Thursday, February 2, 2017

मानवी पशूंचे कळप

Image result for apathy koppal

काही दिवसांपुर्वी म्हैसूर येथील एका रस्त्यावर पोलिसांच्या जीपला अपघात झाला आणि पुर्णपणे चेपलेल्या त्या जीपमध्ये काही पोलिस प्राणांतिक धडपड करत होते. जीप अशी चेपली गेली होती, की त्यात अडकलेल्या पोलिसांना जखमा झाल्या होत्या आणि त्यातून त्यांना बाहेरही पडता येत नव्हते. इतका मोठा अपघात असल्याने लगेच तिथे बघ्यांची गर्दी जमा झाली. जखमी पोलिस जीवाच्या आकांताने आपल्या सुटकेची व मदतीची मागणी करत असूनही, बघ्यांच्या गर्दीतला कोणीही मदतीला पुढे सरसावला नाही. पण त्याच गर्दीतल्या अनेकांनी आपापले स्मार्ट फ़ोन काढून घटनेचे जीवंत चित्रण मात्र करून घेतले. हे चित्रण मग अनेक वाहिन्यांनी प्रक्षेपितही केले. त्यापैकी एका चित्रणात तिघेजण असे चित्रण करताना व पोलिस आकांताने मदत मागत असताना दिसत होते. त्यांचे आवाजही ऐकू येत होते. पण चारपाच डझन नागरिकांपैकी कोणालाही जखमींच्या मदतीला धावून जाण्याची इच्छाही झाली नाही. अर्थातच अशा घटना घडून गेल्यावर मोठमोठे सल्ले दिले जातात आणि विश्लेषणही केले जात असते. पण अशा प्रसंगात शासन वा पोलिसांनी काय करावे? त्याच्या विश्लेषणापेक्षाही सामान्य नागरिकाने काय करावे, याची माहिती लोकांच्या मेंदूत भरणे अगत्याचे असते. त्याचा अभाव असल्याने साधी माणूसकी आपण विसरत चाललेले आहोत. त्या घटनेत नंतर पोलिसांचा मृत्यूही झाल्याचे सांगितले गेले. मग अशा अपघाताने त्यांना मारले, की सभोवती जमलेल्या संवेदनाशून्य जमावाने त्यांना ठार मारले असे म्हणायचे? माणूस म्हणून वा नागरिक म्हणून, आपली काही जबाबदारी असते याचा सर्वांनाच विसर पडल्याची ही साक्ष आहे. त्यात नवे काहीच नाही. कुठल्याही मोठ्या शहरात अशा गोष्टी हल्ली नित्यनेमाने घडू लागल्या आहेत. त्यातून आपण एक समाज नसून निव्वळ संवेदनाशून्य पशूंचा कळप असल्याची साक्ष मिळत असते.

कर्नाटकच्याच कोप्पल जिल्ह्यात तशीच आणखी एक घटना अलिकडे घडली. एक सायकल स्वार बसने भर वर्दळीत टक्कर दिल्याने कोसळला आणि तब्बल पाऊण तास मदतीची भिक मागत होता. पण सभोवती जमलेल्यांनी त्याचे चित्रण स्मार्ट फ़ोनवर करताना, मदतीचा हात पुढे केला नाही. म्हणून त्याचा अखेरीस तिथेच मृत्यू झाला. काही दिवसांपुर्वी कोलकात्यात एका वृद्ध जोडप्यावर असाच प्रसंग आला. त्यापैकी माणूस आधीच मेला होता आणि जखमी स्थितीत विव्हळणार्‍या त्याच्या पत्नीला कोणी इस्पितळात घेऊन जाण्याची तत्परता दाखवली नाही. वृत्तवाहिन्यांवर आल्यामुळे या घटना इथे नोंदवता आल्या. पण तितकेच नाही. कल्याणच्या एका तलावात सकाळच्या सुमारास कोणी वृद्ध नागरिक आत्महत्या करत होता. तर तिथे पाय मोकळे करण्यास आलेल्या एका नागरिकाने ते बघितले आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्यानेही म्हातार्‍याच्या पाठोपाठ तलावात उडी घेतली. सहाजिकच मग जवळपास वावरणारे अनेकजण मदतीला पुढे सरसावले. उडी घेणार्‍याने त्या वृद्धाला बुडण्यापासून वाचवले आणि इतरांनी दोर्‍या वगैरे जमा करून दोघांना पाण्यातून बाहेर काढले. या घटनांतील फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. नुसता लक्षात घेऊन चालणार नाही, तर समजूनही घेतला पाहिजे. जेव्हा त्या वृद्धाने तलावात उडी घेतली, तेव्हा इतरांचे तिकडे लक्ष नव्हते. एकाच व्यक्तीने ते बघितले होते आणि निव्वळ शंका आल्यानेच त्याने पाठोपाठ पाण्यात उडी घेतली. म्हणजे आत्महत्या करणार्‍या निराश माणसालाही त्यापासून परावृत्त करण्याची माणुस म्हणून आपली जबाबदारी असल्याचे भान असलेला एक माणूस तिथे जवळपास होता. त्याने सभोवताली असलेल्या इतरांना आपल्या कृतीतून कार्यरत केले होते. अशा माणसाने नुसता पुढाकार घेतला तरी अवघा समाज एकवटून कामाला लागतो, असा त्याचा अर्थ आहे.

आपण पुढारलो आहोत आणि माणूसकीच्या नवनव्या शेकडो कल्पना आपल्याला आता ठाऊक झालेल्या आहेत. त्यामुळेच माणुसच नव्हेतर जनावरांच्या व पशूप्राण्याच्या हक्कांचेही वादविवाद आपल्या देशात रंगत असतात. मध्यंतरी तामिळनाडूतील जालिकट्टू नामक खेळात पाळीव बैलावर अमानुष अत्याचार होतात म्हणून वाद रंगलेला होता. त्यात बोलणार्‍या राजकीय नेत्यांपासून विचारवंतांपर्यंत प्रत्येकाने आपले पांडित्य सांगितलेले आहे. त्यांचा सूर बघितला तर प्रत्येकजण सरकार व प्रशासनाच्या कोणकोणत्या जबाबदार्‍या आहेत, त्याचाच पाढा वाचत होता. नागरिक म्हणून लोकांच्या काही जबाबदार्‍या आहेत, याविषयी कोणी चकार शब्द बोलला नाही, की बोलतही नाही. सर्व पांडित्य नेहमी नागरिक म्हणून असलेल्या अधिकारावर झाडले जात असते. पण लोकशाही नागरी समाजात कुठलेही अधिकार नागरिकाला मिळतात, तेव्हा त्याच्या सोबत जबाबदार्‍याही येत असतात, हे कोणी चुकूनही बोलत नाही. पोलिस व सरकारने काय करावे, त्याचे बारीकसारीक तपशील सातत्याने ऐकवले जात असतात. पण शासन व कायद्याच्या पलिकडे नागरिकांनी कुठल्या प्रसंगी काय करावे, त्याची माहिती कोणीही सांगत नाही. अधिकार व हक्क फ़ुकटात येत नसतात. तर जबाबदारीचे ओझे डोक्यावर घेऊनच कुठलाही अधिकार येत असतो. याविषयी आपला समाज संपुर्ण अनभिज्ञ आहे. तसे नसते तर उपरोक्त घटनातील जखमींना असे तडफ़डून मरावे लागलेच नसते. कल्याणचा एक नागरिक धाव घेऊन एका आत्महत्या करणार्‍याला परावृत करतो, तर अन्य घटनातील नागरिक असे निष्क्रीय का राहिले? त्याचे उत्तर निष्फ़ळ व निरर्थक पांडित्यामध्ये सामावलेले आहे. कुठल्याही वैचारीक चर्चा व परिसंवादातून लोकांना जबाबदार्‍यांचे भान आणून दिले जात नाही. पण प्रत्येकक्षणी आपले अधिकार असल्याचे मात्र मनावर बिंबवले जात असते.

कायदा वा प्रशासन ह्या सामुहिक व्यवस्था व यंत्रणा आहेत. जिथे मानवी प्रयास तोकडे पडतात, तिथे त्यांनी धावले पाहिजे. पण नित्यजीवनात प्रत्येक नागरिकाने अन्य कुणा माणसाच्या संकटकाळात धावून मदतीला जाणे अगत्याचे असते. त्याला माणुसकी म्हणतात. अशा माणूसकीतून सामाजिक व्यवस्था उभ्या रहातात आणि त्यालाच आपण कायदा वा प्रशासन म्हणतो. पण त्या व्यवस्था उभ्या केल्याने माणूस वा नागरिक म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. अशा मदतीची वा जबाबदारी पार पाडण्याची वेळ येते; तेव्हा त्या व्यवस्थांना कळवणे इतकेच आपले काम नसते. त्या सुविधा येऊन पोहोचण्यापर्यंत अशा पिडित जखमी व्यक्तीला शक्य असेल ती मदत विनाविलंब उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न; ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते. असा नागरिकच कायदा वा अन्य मार्गाने मिळालेल्या अधिकाराचा हक्कदार असतो. जो देऊ शकतो, त्यालाच घेण्याचा अधिकार असतो. कल्याणच्या पाण्यात उडी घेणार्‍या त्या नागरिकाला सगळे नागरी अधिकार असतात. पण संकट काळात नुसती बघ्याची भूमिका घेऊन अंग झटकणारे मुळात नागरिकच नसतील, तर त्यांना कुठलाही नागरी अधिकार कशाला असू शकतो? थोडक्यात निर्बुद्ध चर्चा संवादातून सतत अधिकार शिकवले जातात आणि जबाबदारीचे भान विसरण्यास हातभार लावल्याचा हा दुष्परिणाम आहे. म्हणून आपल्या देशात दिवसे़दिवस अधिकार सांगणार्‍या लोकांची संख्या वाढत असून, जबाबदारी उचलणार्‍यांची संख्या वेगाने घटत चालली आहे. आपले रुपांतर मानवी समाजाकडून पशूंच्या कळपामध्ये होत चालले आहे. एका पशूला मरताना बघूनही त्याचा कळप जसा त्रयस्थ म्हणून बघ्या होतो, त्यापेक्षा उपरोक्त घटना वेगळ्या आहेत काय? अधिकाराच्या गप्पा रंगवणार्‍यांनी दिवसेदिवस भारतातील नागरी समाजाला पशूंचा कळप बनवण्याचे पाप केल्याचा तो परिणाम आहे.

1 comment:

  1. मोदिच्या यावेळेच्या मन कि बात मधील पहिले वाक्य होते , नागरिकांना जशी हक्काची जाणीव असते तशी कर्तव्याची जाणीव पण पाहिजे .

    ReplyDelete