Friday, February 24, 2017

अनाठायी गर्वाचे घर खाली

uddhav raj thackeray के लिए चित्र परिणाम

अहंकार हा माणसाचा सर्वात जवळचा शत्रू असतो. एकदा अहंकाराच्या आहारी गेलात, की तो तुम्हाला सारासार विचार करू देत नाही. सहाजिकच ध्येय व हेतूचाही विसर पडतो. निवडणुकीच्या राजकारणात लढणे जितके महत्वाचे असते, तितकेच जिंकणेही अगत्याचे असते. मग लढाई जिंकण्यासाठी अनेक डावपेच खेळावे लागतात. त्यात अहंकाराला जागा नसते. जिंकण्याला महत्व असते आणि हरणार्‍याच्या अहंकाराला काडीमात्र किंमत नसते. शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याचा निर्णय चुकीचा होता असे कोणी म्हणू शकत नाही. पण युती तोडल्यावर भाजपाला हरवण्याला प्राधान्य असते, याचेही विस्मरण होता कामा नये. प्रजासत्ताकदिनी सेनेच्य मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून पालिका निवडणुकीत युती करायची नाही, असा निर्णय जाहिर केला. त्यानंतर आपल्या बळावर निवडणुक जिंकणेही अगत्याचे होते. पण त्यासाठी कुठलीही रणनिती वा तयारी नव्हती, असेच निकालावरून लक्षात येते. आपण मुंबईतले सर्वात प्रभावी पक्ष आहोत, अशी शिवसेनेची धारणा असल्या़स चुकीची म्हणता येणार नाही. पण ती शक्ती किती योजनबद्ध रितीने व कशी वापरायची, त्याचेही डावपेच असायला हवेत. जेव्हा बाळासाहेबांनी स्वबळावर मुंबई महापालिका १९८५ सालात जिंकली, तेव्हा भाजपाचे मुंबईतील बळ नगण्य होते. किंबहूना हिंदूत्वाचा अजेंडा घेऊन बाळासाहेबांनी पार्ला विधानसभा पोटनिवडणूक जिंकली वा नंतर औरंगाबाद पालिका पादाक्रांत केली, तेव्हा भाजपाची राज्यातील शक्ती किती होती? औरंगाबादेत तर सेनेच्या झंजावातामध्ये कॉग्रेस पराभूत झालीच, पण भाजपाही त्या शहरात नामशेष झाला होता. इतके असूनही हिंदूत्वाच्या कारणास्तव बाळासाहेबांनी १९८८ सालात भाजपाशी राज्यव्यापी युती करून टाकली. तिची खरेच गरज होती काय? असा प्रश्न कोणीही विचारला असता. पण कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी बाळासाहेबांनी तशी युती केली. का केली?

आजच्या शिवसेना नेत्यांनी त्या पहिल्या युतीमागची कारणमिमांसा कधी समजून घेतली आहे काय? एकट्याने लढण्याचा अहंकार साहेबही दाखवू शकले असते. कारण तेव्हा राज्यात भाजपाची शक्ती १६ आमदार इतकी होती आणि मुंबईत १५-२० नगरसेवक अशी होती. पंण कॉग्रेससारख्या बलाढ्य स्पर्धकाला आव्हान देण्यासाठी भाजपाची कुमक त्यांनी आवश्यक मानली होती. त्याचे परिणामही १९९० च्या विधानसभेत दिसून आले. दोन्ही पक्षांना त्याचा लाभ झाला. तेव्हाही युती केलीच नसती तरी सेनेचे स्वबळावर २०-२५ आमदार १९९० सालात निवडून येऊ शकले असते. पण सवाल आपले बळ वाढवण्याचा व त्यासाठी एका छोट्या पक्षाला सोबत घेण्याचा होता. तितकी लवचिकता साहेबांनी दाखवली. फ़ार कशाला अलिकडल्या काळात त्यांनी २००९ नंतर रामदास आठवले यांनाही युतीमध्ये सोबत आणण्यात पुढाकार घेतला होता. तेव्हा साहेबांचा तो दुबळेपणा नव्हता. त्यामागे आपली मर्यादित शक्ती अधिक परिणामकारक ठरवण्यासाठी वापरताना, अन्य छोट्यांची साथही बहुमोलाची ठरत असते. त्यात दुसर्‍याचा किती लाभ होईल हे बघण्यापेक्षाही आपल्याला त्याचे लाभ कसे होतात, हे बघायचे असते. लोकसभा व विधानसभा मतदानामध्ये मनसेचे खच्चीकरण झालेले असले, तरी त्याही पक्षाला ठराविक मते मिळालेली होती आणि तितकी मते शिवसेनेच्या जोडीला आल्यास, मुंबईत तरी ३०-४० जागी फ़रक पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्याचा अर्थ मुंबई पालिकेत सव्वाशे जागा असा होतो. दोन भावांनी एकजूट केली असती, तर आज त्यांची बेरीक सव्वाशेच्या पुढे गेली असती. शिवाय त्यात मनसेकडून पुढाकार घेतला गेला होता. धाकट्याने थोरल्याचा मान राखला होता. पण अहंकार आडवा आला किंवा दरबारी बारभाईंची अडचण झाली, म्हणून त्यात पुढले पाऊल टाकले गेले नाही.

उद्धव ठाकरे वा त्यांच्या सल्लागारांना नेमके काय साधायचे आहे, तेही उमजलेले नसावे. त्यांचे भाजपाशी असलेले भांडण समजू शकते. पण निवडणुकीच्या लढाईत त्यांना भाजपाला धडा शिकवायचा होता, की मनसेला संपवायचे होते? २००४ सालात शतायुषी कॉग्रेस पक्षाला आपले पुनरुज्जीवन करून घ्यायचे होते. अशावेळी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी कोणाच्याही पायर्‍या झिजवत होत्या. त्यांनी वाढदिवशी मायावतींच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ दिलेला होता. म्हणून मायावतींनी कॉग्रेसचे समर्थन केले नाही. मग सोनियांनी एके दिवशी शरद पवार यांच्याही घराची पायरी चढली. रामविलास पासवान यांचेही दार ठोठावले. माजी पंतप्रधानाची पत्नी वा सून असलेल्या सोनियांनी त्यात कमीपणा बघितला नाही. भाजपाच्या विरोधात जवळ येऊ शकणार्‍या पक्ष व नेत्यांच्या पायर्‍या झिजवण्यात, त्यांना अपमान वाटला नाही. पण त्यातूनच मग युपीए साकार झाली आणि अजिंक्य वाटणार्‍या वाजपेयी सरकारला पराभूत करण्यापर्यंत सोनियांनी मजल मारली होती. एकदा त्यात यश मिळाले, मग त्यांनी शिरजोरी नक्कीच केली होती. पण निदान तेव्हा आपल्या पक्षाचा दुबळेपणा वा अशक्तपणा मान्य करून, सोबत येऊ शकणार्‍यांना गोळा करण्याची धडपड केली होती. त्यातून त्यांनी भाजपाला असा धक्का दिला, की पुढली दहा वर्षे भाजपाला सत्तेचे स्वप्नही बघणे अशक्य झाले होते. त्या सोनियांना स्वाभिमान नाही, असे कोणाला म्हणायचे आहे काय? नसेल तर बाळा नांदगावकर मातोश्रीवर आल्यानंतर त्याला हात हलवित परत पाठवण्याने काय साधले? कोणाचे साधले? भाजपाच्या यशाला हातभार लावण्यापलिकडे काय साधले गेले? लव़चिकता हा राजकारणातला मोठा गुण असतो. जी लवचिकता सोनियांनी दाखवली, त्यापेक्षा अधिक लवचिकता नरेंद्र मोदींपाशी आहे. म्हणूनच त्यांना हरवणे सोपे काम नाही.

२००२ सालात रामविलास पासवान हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. पण गुजारतमध्ये दंगल माजल्यावर त्यांनीच मोदींना हाकलण्याची मागणी सर्वप्रथम केली आणि ती मान्य झाली नाही, म्हणून केंद्रीय मंत्रीपदाचा राजिनामा दिलेला होता. म्हणजेच पासवान हे मोदींचे कट्टर वैरीच म्हणायला हवेत. पण बारा वर्षांनी खुद्द नरेंद्र मोदीच भाजपाच्या पुनरूज्जीवनाला उभे ठाकले, तेव्हा त्यांनी विविध पक्षांना सोबत आणायचा चंग बांधला. त्यात त्यांचा राजिनामा मागणारे पासवान होते, तसेच आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही होते. त्यावेळी मोदीही अहंकाराने फ़ुलले असते, तर आज देशाचे पंतप्रधन होऊ शकले नसते. पासवान व नायडू दोघेही पराभूत व शक्ती कमी झालेले नेते मोदींनी सोबत घेतले. कारण त्यांच्या मदतीने मोदींना कॉग्रेस नामे मोठा प्रतिस्पर्धी संपवण्याची मोठी लढाई जिंकायची होती. कोणाला हरवायचे आहे, याची खुणगाठ बांधून मोदी मैदानात आलेले होते. त्यामुळेच आपल्याला अपमानित करून विरोधात उभ्या राहिलेल्या या दोन्ही नेत्यांवरचा राग गिळून, मोदींनी त्यांनाही नव्या एनडीएमध्ये आणले. अतिशय सन्मानाने आणले. उद्या देशाची सत्ता संपादन करायची स्वप्ने बघणार्‍या सोनिया वा मोदी ही अलिकडली ठळक उदाहरणे आहेत. त्यांच्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुखाचा अभिमान वा अहंकार मोठा असू शकत नाही. देशाची सत्ता मिळवण्याच्या तुलनेत, मुंबई पालिका ही खुप लहान गोष्ट होती. पण त्यातही उद्धव ठाकरे यांना आपल्या अहंकाराला बाजूला करून राजकारण साधता आले नाही. अन्यथा आज त्यांना भाजपाचे मुंबईतील इतके मोठे यश बघण्याची वेळ आली नसती. भाजपाचे यश शेलार वा फ़डणविसांचे असण्यापेक्षा सेना नेतृत्वाच्या अहंकाराने भाजपाला बहाल केलेले यश आहे. सत्तेच्या व निवडणूकीच्या राजकारणात अहंकाराला स्थान नसते. कारण अनाठायी गर्वाचे घर नेहमी खाली असते.

14 comments:

 1. khar aahe bhau....pan khup dukh vatat...ki marathi madhe bhaubandaki ashich pudhe chalu aahe tyachi...

  ReplyDelete
 2. भाऊ 2014 ला 147/127 असा फाॅर्म्यूला स्वीकारला असता तर कदाचित आज सेनेचा मुख्यमंत्री असता, नितीशकुमारांचे उदाहरण समोर आहे लवचिकता दाखवून त्यांनी लालूबरोबर युती केली आणि निवडणूक जिंकली

  ReplyDelete
 3. हे सगळे बरोबर आहे. प्रस्तावाचा सकारात्मक विचार व्हायला हवा होता...
  पण हाच लेख २०१४ च्या विधानसभा निवडनुकी ला सुद्धा लागु होतो...
  त्या वेळेला मोठा पक्ष असुन देखील भाजप ला मात देण्यासाठी टाळीचा हात पुढे केलेला...
  त्यावेळेला तो झिडकारताना अहंकार नव्हता तर काय त्या नेत्याची यशस्वी चाल होती का...
  त्या निवडनुकी चा परीणाम आता सगळ्यांनाच दिसतोय...
  अजुनही मोठा पक्ष झुंजतोय... आणि स्वतःच्या पक्षाची वाताहात करुन घेतलीच ना...
  तेव्हाच जर साथ दिली असती तर आज महाराष्ट्राच चित्र पुर्ण वेगळच असत...
  असो पण आज सुद्धा वेळ आहे ती स्वतःहुन कुमक पुरवण्याची आणि दुसर्याने ती स्वीकारण्याची....

  ReplyDelete
 4. >>आजच्या शिवसेना नेत्यांनी त्या पहिल्या युतीमागची कारणमिमांसा कधी समजून घेतली >>आहे काय? एकट्याने लढण्याचा अहंकार साहेबही दाखवू शकले असते. कारण तेव्हा >>राज्यात भाजपाची शक्ती १६ आमदार इतकी होती आणि मुंबईत १५-२० नगरसेवक अशी >>होती. पंण कॉग्रेससारख्या बलाढ्य स्पर्धकाला आव्हान देण्यासाठी भाजपाची कुमक त्यांनी >>आवश्यक मानली होती.

  भाऊ मी तुमचा ब्लॉग अगदी दररोज वाचतो. तुमची शिवसेना सोडून इतर सगळ्या विषयांवरील मते आणि लेख खूपच आवडतात आणि पटतातही.

  तुम्हीच म्हणत आहात की युती झाली तेव्हा राज्यात भाजपाची शक्ती १६ आमदार इतकी होती. पण त्याचवेळी शिवसेनेची शक्ती केवळ १ आमदार (माझगावमधून छगन भुजबळ) होती हे पण का लिहित नाही? शिवसेनेने महापालिकेत १९८५ मध्येच सत्ता काबीज केली होती पण तुम्हीच म्हटल्याप्रमाणे महापालिका आणि विधानसभा-लोकसभा निवडणुका यातील निकाल वेगळे असतात आणि त्यामुळे शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता असली तरी त्या आधारावर विधानसभेत मुंबईतून मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आणण्याइतकी ताकद होतीच असे कसे म्हणता येईल?

  युती होण्यापूर्वी शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद राज्यात जास्त होती हे आकड्यांनिशी सिध्द करता येते. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?

  १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती?

  राज्यात काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये म्हणून अडवाणी, प्रमोद महाजन इत्यादींनी पडती बाजू घेऊन शिवसेनेला मोठ्या भावाचा दर्जा दिला होता. प्रत्येक वेळी दादागिरी करून शिवसेनेने आपल्या पाहिजे त्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि भाजपने मुकाट्याने ती मागणी मान्य करायची ही प्रथाच झाल्यासारखी झाली होती. १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर जागेवरून भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. पण १९९० मध्ये युतीत ही जागा गेली शिवसेनेकडे (शशिकांत सुतार) आणि अण्णा जोशींना कसबा पेठ मतदारसंघात स्थलांतरीत व्हावे लागले. वास्तविकपणे युती करताना कोणताही पक्ष मागच्या वेळी आपण जिंकलेली जागा सोडत नसतो. तरीही भाजपने ही जागा का सोडली हे कोडेच आहे.इतकी वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा मिळविल्या या कारणावरून लगेचच १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला.रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे ज्या मतदारसंघातून निवडून येत असत तो मतदारसंघ भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या 'राजहट्टाखातर' सोडून द्यावा लागला होता.तसे असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेमुळेच इतके मोठे यश मिळाले होते हे अगदी कोणीच नाकारू शकत नाही.त्यावेळी शिवसेनेला भाजपला आणखी जागा द्यायला (१४४-१४४) काय हरकत होती?

  युती झाल्यानंतर प्रथमच २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या खमक्या भाजप नेत्यांशी गाठ होती तिथेच शिवसेनेची मर्यादा उघड झाली. इतकी वर्षे अडवाणी आणि वाजपेयी यासारख्या नमते घेणार्‍या नेत्यांशी वाटाघाटी कराव्या लागत होत्या. त्यानंतर उध्दव ठाकरे एकामागोमाग एक चुका करत गेले आणि अजून अजून गोत्यात यायला लागले. आता मुंबई महापालिकेत सत्ता टिकवायला काँग्रेसची मदत घेऊन उध्दव ठाकरे यांनी आणखी एक (आणि बहुदा अत्यंत घातक) चूक केली नाही म्हणजे मिळवली.  ReplyDelete
  Replies
  1. अतिशय समर्पक विषलेशण...भाऊ या बद्दल आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

   Delete
  2. farach chhan vishleshan....

   Delete
 5. माफ करा भाऊ पण मी आपल्याशी सहमत होऊ शकत नाही... राज ठाकरे यांच्या हात पुढे करण्यामागे राजकारण होतं... मराठी माणसासाठी मी कोणाचेही पाय चाटायला तयार आहे असं राज म्हणाले, मी कमीपणा घेईन असंही ते म्हणाले... मग आज निकाल लागले आहेत... सेनेला बहुमतासाठी नगरसेवकांची गरज आहे... मग आधी विनाअट पाठिंबा देणारे राज आता का शांत आहेत... हा झाला एक विषय...
  दुसरं म्हणजे... जर का सेना-मनसे निवडणुकीआधी एकत्र आले असते तर मराठी मते एकत्रित नक्की झाली असती पण अमराठी मतांचं काय??? मराठी माणूस एकत्र येतो आहे असं म्हटल्यावर मुंबईत अमराठी मतं एकसंधपणे भाजपाच्या पाठीमागे उभी राहिली असती... आणि सर्वच मराठी मते सेनेला किंवा मनसेला पडत नाहीत... मग भाजपने निवडक मराठी अन बहुसंख्य अमराठी मतांवर सहज शंभरी गाठली असती... ह्या वेळेस सेनेला अमराठी मतेही नेहमीपेक्षा बरी मिळाली आहेत... सेनेचे 3-4 अमराठी उमेदवारही निवडून आले आहेत... अमराठी भागात सेनेने कधी नव्हे ते जागा मिळवल्या आहेत... राजसोबत गेले असते तर ह्या दहा-बारा जागा अशाच गेल्या असत्या... राज यांच्याशी ती केली असती तर त्यांना निदान 30-40 जागा तरी सोडाव्या लागल्या असत्या... स्वबळावर लढतानाही सेनेत बंडखोर उभे राहिले आणि त्यातील 2-3 अपक्ष तर काही इतर पक्षातून निवडून आले... राज यांना जागा दिल्या असत्या तर बंडखोरी अजून वाढली असती आणि अजून जागांचे नुकसान झाले असते... ठाण्यात मनसे उभी असतांनाही सेना स्वबळावर आलीच... तीच अपेक्षा मुंबईत होती... मराठी माणसाचे दुर्दैव होते... शिवसेनेचा आकडा 97 पर्यन्त गेला होता पण केवळ नशीब साथ न दिल्याने अघटित घडलं... सात, पंधरा, पन्नास ईश्वरी चिठ्ठी अशाने जागा गमवल्या... मनसेचा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता... उलट मनसे जर उभी नसती तर सेनेवर नाराज असलेली मते भाजपला मिळाली असती... सेना नेतृत्वाने हा विचार केला असावा... सेनेने राज यांच्यावर एकाही सभेत टीका केली नाही... त्याउलट राज यांनी उद्धव यांच्यावर वैयक्तिक आरोप केले... भाजपा अमराठी मतांसह मराठी मतासाठी काहीही करत होतं... पण चार गुजराती मतांची मदत मिळावी म्हणून हार्दिक पटेलला बोलावलं तर मराठी माणसाला ते पटत नाही... नवीन मराठी तरुणांना, ज्यांची बोली भाषा आता इंग्लिश आहे त्याला मराठी वगैरे काही समजत नाही... त्यांना हवा आवडते.... चुकत आहे तो मराठी माणूस... केवळ भौतिक सुविधा नाही मिळाल्या म्हणून अस्मिता सोडून देणारा...
  भाऊ मी आपल्यापेक्षा मोठा नाही... पण तरुण पिढी प्रॅक्टिकल विचार करत आहे हे मान्य करावं लागेल... एकदा हा लेख वाचा... http://latenightedition.in/wp/?p=2394

  ReplyDelete
 6. वेळ आली आहे समस्त मराठी लोकांनी या ठाकरे परिवाराला वगळून पुढे जाण्याची. मराठी मराठी करून फक्त ठाकरे परिवार आणि त्यांच्या बाजूला असलेल्या १५-२० लोकांचे प्रचंड भले झाले आहे. बाकी मराठी माणूस गिरणगावातून ठाणे, पनवेल, कर्जतला पोचला. शिवाजीपार्क परिसरात नव्याने कोणत्या बिल्डर नेत्याच्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत ते सर्व लोक पाहत आहेत. मराठीचा इतका पुतळा आहे तर मराठी लोकांना परवडतील असे घरे का नाही बांधत आहे. 5-6 करोडची घरे किती मराठी माणूस घेणार आहेत.

  ReplyDelete
 7. मराठी माणसाचे नाव घेत त्यालाच हद्दपार करण्याचा करंटेपणा शिवसेनेने केलाय.एवढी मराठी मराठीची कळकळ वाटते तर आपली मुले का इंग्रजी शाळेत शिकली, याचं उत्तर उद्धव देऊ शकतील? अस्मितेला हात घालायचा आणि आपला स्वार्थ साधायचा,हा दुटप्पीपणा हे सेनेचे व्यवचछेदक लक्षण बनले आहे.राज्यसभेच्या जागांसाठी पाठवायच्या उमेदवारांची यादी हेच सांगते.तेथे अर्थकारण महत्त्वाचे ठरते.का नाही एखादा कट्टर पण निवडणुकीच्या फडात न बसणारा कार्यकर्ता पाठवला राज्यसभेवर? भाऊंसारखा निरपेक्षपणे सेनाविचार पुढे नेणारा पत्रकार का दिसला नाही उद्धवसाहेबांना? तेथे निरुपम,धूत,जेठमलानी,केनिया असे कट्टर 'अर्थवादी' लागतात.ख-या कार्यकर्त्याला जेवण आणि रोजंदारीवर वापरणारे नवे सुभेदार हीच ओळख सेनेची बनतेय.भाजप,जनसंघ,रा.स्व.संघ अशी परंपरा एकीकडे आणि बाळासाहेब हेच विद्यापीठ मानणारा नाक्यावरचा बेरोजगार,स्वत:ला समाजमान्यता मिळवण्याच्या प्रतिक्षेत असलेला सत्तरच्या दशकातला अस्वस्थ तरूण एवढ्या भांडवलावर वाढलेली सेना असा विषम सामना होताना अंतिम परिणाम अपरिहार्य आहे.नव्या नेतृत्वाने निष्ठावंतांना वारशात मिळालेले म्हणून फारसे मूल्य न देता,संजय,मिलिंद अनिल अशी मागल्या दारातून आलेली दरबारी फळी विश्वासू मानली. मराठी माणसाच्या हितासाठी हा वापरून गुळगुळीत झालेला विचार कधीच फोल ठरलाय.आदित्य ठाकरे या पंचविशीतल्या पोरासमोर दिवाकर रावतेंसारखा बुजुर्ग पायाशी वाकतो,तेव्हा सेनेचे ढोंग कळते.भाऊ,तुम्हाला हे पटते का?_मग संजय गांधीच्या चपला उचलणारा मुख्यमंत्री कसा काय दोषी असतो? एकच न्याय लावा सगळ्यांना.

  ReplyDelete
 8. शिवसेनेला उद्धव आणि त्यांच्या भोवतीच्या सवंगड्यांच्या अहंकारामुळेच उतरती कळा लागणार आहे. आता सुरूवात झालीच आहे. मुंबईत भाजप शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागांनीच मागे आहे, हे सर्वात महत्वाचे. आता कुणी काहीही म्हणो... पाच मतात जागा गेली, सात मतात जागा गेली... पण त्याला काही अर्थ नसतो. पराभव हा पराभवच असतो आणि तो मान्य करण्यातच पुरुषार्थ असतो. उगाच सभेत मी मर्द, मी मर्द असे सांगून काही होत नसते.
  मनसे सोबत घेतली तर त्यांना पुन्हा जीवदान दिल्यासारखे होईल, असे सेनेच्या कथीत चाणक्यांनी उद्धव यांच्या मनात भरवले असावे. त्यामुळेच ही युती झाली नाही. मनसेला आज वाईट दिवस आले असतील, पण ते प्रत्येक राजकीय पक्षाला येतातच. मनसेचीही हक्काची काही मते आहेत, हे विसरून चालणार नाही.
  शिवसेनेने आज कितीही गप्पा मारल्या, तरी भाजपपेक्षा फक्त दोन जागा जास्त हा त्यांचा पराभवच आहे.

  ReplyDelete