गोवा फ़ेस्ट म्हणून योजल्या जाणार्या एका समारंभात महिला अत्याचार विषयावर आपले मत मांडताना, केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काही ठोस विधाने केलेली आहेत. त्यातून आता नवा वाद उफ़ाळण्याची शक्यता आहे. भारतीय व हिंदी चित्रपटात, मनोरंजन म्हणून ज्या प्रकारचे महिलांचे सादरीकरण होते, त्यातून पुरूषी अहंगडाला व पाशवी विकृतीला अनाठायी प्रोत्साहन मिळत असते. एकूण चित्रपटाच्या कथानकात रोमांन्स म्हणून जी मांडणी केली जाते, त्यात एका मुलीला कोणी मुलगा व त्याचे मित्र मिळून कोंडीत पकडल्यासारखे घेरतात आणि छेडछाड करतात. पुढे त्यालाच शरण गेल्यासारखी ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडल्याचे कथानक काय संदेश तरूणांसमोर घेऊन जाते? वयात आलेल्या मुलाने तरूणी व मुलीची छेड काढावी आणि मुलीच्या मनाविरुद्ध तिची छेड काढणे म्हणजेच रोमान्स असल्याचा हा संदेश घातक आहे. भारतीय चित्रपट कायम काही समाजोपयोगी संदेश देण्यात पुढे राहिले आहेत. पण रोमान्सचा हा संदेश महिलांची दिवसेदिवस कोंडी करण्यातच पुढे राहिला आहे. आता इतके स्पष्ट बोलले, मग तात्काळ दुसर्या बाजूचे लोक मनेका गांधींना मागास मनोवृत्तीच्या ठरवायला पुढे सरसावतील. चित्रपट नव्हते तेव्हा मुलींची छेड काढली जात नव्हती काय? चित्रपटात नसलेल्या गोष्टीही घडत असतात, असे अनेक युक्तीवाद तात्काळ पुढे येतील. पण ही शुद्ध दिशाभूल आहे. कुठल्याही रस्त्यावर मुलीची छेड काढली जात असताना, त्याला व्यवहारी जगात प्रोत्साहन मिळत नाही. पण चित्रपटाच्या कथेत मात्र अशा प्रणयाच्या भेसूर नाट्याला प्रोत्साहन देणारा भोवताल प्रदर्शित केलेला असतो. त्यात मशगुल होणार्या कोवळ्या किशोर वयातील मुलांना त्याची भुरळ सहज पडते. पुढले परिणाम पडद्यावर नव्हेतर वास्तविक जीवनात बघायला मिळत असतात. मनेकाजींनी त्यावरच बोट ठेवलेले आहे.
पंचवीस वर्षापुर्वी मुंबईनजिक उल्हासनगर येथे एका परिक्षाकेंद्रात घुसलेल्या हरीष पटेल नामक प्रेमवेड्या तरूणाने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने परिक्षार्थींना हाकलून लावले. मग तिथे रोखून धरलेल्या रिंकू पाटील नामक मुलीच्या अंगावर रॉकेल ओतुन पेटवून दिलेले होते. हे त्याचे एकतर्फ़ी प्रेम होते आणि त्याला मुलगी दाद देत नसेल, तर तिला जगण्याचाही अधिकार नसल्याचा संकेत त्याने आपल्या कृतीतून दिलेला होता. त्या घटनेने अवघा महाराष्ट्र व देश हादरला होता. पुढल्या महिनाभर त्याच एका बातमीने सर्वत्र धुमाकुळ घातला होता. मुलीच्या चेहर्यावर एसीड फ़ेकणे, तिच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करणे वा सामुहिक बलात्कार या गोष्टी नव्या राहिलेल्या नाहीत. पण ह्याचे आज ज्याप्रकारचे पेव फ़ुटलेले दिसते, ते कधीपासून, हेही तपासून बघण्यासारखे आहे. रिंकू पाटीलची घटना घडल्यानंतर दोनचार वर्षांनी शाहरुख खान हा नवा सुपरस्टार उदयास आला. त्याचे आरंभीचे गाजलेले तिन्ही चित्रपट रिंकू हत्याकांडाचे उदात्तीकरण करणारे होते. एकतर्फ़ी प्रेमात पडलेला तरूण कुठल्या टोकाला जाऊन आपल्या आसुरी प्रेमाचे प्रदर्शन करतो, त्यावरील या गाजलेल्या चित्रपटांनी लाखोच्या संख्येने वयात येणार्या तरूणांना कोणता संदेश दिला? आपल्याला एक मुलगी आवडली म्हणजे झाले. तिला आपण आवडण्याचे वा पसंत असण्याचे काहीही कारण नाही. किंबहूना त्या मुलला नाकारण्याचाही तिला काही अधिकार नाही. त्याच्या इच्छेला शरण जायचे किंवा मरणाला सामोरे जायचे, अशीच चित्रपट कथा काय संदेश देते? वयात येताना मुलांच्या मानसिक जाणिवा अस्थीर असतात आणि त्यांच्याशीच अशा कथांमधून खेळ होत असतो. अशावेळी समाजाची प्रतिक्रीया वा समाजाचा धाक त्या प्रवृत्तीला वेसण घालत असतो. चित्रपटांनी तीच भिती संपुष्टात आणली, ही खरी समस्या आहे.
रिंकू पाटील घटनेने बिथरलेला समाज क्षुब्ध होता. पण ‘डर’ वा ‘बाजीगर’ अशा चित्रपटांनी या आसुरी प्रियकराच्या विकृत मानसिकतेचे नको तितके उदात्तीकरण केले. ‘डर’ या चित्रपटातील ‘तू है मेरी किरन’ हे त्या काळात अफ़ाट लोकप्रिय झालेले गाणे, प्रत्यक्षात रिंकूला जाळणार्या हरीश पटेलच्या क्रुर भूमिकेचे संगीतमय समर्थन होते. त्यात म्हटले आहे. ‘तू हा कर या ना कर, तू है मेरी किरन’. तु किसी और की हो ना जाना, कुछभी कर जाऊंगा मै दिवाना. अशा ओळी वयात येणार्या कोवळ्या मुले व मुलींवर कोणते संस्कार करतात? त्या मुलाला कुठल्याही थराला जाऊन त्या मुलीवर कब्जा मिळवायला प्रवृत्त करतात ना? त्या इच्छेला मुलगी शरण जाणार नसेल, तर वाट्टेल ते करण्यालाही हेच गाणे प्रोत्साहन देते ना? असे शब्द निर्जीव नसतात. ते संगीतमय होऊन गुणगुणले जातात, तेव्हा मेंदूच्या कुठल्या तरी कप्प्यात घर करून बसतात. भावनाविवश होऊन मनावरचा ताबा सुटलेला असतो, तेव्हा त्या मुलाकडून तसेच काही करवून घेतात. त्यात हकनाक त्या निरपराध मुलीचा बळी जात असतो. तथाकथित कलाकार वा गीतकारासाठी ते कलाप्रदर्शन असेल, पण अशा लाखो तरूण मुलींसाठी ते मृत्यूचे भयंकर फ़र्मान असते. किती सहजगत्या वयात येणार्या मुलांच्या मनात हे विष पेरले जाते आणि त्याचे कोणते भीषण परिणाम संभवतात, त्याचा विचारही तात्विक युक्तीवादात होत नाही. असे काही घडले म्हणजे त्याला गुन्हा ठरवून कारवाई होऊ शकते. पण ज्या मुलीचे आयुष्य बरबाद झाले; तिला त्यातून न्याय मिळत नसतो की वाया गेलेले जीवन पुन्हा रुळावर येत नसते. कलाविष्कार वा मनोरंजनाच्या स्वातंत्र्याचे अनुभव अन्य कोणी घेतो आणि किंमत मात्र बिचार्या अशा निरपराध मुलींना मोजावी लागत असते. कारण अशा अविष्कारामधून शेकडो स्फ़ोटक मनांचा चुड लावली जात असते.
अशा विषयावर किंवा अविष्कार स्वातंत्र्यावर चर्चा रंगतात, तेव्हा आपल्या महान स्वातंत्र्यावर युक्तीवाद केले जातात. पण तुमच्या स्वातंत्र्यासाठी अन्य कुणाच्या किमान सुखरूप जगण्याच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जाण्याच्या लाखो शक्यता निर्माण केल्या जातात. त्याचा गंधही चर्चा रंगवणार्या बुद्धीजिवींना नसतो. त्यांच्या लेखी असे परिणाम हे समाजातील नित्यनेमाने घडणारे गुन्हे असतात आणि पोलिस व कायद्याने त्याच्याशी निपटावे. माणूस हा पशूच असतो आणि कायदे, नियम, संकेत, पापपुण्य अशा विविध मानवी संकल्पनांनी, त्या पशूला वेसण घातलेली असते. लोक काय म्हणतील? जगात छीथू होईल किंवा अशा वचकामुळेच, माणसात दडी मारून बसलेला पशू काबूत ठेवलेला असतो. ज्याप्रकारचे नाचगाणे चित्रपटात आपण बघतो, तशा गोष्टी प्रत्यक्षात सहसा होताना दिसणार नाहीत. पण कथा चित्रपटातून त्या वारंवार बघितल्या, मग त्यात काही गैर नसल्याचे वाटू लागते आणि त्याचे अनुकरण समाजात सुरू होते. आरंभिक मौजमजेच्या गोष्टी मर्यादांच्या सीमारेषा पार करून कधी पलिकडे गेल्या, त्याचे भानही रहात नाही. मात्र त्याचे हिंस्र भयावह परिणाम समोर आले, मग आपण सगळेच कानावर हात ठेवून नामानिराळे होऊ बघतो. पण ही विकृती आपण सर्वांनी पोसली आहे. तिला खतपाणी घातले आहे, प्रोत्साहन दिलेले आहे. चित्रपटांनी समाजातील मर्यादांचे उल्लंघन करून माणसात दडलेला पशू मोकाट करण्याला चालना दिलेली आहे. म्हणूनच जितके मुलींना स्वातंत्र्य मिळते आहे, तितकीच त्यांच्या स्वातंत्र्याचा घास घेऊ बघणारी आसुरी विकृतीही फ़ोफ़ावली आहे. चित्रपट कथा व सादरीकरणाने त्या पाशवीवृत्तीला चिथावण्या देण्यातूनच हा मानसिक रोग बोकाळला आहे. अन्यथा शाहरुखखान तशा कथानकानेच लोकप्रिय होऊन सुपरस्टार कशाला झाला असता? मनेकाजींनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे.
Bhau
ReplyDeleteAgadi yogya jagi bot thevle aahe. All bollywood has done it since long with well planned manner & with specific goal to achieve, which they achieved.
This thing need to be conveyed to conman people so that they can understand this dirty game.
Heartily congrats to Menka Ji & You for writing this.
Abhijeet
चित्रपटां इतक्याच आजकालच्या टीव्ही मालिका देखील वाईट संदेशच देत असतात.
ReplyDeleteभाऊ!
ReplyDeleteसामाजिक विषयावरील एक उत्तम लेख फक्त तुम्हीच लिहू शकता. धन्यवाद.
Since time of Dilipkumar, Shammikapoor etc. such things are going on and people are enjoying it. So SHAMEFUL.
ReplyDelete