कुलभूषण जाधव या मराठी माणसाला पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फ़ाशीची शिक्षा ठोठावली आहे. कुलभूषण हा भारतीय नौदलाचा माजी अधिकारी असून, निवृत्ती पत्करल्यावर त्याने इराणमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. तिथे त्याने सागरी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याला आता अनेक वर्षे होऊन गेलेली आहेत. पण मागल्या वर्षी पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या सीमेवर जाधवला अटक केल्याची बातमी आली आणि अनेक भारतीयांना धक्काच बसला. कारण बलुचिस्तान वा पाकिस्तानशी जाधवचा दूरान्वयेही संबंध नव्हता. त्याने इराणमध्ये वास्तव्य करून, तिथेच सागरी वाहतुकीचा उद्योग आरंभला होता. असा माणूस अचानक पाकच्या बलुचिस्तान प्रांतात गेला कुठून? तिथे काय करीत होता, असा प्रश्न भारतातही अनेकांना पडला. पण त्याचे उत्तर पाकिस्तानच्या हेरखात्याने दिलेले आहे. त्यांच्या मते कुलभूषण जाधव नौदलातून निवृत्त झालेलाच नव्हता. तर निवृत्तीचे नाटक करून तो भारतीय हेरखात्याचा हस्तक म्हणून पकिस्ताननजिक वावरत होता. पाकिस्तानात घातपात करणे वा लोकांना सरकार विरोधातील कारवायांसाठी चिथावणे, असे उद्योग जाधव करीत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. पण पाकिस्तानात तो पोहोचला कसा, त्याचा समाधानकारक खुलासा पाकला करता आलेला नाही. भारत सरकारने त्यासाठी प्रयास केले असतानाही स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही. अर्थातच अशा विषयात भारत सरकारला काहीही करण्यात मर्यादा येतात. पण तशा मर्यादा भारतातल्या पाकमित्रांना येण्याचे काही कारण नाही. हे पाकमित्र जगप्रसिद्ध आहेत. भारतात पाकिस्तानी कलावंत वा खेळाडूंना कुठलीही अडचण आल्यावर हे पाकमित्र हिरीरीने हातातले काम सोडून धाव घेत असतात. मग त्यांनी त्यांच्या पाकमधील भारतमित्रांना हाताशी धरून कुलभूषणसाठी काहीतरी करायला नको काय?
पाक व भारत सरकार एकमेकांचे शत्रू असले, तरी दोन्ही देशातील जनता परस्परांची घनिष्ठ मित्र असल्याचे दावे आपण इथल्या पाकमित्रांकडून नेहमी ऐकत असतो. त्यात नासिरुद्दीन शहा, मणिशंकर अय्यर वा जतीन देसाईपासून बरखा दत्त, सुधींद्र कुलकर्णी, दिवंगत दिलीप पाडगावकर इत्यादिंचा समावेश होतो. हे लोक दोन वर्षापुर्वी पाकिस्तानात शांती संमेलनासाठी गेलेले होते. त्यांच्यासोबत वेदप्रकाश वैदिक नावाचे महाशय गेल्याने पाकमित्रांच्या त्या पाकभेटीचा खुप गाजावाजा झाला होता. अशा या पालमित्रांना तिथे अगत्याने आमंत्रित करणार्या संस्थेचे सर्व संचालक पाकिस्तानी हेरसंस्थेचे माजी अधिकारी असावेत, हा योगायोग आहे. त्याच हेरसंस्थेने पाक भूमीत सईद हाफ़ीज वा अजहर मसूद यांच्यासारखे शांतीदूत निर्माण केलेले आहेत. त्यांच्याच अगत्याने इथले उपरोक्त पाकमित्र भारतीयांनी पाकिस्तानशी मैत्री केल्याने शांतता कशी प्रस्थापित होऊ शकेल, हे अहोरात्र समजावत असतात. मात्र जेव्हा कुलभूषण वा सर्वजीत यांच्यासारखा कोणी भारतीय पाकिस्तानच्या जाळ्यात फ़सतो, तेव्हा या सर्वांची दातखिळी बसलेली असते. स्वत: हे पाकमित्र कुठल्या तरी बिळात दडी माररून बसतात, बेपत्ता होतात. आताही कुलभूषणला फ़ाशीची शिक्षा झाल्याची बातमी आल्यापासून या पाकमित्रांचा आवाज कुठल्याही वाहिनीवर ऐकायला मिळालेला नाही. पण जेव्हा भारतात पाकिस्तानी हस्तक म्हणून अहमदाबाद येथे इशरत जहान मारली गेली, तेव्हा अन्नपाणी सोडून अशी पाकमित्र मंडळी दिवसरात्र इशरतला मारणार्या पोलिसांना आयुष्यातून उठवायला राबत होती. संसदेवर हल्ला करणार्या अफ़जल गुरूच्या गळ्यातला फ़ाशीचा फ़ंदा मोकळा करण्यासाठी त्यांना अन्न गोड लागत नव्हते. पण सीमेपलिकडे असेच काही होत असेल, तेव्हा पाकमधील भारतप्रेम कशाला आटले आहे, त्याचे उत्तर द्यायला त्यापैकी एकही हजर नसतो.
अन्य प्रसंगी म्हणजे करण जोहर वा शाहरुख खानच्या चित्रपटातील पाक कलाकारांना भारतातून हाकलून लावण्याची मागणी झाली, म्हणजे यांचा जीव कासावीस होतो. घश्यात त्यांचा घासही अडतो. पाकिस्तानने तसे कुलभूषणला हाकलून लावलेले नाही. तर त्याला परस्पर पकडून कुठलाही आरोप न दाखवता फ़ाशी ठोठावली आहे. जर हीच दोन देशातील प्रेमाची कसोटी असेल, तर पाकिस्तानी कलाकार वा खेळाडूंना इथे भारतीय पोलिसांनी अटक करायला हवी आणि त्यांच्यावर हेरगिरी वा घातपाताचे आरोप ठेऊन लष्करी कोर्टात खटले भरायला हवेत. त्यांच्यावर असलेल्या भारतीयांचे प्रेम सिद्ध करण्यासाठी अशा कलाकार वा अन्य कोणाही पाकिस्तान्याला थेट फ़ाशीच ठोठावली पाहिजे. एकदा असे सुरू झाले, मगच पाकिस्तानला अक्कल येऊ शकेल. पाकलाच नव्हेतर इथल्या तथाकथित पाकमित्रांनाही थोडे शहाणपण येऊ शकते. कारण अशा कुणा पाहुण्या पाक नागरिकाला खटल्यात गोवले वा फ़ाशी झाली; मग हे पाकमित्र खडबडून जागे होतील. तेव्हा त्यांना आपण कुलभूषणच्या फ़ाशीचा जाब विचारू शकतो. अन्य कुठलाही सभ्य मार्ग नाही. गेले वर्षभर भारत सरकार कुलभूषणशी संपर्क साधायचा प्रयास करते आहे. पाकमधील भारतीय वकिलाना त्याला भेटण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अनेकदा करून झालेली आहे. पण तेही पाकने नाकारलेले आहे. आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे पाक पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी कुलभूषण विरोधात कुठलाही सज्जड पुरावा पाककडे नसल्याची कबुलीही देऊन झाली आहे. इतके होऊनही त्याला फ़ाशीची शिक्षा कशाच्या आधारे ठोठावण्यात आली? त्याचे उत्तर पाकपाशी नाही. पण निदान इथल्या पाकप्रेमींकडे तरी अशा अजब पाकप्रेमाचे उत्तर असायला हवे ना? मुळात या कुलभूषणला सामान्य नागरिक असताना लष्करी कोर्टात कशाला उभे करण्यात आले, त्याचे तरी उत्तर हवेच ना?
खरेतर ही इथल्या पाकप्रेमी मंडळींना उत्तम संधी आहे. भारतात पाकिस्तानचा अकारण द्वेष चालतो, त्याला चपराक हाणण्याची ही संधी आहे. या पाकप्रेमींचे त्या देशात अनेक उच्चपदस्थ घनिष्ठ मित्र आहेत. त्यांचा वापर करून बरखा दत्त वा सुधींद्र कुलकर्णी यांनी कुलभूषणला जामिन रहावे आणि त्याची सोडवणूक करावी. त्याच्या बदल्यात तुरूंगवास सोसून व फ़ासावर लटकून, पाकिस्तान भारतीयांवर किती प्रेम करतो, त्याचेच पुरावे द्यालया काय हरकत आहे? त्यांना थेट जन्नतमध्येच प्रवेश मिळेल आणि भारतीयांना पाकप्रेमाचाही पुरावा मिळेल. पाकिस्तानात आपल्याला खुप प्रेम मिळाल्याचा दावा अभिनेता नासिरुद्दीन शहाने केला होता. त्याला हीच उत्तम संधी आहे. कुलभूषणला जी वागणुक मिळाली ती सुडबुद्धी नसून प्रेमाचा वर्षाव असल्याचे सिद्ध करण्यासाठी, नासिरने पाकिस्तानात जाऊन कोर्टासमोर हजर व्हावे आणि कुलभूषण ऐवजी तेही पाकप्रेम आपल्याच गळ्यात अडकवा, अशी मागणी करावी. वरकरणी आपल्याला पाकिस्तानी लष्कराचा हेरखात्याचा वा पाक सरकारचा राग येऊ शकेल. पण कुलभूषण जाधव किंवा त्याच्या आधीचा सर्वजित सिंग हे पाकिस्तानने घेतलेले बळी नाहीत. त्यांना त्या श्वापदाच्या जबड्यात नेऊन सोडणार्या शिकार्यांचे नाव भारतातले पाकप्रेमी असेच आहे. पाकने नेहमी अशीच पापे केलेली आहेत. पण त्यांच्या प्रत्येक पापावर पांघरूण घालण्याचे पुण्यकर्म इथले पाकप्रेमीच करीत आलेले आहेत. म्हणून तर निजामूद्दीन दर्ग्याचा मौलवी तिकडे जाऊन फ़सतो किंवा कुलभूषण मृत्यूच्या सापळ्यात अडकतो. जोवर त्याची किंमत इथे भारतात वसुल केली जात नाही, तोवर नुसते हातपाय आपटून काहीही उपयोग नाही. ज्यांना खेटराचीच भाषा कळते, त्यांच्यावर फ़ुलांची बरसात करून उपयोग नसतो. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी, हेच कुलभूषणला सोडवण्याचा दिशेने टाकलेले पहिले पाऊल असेल.
कुबेरांना 'अवघड जागेचे दुखणे' झाले अाह् भाऊ. त्याचा ईलाज सुचवा. याकुब पेक्षा जाधव त्यांना भयंकर वाटतात
ReplyDeleteआता जनतेनेच अशी दुखणी ठीक करायला हवीत