Thursday, April 6, 2017

आधुनिक मायावी राक्षस

Image result for lokpal movement

रामायण वा तत्सम पुराणकथांमध्ये मायावी राक्षसाच्या खुप गोष्टी आहेत. हे मायावी राक्षस मनात येईल, तेव्हा कुठलेही रुप धारण करू शकायचे आणि हेतू पुर्ण झाला, मग आपल्या मूळ रुपात अवतिर्ण व्हायचे. अशाच एका राक्षसाने सोनेरी मृगाचे रुप धारण करून वनवासातल्या सीतामाईला भुरळ घातली होती. मग त्याचीच शिकार करायला श्रीराम पर्णकुटीतून बाहेर पडला असता, ‘लक्ष्मणा धाव’ अशा आरोळ्याही मायावी राक्षसानेच हुबेहुब रामाचा आवाज काढून ठोकलेल्या होत्या. लक्ष्मणाने पर्णकुटीभोवती सुरक्षेसाठी रेखा आखली आणि सीतामाईला ती न ओलांडल्याचे बंधन घातले असताना, गरीब भिक्षुकाचे रूप धारण करून रावण भिक्षेकरी म्हणून तिथे पोहोचल्याची कहाणी सर्वश्रूत आहे. आजच्या विज्ञानयुगात ती भाकडकथा मानली जाते. असे कोणी मायावी राक्षस नसतात आणि त्यांना क्षणार्धात आपले रुप बदलणे शक्य नाही, असेही ठामपणे सांगणारे विज्ञाननिष्ठ आपल्यात खुप आहेत. त्यात खरेच तथ्य असते, तर लोकपाल आंदोलनातून केजरीवाल, शिसोदिया वा आम आदमी पक्ष नावाचे मायावी राक्षस कशाला निर्माण झाले असते? स्वयंसेवी, समाजसेवी किंवा त्यागमुर्ति म्हणून लोकांसमोर येऊन जनतेला इतकी मोठी भुरळ घालण्याचा चमत्कार, कुठल्या विज्ञानात बसणारा आहे? पण तो घडलेला आहे आणि त्याचे ‘सार्थ रामायण’ शुंगलू समितीने आता लिहून प्रसिद्ध केलेले आहे. अर्थात असा राजकीय वा प्रशासकीय भ्रष्टाचार प्रथमच घडलेला नाही. यापुर्वीही अनेक पक्षांनी व नेत्यांनी आपापल्या पद्धतीने असेच भ्रष्टाचार केलेले आहेत. केजरीवाल त्यात पडलेली नवी भर आहे. असेही म्हणता येईल. पण विषय त्यापेक्षा वेगळा आहे. अन्य पक्ष भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीतून जन्माला आलेले नसतात आणि आपण सर्वात शुचिर्भूत असल्याचे प्रदर्शन मांडून लोकांना भुरळ घालणारे नसतात.

दिल्लीतल्या लोकांची विजबिले माफ़ व्हावीत वा कमी व्हावीत, म्हणून उपोषण करण्यापासून केजरीवाल यांनी कितीतरी नाटके केली. मग निवडणुकीत थोडेफ़ार यश मिळाल्यावर त्यांनी आपल्या त्यागी अवताराचे उथळ प्रदर्शन मांडले. मुख्यमंत्री म्हणून शपथविधीला येताना मेट्रोमधून सामान्य प्रवाश्यासारखे आलेले केजरीवाल, आता आपल्या सामान्य कार्यकर्त्याला व सहकार्‍यांनाही सरकारी खजिना लुटायचे मुक्त परवाने देऊन बसलेले आहेत. अर्थात हेच अन्य राजकीय पक्षांनी कमीअधिक प्रमाणात आजवर केलेले आहे. पण त्यांनी साधेपणाची त्यागाची नाटके रंगवली नव्हती. आपल्याला मंत्री म्हणुन बंगले नको, गाड्या नकोत, नोकरचाकर नकोत, अशी मानभावी भाषा करण्यापासून यांची सुरूवात झाली. आता मिळेल तिथून जनतेचा पैसा लुटण्यापर्यंत दोन वर्षात मजल गेली आहे. घटना, कायदा व प्रत्येक नियम धाब्यावर बसवून दिल्लीच्या जनतेच्या पैशाची नुसती राजरोस लूट करण्याचा कार्यक्रम चालू होता, असे़च शुंगलू समितीचा अहवाल सांगतो. महिला आयोगाच्या प्रमुखाला बंगला बहाल करण्यात आला, तर एका मंत्र्याच्या मुलीपाशी कसलीही पात्रता नसताना सल्लागार नेमून लाखो रुपयांचा मेहनताना देण्यात आला. अशा एकदोन नव्हेतर चारशे प्रकरणांची शवचिकित्सा शुंगलू समितीने केलेली आहे. यापुर्वीच्या कॉग्रेसी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांची कारकिर्द पंधरा वर्षांची होती. त्या प्रदिर्घ काळात त्यांच्यावर जे व जितके आरोप झाले नाहीत, तितक्या भानगडी केजरीवाल यांनी अवघ्या दिड वर्षात करून दाखवल्या आहेत. एका बाजूला प्रशासकीय निर्णयातला भ्रष्टाचार आहे, तर दुसरीकडे सरकारी अधिकार वापरून गोरगरीबांचे सर्वप्रकारचे शोषण करण्याचे विक्रमही या टोळीने करून दाखवले आहेत. म्हणूनच आता त्याचा जाब स्वयंसेवी संस्थांना विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण हे भूत दिल्लीच्या माथी त्याच संस्थांनी मारलेले आहे.

२०१० सालापर्यंत देशाला अरविंद केजरीवाल किंवा मनिष शिसोदिया अशी कोणी माणसे ठाऊक नव्हती. अकस्मात अशी माणसे माध्यमातून झळकू लागली, त्याला लोकपाल आंदोलन जबाबदार होते. ज्या मुठभर मान्यवरांनी ही दोन भुते किंवा मायावी राक्षस समाजाच्या माथी मारले; त्यांना सिव्हील सोसायटी किंवा स्वयंसेवी संस्था म्हणून देश ओळखतो. कुठल्याही बॅन्केत खाते काढायला गेल्यास ओळख विचारली जाते, ही ओळख देणार्‍यांना जामिन मानले जाते. त्यातला खातेदार फ़रारी झाला वा बेपत्ता झाला, तर ओळख देणार्‍यांना जबाबदार धरून खेचले जाते. लोकपाल आंदोलनाच्या निमीत्ताने अण्णा हजारे वा अन्य स्वयंसेवी संस्थांनी तयारी केलेली होती. त्यांच्या भरीला माध्यमातील अनेकांनी टिमकी वाजवत या भुतांची वरात काढलेली होती. म्हणूनच देशभरच्या लोकांची दिशाभूल झालेली आहे. दिल्लीकरांनी त्यांना नुसती मते दिली असतील. पण ती देण्यासाठी लोकांच्या मनाला भ्रुरळ घालण्यात कोणी पुढाकार घेतलेला होता? लोकपाल आंदोलनाची जी काही कोअर कमिटी होती, त्यात जे कोणी सहभागी होते, त्यांनीच हे पाप केलेले आहे. नंतर त्यापैकी अनेकांनी आपले केजरीवाल टोळीशी असलेले संबंध तोडून टाकलेले होते. पण तसे करताना हा इसम वा त्याची टोळी दरोडेखोर असल्याचे जगाला ओरडून सांगण्याची जबाबदारी त्यांचीच नव्हती काय? आता अन्य राजकीय पक्ष वा कोणीही केजरीवाल यांना जाब विचारणे, ही नित्याची बाब आहे. पण हे आपलेच पाप असल्याने त्याला जाब विचारण्यात खरेतर स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. पण तसा कोणीही पुढाकार घेताना दिसलेला नाही. सरकारला प्रत्येक बाबतीत जाब विचारण्यात पुढे असलेले हे तथाकथित साधूसंत; आज कुठे गायब झालेत? शुंगलू समितीचा अहवाल आल्यानंतर केजरीवालना जाब विचारण्यात सर्वात आधी त्याच महाभागांनी पुढे येणे अगत्याचे होते.

लोकपाल आंदोलन छेडणार्‍यांपैकी कोणालाही आज आपल्याच नावाचा मळवट भरलेल्या केजरीवालनी केलेली लूटमार दिसलेली नाही, की ती त्यांना लूटमार वाटत नाही? तसेही असू शकते. कारण स्वयंसेवी मुखवटे लावून मिरवणार्‍यांमध्ये एक हताश निराश राजकारणी दडलेला असतो. आपल्यापाशी बुद्धी व कौशल्य असूनही आपल्या बदमाशीला बाजारात किंमत नसल्याचे दु:ख गोंजारत बसलेलेच बहुधा अशा स्वयंसेवी मुखवट्यात आपला चेहरा लपवून संधीची वाट बघत असतात. लोकांच्या समस्या व गरीबीचे भांडवल वापरून आपला सेवेचा बाजार मांडलेल्यांनीच, केजरीवाल नावाचा मायावी राक्षस निर्माण केला होता. मात्र आता अंगलट आल्यावर त्यापैकी प्रत्येकजण आपापल्या बिळात दडी मारून बसला आहे. त्यातून एकटा केजरीवाल उघडा पडलेला नाही, तर त्याग व सेवेच्या शाली पांघरून समाजसेवेचे नाटक रंगवणार्‍या सर्वांचेच विद्रुप चेहरे समोर आलेले आहेत. आपल्याला संधी नाही, म्हणून हे प्रतिष्ठीत पांढरपेशी दरोडेखोर सेवाभावाचा अवतार धारण करतात. पण थोडीशी संधी मिळाली, तरी प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायला मागेपुढे बघत नाहीत. तीस्ता सेटलवाडने ते गुजरात दंगलीच्या प्रेतावर नंगानाच घालून सिद्ध केले; तर केजरीवाल टोळीने दिल्लीतली निवडणूक जिंकून दोन वर्षात आपल्या डाकुगिरीला प्रशासनाचा पेहराव चढवून दाखवला आहे. राजकीय लोक मतलबी असतातच आणि भ्रष्ट असतातच. पण त्यांच्यावर आरोप करणारे वा आपल्या शुद्ध चारित्र्याचे हवाले देणारे त्यापेक्षाही भयंकर मायावी दरोडेखोर असल्याचे साक्षीपुरावेच, शुंगलू समितीने समोर आणलेले आहेत. त्यासाठी केजरीवाल वा आम आदमी पक्षाच्या नावाने डंका पिटण्याची गरज नाही. त्यापेक्षा स्वयंसेवी संस्था म्हणून मिरवणार्‍या अशा शरीफ़ बदमाशांपासून यापुढे सावध रहाण्याची गरज आहे. खरा दरोडेखोर परवडला, इतके असे मायावी राक्षस अधिक दगाबाज असतात.

1 comment:

  1. भाऊ बरोबर आहे फेसबुक वर असे पुरोगामी कार्यकर्ते पत्रकार नेहमी रतीब घालत असतात.तेही दडून कोणी तिस्ताच्या गांधींवरील लेखाची लिंक देतो तर कोणी केजरीवाल च प्रगतीपुस्तक सादर करतो.आणि जरा कोणी चूक दाखविली की भक्त भणंग म्हणून हेटाळणी करतात

    ReplyDelete