विविध राज्यातील दहा विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल गुरूवारी लागले आणि त्यात बहुतांश जागा भाजपाने जिंकल्या. त्याचा आनंदोत्सव साजरा होणे स्वाभाविक आहे. पण अवघा देश जिंकायला सिद्ध झालेल्या भाजपाने दिल्लीत केजरीवालचे नाक कापताना कर्नाटकातील अपयशाकडे पाठ फ़िरवून चालणार नाही. किंबहूना त्या पक्षाचा अश्वमेध कॉग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रोखून दाखवला, ही लक्षणिय बाब आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तिथे पुढल्या वर्षी विधानसभा निवडणूका व्हायच्या असून भाजपाने आतापासूनच ते राज्य जिंकण्याची रणनिती राबवलेली आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याकडे पक्षाची सुत्रे सोपवलेली असून त्यांनी विविध नेते व दिग्गजांना गोळा करण्याचा सपाटा लावला आहे. कालपरवाच माजी मुख्यमंत्री व परराष्ट्रमंत्री एस. एम कृष्णा यांना भाजपात आणल्याचा खुप गाजावाजा झालेला होता. त्यानंतरही कर्नाटकातील दोन्ही पोटनिवडणूकात कॉग्रेसने बाजी मारली असेल, तर पुढली विधानसभा भाजपाला वाटते तितकी सोपी लढाई नक्कीच राहिलेली नाही. असे सांगण्याचे कारण लोकसभेत भाजपाने मोठी मुसंडी मारून बहुतांश लोकसभा जागा जिंकलेल्या होत्या आणि आता देशभर मोदी लाट घोंगावत असताना दोन्ही जागी कॉग्रेस शाबुत राहिली आहे. याचा अर्थ येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागलेले असून, भाजपाला अतिशय मेहनत करावी लागेल. अर्थात पोटनिवडणुकीत भाजपाने स्थानिक नेत्यांवर काम सोपवलेले असल्याने हा पराभव गंभीर मानण्याचे कारण नाही. पण त्यातून ढिलेपणाची साक्ष मिळालेली आहे. नंतरही असाच ढिलेपणा राहिला, तर विधानसभेत सिद्धरामय्या कॉग्रेसला यश मिळवून देऊ शकतील. किंबहूना तेच कॉग्रेससाठी आशेचा किरण आहेत, कारण आता कॉग्रेसपाशी तेच एकमेव मोठे राज्य शिल्लक उरलेले आहे.
बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल कॉग्रेसने पोटनिवडणूक जिंकली वा झारखंडात मुक्ती मोर्चाने एक जागा जिंकली, ही गोष्ट वेगळी आहे. कर्नाटकचा कॉग्रेस विजय मात्र तितका नगण्य नाही. कॉग्रेससाठी हे राज्य महत्वाचे आहे, तसेच भाजपासाठीही महत्वाचे आहे. कारण दक्षिणेत भाजपाला पाय रोवून उभे करण्यासाठी कर्नाटकातले यश निर्णायक असू शकते. यापुर्वी भाजपाने अनेकांना सोबत घेऊन आपला विस्तार वाढवला होता आणि नंतरच्या काळात स्वबळावरही बहूमताने तिथे सत्ता मिळवलेली आहे. अशा स्थितीत कर्नाटकचे महत्व वेगळे आहे. देशाच्या विविध राज्यात भाजपा राष्ट्रीय प्रमुख पक्ष होत असताना, काही राज्यात त्याचा खरा विरोधक आजही कॉग्रेसच आहे. सहाजिकच जिथे अशी स्थिती आहे तिथे कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होणे शक्य आहे. गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचलप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरयाणा यांच्याप्रमाणे कर्नाटकातही विरोधात कॉग्रेसच मोठा पक्ष असून, अन्य कुठलाही प्रादेशिक पक्ष नाही. त्यामुळे कॉग्रेसला नव्याने पाय रोवून उभे रहायचे असेल, तर त्या़च राज्यात टिकून राहिले पाहिजे आणि त्याच बळावार राष्ट्रीय वा देशव्यापी राजकारणात पुनरागमन केले पाहिजे. त्या दृष्टीने कर्नाटक हे कॉग्रेससाठी महत्वाचे राज्य आहे. पण कॉग्रेसमुक्त भारताच्या संकल्पनेत कर्नाटकात कॉग्रेस सुदृढ झाली, तर अन्य राज्यातही तिला संजीवनी मिळू शकते. म्हणूनच दक्षिणेत कॉग्रेसला नामोहरम करण्याच्या दिशेने भाजपासाठी कर्नाटक हे महत्वाचे राज्य ठरते. सहाजिकच त्याच राज्यात सत्तेतल्या कॉग्रेसला पोटनिवडणूकीत मिळालेले यश, हा भाजपासाठी मोठा गंभीर इशारा ठरतो. केवळ दोन जागा असा विषय तिथे नसतो, तर संपुर्ण दक्षिण भारतामध्ये भाजपाला विस्तार करण्यासाठीची भूमीच कर्नाटक आहे. तिथे मोदी लाट ओसरली काय? की भाजपाच्या संघटनात्मक बेबनावाचा लाभ कॉग्रेसला झाला आहे?
कारण कुठलेही असो, कॉग्रेससाठी कर्नाटक हा मोठा दिलासा आहे. दिल्लीतही केजरीवाल यांच्या पक्षाचे डिपॉझीट खाऊन भाजपाने राजौरी गार्डनची जागा जिंकलेली असली, तरी इथे कॉग्रेसला मिळालेली मते आशादायक आहेत. दोन वर्षापुर्वी दिल्लीतून कॉग्रेसचे नामोनिशाण पुसले गेलेले होते. आम आदमी पक्षाच्या झंजावातासमोर भाजपालाही अपयश आले होते आणि मोदी लाटही फ़िकी पडली होती. दिल्लीत कोणी कॉग्रेसला खिजगणतीमध्ये पकडत नव्हते, अशा स्थितीत ताज्या निकालांनी त्या पक्षाला यश दिलेले नसले, तरी भरपूर मते दिली आहेत. ही मते कॉग्रेस दिल्लीतही पुनरागमन करीत असल्याचे लक्षण मानता येईल. आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने कॉग्रेसचा मतांचा पायाच खिळखिळा करून टाकला होता. तिथून कॉग्रेस माघारी येत असल्याचे चिन्ह मतदानाने दाखवले आहे. भले भाजपाने राजौरी गार्डनची जागा जिंकलेली आहे व तिथे आम आदमी पक्षाचे डिपॉझीट गेलेले आहे. पण कॉग्रेसने मतांमध्ये दुसरा क्रमांक मिळवताना आपला मतदार अजूनही शाबुत असल्याचे सिद्ध केले आहे. दिल्लीतील या निकलाशी कर्नाटकातील कॉग्रेसचे यश जोडले तर त्याही पक्षाला काही शिकता येईल. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग या नेत्याने पक्षाला मोठे यश मिळवून दिले आणि सत्तेवर नेऊन बसवले. सिद्धरामय्या सुद्धा कर्नाटकातील निर्विवाद कॉग्रेस नेता आहेत आणि त्यांच्या कामात श्रेष्ठी फ़ारशी काही ढवळाढवळ करताना दिसलेले नाहीत. आताही पोटनिवडणूक त्यांनी आपल्या बळावर लढवली होती आणि दणदणित यश मिळवलेले आहे. दक्षिणेत घुसू बघणारा भाजपाचा अश्वमेध आपणच रोखू शकतो, असेच या मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षश्रेष्ठींना दाखवले आहे. मुद्दा इतकाच, की पुढल्या विधानसभेत वा कर्नाटकच्या राजकीय घडामोडीत राहुल वा सोनिया त्याला तितकी मोकळीक देणार काय?
भाजपाला खरेच दक्षिण दिग्विजय साजरा करायचा असेल, तर त्याला अन्य राज्यातील पोटनिवडणूका जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करीत बसून चालणार नाही. तर कर्नाटकात कॉग्रेस मुख्यमंत्र्याने मिळवलेल्या यशाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. कारण मध्यंतरी सिद्धरामय्यांच्या विविध भ्रष्ट कारभाराच्या कहाण्या माध्यमात गाजल्या होत्या. अगदी त्यांनी सोनियांना व राहुल इत्यादींना किती कोटी रुपये दिले, त्याचे पुरावेही झळकले होते. भाजपाचे येदीयुरप्पा यांनीही त्याचे खुप भांडवल केले होते. इतके असूनही दोन्ही जागी कॉग्रेस जिंकली आहे. त्याचे कारण कॉग्रेस सुसंघटित झाली की सिद्धरामय्यांची लोकप्रियता वाढली आहे? की भाजपामध्ये अंतर्गत विवाद व बेबनावाचा लाभ कॉग्रेसने घेतला आहे? मध्यंतरी येदीयुरप्पा व अन्य कानडी ज्येष्ठ भाजपाच्या नेत्यांमध्ये वादावादी खुप झालेली होती. अगदी माध्यमात येऊनही आरोप प्रत्यारोप झालेले होते. पक्षातले झगडे व मतभेद चव्हाट्यावर येऊन खेळले जातात, त्याचा लोकमतावर विपरीत परिणाम होत असतो. ताज्या निकालात त्याचे प्रतिबिंब पडले आहे किंवा कसे; त्याचाही शोध भाजपाला घ्यावा लागणार आहे. म्हणूनच कुठे जिंकलो, त्यापेक्षा कुठे कशामुळे हरलो, त्याचे आत्मपरिक्षण गरजेचे असते. भाजपात तसे आत्मपरिक्षण होत असल्याची नेहमी चर्चा होते. इथे ही बाब म्हणूनच गंभीर आहे. कारण बंगालप्रमाणे इथे भाजपा नव्याने हातपाय पसरत नसून, एकदा त्याने स्वबळावर सत्ता मिळवलेली आहे आणि नंतर आपल्याच आंतर्गत वादविवादातून सत्ता गमावलीही आहे. तसेच पुन्हा सुरू झाले आहे काय, त्याचाही शोध पक्षाध्यक्ष अमित शहांना घ्यावा लागणार आहे. बाकीच्या जागी भाजपाने मिळवलेल्या यशापेक्षाही म्हणूनच कर्नाटकातील अपयश अधिक गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तसेच कॉग्रेसनेही प्रादेशिक नेत्यांना मोकळीक दिल्यास यश मिळते याची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे.
भाऊ नमस्कार, कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलर हा जरी नावाचा राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याचे प्रादेशिक पातळीवरील स्थान नक्कीच शिल्लक आहे आपल्या कर्नाटकमध्ये प्रादेशिक पक्ष शिल्लक नाही हे मत थोडेसे सत्यापासून दूर आहे.
ReplyDeleteआजच्या कर्नाटक राज्यामध्ये आपण राजकीय व सामाजिक दृष्ट्या तीन भाग पाडू शकतो त्यातील पहिला जुने म्हैसूर संस्थान या भागामध्ये अजूनही जनता दल सेक्युलर ची मजबूत पकड आहे. काही वर्षांपूर्वी हाच इथला सर्वात मजबूत पक्ष होता पण (विद्यमान मुख्यमंत्री पूर्वाश्रमीचे जनता दलाचे प्रमुख नेते ) बाहेर पडल्यापासून यांचेबळ कमी झाले आहे. यांचा प्रमुख जनाधार वक्कलिगा हा समाज आहे.
दुसरा भाग म्हणजे जुन्या हैद्राबाद संस्थानाचा भाग यामध्ये काँग्रेस अजूनही प्रबळ आहे. यामध्ये ओबिसि व मुसलमान समाजाचे वर्चस्व आहे.
तिसरा भाग म्हणजे जुन्या मुंबई प्रांताचा हिस्सा यामध्ये लिंगायत समाज प्रधान असून हा बीजेपी चा पारंपरिक मतदार आहे.