Sunday, February 5, 2017

उतावळी नवरी चिन्नम्मा

sasikala natarajan profile के लिए चित्र परिणाम

जयललितांना तामिळनाडू अम्मा म्हणून ओळखत होता. त्यांच्या सखीप्रमाणे सोबत केलेल्या शशिकला नटराजन यांना म्हणूनच चिन्नम्मा म्हटले जाते. चिन्नम्मा म्हणजे धाकडी बहीण! जया अम्माच्या अखेरच्या काळात त्यांच्या सोबत होत्या. भ्रष्ट्राचाराच्या आरोपाखाली तुरूंगात जाण्याची वेळ आल्यावरही चिन्नम्मा अम्माच्या सोबतच होत्या. सहाजिकच त्यांना अम्माची वारस मानले गेले. पण मध्यंतरी अम्मानेच शशिकला यांच्यासह त्यांच्या तमाम कुटुंबाला आपल्या घरातून व पक्षातून हाकलून लावले होते. कारण याच मंडळींनी अम्मावर अन्नातून व औषधातून विषप्रयोग करण्याचे कारस्थान केल्याची कुजबुज होती. नंतर शशिकलांनी थेट संपर्कातून अम्माची माफ़ी मागितली आणि अम्माने त्यांना एकटीला आपल्या घरात प्रवेश दिला. बाकीचे नटराजन कुटुंबिय कधी माघारी येऊ शकले नाहीत. पण अम्मा आजारी पडल्यावर त्यांचा वावर घरात दिसू लागला. मात्र त्याच कालखंडात चिन्नम्माने कधी अम्माच्या खर्‍याखुर्‍या आप्तेष्टांना अम्माजवळ फ़िरकू दिलेले नव्हते. आजारपणात वा अम्मा बेशुद्धावस्थेत असताना सर्व निर्णय चिन्नम्माच घेत होती आणि निधनानंतर तिनेच सर्व सुत्रे हाती घेतली. अम्माचा मृत्यू जाहिर करण्यापुर्वी मुख्यमंत्रीपदी पन्नीरसेल्व्हम यांना बसवण्याचाही निर्णय धाकटीचाच होता. आता पक्षाची सुत्रे हाती घेतल्यावर अवघ्या दोन महिन्यात चिन्नम्माने राज्याची सत्तासुत्रेही हाती घेण्याचा धाडसी पवित्रा घेतला आहे. इतक्या वेगाने सत्ता हाती घेणे चिन्नम्मासाठी अवघड नाही. कारण पक्षाचे तमाम पदाधिकारी व आमदार तिच्या मुठीत आहेत. पण निवडून आलेले आमदार खासदार वा तुम्हीच नेमलेले पदाधिकारी म्हणजे मतदार नसतो. त्याच्यावर राज्य करण्याचे कौशल्य चिन्नम्मापाशी कितपत आहे? नसेल तर आधीच सामान्य तामिळी जनतेच्या मनात असलेल्या शंका संशयांना खतपाणी घातले जाण्याचा धोका आहे.

५ डिसेंबर रोजी अम्माचे निधन झाल्याची घोषणा झाली. तेव्हापासून त्यांच्या वारश्याची चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या हयातीतच पन्नीरसेल्व्हम दोनदा हंगामी मुख्यमंत्री झालेले असल्याने पुन्हा एकदा त्यांचीच तिथे वर्णी लागल्याने फ़ारसे बिघडत नव्हते. शिवाय पक्षाची सुत्रे घरातूनच हलवली जात असल्याने, पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी चिन्नम्माच्या महत्वाकांक्षेपुढे मान तुकवली असू शकते. पण अम्माचा करिष्मा मतदारांवर होता आणि अन्य राजकीय पक्षांसह नेत्यांशी जुळवून घेण्याची क्षमता अम्मापाशी होती. ते कौशल्य अजून तरी शशिकला यांना कधी दाखवता आलेले नाही. कधीकाळी अशीच स्थिती अण्णा द्रमुक पक्षात आलेली होती. पक्षाचे संस्थापक. एम. जी. रामचंद्रन यांनी उघडपणे आपल्या वारस म्हणून जयललितांना पुढे केलेले होते. पण त्यांच्या आजारपणात व निधनानंतर दरबारी राजकीय सहकार्‍यांनी पत्नीला पुढे करून, जयललिताचा पत्ता कापला होता. त्यांना मृतदेहाच्या जवळ फ़िरकू दिले नाही, की पक्षात कुठले स्थान शिल्लक ठेवले नाही. कारणही सोपे होते. सर्व आमदार लोकप्रतिनिधी व पदाधिकारी दरबार्‍यांच्या हुकूमाचे ताबेदार होते. पण जेव्हा एमजीआरची पत्नी यांना निवडणूकीला सामोरे जाण्याची वेळ आली, तेव्हा खरी कसोटी लागली होती. तिथे बंडाचा झेंडा घेऊन उभ्या असलेल्या जयललितांनी बाजी मारली. पक्षातला कोणीही ज्येष्ठ नेता सोबत नसताना, सामान्य कार्यकर्ता जयललितांना साथ द्यायला उभा राहिला आणि त्यानेच अण्णा द्रमुकची नवी घडी बसवली. मग जानकी अम्माने राजकारणातून संन्यास घेतला होता. कारण एमजीआर यांच्याइतका जनमानसावर प्रभाव पाडण्याचा करिष्मा पत्नी जानकीपाशी नव्हता. सहाजिकच सत्ता पक्षाने गमावली आणि द्रमुक सत्तेत आला. तेव्हा जयललिता विरोधी नेत्या झाल्या. तिथेही त्यांची अवहेलना झाली आणि लोकमत बदलत गेले.

चिन्नम्मा आणि तीन दशकापुर्वीच्या जानकीअम्मा, यांच्यातले हे साम्य दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण एमजीआर यांच्या आजारपणात आणि निधनानंतरच्या घडामोडींची अण्णा द्रमुक पक्षात सध्या पुनरावृत्ती चालू आहे. तेव्हा भले जानकीअम्मा महत्वाकांक्षी नव्हत्या. पण त्यांच्या भोवती जमा झालेले तमाम दरबारी नेते व पदधिकार्‍यांनी असेच डावपेच उभे करून, वारसाची लढाई काहीकाळ जिंकलेली होती. त्यांनी जनमानसाची वा लोकमताची पर्वा केलेली नव्हती. तर आमदारांची बहुसंख्या व पदाधिकार्‍यांचा पाठींबा, यावर सत्ता बळकावली होती. त्यासाठी जानकीअम्मा व एमजीआर यांच्या एकत्रित फ़ोटोंचा सरसकट वापर करून, लोकांची दिशाभूल चालविली होती. त्याचा फ़ारसा उपयोग निवडणूकीच्या रिंगणात झाला नाही. तिथे खरा योद्धा जयललिता असल्याचे दाखवून सामान्य मतदार व जनतेने वारसा विषयाचा थेट निकाल लावून टाकला. आज नेमक्या त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. चिन्नम्मा यांनी आपल्या मुठीत ठेवलेल्या पदाधिकार्‍यांच्या बळावर सत्ता बळकावण्याचा लपंडाव आरंभला आहे. पण त्या एक गोष्ट विसरतात, की लोकमतावर जयाअम्माने पक्षाची उभारणी केली आणि त्यांच्याच कृपेने वा जवळीकीने चिन्नम्मा आपल्याच पसंतीचे व विश्वासातले लोक पदाधिकारी नेमू शकल्या होत्या. त्या गोतावळ्यामध्ये मते मिळवण्याची वा जनतेला प्रभावित करण्याची कुवत नसेल, तर सत्तेचे सिंहासन डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही. मुठभर आमदारांनी पक्षांतर केले, किंवा फ़ाटाफ़ुट होऊन बहूमत गोत्यात आणायची खेळी विरोधकांनी केली, तर केव्हाही लोकमत आजमावण्याची वेळ येऊ शकते. त्याला मुठीत राखण्याची वा प्रभावित करण्याची शशिकला यांची क्षमता अजून तरी सिद्ध झालेली नाही. सहाजिकच तशी वेळ टाळण्याला राजकारण म्हणतात. तेच चिन्नम्मा विसरून गेल्या आहेत.

पक्षाच्या सरचिटणिस या सर्वोच्च पदावर आपली निवड करून घेतल्यावर, आता चिन्नम्माला मुख्यमंत्रीपदी बसण्याचे वेध लागलेले आहेत आणि काडीमात्र अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. अशा स्थितीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला तर कसोटीचा प्रसंग लौकर येऊ शकतो. लगेच सत्तेत बदल करण्यापेक्षा असलेली व्यवस्थाच काही काळ चालू राहिली; तर आधी पक्षावर आपले पक्के प्रभूत्व चिन्नम्मा सिद्ध करू शकतात. त्या निमीत्ताने राज्यभर दौरे करून आपल्या व्यक्तीमत्वाची लोकांवर छाप पाडण्याची मोहिम राबवू शकतात. प्रशासकीय जबाबदारी नसल्याने त्यांना टिकेच्या भडीमारालाही सामोरे जावे लागणार नाही. तो हल्ला अंगावर घेण्यासाठी आधीचे मुरब्बी राजकीय नेते पक्षात खुप आहेत आणि त्यांचे कवच करून चिन्नम्मा आपले बस्तान पक्के करू शकतात. उलट इतक्या घाईगर्दीने सर्व सत्ता हाती केंद्रीत केली, तर त्यांना प्रत्येक बाबतीत जबाब देण्याची संकटे येऊ शकतात. तितकी सज्जता वा कुशलता त्यांच्यापाशी अजिबात नाही. म्हणूनच अम्माच्या निधनानंतर दोन महिन्यातच शशिकला स्वत:ला अम्मा म्हणून पेश करायला निघाल्या, हा उतावळेपणाच म्हणावा लागेल. कारण अतिशय मुरब्बी व अनुभवी लढवय्यांना नवागताने मोठी लढाई करायला आव्हान द्यावे, इतका हा मुर्खपणा आहे. आजही मुख्यमंत्री नसताना राज्याची सत्तासुत्रे त्यांच्याच जाती केंद्रीत झालेली आहेत. पण कुठल्याही निर्णयासाठी चिन्नम्माला कोणी जबाबदार धरू शकत नाही. पण त्या पदावर आरुढ झाले, मग आपल्याच नव्हेतर कुठल्याही सहकार्‍याच्या वर्तनालाही जबाबदार धरले जाणार आहे. म्हणूनच इतक्या घाईने मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेला उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग, असेच म्हणावे लागणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पाच वर्षे ही विधानसभा टिकणार नाही, असाही निष्कर्ष काढता येईल.

1 comment:

  1. Wah wah bhau......jas bolalat tasach hot chalalay.....Again well predicted.

    ReplyDelete