Friday, April 14, 2017

बहिणीची वेडी रे ‘माया’

mayawati cartoon के लिए चित्र परिणाम

१९८९ सालात देशात मोठे सत्तांतर झालेले होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा सार्वत्रिक निवडणूकीत पराभव झाला होता आणि विश्वनाथ प्रताप सिंहांच्या नेतृत्वाखालील जनता दलाला स्पष्ट बहूमतही मिळालेले नव्हते. मग एका बाजूला भाजपा व दुसर्‍या बाजूला मार्क्सवादी डाव्या आघाडीचा पाठींबा घेऊन, सिंग यांनी सत्ता स्थापन केली होती. त्यात हरयाणाचे बुजूर्ग नेते देवीलाल यांना उपपंतप्रधान करण्यात आलेले होते. पण तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना हरयाणाची सत्ता सोडायची नव्हती. म्हणून त्यांनी राज्यपालांना दिल्लीतच बोलावून आपल्या जागी लाडका पुत्र ओमप्रकाश चौताला यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घेतला होता. राज्याबाहेर मुख्यमंत्रीपदाचा झालेला तो बहूधा पहिला व एकमेव शपथविधी असावा. त्यावरून खुप वाद झाले होते आणि पुत्राची निवड करण्यामागे चौधरी देवीलाल यांनी दिलेले स्पष्टीकरण नव्या राजकीय भूमिकांचा पाया घालणारे होते. अशारितीने पुत्राला मुख्यामंत्रीपदी बसवण्याचे कारण सांगताना देवीलाल उत्तरले; माझ्या जागी कुणीतरी विश्वासातला माणूस नेमायचा होता. घरकुटुंबातल्या व्यक्तीपेक्षा अधिक विश्वासातला निकटवर्ति कोण असू शकतो? नंतरच्या काळात तीच राजकारणात पद्धत होऊन गेली. प्रत्येक नामवंत नेता आपल्या कुटुंबातील कोणाला तरी आपला वारस नेमू लागला, किंवा राजकीय पक्षाचे नेतॄत्व संघटनेऐवजी नेत्याच्या कुटुंबातून जन्माला येऊ लागले. जिल्हा राज्यापासून राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक पक्षाला व ख्यातनाम नेत्यांना त्याची बाधा होत गेली. मग त्याच मार्गाने जाणार्‍या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा, मायावतींना तरी दोष कसा देता येईल? त्यांनाही आता दोन दशकांनी निवृत्तीचे वेध लागलेले असावेत. त्यांनी आपल्या भावाकडे पक्षाची सुत्रे सोपवणार असल्याचा संकेत दिला आहे. भावाची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

१९८० साली बहूजन समाज पक्ष उदयास आला, तेव्हा त्याची दखल कोणी घेतलेली नव्हती. कांशिराम यांनी सरकारी व सार्वजनिक सेवेत काम करणार्‍या दलित मागास कर्मचार्‍यांच्या संघटनेतून राजकीय जाणिवा निर्माण केल्या व पुढे त्याच संघटनेच्या बळावर राजकारणात विस्तार केला. त्यातून दलितांचा अ्शा बहुजन समाज पक्षाची त्यांनी स्थापना केलेली होती. तरीही १९९६ पर्यंत मायावतींचे नाव राजकारणात फ़ारसे पुढे आलेले नव्हते. १९९३ सालात बसपाने उत्तरप्रदेशात मोठी मजल मारली आणि त्यात मायावती स्थानिक नेत्या म्हणून चर्चेत आल्या. पुढल्या काळात त्यांचे नाव कांशिराम यांच्यासोबत घेतले जाऊ लागले आणि त्या राष्ट्रीय राजकारणातही गाजू लागल्या. तेव्हा नवखा असलेल्या बसपाचे नेतृत्व याच दोघांनी केलेले होते. १९९६ सालात उत्तरप्रदेशात बिगर भाजपा पक्षांनी सत्ता बळकावली, तेव्हा मुलायमनी बसपाशी युती करून मोठे यश मिळवले होते. त्यांची सत्ता डळमळीत करण्यासाठी भाजपाने जुगार खेळला आणि ५० च्या आसपास आमदार असलेल्या बसपाला बाहेरून पाठींबा देत सरकार बनवण्याची ऑफ़र दिली. हेतू मुलयमना सत्ताभ्रष्ट करण्याचा होता आणि तो सफ़ल झाला. मायावती भाजपाच्या पाठींब्यावर प्रथम मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांचे नाव गाजू लागले. पुढल्या काळात कांशिराम यांची प्रकृती ढासळत गेली आणि त्यांनी पक्षाध्यक्षपद मायावतींकडे सोपवले. त्यानंतर त्या पक्षाच्या सर्वेसर्वा होऊन बसल्या. कांशिराम बेशुद्धीत गेले व त्यांचा देहांत झाल्यावर मायावतींची पक्षावरील हुकूमत निरंकुश झाली. त्यांनी पक्षाच्या अनेक भूमिकांना तिलांजली देत विविध समाजघटकांना सोबत घेतले व २००७ सालात स्वबळावर बहूमतही प्राप्त करून दाखवले. विधानसभेसह लोकसभेतही त्यांनी चांगले यश मिळवले. पर्यायाने मायावती म्हणजेच बसपा अशी स्थिती येऊन गेली.

२०१२ सालात त्यांचे बहूमत गेले व सत्ताही गेल्यावर पक्षात हळुहळू विरोधी सु्र उमटू लागले होते. मायावतींचा भ्रष्टाचारही बाहेर येऊ लागला होता आणि पक्षातही वाद सुरू झालेले होते. उमेदवारी देण्यातून मायावती पैसे उकळतात, याचीही चर्चा खुप झाली आणि त्यातच त्यांच्या कौटुंबिक गोष्टी जगासमोर येत गेल्या. मायावती सत्तेत असताना त्यांच्या भावाची संपत्ती अनेकपटीने वाढत गेली. कालपरवा नोटाबंदीच्या कालखंडात याच भावाने कोट्यवधी रुपयांची रोकड जुन्या चलनामध्ये बॅन्केच्या खात्यात जमा केल्याचेही लोकांनी बघितले होते. मायावतींच्या राजकारणाचा आलेख चढत असताना, त्यांच्या भावाचा व्यावसायिक व आर्थिक आलेखही कमालीचा उंचावत गेला होता. हजारो कोटी रुपयांची माया या भावाने केल्याचेही आरोप सतत होत राहिले. पण त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचा खुलासा करण्याच्या पलिकडे काही उत्तरे दिली गेली नाहीत. नोटाबंदीच्या काळात खात्यात जमा केलेले कोट्यवधी रुपये वा डझनावारी निनावी कंपन्यातली गुंतवणूक याविषयी विचारले असता, हा केवळ मायावतींचा भाऊ आहे म्हणुन गाजावाजा केला जातो असे सांगितले गेले. तो राजकारणात नाही. पण त्याचा आडोसा घेऊन बहन मायावतींना बदनाम केले जाते, असाही प्रत्यारोप झालेला आहे. असा हा दिग्गज बहिणीचा लाडका भाऊ आता अकस्मात बहूजन समाज पक्षाचा दोन क्रमांकाचा नेता झालेला आहे. त्यासाठीची त्याची पात्रता काय, असाही सवाल असू शकतो. तर त्याचे उत्तर मायावतींचा भाऊ यापेक्षा अन्य काही असू शकत नाही. कदाचित आपली संपत्ती भावाच्या खात्यात जमवलेली असल्यानेही मायावती त्याला जवळ ठेवू इच्छित असतील. जी प्रकरणे त्याच्या नावाने बाहेर येत आहेत, त्याला संरक्षण देण्यासाठी राजकीय कवचकुंडले अंगावर घातली असावीत. उद्या या भावाला आयकर वा सीबीआयने गोत्यात घातले, तर राजकीय सुडबुद्धीचा आरोप करण्याची ही तयारीही असू शकते.

कुठल्याही राजकीय चळवळ वा संघटनेच र्‍हास असाच सुरू होत असतो. चळवळ वा आंदोलन हे लोकहितासाठी सुरू होत असते आणि त्यात लोकांना समाविष्ट करून घेण्यासाठी काही विचार व भूमिका पुढे केलेल्या असतात. पण जेव्हा त्या संघटनेला वा चळवळीला लोकांचे पाठबळ मिळते, तेव्हा हळुहळू तिच्यावर कब्जा करण्याला प्राधान्य मिळू लागते. ही संघटना वा त्यापुर्वीची चळवळ ही एकप्रकारची मलमत्ता बनु लागते. तेच काही दशकानंतर कॉग्रेस पक्षात झाले आणि कमीअधिक प्रमाणात अन्य लहानसहान पक्षात झाले. असे बहुतांश पक्ष लयास गेलेले आहेत आणि काही पक्ष त्या वाटेवर आहेत. मुलायम व लालूंच्या पक्षाची कहाणी आपल्यासमोर आहेच. मुलायमना तर मुलानेच डबघाईला आणले आणि घरातली भांडणेच पक्षाच्या गळ्यातला फ़ास बनली. अशा स्थितीत मायावतींनी तीच समस्या आपल्या पक्षात आणली असेल, तर कांशिराम यांनी ज्या हेतूने पक्ष स्थापन केला होता, त्याचाच पराभव त्यांच्या वारसाने करून टाकला आहे. त्यालाही पर्याय नसतो. नुसते विचारांचे बुडबुडे उडवून कुठली चळवळ जीव धरू शकली, तरी टिकून रहाणे अवघड असते. जेव्हा त्यात नेतृत्व करणार्‍यांचे व्यक्तीगत वा कौटुंबिक हितसंबंध, चळवळ वा संघटनेत निर्माण होतात, तेव्हा ती एक मालमत्ता बनून जाते. सहाजिकच मालमत्तेची भांडणे व्हावीत तसेच वादावादी व हेवेदावेही इथे सुरू होतात. त्याला राजकीय विचार तत्वांचा मुलामा देऊन लोकांची दिशाभूल करण्याचे नाटकही काहीकाळ सवलत देते. पण फ़ारकाळ ते नाटक चालत नाही. त्यांचा र्‍हास अपरिहार्य असतो. कारण त्या संघटनेत वा पक्षात मग कार्यकर्ते वा गुणवान माणसांना स्थान शिल्लक रहात नाही. तोंडपुजे भाट गोळा झालेले असतात. त्यांचेच हितसंबंध साध्य करण्यासाठी पक्षाचा राजरोस वापर होते. पण काय करणार? ‘वेड्या बहिणीची वेडी रे माया’ म्हणतात ते उगाच नाही.

No comments:

Post a Comment