Monday, April 10, 2017

सदा मरे, त्याला कोण रडे?



जसजशी दिल्लीतील महापालिकांची निवडणूक जवळ येते आहे, तसतसे आम आदमी पक्षासह अरविंद केजरीवाल यांचे एकाहून एक प्रताप समोर येत आहेत. अर्थातच राजकारणात एकप्रकारची लढाईच चाललेली असते. त्यात प्रतिस्पर्धी वा शत्रूला नेमक्या कोंडीत पकडूनच हल्ला केला जात असतो. सहाजिकच भाजपा किंवा कॉग्रेसने आम आदमी पक्षाच्या भानगडी ऐन मतदानाच्या मुहूर्तावर जाहिर करण्याचा सपाटा लावला असेल, तर गैरलागू म्हणता येणार नाही. दिल्लीत विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकीत केजरीवाल यांनी मोठे यश मिळवल्यानंतर दोन वर्ष उलटून गेली आहेत. दरम्यान त्यांचे केंद्र सरकार व नायब राज्यपालांशी सतत वादविवाद होत राहिले. दिल्लीत पुर्वीच्या चार किंवा देशातल्या अन्य कुठल्याही मुख्यमंत्र्याचे आजवर असे राज्यपालाशी सतत भांडण होऊ शकलेले नाही. आजही अन्य कुठला मुख्यमंत्री सतत राज्यपालांना शिव्याशाप देताना दिसलेला नाही. राज्यपाल आपल्याला काम करू देत नाही, ही तक्रार करण्यापलिकडे केजरीवालनी गेल्या दोन वर्षात नेमके कोणते लोकोपयोगी काम केले; त्याचे संशोधनच करावे लागेल. अशा स्थितीत या माणसाने व त्याच्या पक्षाचे प्रत्येक प्रस्थापित कायद्याला आव्हान देणे वा कायदा झुगारून निर्णय घेण्याचेच काम केले. सहाजिकच दिल्ली सरकारच्या प्रत्येक कारभारात गोंधळ निर्माण होत राहिला. त्याची पर्वा न करता केजरीवाल आपले निर्णय घेत गेले व त्याचा अंमल करीत गेले. त्यातून अनेक बेकायदा गोष्टी घडत गेल्या आणि आता त्याचाच पाढा जाहिररित्या वाचला जात आहे. केजरीवालना आपले अधिकार ठाऊक आहेत. पण इतराचे अधिकार मात्र त्यांना मान्य नाहीत. आपल्याला लोकांनी मते दिली, म्हणजे निरंकुश मनमानी करण्याचे अधिकार दिले, अशी काहीशी समजूत त्यांनी करून घेतली आहे. तीच आता त्यांच्यासाठी समस्या बनलेली आहे.

सरकार म्हणून जे अधिकार मिळतात, त्यात कायदा व घटनेसह विविध नियमांच्या मर्यादेत राहून काम करता येते. निर्णय घेता येतात. पण केजरीवालना कुठल्याही मर्यादा मान्य नाहीत. सहाजिकच त्यांनी एक संसदीय सचिव नेमण्याचा अधिकार असताना, तब्बल २१ संसदीय सचिवांची नेमणूक करून त्यांना अधिकार बहाल केले. त्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलेले आहेत. आपल्या पक्षाला त्यांनी एक मोठे घर कार्यालय म्हणून देऊन टाकले. असा कुठलाही अधिकार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या हाती नव्हता, किंवा त्यांच्या सरकारलाही नव्हता. पण दडपशाही करून त्यांनी ह्या कारवाया केल्या. आपल्या सरकारचे काम म्हणून त्यांनी दिल्लीबाहेर अनेक राज्यात वाहिन्या व वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती केल्या. त्याचा जनहिताशी कुठलाही संबंध नव्हता. बारा हजार रुपये प्रतिथाळी या दरात त्यांनी सहकार्‍यांना खाऊपिऊ घातले आणि त्याचे बिल सरकारच्या माथी मारले. आपल्या पक्ष कार्यकर्ते व सहकार्‍यांना सरकारी खजिना लुटण्याची मोकळीकच त्यांनी देऊन टाकली होती. त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षाला बंगला दिला, तर इतरांना असेच काहीबाही देऊन टाकले. आपल्यावर झालेल्या खाजगी खटल्यासाठी जेठमलानी यांच्यासारखा मोठा महागडा वकील करून, त्याचा मोबदलाही सरकारच्या माथी मारला. यापैकी कुठलीही गोष्ट कायद्यात बसणारी नसल्याने कोर्टाला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि तिथेही कोर्टाने नायब राज्यपालच निर्णायक अधिकारी असल्याची ग्वाही दिली. तरीही केजरीवालांचे नाटक चालू राहिलेले आहे. मात्र आपल्या नाटकातून हा माणूस बाहेर पडायला राजी नाही. आपल्यावर अन्याय होतो असा ओरडा केल्यावर रस्त्यावरचे चार लोक तुमच्या मदतीला धावून येत असतात. पण उठताबसता तुम्ही तेच टुमणे लावून बसलात, मग कोणीही तुमच्याकडे ढुंकून बघत नाही.

केजरीवाल व आम आदमी पक्षाची आता काहीशी तशीच अवस्था झालेली आहे. चार वर्षे त्यांचे रडगाणे ऐकून दिल्लीकर व जनताही कंटाळलेली आहे. सहाजिकच त्यांचे कौतुक असलेल्या बहुतेक पत्रकारांनाही आता अडचणीचे प्रश्न विचारणे भाग झालेले आहे. त्यामुळेच केजरीवाल आता पत्रकारांवरही घसरले आहेत. आपल्या विरोधात कोणी बोलला वा प्रश्न विचारले, की त्यालाही शत्रू ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या प्रत्येक बेकायदा वा नियमबाह्य कृतीला गरीबासाठी केलेले काम ठरवित, पळवाट शोधली आहे. त्यांनी पक्षाला जागा हवी म्हणून दिल्ली सरकारचा जो बंगला बळकावला. तो रिकामा करण्याचा फ़तवा नायब राज्यपालांनी काढल्यावर केजरीवाल यांनी नवा कांगावा सुरू केला आहे. ही सुडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप करीत, त्यांनी रस्त्यावरून पक्षाचे कामकाज चालवण्याच्या गमजा केल्या आहेत. रस्त्यावरून काम करण्याचा अर्थ तरी या इसमाला कळतो काय? आपल्या सरकार स्थापनेला दोन वर्षे पुर्ण झाली म्हणून जो इसम बारा हजार रुपये थाळी अशा दराने जेवणावळी घालतो. त्याता रस्त्यावर लोक कसे जगतात वा रस्त्यावरचे जीवन कसे आहे, त्याची कल्पना तरी असू शकते काय? रस्त्यावरून काम करण्याची कुवत असती, तर केजरीवाल किंवा त्यांच्या टोळीला सरकारी खर्चाने जेवणावळी उठवाव्या लागल्या नसत्या. किंवा सरकारी बंगला बळकावण्याची वेळच आली नसती. सत्तेत येऊन वा राजकारणात येऊन मिळेल तिथून जनतेचा पैसा व संपत्ती बळकावणारे रस्त्यावरून कार्य करू शकत नाहीत, किंवा गरीबासाठी काम करू शकत नाहीत. त्यांना गरीब म्हणजे काय तेही ठाऊक नसते. तसे असते तर जेवणावळींवर लाखो किंवा जाहिरातीवर करोडो रुपये खर्चण्यापेक्षा केजरीवाल यांनी गेल्या दोन वर्षात दिल्लीत साफ़सफ़ाई राखण्यावर पैसे खर्च केले असते.

केजरीवाल यांची एक मोडस ऑपरेन्डी आहे. गुन्हेगारांच्या ठराविक कार्यशैलीला मोडस ऑपरेन्डी असा शब्द आहे. त्यांच्या वर्तनात किंवा कृतीमध्ये एकप्रकारचे तर्कशास्त्र सामावलेले असते. कांगावा ही केजरीवाल यांची कार्यशैली आहे. इतर प्रत्येकावर आरोप करताना केजरीवाल टोळी, कायदे व नियमांचा आधार घेऊन आरोप करीत असते. सोनियांचा जावई रॉबर्ट वाड्रा याने कुठे जमिनी घेतल्या वा विकल्या, तर त्यात त्याने कुठले कायदे वा नियम मोडले म्हणून केजरीवाल भ्रष्टाचाराचे आरोप करणार. पण तसेच नियम धाब्यावर बसवून केजरीवाल वा त्यांच्या टोळीतला कोणी वागला, मग इतरांचे हवाले देऊन आपण काय वेगळे वागलो, असा त्यांचा बचाव असतो. ज्याप्रकारे पक्षाला सरकारी बंगला देण्याचा उद्योग केजरीवाल यांनी नियम झुगारून केला वा पळवाटा काढल्या, त्यापेक्षा वाड्राने कोणते वेगळे पाप केलेले होते? पण वाड्राने केले तर पाप असते. कारण तो केजरीवालचा सहकारी नाही किंवा आम आदमी पक्षाचा सदस्य नसतो. राज्यपालांनी शुंगलू चौकशी समिती नेमली तर ती कायद्याच्या कसोटीवर असली पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. पण स्वत: मात्र प्रत्येक नियम व कायदा झुगारण्यात त्यांना पुरूषार्थ वाटतो. हा शुद्ध कांगावा आहे. मग आपल्यावर अन्याय झाल्याचा किंवा सूडबुद्धी वापरल्याचा प्रत्यारोप करायला केजरीवाल सज्ज असतात. ही आता चार वर्षात नेहमीची बाब झाली आहे. पोराचे पाय पाळण्यात दिसतात, तशीच यांचीही कथा आहे. सरकारी सनदी सेवेत असताना परदेशी उच्चशिक्षणासाठी गेल्यावर ठराविक वर्षे सेवेत असण्याचे बंधन असते. तेच यांनी झुगारले होते आणि त्यासाठी द्यायची भरपाई बुडवली होती. मग अण्णांच्या आंदोलनात उतरल्यावर ते प्रकरण उघडकीस आल्यावर भरपाईची रक्कम पंतप्रधानांच्या नावे चेकने पाठवण्याचा खेळ केजरीवालनी केला होता. हे नेहमीचे झाले आहे. राजकारणात येण्यापुर्वीच त्यांनी आपली लक्षणे दाखवली होती ना?

2 comments:

  1. Great article bhau, however you should also translate it in hindi/ English, so that you could reach out to wider audience and expose the types of Kejriwal and co.

    ReplyDelete
  2. रोज मरे त्याला कोण रडे अशी म्हण आहे अर्थ तोच असला तरी सदाऐवजी रोज अधिक सजून दिसते .म्हणून पहा

    ReplyDelete