Wednesday, April 5, 2017

रामनवमीचे गौड‘बंगाल’

mamta maulawi के लिए चित्र परिणाम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बंगालमध्ये योजनाबद्ध रितीने आपले हातपाय पसरण्यास आरंभ केला आहे. कुठले ना कुठले निमीत्त शोधून, संघाचे स्वयंसेवक व कार्यकर्ते तिथे जनतेपर्यंत जात असतात आणि आपल्या हिंदूत्वाचा उदघोष करीत असतात. त्याचा परिणाम नजरेत भरणारा नसेल, पण ज्यांना त्याचे राजकीय चटके बसतात, त्यांना असा परिणाम जाणवत असतो. गेल्या लोकसभा मतदानापासून ममता बानर्जी व डाव्यांना त्याची जाणिव झालेली आहे. खरे तर २०१२ सालात प्रणबदा मुख्रर्जी यांची राष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती आणि त्यात त्यांचेच सुपुत्र लोकसभेत निवडून आलेले होते. तर त्या मतदानात भाजपाचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकाने पराभूत झाला. त्यावर मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी यांची प्रतिक्रीया लक्षणिय होती. बंगालमध्ये नगण्य असलेल्या भाजपाने या पोटनिवडणूकीत पंधरा टक्केहून अधिक मते मिळवल्याने, त्या पक्षाचा जनमानसातील प्रभाव वाढत असल्याचा इशारा येच्युरी यांनी दिलेला होता. पण इतरांना इशारा देणार्‍या येच्युरी वा डाव्यांनी, भाजपाला रोखण्यासाठी काय केले, त्याचे उत्तर नकारार्थी आहे. भाजपाला अशा प्रदेशातला विस्तार संघाच्या प्रयासांनी जितका होतो, तितकाच त्यासाठी पोषक वातावरणानेही होत असतो. जेव्हा कुठल्याही एका समाजघटकाला आपली कोंडी होत असल्याची जाणिव होऊ लागते, तेव्हा तो घटक प्रतिकाराला सिद्ध होऊ लागतो. बंगालमध्ये पुरोगामी नावाने हिंदू समाजाची सतत कोंडी झाली आहे आणि मुस्लिमांच्या आक्रमक पवित्र्याने मुस्लिमांचे सतत लाड होत राहिले आहेत. देशभर पुरोगामीत्वाची तीच शोकांतिका झालेली आहे. अशा बंगामध्ये अकस्मात पुरोगामी ममता बानर्जी यांनी थाटामाटात रामनवमीचा उत्सव साजरा करायला घ्यावा, हा चमत्कार नाही काय?

ममता बानर्जी सतत आपण कशा मुस्लिमांच्या तारणहार आहोत, तेच सिद्ध करण्यासाठी झटत राहिल्या आहेत. कुठेही मुस्लिमांनी मस्तवालपणा वा गुंडगिरी करावी आणि ममता सरकारने ती पाठीशी घालावी, ही नित्याची बाब झाली आहे. त्याचेही कारण आहे. ममतांनी सत्ता मिळवताना मुस्लिम मौलवी व धर्मांधांना हाताशी धरलेले होते. सहाजिकच मौलवींच्या समोर शरणागत व्हायला पर्याय नाही. अर्थात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मताने पुरोगामी पक्षांना आजवर हात दिला ही वस्तुस्थिती असली, तरी अशा प्रत्येकवेळी हिंदू मते धर्मापेक्षा राजकीय विचारांनी विभागली गेल्यानेच तसे निकाल आलेले होते. कुठलाही पक्ष उघडपणे हिंदूंचा पक्षपाती म्हणून उभा राहिला नाही, किंवा हिंदू मतावरच निवडून येण्याची इच्छा बाळगून काम करीत नव्हता. भाजपाने तसा पवित्रा घेतला आणि तशी हालचाल हिंदू समाजात सुरू झाली. अर्थात त्या हालचालीला फ़ारसा वेग नव्हता. अशावेळी मुस्लिम मते भयभीत होऊन आपल्याच पारड्यात पडावी, म्हणून जो अतिरेक पुरोगामी पक्षांनी सुरू केला, त्यातून विचलीत झालेल्या हिंदूंमध्ये धर्माच्या जाणिवा राजकारणापेक्षा प्रभावी होत गेल्या. प्रत्येक पक्षाला मुस्लिमांची काळजी आहे, पण हिंदूंसाठी कोणीच नाही, अशी धारणा पुरोगामी मुर्खपणाने निर्माण केली. त्याचा लाभ भाजपाला मिळत गेला आहे. वास्तवात भाजपा तितका कडवा हिंदूत्ववादी वा हिंदू पक्षपाती पक्ष नाही. पण हिंदूंच्याही वेदना प्रश्न याविषयी बोलायला भाजपा मागे हटत नाही. सहाजिकच भाजपा हिंदूंना आपलासा पक्ष वाटत गेला आणि त्यातून क्रमाक्रमाने धर्माधिष्ठीत मतदानाकडे मोठी संख्या वळत गेलेली आहे. हिंदू सणांवर टिका वा त्यावर आणले जाणारे निर्बंध, यातून बेचैनी वाढली आणि त्याविषयी कोणी पुरोगामी आवाजही उठवायला राजी नाही. अशावेळी भाजपा वा संघाने ती गरज पुर्ण केल्यास, हिंदूंचा ओढा तिकडेच वळणार ना?

उत्तरप्रदेशात तेच झाले. प्रत्येक पक्ष मुस्लिमांना अधिकाधिक उमेदवार देत होता. पण हिंदूंच्या भावनांची पायमल्ली करीत होता. अशावेळी मुस्लिमांच्या मतांची गरज नसल्याचे भाजपाने ठामपणे दाखवून दिले. त्याने चारशे जागी एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही आणि आपल्याला फ़क्त हिंदूंच्याच मतांची अपेक्षा असल्याचेच दाखवून दिले. तसे भाजपाचा कोणी नेता बोलला नाही. पण पुरोगामी नेते व पक्षांनी त्याचेच भांडवल मुस्लिम मतांसाठी केले आणि अधिकाधिक हिंदू प्रतिक्रीया म्हणून भाजपाकडे ढकलून दिले. म्हणून तर उत्तरप्रदेशात भाजपाला प्रचंड यश मिळाले आणि ते हिंदू व्होटबॅन्केचे यश आहे. त्या मोठ्या राज्यातील १८-१९ टक्के मुस्लिमांच्या मतांशिवाय भाजपा इतके मोठे यश मिळवू शकते असेल, तर बंगालमध्ये २५-२७ टक्के मुस्लिमांच्या मतांवरच विसंबून ममता किती काळ राज्य करू शकतील? हिंदूंची संख्या बंगालमध्ये किमान ६५-७० टक्के तरी आहेच ना? त्यापैकी ३०-३५ टक्के मते हिंदू म्हणून एकवटू लागली, तर ममतांनी नमाज पढून काय उपयोग उरणार आहे? त्याचेच भान आता ममतांना आलेले आहे. आजवर त्या मुल्लामौलवींना आपल्या व्यासपीठावर आणून मुस्लिमांची मते एकगठ्ठा मिळवायला कसरती करीत होत्या. आता त्यापेक्षाही मोठी व्होटबॅन्क हिंदूंची असल्याचे त्यांना भान आले आहे. कारण उत्तरप्रदेशात त्याची प्रचिती आलेली आहे. त्याची पुनरावृत्ती बंगालमध्ये झाली, तर ममताची महत्ता संपुष्टात येणार आहे. म्हणूनच बंगालच्या इतिहासात प्रथमच एका पुरोगामी पक्षाने रामनवमी वाजतगाजत साजरी करण्यात पुढाकार घेतलेला आहे. कोलकाता येथे संघाच्या रामनवमीला तृणमूल कॉग्रेसच्या प्रशासनाने नकार दिला होता. पण कोर्टाने फ़टकारताच तशी परवानगी देण्यात आली होती. पण त्याच्याही पुढे जाऊन आता खुद्द ममताच रामनवमी पक्षातर्फ़े साजरी करू लागल्या आहेत.

यातले गणित समजून घेण्यासारखे आहे. देशातील मुस्लिम लोकसंख्या १७-१८ टक्के असल्याचे मानले जाते. ती सर्व एकगठ्ठा मतदान करीत असल्याचे गृहीत आहे. सहाजिकच ती एकत्रित मते मिळवण्याला आजकाल पुरोगामी संबोधले जाते. त्यासाठी ७५-८० टक्के हिंदूंच्या भावना धारणा पायदळी तुडवण्यात कोणाला काही फ़िकीर नसते. मोदींच्या उदयानंतर त्याच गृहीताला छेद गेला आहे. मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा रंगवूनही मोदींना देशभरच्या लोकांनी स्पष्ट बहूमत दिले. उत्तरप्रदेश विधानसभेत मुस्लिम उमेदवार कटाक्षाने नाकारले असूनही प्रचंड बहूमत मिळवले. याचा अर्थ असा, की मुस्लिम जितके टक्के आहेत, तितकी हिंदू व्होटबॅन्क उभी राहिली, की मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोर होऊन जाते. मग उर्वरीत मतदानात जो पुढे असेल, तोच दणदणित विजय संपादन करतो. बंगालमध्ये २५ टक्के हिंदूंनी भाजपाला केवळ धर्माच्या नावावर मतदान करायचे ठरवले, तर पुरोगामी मुस्लिम मतांचा सिद्धांत उत्तरप्रदेश प्रमाणेच धुळीस मिळणार आहे. ममतांना त्याच चिंतेने ग्रासलेले आहे. म्हणूनच अकस्मात त्यांनी नमाज पढणे सोडून, रामनवमीचा उत्सव साजरा करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. मात्र त्यात त्यांचेच मुस्लिम सहकारी किती साथ देतील याची शंका आहे. अशा हिंदू सणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न झाल्यास ममताचीच आणखी तारांबळ उडून जाईल. पोसलेल्या मुस्लिम गुंडांच्या मुसक्या बांधता आल्या नाहीत, तर सतावले जाणारे अधिकाधिक हिंदू मतदार भाजपाच्या गोटात दाखल होत जाणार आहेत. दादरीच्या अखलाख नामक मुस्लिमाच्या गोमांस प्रकरणात मोदी सरकारला बदनाम करण्याची मोहिम रंगली, त्या मोहिमेनेच योगींचे सरकार सत्तेत आलेले आहे. बंगालसह अनेक राज्यात आता त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. त्याचे श्रेय संघ वा भाजपाला नसून पुरोगामी मुस्लिम लांगुलचालनाला आहे.

1 comment:

  1. "मुस्लिमांच्या एकगठ्ठा मताने पुरोगामी पक्षांना आजवर हात दिला ही वस्तुस्थिती असली, तरी अशा प्रत्येकवेळी हिंदू मते धर्मापेक्षा राजकीय विचारांनी विभागली गेल्यानेच तसे निकाल आलेले होते. कुठलाही पक्ष उघडपणे हिंदूंचा पक्षपाती म्हणून उभा राहिला नाही "
    हा विचार करण्याचे धार्ष्ट्य कोणताही राजकीय पक्ष करत नाही.

    ReplyDelete