कुठल्याही लोकसमुहाला तेव्हाच देश वा राष्ट्र संबोधले जाते, जेव्हा तिथला प्रत्येकजण आपल्या सामुहिक जबाबदारीसाठी कुवतीनुसार पुढे सरसावत असतो. सामुहिक अभिमान व स्वाभिमान, ही राष्ट्रीयत्वाची खरी ओळख असते. कुठलाही सैनिक भारतीय सीमेवर आपले प्राण पणाला लावून सुरक्षेसाठी उभा असतो, म्हणूनच देशातील कोट्यवधी नागरिक सुखाने व निश्चींत मनाने आपापल्या घरात राहू शकत असतात. पण अशा प्रत्येक सैनिकाची हिंमत त्याच्या मनगटात नसते, तर मनात असते. अवघा देश व त्यातले कोट्यवधी नागरिक आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आपण इथे उजाड निर्मनुष्य सीमेवर एकाकी नाही, अशी त्या सैनिकाची धारणाच त्याला मृत्यूशी झुंजण्याच शक्ती देत असते. तेवढेही नाही, नुसता देशाचा पासपोर्ट वा आधार कार्ड घेतल्याने कोणी नागरिक होत नाही. प्रसंग आला तर त्याच देशाच्या सुरक्षा वा हितासाठी लढायला पुढे सरसावतो, त्याला नागरिक म्हणतात. मग प्रसंग महापूराचा, भूकंपाचा असो किंवा प्रत्यक्ष परचक्र ओढवलेले असो. आपापल्या परीने जो लोकसमुह त्यात आपले योगदान द्यायला पुढे येतो, तेव्हाच त्याला देश मानले जाते. त्यात सामावलेल्या निष्ठा वा धारणांना राष्ट्रवाद म्हणतात. त्याच धारणांना जेव्हा तडा दिला जात असतो, तेव्हा त्याला देशद्रोह मानावे लागते. आज कुलभूषण जाधब नावाचा एक माजी सैनिक पाकिस्तानच्या तुरूंगात खितपत पडला आहे आणि त्याच्यावर खोटा खटला चालवून त्याला फ़ाशीची शिक्षा फ़र्मावण्यात आलेली आहे. अशावेळी त्याच्या सुटकेसाठी वा न्यायासाठी पुढे येण्यातून राष्ट्रवाद सिद्ध होणार असतो. पण अनेक शहाणे व दिवटे त्याच पाकिस्तानच्या वकीलातीने दिलेली मेजवानी झोडायला पोहोचले आणि त्यापैकी कोणाला आपल्या कर्तव्याचे भान राहिले नाही. अशा पार्श्वभूमीवर उज्जवल निकम यांनी घेतलेली भूमिका अभिमानास्पद आहे.
तिकडे कुलभूषणच्या गळ्यात पाकने फ़ास अडकवला आहे आणि इथे भारतीय राजधानीत पाकच्या वकिलांतीने मेजवानी आयोजित केली. तर तिला अनेक मान्यवर भारतीयांनी हजेरी लावली होती. त्यात मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी अशा लोकांनी हजेरी लावली होती. त्यापैकी कोणी कुलभूषणच्या न्यायाविषयी पाकिस्तानच्या अधिकार्यांना जाब विचारला नाही. काश्मिरात भारतीय सैनिक मारले जात आहेत आणि पाकच्याच इशार्यावर तिथे हिंसाचार माजवला जात आहे. त्याविषयी पाकला जाब विचारण्याची हिंमत नसलेले शहाणेही आपल्या देशात आहेत. तिथे पाकच्या वकील संघटनेने अपील झाल्यास कुलभूषणचे वकीलपत्र कोणी घेऊ नये, अशीही तंबी वकील संघटनेने दिलेली आहे. त्याचा जाब विचारायला यापैकी कोणी धजावलेला नाही. असे लोक पाकशी संवादाच्या गोष्टी बोलत असतात. कारण भारतात कायद्याचे राज्य आहे आणि नागरी स्वातंत्र्ये शाबुत आहेत. खरेतर काही लोकांच्या दिवाळखोरीसाठी अशी स्वातंत्र्ये आजकाल चैनीची गोष्ट झालेली आहेत. म्हणूनच त्यांना राष्ट्र वा राष्ट्रवाद ही हास्यास्पद गोष्ट वाटू लागली आहे. कुलभूषण सारखा माजी सैनिक मृत्यूच्या दारात उभा असल्याची त्यांना फ़िकीर नाही. कारण कोणी आजी वा माजी सैनिक उठून कसाबप्रमाणे यांना गोळ्या घालत नाही. ज्या दिवशी तशी वेळ येईल, तेव्हाच यांना नागरी स्वातंत्र्य व भारतीय लोकशाहीच्या महत्वाची जाणिव होऊ शकेल. जेव्हा पाकच्या माथेफ़िरू सैनिकांप्रमाणे इथलेही सैनिक अशा देशविघातक बोलण्यासाठी मुडदे पाडू लागतील, तेव्हाच अशा पाकमित्रांना भारतीय असण्याचे मोल लक्षात येऊ शकेल. कारण त्यांना भारत नावाच्या अभिमानाची लाज वाटू लागली आहे. सहाजिकच भारत या अभिमानासाठी लढण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. ते भारतीयच राहिलेले नाहीत. उज्ज्वल निकम यांनी त्याच भारतीयत्वाची व्याख्या कृतीतून केली आहे.
जेव्हा देशावर संकट ओढवते, तेव्हा अवघा समाज व सगळी लोकसंख्या एकदिलाने उभी रहाते, त्याला राष्ट्र म्हणतात. त्याला भारत म्हणतात. अशावेळी तामिळनाडूचा जवान काश्मिरात जाऊन आपल्या सीमेचे रक्षण करत असतो. किंवा मुंबई हत्याकांड करणार्या कसाबला रोखताना केरळचा उन्नीकृष्णन प्राण पणाला लावत असतो. ती धारणा म्हणजे राष्ट्रवाद असतो आणि अशी धारणा उराशी घेऊन सामुहिक जीवन जगणार्या लोकसंख्येला राष्ट्र म्हणतात. अशा समुदायातील लोक आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. पण जेव्हा संकटाची स्थिती येते, तेव्हा आपापल्या कुवतीनुसार रणांगणात उतरून संकटाशी दोन हात करतात. कधी ते सैनिक म्हणून हाती हत्यार घेऊन लढाई करतात, तर कधी न्यायाची वा उपचाराची लढाई करणारे वकील वा डॉक्टरही असू शकतात. उज्ज्वल निकम यांनी कुलभूषण जाधवसाठी पाकिस्तानात जाऊनही खटला लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचा अर्थ आपणही या देशाचे सैनिक आहोत, अशीच साक्ष त्यांनी दिलेली आहे. आपण हत्यार उचलू शकत नाही. पण रणभूमी कायद्याची असेल तर तिथे तोकडा पडणार्या भारतीय सैनिकासाठी आपण न्यायाचे सैनिक आहोत, अशीच ग्वाही निकम यांनी दिलेली आहे. कुठल्याही विचारवंत पाकप्रेमीला ही कृतीतून हाणलेली चपराकच आहे. कुलभूषण एकटा नाही आणि पाकिस्तानी तुरूंगात खितपत पडलेला असला, म्हणून त्याला भारतीयांनी वार्यावर सोडलेला नाही. सरकार आपल्या परीने त्याला सोडवण्यासाठी सर्व प्रयास करते आहे. तर प्रत्येक भारतीयाचेही कुलभूषण प्रति काही कर्तव्य आहे. मनामध्ये राष्ट्र ही संकल्पना पक्की असेल, तर आपापल्या कर्तव्याची व्याख्या कायदा वा नियमात असण्याची गरज नसते. निकम यांनी त्या कर्तव्याचे भान दाखवून दिले आहे. प्रसंग असेल व संधी मिळेल तर पकिस्तानात जाऊन कुलभूषणचा खटला लढायची तयारी त्यांनी दाखवली आहे.
बौद्धिक युक्तीवादाचे इमले उभे करून मिरवणार्या शेकडो शहाण्यांपेक्षा असा एक वकील भारतासाठी मोठा असतो. कारण त्याच्याच निष्ठा व कर्तव्य भावनेवर देश नावाची संकल्पना ठामपणे उभी असते. दिसायला उज्ज्वल निकम एकटे वाटतील. पण तशी धारणा घेऊन जगणारे कोट्यवधी लोक भारतात आहेत, म्हणूनच हा देश कित्येक शतके शेकडो आक्रमणे पचवून शाबुत राहिला आहे. कुठल्या आक्रमक फ़ौजाही त्याला संपवू शकलेल्या नाहीत. कुठल्या वैचारिक वा तात्विक हल्ल्याने हा देश जमिनदोस्त होऊ शकलेला नाही. म्हणूनच पाकिस्तानसारखे कपटी देश वा पाकप्रेमी भारतीयांसारखे जयचंद, या देशाला संपवू शकलेले नाहीत. कारण इथे उज्ज्वल निकम सारखे कर्तव्यदक्ष सुपुत्र कायम प्रत्येक पिढीत जन्म घेत असतात आणि या देशाची प्राणपणाने सुरक्षा करीत असतात. कोणी सीमेवर हत्यार घेऊन पहारा देतो, तर कोणी वैद्यकीय उपचारातून समाजाला निरोगी राखायला धडपडत असतो. कोणी विकासाच्या मार्गावर आपले कौशल्य पणाला लावत असतो, तर कोणी न्यायालयात आपल्या बुद्धीच्या कौशल्याने न्यायाची प्रतिष्ठापना करीत असतो. मग आपला कोणी नागरिक बंधू सीमापार का असेना? त्याला एकटा पडू देणार नाही, त्याच्यासाठी तिथे येऊनही कायद्याची लढाई लढण्याची निकम यांनी केलेली गर्जना, म्हणूनच अगत्याची आहे. पाक सरकार त्यांना तशी संधी कितपत देईल याची शंकाच आहे. पण मुद्दा तशी संधी मिळण्याचा नसून, कुलभूषण वा त्याच्यासारख्या कोट्य़वधी भारतीयांच्या हिंमतीचा आहे. त्यांच्या मनातल्या राष्ट्र नावाच्या संकल्पनेचा आहे. भारत कुणा बुद्धीचे अजीर्ण झालेल्या बुद्धीमंतांचा लाचार नाही, अशी ग्वाही देण्यासाठी पुढे येण्याची गरज होती आणि निकम यांनी, तीच उज्ज्वल भारतीय परंपरा मोठ्या खुबीने राखली आहे. वकील न्यायाचा सैनिक असल्याचे इतके सुंदर उदाहरण जगात क्वचितच आढळते.
ReplyDeleteभाऊराव,
लढवय्या आणि भडवय्या यांतला फरक अधिकाधिक स्पष्ट होऊ लागलाय. कुळभूषण जाधव प्रकरणी पुरोगाम्यांच्या तोंडाला बसलेला लकवा भयंकर धिक्कारार्ह आहे. पुरोगामी लोकं भारतीय नागरिकांच्या जिवावर उठलेली आहेत. त्यांचं जिणं हराम केलं पाहिजे. ही जबाबदारी केवळ सर्वसामान्य नागरिकांचीच आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
भाऊ,अॅड.उज्वल निकम यांचे आभार ते एकटे नाहीत ... भाऊ छानच लेख आहे कमितकमी माझ्या संपर्कातील ५०० जण वाचतील
ReplyDeleteग्रेट भाऊ
ReplyDelete