Friday, February 17, 2017

भरकटलेले ‘उप’ग्रह

Image result for gadkari fadnavis

कालपरवा भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केला. त्यातले अवघे तीन उपग्रह भारताचे होते. १०१ उपग्रह अन्य देशांचे होते. अगदी प्रगत देश मानल्या जाणार्‍या अमेरिकेचे तर त्यात ८८ उपग्रह होते. पण त्यांनी हे काम भारताकडे कशाला सोपवले? अमेरिकेपाशी भारतापेक्षा आधुनिक यंत्रणा व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तरीही अनेक प्रगत देश भारताकडे आपले उपग्रह हल्ली प्रक्षेपणासाठी पाठवत असतात. कारण भारताने स्वस्तातली अचुक प्रक्षेपण व्यवस्था तयार केली आहे. यापुर्वी रशिया व अमेरिकेनेही अनेक उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले आहेत. पण त्यांना पन्नास प्रक्षेपणे एकाचवेळी साधलेली नाहीत. म्हणूनच भारताच्या या पराक्रमाचे कौतुक आहे. कौतुक प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांच्या संख्येचे आहे, त्यांच्या वजना़चे नाही. याचे कारण इतके उपग्रह उचलून अवकाशात नेण्यापुरते ते वजन कमी आहे. पण इतक्या उपग्रहांना आपापल्या कक्षेत सुखरूप पोहोचते करण्याची कला अवघड आहे. अशा अवकाश पोकळीत त्यांच्यात परस्पर टक्कर झाली, तर ते निकामी होणार. सगळा प्रयास वाया जाणार. म्हणूनच ते योग्य उंचीवर पोहोचले, मग त्यांना एकमेकांचे धक्के न लागता सुरक्षित अंतरावर राखून योग्य जागी प्रस्थापित करण्याला खरे महत्व असते. तेही रिमोट कंट्रोलद्वारे करावे लागते. भारताने तेच काम यशस्वी करून दाखवले, म्हणून भारतीय शास्त्रज्ञांचे जगभर कौतुक चालले आहे. १०४ उपग्रह इतक्या उंचीवर गेल्यानंतर भरकटले असते, तर याच शास्त्रज्ञांना शिव्या ऐकाव्या लागल्या असत्या. जगभरात त्यांची छिथू झाली असती. इतके हे सुसंघटित व सुनियंत्रित काम असते. इस्रोच्या संघटनेत विविध शास्त्रज्ञ व अधिकार्‍यात एकवाक्यता नसती, तर काय झाले असते? भाजपाच्या विद्यमान नेत्यांची वक्तव्ये व कृत्ये बघितली, तर त्याचा आंदाज येऊ शकेल.

भाजपाने मुंबईत स्वबळावर महापालिका जिंकण्याचा मनसुबा आधीपासून केला होता. तसेच असेल तर मुळातच शिवसेनेशी युती करण्या़चा विषय येत नव्हता. आजवर सेनेने फ़क्त भ्रष्टाचार केला, किंवा कंत्राटात टक्केवारी केली असेल, तर सेनेच्या सोबत जाऊन युती करण्याचे काहीही प्रयोजन नव्हते. मग तिच्याशी युतीच्या वाटाघाटी करण्याची गरजच काय होती? तरीही भाजपाने तसा प्रयत्न केला. समजा त्यात यश आले असते, तर आजची टक्केवारीची भाषा बोलली गेली असती काय? आजवरच्या कामकाजात शिवसेना टक्केवारीच करीत होती, तर तसे खुले आरोप करून भाजपाने पालिकेतील सेनेची साथ कशाला सोडली नव्हती? की सेनेका जी काही टक्केवरी मिळते, त्यातली हक्काची टक्केवारी भाजपाला मिळत नाही, म्हणून भांडण आहे? कुठल्याही तर्काने पारदर्शकता वा टक्केवारीचा भाजपाचा युक्तीवाद खरा मानता येणार नाही. राजकारणात व प्रामुख्याने सत्तेच्या राजकारणात आपण कुठल्याही कामातून पैसे काढत नाही वा टक्केवारी घेत नाही; असा दावा कोणीही करण्याची गरज नाही. भाजपासह सगळेच पक्ष व त्यांचे नेते कमीअधिक प्रमाणात टक्केवारी घेतात. त्याशिवाय राजकारणाची ‘पुर्ती’ होऊ शकत नाही, हे नितीन गडकरींना समजावण्याची गरज आहे काय? त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कशामुळे सोडावे लागले होते? त्यांच्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरूस्ती करून दोनदा अध्यक्ष होण्याची तरतुद झालेली होती. पण ती दुसरी कारकिर्द सुरू होत असतानाच, त्यांच्या ‘पुर्ती’ उद्योग समुहाच्या व्यवहाराचा गाजावाजा झाला. त्यातली गुंतवणूक कुठल्या बोगस कंपन्यांमधून आली, त्याचा बुरखा फ़ाटला म्हणून गडकरींना अध्यक्षपद तडकाफ़डकी सोडावे लागले होते. त्यांनी शिवसेनेवर टक्केवारीचा आरोप करण्यातला विनोद वेगळा सांगायला हवा काय? मुद्दा टक्केवारीचा नसून टक्केवारीतल्या हिस्सेवारीतला आहे.

शिवसेनेसोबत पंचवीस वर्षे काढली तेव्हा टक्केवारी बोचली नाही, की पारदर्शक कारभाराकडे बघता आले नाही. ही अचानक भाजपाला आलेली नवी दृष्टी म्हणूनच थक्क करून सोडणारी आहे. बरे मुंबई पालिकेचा कारभार पारदर्शक नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हणायचे; तर निदान दिल्लीत बसलेल्या आपल्याच ज्येष्ठ मंत्री अरूण जेटलींशी तरी सल्लामसलत करायची. कारण इथे देवेंद्रांनी आरोप केला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी जेटलींनी संसदेच्या पटलावर सादर केलेल्या आर्थिक आढाव्यात देशातील सर्वात वरच्या क्रमांकाची पारदर्शक महापालिका म्हणून मुंबईचा गौरव करून टाकला. फ़क्त शिवसेनेच्या ताब्यातल्या मुंबईचाच नव्हेतर ओवायसीच्या ताब्यात असलेल्या हैद्राबाद पालिकेचाही जेटलींनी गौरव केला आहे. पण भाजपाच्याच ताब्यात असलेल्या दिल्ली, बंगलोर वा नागपूर पालिकांना जेटलींनी पारदर्शकतेचे प्रमाणपत्र दिलेले नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की भाजपात नेत्यांची वा उपनेत्यांची खुप गर्दी झाली आहे आणि त्यांना आपापल्या कक्षेत राखण्यात भाजपाचे नियंत्रण कक्ष निकामी ठरत चालले आहे. म्हणून जेटली नावाचा मोठा उपग्रह देवेंद्र नावाच़्या दुसर्‍या उपग्रहाशी टक्कर घेतो आणि भाजपाचे प्रक्षेपणच निकामी होऊन जात असते. कधी गडकरी हा उपग्रह शेलार वा सोमय्या नावाच्या शाळकरी उपग्रहांना टक्कर देतो आणि मोडून टाकतो, असा खेळ होऊन बसला आहे. पण म्हणून प्रक्षेपणे थांबलेली नाहीत. पर्यायाने कपाळमोक्ष होण्याचे धोके संपणारे नाहीत. ‘सामना’ नावाचे सेनेचे मुखपत्र पाव शतकाहून अधिक काळ प्रसिद्ध होत आहे. आजवर ज्या पद्धतीने ते चालले, त़सेच आज देखील चालते आहे. आता अकस्मात भाजपाला ‘सामना’ नावाच्या धुमकेतूचा शोध लागल्यासारखी त्याच्या प्रकाशनावर बंदी घालण्याची लेखी मागणी इथल्या भाजपा शाखेने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. मग त्यावर व्यंकय्या नायडू नामक उपग्रह येऊन धडकला आहे.

भाजपाने ‘सामना’ दैनिकाच्या प्रकाशनावर बंदी घालण्याची मागणी केली, त्यावर प्रतिक्रीया देताना नायडू यांनी ती मागणी गैरलागू असल्याची प्रतिक्रीया दिली. याचा अर्थ असा, की भाजपामध्ये एकवाक्यता अजिबात नाही. इथे देवेंद्र फ़डणवीस निकालानंतर कुठेही सेनेशी युतीची गरज भासणार नाही व युती करणार नाही, अशी ग्वाही देत फ़िरत आहेत. त्याच खुर्चीवर बसून त्याच वाहिनीवर त्यांचे महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील आपण निकालानंतर एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देतात. याला नेमके काय म्हणायचे? हे सगळे भाजपाचे उपग्रह आपापल्या कक्षेत नेमके सुखरूप सोडलेले नाहीत, की त्यांना कुठलीच कक्षा माहित नसताना कुठेही कसेही भरकटायला सोडून दिलेले आहे? मुंबईत आपण काय नवनव्या तंत्राचा अवलंब करणार, त्याची गर्जना देवेंद्र नित्यनेमाने करत आहेत. पण मतदानाचा दिवस जवळ आला असताना, बंगलोर महापालिकेने तलावालाही आग लावून देण्याइतपत भाजपाच्या कारकिर्दीत मजल मारल्याचा थांगपत्ता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नसावा, ह्याला काय म्हणाय़चे? शुक्रवारी सकाळपासून सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवर बंगलोरच्या तलावात रासायनिक कचर्‍यामुळे भडकलेल्या आगीचे लोट दाखवले जात होते. मागली आठ वर्षे बंगलोर पालिकेत भाजपाची सत्ता आहे. मग तिथे टक्केवारीने काम करणारी शिवसेना राज्य करते असे गडकरींना म्हणायचे आहे, की देवेंद्रना मुंबईतही विहार पवई तलावांना आगी लावण्यासाठी भाजपाची एकहाती सत्ता हवी आहे? कुठल्या तरी एका उपग्रहाने नेमकी एक कक्षा धरून भ्रमण करावे ना? नुसताच धुरळा उडवून काय साध्य होणार आहे? आजवर राष्ट्रवादी, कॉग्रेस वा शिवसेनेने टक्केवारी खाल्ली, आता आम्हाला सगळेच काही खायचे आहे. त्यात अन्य कोणी भागिदार नको ,असे म्हणायला काय हरकत आहे? जरा तरी पारदर्शक बोला की!


1 comment:

  1. भाऊ हे सगळे भाजपावाल्यांचे व उद्धवसाहेबांचे बुडबुडे आहेत हे सगळ ठरवुन आहे निकाला नंतर गरजेनुसार युती होणार तर गरजेनुसार हेच विरोधक होणार सगळेच भगवे होणार कांगी घड्याळवाले कपडे फाडत फिरणार

    ReplyDelete