मुंबईत युती तुटल्याने भाजपाचे फ़ारसे बिघडले नसते, कारण तसाही भाजप निदान पालिकेतला मोठा पक्ष नव्हता. लोकसभा व विधानसभेची गोष्ट वेगळी असते. पुर्वी त्या निवडणुका जिंकण्यार्या पक्षाला मुंबई पालिकेत हमखास बहूमत वा सत्ता मिळाली, असे अपवादानेच झालेले आहे. म्हणूनच मुंबईत एक आमदार जास्त निवडून आला म्हणून भाजपाने बहूमताचे दावे करीत लढतीमध्ये उतरण्याची गरज नव्हती. शिवसेनेने युती मोडली इतके म्हणून प्रचाराचे रान उठवले असते, तर त्या पक्षासाठी काम सोपे झाले असते. पण मुंबई पालिकेची निवडणुक भाजपाने प्रतिष्ठेची केली आणि आता बाकीच्या महाराष्ट्रात व्हायचे ते होईल, पण मुंबई जिंकलीच पाहिजे; अशी कोंडी भाजपाची झाली आहे. म्हणूनच शक्य तितक्या अधिक सभा मुंबईत गाजवणे व बाजी मारणे भाजपासाठी अत्यावश्यक होऊन बसले आहे. पण दुर्दैवाने तशा मोठ्या सभा घेऊन गाजवू शकतील, असे कोणीही नेते मुंबई भाजपाकडे नाहीत किंवा महाराष्ट्रातही नाहीत. त्यामुळेच प्रचाराचा सर्व भार मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच़्यावरच आलेला आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुधीर मुनागंटीवार अशा कुणावरही ते काम सोपवता येत नाही. म्हणून तर मुंबईसह अवघ्या राज्यात प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना धावणे भाग आहे. अशा स्थितीत सर्वत्र स्वबळावर लढणार्या शिवसेनेने मुंबई काबीज करण्यासाठी उर्वरीत महाराष्ट्राकडे साफ़ दुर्लक्ष केलेले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईबाहेर फ़ार सभा घेतलेल्या नाहीत. पण मुख्यमंत्र्यांना मात्र सर्वत्र पळावे लागते आहे. कारण भाजपाला शिवसेनेलाच पराभूत करायचे नसून, खरे आव्हान कॉग्रेसचे पेलावे लागणार आहे. कारण भाजपाची मुंबईतली ताकद मर्यादित असून, मोदी लाटेचा लाभ मिळून त्यांनी १५ आमदार जिंकून आणलेले होते. ते देणारा मतदार किती टिकून आहे, त्यावर सर्व काही अवलंबून आहे.
मागल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपाचे यश कॉग्रेसकडून भाजपाकडे झुकलेल्या अमराठी मतदाराच्या पाठींब्याने लाभलेले होते. उलट शिवसेनेचे यश हक्काच्या बांधील मतांमुळे मिळालेले होते. आजही त्या मतांवर शिवसेना जितकी अवलंबून राहू शकते, तितका विधानसभेच्या आकड्यावर भाजपा विसंबून राहू शकत नाही. खरी तीच अडचण आहे. कॉग्रेस राष्ट्रवादी वा सेनेतून फ़ुटलेल्या लोकांना उमेदवारी देणे सोपे काम आहे. पण आपल्या सोबत ही मंडळी किती मते भाजपाकडे घेऊन येणार; याची कोणी खात्री देऊ शकत नाहीत. एखादा लोकप्रिय नगरसेवक वा स्थानिक कार्यकर्ता तितकी मते आणूही शकतो. पण प्रत्येक फ़ुटलेला तशा कुवतीचा असतो असे नाही. म्हणूनच उसनवारीचे उमेदवार भाजपाला तितके यश देऊ शकणार नाहीत. पण भाजपाची हीच अडचण कॉग्रेसचे पुनरुज्जीवन घडवून आणू शकते. कारण मागल्या विधानसभा व लोकसभा मतदानात त्या पक्षाचे पानिपत झालेले आहे. त्याचा मुंबईतला हक्काचा मतदार भाजपाकडे ओढला गेल्याने कॉग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. आता तोच मतदार पुन्हा माघारी फ़िरला, तर त्याचा फ़टका शिवसेनेला बसण्याची अजिबात शक्यता नाही. पण त्याचा मोठा फ़टका भाजपाला विधानसभा मतदानात मिळालेल्या बळाला बसू शकतो. त्याची एक झलक खेरवाडी पोटनिवडणूकीत दिसलेली आहे. तिथे नारायण राणे यांनी आधीपेक्षा कॉग्रेसला १८ हजार अधिक मते मिळवून दिली. ती मते मुळात विधानसभेला भाजपा उमेदवाराला पडलेली होती. ती भाजपाला कितपत राखता येणार हा पालिका मतदानातला निर्णायक पैलू आहे. नारायण राणे हा मुंबईतला मुरब्बी राजकारणी या बाबतीत काय म्हणतो, ते म्हणूनच लक्षात घेतले पाहिजे. एका वाहिनीला मुलाखत देताना राणे यांनी मुंबईत शिवसेनाच मोठा पक्ष होणार अशी ग्वाही दिलेली आहे. त्याचा अर्थ काय होतो?
नारायण राणे यांचा उद्धववरील राग सर्वांना ठाऊक आहे. अशावेळी ते शिवसेना सर्वात मोठा पक्ष होईल, हे प्रेमाने म्हणू शकत नाहीत. सामान्य शाखाप्रमुख ते मंत्री अशी मजल मारणार्या राणे यांना शिवसेनेचे मुंबईतील शाखांचे कार्य व जाळे पक्के ठाऊक आहे. त्यामुळेच पुन्हा शिवसेना पालिका कशामुळे जिंकू शकते, तेही त्यांना चांगले ठाऊक आहे. पण सेनाच पहिला क्रमांक पटकावणार असेल, तर दुसरा क्रमांक कोणाचा, असाही प्रश्न निर्माण होतो. सध्या पालिकेत कॉग्रेस दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि भाजपाला किमान दुसर्या क्रमांकाच्या जागा पटकावणे भाग आहे. एकदम बहूमताचा पल्ला गाठला नाही, तरी निदान शिवसेनेच्या नंतर दुसर्या क्रमांकाचा पक्ष होणेही मोठीच बाजी असेल. पण ते कितपत शक्य आहे? कारण पालिका मतदानात बालेकिल्ले व हक्काची मते निर्णायक असतात. मागल्या काही दशकात सेनेने पहिला क्रमांक पटकावला असला, तरी कॉग्रेस कायम दुसर्या क्रमांकावर राहिलेली आहे. कितीही दुबळे नेतृत्व असो किंवा पक्ष कितीही विस्कळीत असो, ठराविक भाग कॉग्रेसलाच मतदान करतात, हे वारंवार दिसून आलेले आहे. तशी मते कॉग्रेसला मिळाली तरी त्यांचे क्रियाशील कार्यकर्ते नगरसेवक म्हणून निवडून येत राहिलेले आहेत. सहाजिकच आजच्या स्थितीत कॉग्रेसला मुंबईत तितकीच आशा आहे. आपल्या निष्ठावान मतदारांच्या बळावर त्यांना यश मिळावे, यापेक्षा कॉग्रेसने जास्त काही अपेक्षा बाळगलेल्या नाहीत. त्यामुळेच त्यापैकी किती मते कॉग्रेस मिळवू शकेल, त्यावर भाजपाचे भवितव्य अवलंबून आहे. कारण विधानसभेला भाजपाने मिळवलेल्या मतांचा मोठा हिस्सा, त्याच कॉग्रेसच्या मतपेढीतून आलेला आहे. किंबहूना मुंबईत जो पक्का सेनाविरोधी घटक आहे, त्याची मक्तेदारी आजवर कॉग्रेसकडे राहिलेली आहे. भाजपाकडे ती मक्तेदारी पुर्णपणे आलेली नाही.
विधानसभा असो वा अन्य निवडणूका असोत, त्याचे निकाल लागल्यावर भाजपा पुन्हा शिवसेनेशी हातमिळवणी करणार; हे गेल्या दोन वर्षातले गृहीत झालेले आहे. मग जो कट्टर सेनाविरोधी मतदार आहे, त्याच्यासाठी भाजपापेक्षाही कॉग्रेस हा जवळचा पर्याय शिल्लक उरतो. अशा मतदाराला चुचकारण्यावर कॉग्रेसने भर दिलेला आहे. तर त्याच मतदारावर भाजपाची भिस्त आहे. हा मतदार मिळवायचा असेल तर शेलार वा सोमय्या असे ‘स्टार प्रचारक’ असून भागणार नाही. जे सेनेच्या विरोधात आग ओकू शकतील, असे प्रचारक वक्ते भाजपाला आणावे लागतील. पेश करावे लागतील. पण फ़डणवीस वगळता तसा कोणी आक्रमक प्रचार करणारा भाजपापाशी उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी बाकीच्या महाराष्ट्राकडे पाठ फ़िरवून मुंबईत सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. त्याचा अर्थ सरळ आहे. मुंबई काहीही करून जिंकायचा त्यांचा मनसुबा आहे. पण भाजपा मात्र आपली सर्व शक्ती मुंबईत पणाला लावू शकत नाही. मुख्यमंत्री फ़क्त मुंबईत ठाण मांडून बसू शकत नाहीत. ती भाजपासाठी अडचण झाली आहे. अशा तारांबळीचा लाभ कॉग्रेसला मिळू शकतो आणि त्यात भाजपाला सर्वाधिक जागा नाही मिळाल्या, म्हणून बिघडत नाही. मुंबई हा सेनेचाच बालेकिल्ला आहे, असेच आजवरचे गृहीत आहे. पण सेनेशी पंगा घेतल्यावरही भाजपा दुसर्या क्रमांकावर आला नाही, तर मात्र नाक कापले जाणार आहे. त्यात दुसर्या क्रमांकाच्या जागा कॉग्रेस घेऊन गेली, तर मुंबईत भाजपाला मूळपदावर आल्यासारखे खाली बघावे लागणार आहे. दिल्लीत कॉग्रेसचा सफ़ाया झाला होता. पण केजरीवाल यांच्या यशात ३४ टक्के मते असूनही भाजपाचे नाक कापले गेले होते. मुंबईत तसेच झाले तर नंतरच्या काळात कॉग्रेसचे पुनरुज्जीवन सुरू होईल आणि भाजपाला मुंबईत नव्याने संघटना उभी करण्याची नामुष्की येऊ शकते.
होणारही हेच
ReplyDeleteकाँग्रेस चे पुनर्जीवन होईल का? भा. ज पा दुसऱ्या स्थानावर येईल का? अशी मांडणी करताना भाउ तुम्ही शिवसेनेला पहिला क्रमांक
ReplyDeleteदेउन टाकला. भाउ तुम्ही शिवसेनेला पहिला क्रमांक देउन टाकला कारण शिवसेनेकडे हक्काची मते आहेत. प्रश्न असा आहे कि हक्काची
मते शिवसेनेला मिळतील का? जर हक्काची मते शिवसेनेला मिळतील तर उद्धवसाहेब मनसे नसताना मुंबईत का अडकून पडले आहेत? भाउ
शिवसेनेकडे हक्काची मते शिवसेनेला मिळतील असा आत्मविश्वास राहिलेला नाही. राज्यातील सर्व महानगरपालिकेमध्ये भगवा नाही फडकला तरी चालेल पण मुंबई महानगरपालिकेवर भगवा राहिलाच
पाहिजे ह्या चुकीच्या स्ट्रॅटेजी मुळे मुंबई मधून शिवसेना हद्दपार होण्याची शक्यता आहेच.