Monday, February 20, 2017

बिभीषण आणि भीषण

paricharak के लिए चित्र परिणाम

पार्टी विथ डिफ़रन्स अशी आपली ओळख मागल्या शतकाच्या अखेरीस भाजपाने करून दिलेली होती. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीनंतर कॉग्रेसचा अस्त होऊ लागल्यावर भाजपाने देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने पाऊल टाकताना, अन्य राजकीय पक्ष व त्यांच्या शैलीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचा पवित्रा घेतला. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, म्हणजेच आपण फ़ारच सभ्य व सुसंस्कृत आहोत, असा टेंभा भाजपा मिरवत होता. म्हणूनच अन्य पक्षातले गुंड गुन्हेगार वा भ्रष्ट नेत्यांवर आरोप करीत, आपली साधनशुचिता दाखवण्यावर भाजपाचा भर असायचा. पण मागल्या लोकसभा मतदानात संसदेतील बहुमतापर्यंत मजल मारली आणि भाजपाने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असे सिद्ध करण्याची भूमिका घेतली. मात्र त्यांनी आपल्या भीषण असण्याला बिभीषण असे सोज्वळ पौराणिक संबोधन घेतले. मागल्या दोन वर्षात देशभर सोडाच महाराष्ट्रातही एकामागून एक नमूने शोधून त्यांना भाजपात आणण्याची प्रक्रीया इतकी वेगवान करण्यात आली, की मुळच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाही आपल्या पक्षाची ओळख जाणवेनाशी झाली. आचार, विचार, निष्ठा वा चारित्र्य याच्याशी जणू काडीमोड घेतल्यासारखा पक्षाचा विस्तार करत, कुठलाही कचरा गोळा करण्याचा सपाटा लावला गेला. सत्तेसाठी बहूमत आणि बहूमतासाठी काय पण, कोणी पण; हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. त्याविषयी बोलताना विधानसभा प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फ़डणवीस यांनी बिभीषणाची कहाणी सांगत, आपण रामराज्य आणणार असल्याची ग्वाही दिलेली होती. रामालाही विजय संपादन करण्यासाठी रावणाच्या गोटातला बिभीषण आपल्याकडे घ्यावा लागला होता. हा निकष लावताना भाजपाने कुठले कुठले हिरण्यकश्यपू वा दु:शासन पक्षामध्ये भरती करून घेतले, तेही आता मुख्यमंत्र्याला आठवेनासे झाले आहे. पंढरपूरचे परिचारक त्यापैकीच एक असावेत.

विधान परिषदेत आपले संख्याबळ वाढावे म्हणून पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांना भाजपाने सहयोगी सदस्य म्हणून पक्षात सामवून घेतले होते. त्यांनी कालपरवाच एका प्रचारसभेत मुक्ताफ़ळे उधळली आहेत. त्यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नीची अब्रु घेण्यापर्यंत मजल मारली आहे. पंतप्रधान देशभर सीमेवर अखंड पहारा देणार्‍या भारतीय जवानाच्या पुरूषार्थाचे गोडवे गात असतात आणि देशभरचे भाजपावाले त्याच सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे राजकीय भांडवल करायला धडपडत असतात. अशा कालखंडात त्यांचाच एक बिभीषण उठतो आणि भारतीय सैनिकाच्या पुरूषार्थावर प्रश्चचिन्ह लावणारे संतापजनक विधान करतो. पण त्याला पक्षातून हाकलून लावण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस करू शकलेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही तितके धाडस करू शकलेले नाहीत. रामायण महाभारताच्या कथा सांगणारे भाजपाचे किर्तनकारही मुग गिळून गप्प आहेत. कुठल्या तोंडाने बोलणार? मतांसाठी पक्ष व त्याचे नेते लाचार झाले; मग त्यांना आपल्याच घराची अब्रुही चव्हाट्यावर आली तर बोलायची हिंमत नसते. त्यांनी भारतीय पुरूषार्थाचे प्रतिक असलेल्या सैनिकाच्या प्रतिष्ठेसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा कोण करणार आहे? पण हा विषय एका पक्षापुरता नाही की एका व्यक्तीपुरता नाही. तो हिणकस मनोवृत्तीचा आहे. भारतातील राजकीय नेते आणि त्याची बुद्धी किती सडलेली विकृत आहे, त्याच्याशी संबंधित असा हा विषय आहे. जो माणूस सैन्यात भरती होतो आणि दिर्घकाळ आपल्या कुटुंबापासून दुर भयंकर स्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करत असतो; तेव्हा पगारासाठी कष्ट उपसत नसतो. देशाचे व समाजाचे नेते आणि समाजच आपल्या कुटुंबाची रक्षा करणार; अशा विश्वासाने सीमेवर उभा असतो. प्रशांत परिचारक यांनी त्याच अत्यंत ठाम विश्वासालाच सुरूंग लावण्याचे पाप केले आहे.

आपले कुटुंब सुरक्षित नाही, आपल्या पत्नीची इज्जत सुरक्षित नाही, अशी धारणा झालेला सैनिक घरदार सोडून सेनेत भरती होणार नाही. गाव सोडून सरहद्दीवर जाऊन पहारा देणार नाही. त्याच्यातली हिंमत हाच देशाचा पुरूषार्थ असतो आणि त्याच बळावर तो शत्रुशी सामना करीत असतो. जीवावर उदार होऊन लढणार असतो. त्याची पत्नी, भगिनी वा घरातील महिलाच सुरक्षित नाही, असे त्याला सांगणे; म्हणजे त्याच्यातला पुरूषार्थच खच्ची करणे असते. इसिसचे जिहादी अन्य समाजातल्या महिलांला पळवून नेतात आणि त्यांची अब्रु लुटतात, तेव्हा त्या समाजातला पुरूषार्थ खच्ची करीत असतात. प्रशांत परिचारक यांनी केलेला विनोद म्हणूनच इसिसच्या अमानुष पाशवी बलात्कारापेक्षा किंचीतही भिन्न नाही. पण भाजपाच्या स्थानिक नेत्याला अशा भीषण वक्तव्यासाठी परिचारक यांना गुन्हेगार ठरवण्याची हिंमत झाली नाही. हा पक्ष विधीमंडळातील एक आमदार वा तिथली पक्षाची आमदारसंख्या यासाठी किती लाचार झालेला आहे, त्याचीच यातून साक्ष मिळते. कौरव पांडवांची कथा रंगवून सांगणार्‍यांना, महाभारत हे एका महिलेच्या प्रतिष्ठा व अब्रुसाठी लढले गेलेले महायुद्ध असल्याचेही ठाऊक नाही काय? एका द्रौपदीच्या शापवाणीने महाभारताच्या युद्धाचे रणशिंग फ़ुंकले गेले होते. तिच्या अब्रुला हात घालणार्‍यांनीच युद्धाची अपरिहार्य स्थिती निर्माण केली आणि तो दुर्योधन दु:शासन जे काही बोलला होता, तेही शब्द परिचारक यांच्या मुक्ताफ़ळांपेक्षा तसूभरही वेगळे नव्हते. देवेंद्र फ़डणवीस यांना ते शब्द वा द्रौपदीचा टाहो ठाऊकच नाही काय? असेल तर परिचारक प्रकरणात त्यांचे मौन कशासाठी आहे? विधीमंडळातील मुठभर जागा व आमदार संख्येसाठी मौन आहे काय? असे पांडव असण्यापेक्षा लोकांना कौरवही मान्य होतात. मोदींचा बाप काढला म्हणून टाहो फ़ोडणार्‍यांची विवेकबुद्धी आज कुठे झिंग येऊन पडली आहे?

विधानसभेच्या वेळी प्रत्येक भाजपा नेता आयात मालाला बिभीषणाची उपमा देत होता. अशा पतितांना म्हाळगी प्रबोधिनीत आणून शुचिर्भूत करण्याचे वायदे केले होते. त्याचे काय झाले? परिचारक यांना वा तत्सम लोकांना अजून संस्कारीत करण्याचे काम झाले नव्हते, म्हणून त्यांनी मुक्ताफ़ळे उधळलीत काय? यालाही अपवाद आहे. केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचा! त्यांनी याविषयी प्रतिक्रीया देताना विनाविलंब अशा नेत्याची गाढवावरून धिंड काढली पाहिजे, असे तरी बोलून दाखवले आहे. परंतु रामायण वा महाभारताचे दाखले देणार बहुतांश भाजपानेते चिडीचूप गप्प आहेत. कारण त्यांना भारतीय सैनिकांच्या कुटुंब व पत्नीच्या अब्रुपेक्षाही विधीमंडळातील आमदार संख्येचे मोल अधिक वाटते. मुली महिलांच्या प्रतिष्ठा वा अब्रुपेक्षा सत्ते़ची महत्ता अधिक वाटू लागली, याला पार्टी विथ डिफ़रन्स समाजायचे काय? कारण अन्य कुठला पक्ष असता, तर एव्हाना त्याच्यावर कठोर कारवाई नक्की झाली असती. एक आमदार असे अर्वाच्य बोलतो आणि समोरचे लोक त्यावर टाळ्या पिटतात, अशी सभा आपल्या पक्षातर्फ़े झाली, याची लाजही कोणाला वाटली नाही. तर मोठाच डिफ़रन्स भाजपाने राजकारणात आणला हे मान्य करावेच लागेल. कदाचित भाजपाला आता डिफ़रन्सपेक्षाही प्रेफ़रन्स मोठा वाटू लागला असेल. महिलांच्या अब्रुपेक्षाही पक्षाची आमदार संख्या हा प्रेफ़रन्स असावा. तसा असायलाही हरकत नाही. मात्र तेच प्राधान्य असेल तर सिंहगडावर जाऊन शपथा घेण्याची गरज नव्हती. हुतात्मा स्मारकापाशी शपथेचे नाटक करण्याचे कारण नव्हते. गोळा केलेल्या भीषण लोकांनाच बिभीषण ठरवण्यातून अशा पक्षाचा लौकरच र्‍हास होणार याविषयी लोकांच्याही मनात शंका उरणार नाही. संस्कारी प्रचारकांच्या अथक मेहनतीतून उदयास आलेल्या पक्षाला आज सत्तेसाठी परिचारकासमोर नतमस्तक व्हावे लागणे, भूषणावह राहिले का?

4 comments:

 1. या मूर्खचा व भा.ज.प. चा ही निषेध सर्वच थरातून होणे आवश्यक आहे.
  इतकी सौम्य प्रतिक्रिया देताना मला खूप वेदना होत आहेत. फक्त माध्यमाची मर्यादा मी सोडू इच्छीत नाही.

  ReplyDelete
 2. Its blown out of proportion, You know it bhau.

  ReplyDelete


 3. भाऊराव,

  भाजपला पक्षातूनच जाणूनबुजून अपशकून करण्यात येत आहेत. आज ना उद्या भाजप फुटणार हे नक्की.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान  ReplyDelete
 4. ain nivadnukichya tondavar ase vaktavya karane aani Bhajapachi Gochi karane hey niyojit asu shakte kay?

  ReplyDelete