एका वर्तमानपत्रात शिवसेनेतील मोठ्या फ़ेरबदलाची शक्यता असलेली बातमी आलेली आहे. किंबहूना २०१९ च्या निवडणूकांसाठी असे फ़ेरबदल आवश्यक असल्याची ही बातमी, अनेक शिवसैनिकांना दिलासा देणारी असेल. कारण मागल्या तीनचार वर्षात शिवसेना आपलीच ओळख विसरत गेलेली आहे. जणू अन्य पक्षांपैकीच एक अशी आजच्या शिवसेनेची ओळख होऊन बसली आहे. त्यात नेतृत्वाशी निष्ठावंत असलेल्यांना प्राधान्य आहे आणि खरोखरीच्या कार्यकर्त्यांना स्थान उरलेले नाही. त्याचीच मोठी किंमत सेनेला विधानसभा व नंतरच्या निवडणूकात मोजावी लागलेली होती. बाळासाहेबांच्या काळातली शिवसेना व आजची सेना, यात जमिन अस्मानाचा फ़रक पडलेला आहे. त्याचेच प्रतिबिंब मग मतदानातही पडलेले आहे. त्याचा विचार वा आत्मपरिक्षण करण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे संघटनेला मरगळ येत जाणे स्वाभाविक होते. १९९० पर्यंत शिवसेनेने अनेक पराभव पचवलेले आहेत. ज्या मुंबईत सेनेची स्थापना झाली वा विस्तारही झाला, त्याच मुंबईतही सेनेला अनेक पराभव पचवावे लागले आहेत. १९६६ ते १९९० पर्यंत एकाददुसरा आमदार निवडून आला असेल, पण महापालिकेत शिवसेनेचा भगवा डौलाने फ़डकत राहिला होता. पालिकेत नगण्य वाटणार्या पक्षांनाही विधानसभेत यश मिळायचे, पण सेनेला आमदार निवडून आणता आलेले नव्हते. पण संघटनात्मक पातळीवर त्याचा कधीच प्रभाव पडला नाही. आपापल्या विभागात व परिसरात शिवसेनेच्या शाखा कामात गुंतलेल्या असायच्या. गेल्या चारपाच वर्षात सेनेच्या शाखा मरगळल्या आणि सेना केवळ आमदार नेत्यांच्या भोवतीच घोटाळत असल्याचे जाणवू लागले. अन्य पक्षात असेच असते. आमदार खासदारांच्या संख्येपेक्षा शाखात जमणार्या गर्दीवरून शिवसेनेची ओळख होती, ती कुठल्या कुठे पुसली गेली. आपला तोच खरा चेहरा शिवसेना पुन्हा शोधणार आहे काय?
लौकरच विधानसभेचे अधिवेशन संपेल आणि त्यानंतर सेनेच्या संघटनात्मक स्वरूपात मोठे फ़ेरबदल व्हायचे आहेत, असे या बातमीत म्हटले आहे. त्यात विधान परिषदेत बसलेल्या नेते मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे आणि ग्रामीण वा मुंबई बाहेरच्या कर्तबगार शिवसैनिकांना पुढे आणले जाणार असल्याची ही बातमी लक्षणिय आहे. शिवाय मुंबईची संघटना स्वतंत्रपणे संभाळणारा वेगळा नेता नेमला जाणार असेल तर छानच आहे. खरेतर त्याचीच आवश्यकता आहे. शिवसेनेची मुंबईतली संघटना जितकी जागरुक व प्रभावी असते, तितके सेनेचे महाराष्ट्रातील संघटनेवरचे प्रभूत्व अधिक समर्थ असते. मुंबईत शिवसेनेने शाखांचे जाळे विणून त्यातून लोकांना आपल्या पक्षाशी जोडण्याचे दिर्घकाळ काम केले. अशाच मुशीतून तयार झालेल्या शिवसैनिकांनी पुढल्या काळात खेड्यापाड्यापर्यंत शिवसेना नेलेली आहे. अशा मुंबईत संस्कार घेतलेल्या शिवसैनिकाने संपर्कप्रमुख म्हणून तालुका व जिल्हा पातळीवर संघटनेचा विस्तार करताना, तिथल्या नवख्या तरूणाला कामाची पद्धत शिकवली व शिवसेना त्याच्यात बाणवली होती. अलिकडल्या काळात अशा संपर्कप्रमुखांचा तुटवडा सेनेला फ़टका देऊन गेला आहे. खेरीज संघटना व सत्तापदांच्या शर्यतीत, नेतेच गुंतल्याने संघटनेकडे मोठे दुर्लक्ष होऊन गेलेले आहे. सहाजिकच ग्रामिण भागात उत्तम काम करणार्या व मुसंडी मारणार्या शिवसैनिकांना प्रोत्साहन मिळू शकलेले नाही. इतक्या वर्षात शिवसेनेचा ग्रामीण चेहरा समोर येऊ शकलेला नाही. आमदार अनेक जिल्ह्यातून निवडून आले. पण सेनेचे नेतृत्व मुंबईकरांच्याच हातात राहिले. त्याला नारायण राणे वा छगन भुजबळ असे अपवाद होते. काही प्रमाणात दिवाकर रावते यांनाही श्रेय देता येईल. कारण त्यांनी मराठवाडा विदर्भात शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार यशस्वी करून दाखवला.
अलिकडल्या काही वर्षात शिवसेनेच्या कार्यशैलीचा विस्तार करण्यापेक्षा, वाचाळता करणार्यांना अधिक प्रोत्साहन मिळाले. पर्यायाने रस्त्यावर किंवा मैदानात उतरून काम करणारे शिवसैनिक मागे पडत गेले. नेतृत्वाची मर्जी संपादन करणे किंवा वाचाळता, ही अधिक पात्रता होत गेली. पाच वर्षे मागे गेल्यास कुठल्याही वर्तमानपत्रात येणार्या शिवसेनेच्या बातम्या बघितल्या, तर कुठे ना कुठे शिवसैनिकांनी राडा केला, म्हणूनच बातम्या येत असत. पाकिस्तानचे खेळाडू असोत वा कलाकार असोत, त्यांच्या विरोधात धमाल केली. हिंदूत्वाचा विषय असो अशा कुठल्याही बाबतीत राडा केला, अशीच शिवसेनेची बातमी असायची. आता तशी बातमी चुकूनही वाचायला मिळत नाही. दिड वर्षापुर्वी सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याची घटना घडली. ती वगळता तीनचार वर्षात शिवसेनेने कुठल्या विषयात राडा केला, किंवा धमाल उडवली, असली बातमी वाचायला मिळालेली नाही. मात्र रोजच्या रोज मुखपत्राच्या संपादकीयात काय म्हटले आहे, त्याची बातमी अगत्याने सर्व वृत्तपत्रे प्रसिद्ध करतात. थोडक्यात आता शिवसेना शाखा वा संघर्षात उरलेली नसून, मुखपत्रापुरती मर्यादित झाली आहे. पन्नास वर्षात शिवसेनेची ख्याती ज्या कारणास्तव होती, तिचाच आज मागमूस दिसत नाही. सेनेच्या कुठल्या नेत्याने कोणते वक्तव्य केले वा कुणावर आरोप केले, अशा बातम्या येत असतात. पाक कलाकारांच्या भारतीय चित्रपटात भूमिका असण्याबद्दल सेनेची कुठली प्रतिक्रीया नव्हती, की काही हालचाल नव्हती. असे कित्येक विषय नजरेस आणून देता येतील, की जिथे शिवसेनेकडून लोकांच्या अपेक्षा असतात. तिथेच सेना तोकडी पडत असेल तर संघटनात्मक पातळीवर कुठेतरी गडबड झालेली आहे. कारण धोरण ठरवून असे राडे वा आंदोलने सेना करीत नव्हती. शाखा व शिवसैनिक आपल्याच पातळीवर ही धमाल उडवून द्यायचे. ती शिवसेना कुठे अंतर्धान पावली आहे?
शिवसेना स्थापन झाली व नंतर राजकारणात वावरू लागली; तेव्हाही अनेक पक्ष कार्यरत होते आणि त्यापेक्षा आपल्या वेगळ्या रुपाने व कार्यशैलीने शिवसेनेने मुंबईत आपले स्थान निर्माण केले. तिच्या राडासंस्कृतीची शहाण्यांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली. म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या पाठीराख्यांना आवरले नाही. मुंबईकरांना व मराठी जनतेला त्यामुळेच सेनेविषयी आस्था निर्माण झाली. तिथून मग सेनेची मुंबईत मक्तेदारी निर्माण होत गेली. हल्ली ती शिवसेना कुठे गायब झाली आहे? आता आपला तोच जुना अवतार शिवसेना धारण करणार आहे काय? मुंबईच नव्हेतर महाराष्ट्रालाही तीच शिवसेना हवी होती आणि तेच आपले रूप शिवसेनेने त्यागले. तिथून तिची घसरण झालेली आहे. अन्य पक्षात जशी आमदार वा सत्तापदासाठी आसुसलेल्यांची झुंबड उडालेली असते, तशी आजची शिवसेना झाली असेल, तर मुंबईकरांना वा अन्य कुणाला शिवसेना व अन्य पक्षात फ़रक कसा करता येईल? पाच वर्षापुर्वी ओवायसीच्या पक्षाने नांदेड महापालिकेत काही नगरसेवक निवडून आणले, त्याचाही उल्लेख करून बाळासाहेबांनी आपल्या अखेरच्या चित्रित भाषणात इशारा दिलेला होता. आज त्याच ओवायसीचा मुंबईत एक आमदार निवडून आला आहे आणि मुंबई पालिकेतही एकदोन नगरसेवक जिंकू शकले आहेत. शिवसेना पुर्वीसारखी भक्कम व लढवय्या असती, तर त्याला ही मजल मारता आली नसती. ना भाजपाला सेनेशी मुंबईत बरोबरी साधता आली असती. सत्तेच्या साठमारीत शिवसेना आपली खरी ओळखच हरवून बसली, म्हणून ही पाळी आलेली आहे. सत्तापदाचा हव्यास व नेत्यांची मक्तेदारी मोडून काढली, तरच सेनेला आपल्या मूळ स्वरूपात ठामपणे उभे रहाता येईल. मग कुठलेही आव्हान पेलणे शक्य होईल. संघटनेत फ़ेरबदल करताना पक्षप्रमुखांनी आपली ओळख व चेहरा पुनर्स्थापित केला तर?
Bhau, ha lekh tumheech lihila ahe ka? Shivsenechya RADA karnyachya vruttee chi tumhi tarafdari karta? Kamaal ahe.
ReplyDeleteAajche Ravindra Gaikwad ani Sanjay Raut yaanchi muktafale aikun, yanna lokanni chaukat chaplene ka maru naye asa prashna padto.
barobar ahe bhaau. Eknath Shinde sarakhe kattar karyakarte ahet tyancha yogya vaapar pakshane kelaa pahije. Navi vaatchal karayachi asel tar senet badal garjeche ahet.
ReplyDelete