते. पण त्यांच्यामध्ये मराठीच्या अस्मितेसाठी हिरीरीने पुढे येण्याची हिंमत नव्हती. त्याच धुसफ़ुशीतून नाराज मराठी तरूणांचा आवाज घुमू लागला आणि त्याला ‘मार्मिक’ साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे यांनी वाचा फ़ोडली, तर प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या भावनेला खतपाणी घातले. त्यातून शिवसेना नावाची मराठी तरूणांची संघटना उदयास आली. पुढे ती निवडणूकीतही उतरली. तिला पालिकेतील सत्ता संपादन करण्यात खुप वर्षे खर्ची पडली. पण निदान मराठी माणसाचा आवाज पुन्हा मुंबईत घुमू लागला होता. थोडक्यात समितीने शिवसेना म्हणून नवा अवतार घेतला होता. जर समिती फ़ुटलीच नसती आणि समितीतल्या पक्षांनी एकजुटीने मराठी अस्मितेची जपणूक केली असती, तर शिवसेनेला अवतार घ्यावा लागला नसता आणि बाळासाहेबही व्यंगचित्रकला बाजूला ठेवून राजकारणात नेते झाले नसते. पण त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागली. ती समितीतल्या अनेक पक्ष व नेत्यांच्या अहंकारी भांडणाने, मराठी अस्मितेची पायमल्ली केली म्हणून! आज तीच शिवसेना कुठेतरी हरवून गेली आहे. शिवसेनेची समिती होत गेली आहे. त्याच शिवसेनेतून बाजूला झालेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हा गट आणि शिवसेनेच्या विभाजनाचा लाभ घेऊन भाजपाचा विजय झाला आहे. तेव्हा समितीतले पक्षनेते अहंकाराच्या आहारी गेले आणि कॉग्रेस जिंकली होती. आज भाजपा निर्विवाद बहूमत मिळवू शकला नसला, तरी सेना व मनसे अशा दोन गटातील विभाजनाने मराठी मतांची विभागणी तिसर्‍या पक्षाला मोठे यश देऊन गेली आहे. हेच अपेक्षित असेल, तर अर्धशतकापुर्वी शिवसेनेची स्थापना होण्याची गरजही नव्हती.

तेव्हा मराठी माणूस व मराठी तरूणाने आपल्याला कशाला डोक्यावर घेतले आहे, तेच समितीतले पक्ष विसरून गेले होते आणि आपापले अहंकार सुखावण्यासाठी मराठी अस्मितेशी खेळले होते. आज दोन ठाकरे बंधूंच्या अहंकारी भांडणाने काय वेगळे घडले आहे? दोघांना वेगवेगळे लढून जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा ३०-४० जागा त्यांनी एकमेकांशी लढताना गमावल्या आहेत. त्या जागा हिशोबात घेतल्या तर मुंबईचा मराठी बाणा राखला गेला असता. एका ठाकरे बंधूने ताठरपणा दाखवला नसता व दुसर्‍याच्या लवचिकतेला साथ दिली असती, तर मतमोजणी संपल्यानंतरचे चित्र कसे दिसले असते? भाजपाने भले बहूमत मिळवले नसेल, पण शिवसेनेशी बरोबरी केली आहे आणि त्याचे श्रेय त्या पक्षापेक्षाही दोन ठाकरे बंधूंच्या बेबनावाला द्यावे लागेल. बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन केलेला प्रयास झिडकारताना, उद्धव ठाकरे यांना आपल्याच आजोबांचे स्मरण कसे झाले नाही? तेव्हा प्रबोधनकार समितीतील पक्षांना एकत्र राखण्यासाठी धडपडले होते. ते स्वत: कुठली निवडणुक लढले नाहीत, की कोणाचे तिकीटवाटपही करीत नव्हते. पण मराठी अस्मितेसाठी त्यांनी तेव्हा अनेक राजकीय नेत्यांच्या मनधरण्या केल्या होत्या. आज त्यांच्याच नातवांना आपल्या आजोबाच्या मराठी अस्मितेपेक्षा आपापले अहंकार मोठे वाटले आहेत. म्हणूनच माझ्या जुन्या जखमेवरची खपली निघाली आहे. शिवसेनेच्या स्थापनेमागची खरी धारणा व प्रेरणा प्रबोधनकार होते आणि त्यांचेच स्मरण त्यांच्या वारसांना राहिलेले नाही. समितीच्या एकजुटीसाठीची त्यांची तळमळ ज्यांना समजणार नाही, त्यांना शिवसेनाच समजली नाही. त्यांच्याकडून मराठी अस्मितेची राखणदारी कशी होऊ शकेल? तेव्हा समितीच्या नेत्यांनी मराठी बाण्याला पराभूत केले होते. तर आजच्या शिवसेनेनेच शिवसैनिकाला पराभूत व खच्ची केले आहे. दु:ख त्याचे आहे.

11 comments:

 1. आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची खरी कसोटी आहे .सत्ता थोडक्यासाठी हुलकावणी देत आहे हे दिसत असताना आणि मतदारांकडे ताबडतोब परत जायचे नसताना ते कोणते डावपेच किती
  ' पारदर्शक 'पणे खेळतात ते पाहू या !

  ReplyDelete
 2. भाऊ साहेब तुम्ही मार्मिकमध्ये होता, तुम्ही शिवसेना आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना जवळून पहिले आहे. म्हणून काही प्रश्न विचारात आहे. शिवसेना खरंच मराठी माणसासाठी होती का? २०-२५ वर्षाचा असताना मी सुद्द्धा शिवसेनेला पाठिंबा देत होतो. पण जस जस वय वाढत गेला तसं शिवसेनेचा मराठी बाणा म्हणजे सकाळी मराठी आणि रात्री परप्रांतीय समजून चुकले. जसं इतर राज्यात प्रादेशिक पक्ष वाढले तसे शिवसेना का नाही वाढली याचे कारण लोकांना शिवसेनेबद्दल नसलेला विश्वास असू शकेल का? सर्वच दोष मराठी लोकांना न देता शिवसेनेचे नेतृत्व पण चुकले आहे कि नाही? मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे हे सर्व भविष्यात मुंबई तोडण्यासाठीचा डाव आहे. पण मुंबईत जेव्हा मांसाहारी म्हणून मराठी माणसाला घर नाकारले जाते तेव्हा शिवसेना का नाही आवाज उठवत? किंबहुना या बिल्डरला मोठे करणारे शिवसेना आणि मनसेच आहे हे आम्ही कसे विसरायचे? मुंबई महापालिकेत झाडून सर्व कंत्राटदार राजस्थानी आहेत हे आम्ही कसे विसरायचे? कृपाशंकर सिंग बरोबरचे लागेबंध कसे विसरायचे? शिवसेनेला अमराठी लोकांची साथ या निवडणुकीत का घ्यावी लागली. मराठी माणूस ताटातल्या लोणच्या सारखा फक्त निवडणुकी पुरता राहिला आहे. शिवसेनेला आणि मनसेला फक्त निवडणुकीपुरता मराठी माणूस हवा आहे. निवडणूक झाल्यावर यांचे आर्थिक व्यवहार अमराठी लोकांशी होतात. मग मराठी लोकांनी का यांना साथ द्यावी. उत्तराची अपेक्षा आहे. धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. एकदम बरोबर आहे.

   Delete
  2. बरोबर आहे. फारच परखड. मुस्लीम विषयात तही असेच आहे.

   Delete
 3. जबरदस्त पोस्ट, अत्यंत मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! खर तर सत्तेच्या अमीषापायी शिवसेना आणि बीजेपी एकत्र आले नाहीत आणि नुकसान मराठी माणसाचे झाले

  ReplyDelete
 4. Bhavu,tumhi ya vishayawar nikal lagalya nantar mat mandtay. Nivadnukiche vare vahu lagalyawar ka nahi tumhi he lihilat? Maharashtra Navnirman Senechya Nasik madhil kamavar pan tumacha lekh vachayala aawadel aamhala.

  ReplyDelete
 5. फडणवीसांनी गृह खात्याचा उपयोग आता बाकी पक्ष साफ करायला न करता कायदा व सुव्यवस्था स्थापन करायला करावा...आपल्या कार्यकर्त्यांना आवरावे...

  ReplyDelete
 6. कु.आदित्यच्या होणाऱ्या सुपुत्राला सच्च्या शिवसैनिकांचे दुःख समजेल कदाचित .

  ReplyDelete
 7. Bhau, tumcha hi bmc cha andaj chukala ch... Facebook ani WhatsApp var election results avalambun nasatana

  ReplyDelete
 8. कृपया latenightedition.in वर दोन लेख लिहिलेले आहेत जे एक वेगळी समीक्षा मांडत आहेत... माफ करा भाऊ आपली समीक्षा पुर्णपणे पटत नाही! ह्या दोन लेखांतून मी माझं मत नोंदवलं आहे...
  1. शिवसेनेची अडलेली वाटचाल?
  http://latenightedition.in/wp/?p=2394

  2. शिवसेना मनसे मिलन सिद्धांत?
  http://latenightedition.in/wp/?p=2399

  ReplyDelete
 9. काय करावे उध्दव साहेबांनी .....

  ReplyDelete