Tuesday, April 18, 2017

शर्यत आणि स्पर्धक



त्याला आता चार वर्षे उलटून गेली आहेत. नरेंद्र मोदी तेव्हा लोकसभेच्या मोहिमेत उतरले होते. लोकसभा निवडणूकीची घोषणाही झालेली नव्हती आणि त्यांनी सर्वात मोठ्या अशा उत्तरप्रदेश वा बिहार, महाराष्ट्र अशा राज्यात मोठमोठ्या जाहिरसभा घेण्यास आरंभ केला होता. नंतर पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यावेळी देशातले मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शरद पवार यांनी एक गंभीर विधान केलेले होते. आपण जितके राजकारणी आहोत तितकेच क्रिडाक्षेत्रातही काम केलेले आहे, असा हवाला देऊन पवारांनी मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयास केला होता. इतरांविषयी सभ्य शब्दात उपरोधिक बोलण्यासाठी पवार ख्यातकिर्त आहेत. ते म्हणाले होते, मॅराथॉन शर्यतीमध्ये ज्याला जिंकायचे असते, तो आरंभापासून धावायला सुरूवात करत नाही. तो आपली उर्जा राखून ठेवतो आणि हळुहळू आरंभ करून  अखेरच्या पल्ल्यात वेगाने दौडतो. त्यांनी सांगितलेली गोष्ट अजिबात गैरलागू नव्हती. पण त्यांनी डोळसपणे मोदींच्या दौडीकडे बघितलेलेच नव्हते. त्यांनी अतिशय संथपणे धावण्याचा पवित्रा घेतला होता. देशाच्या कानाकोपर्‍यात एक एक मोठी सभा घेत आपल्याला मिळणार्‍या प्रतिसादाचा अंदाज घेत मोदी पा्वले टाकत होते. याचे कारण पल्ला खुप दूरचा होता आणि धावपटूच्या शरीराला एक गतिमानता येण्यासाठी काही दौड मारावी लागत असते. त्याचा तो आरंभ होता. आयोगाने मतदानाचे वेळापत्रक जाहिर केल्यावर तितकीस सवड मिळत नाही, म्हणूनच आधीपासून आरंभ करण्याची गरज असते. आजकाल गावगन्ना कुठेही मॅराथॉन भरवल्या जातात. त्यात कुणीही स्पोर्टचे कपडे घालून दौडतो. पण पहिल्या दोनतीन मैलातच गळून पडतो. त्यांना बघून पवारांनी ते विधान केले असावे. अन्यथा मोदी आज पतप्रधान दिसले नसते. तेच मोदी आज दोन वर्षांनंतरच्या शर्यतीच्या सरावाला लागलेले आहेत.

उत्तरप्रदेशच्या निकालानंतर विरोधातल्या अनेक पक्षांना मोदी विरोधात एकजुट करण्याचा साक्षात्कार झालेला आहे. पण त्यासाठी त्यांनी एकही पाऊल टाकलेले नसताना मोदी मात्र असे विरोधक एकत्र येणार हे गृहीत धरून कामाला लागलेले आहेत. त्यातला पहिला टप्पा राष्ट्रपतीपदाचा असून, नंतरचा टप्पा राज्यसभेत रिकाम्या होणार्‍या ६० जागांचा आहे. मध्यंतरी विविध विधानसभांचे लहानसहान टप्पे यायचे आहेत. त्यानंतर सतराव्या लोकसभेचे वेध लागतील. अशा स्पर्धकाशी शर्यत करायची म्हटले तर किती सावधपणे कामाला लागले पाहिजे, हे कदाचित पवारांना कळत असेल. पण ज्यांच्यावर विसंबून पवार एकजुटीची भाषा बोलत आहेत, त्यांना त्याचा अंदाजही आलेला नाही. २०१४ मध्ये मोदी लाट होती आणि नवेपणाचा लाभ मोदींना मिळालेला होता. पाच वर्षानंतर त्याच राज्यात तितक्याच मोठ्या प्रमाणात सर्व जागा नक्की मिळतील, अशी खात्री मोदींनीही बाळगलेली नाही. म्हणूनच त्यांनी आतापासून हक्काच्या जागा जितक्या घटतील, त्या भरून काढण्यासाठी नवनव्या प्रांतात मुलूखगिरी आरंभलेली आहे. त्यात ओडिशा, बंगालसह दक्षिणेतील एकदोन राज्यांचा समावेश आहे. कदाचित महाराष्ट्रात शिवसेनेशी जुळवून घेणे जमले नाही, तर काही जागा गमवाव्या लागणार आहेत. तसेच गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थानात सर्वच जागा भाजपाला मिळाल्या होत्या, त्यातही थोडीफ़ार घट संभवते. ती भरून काढण्यासाठी ओडिशा, बंगाल वा तेलांगणासारख्या राज्यात मुसंडी मारणे आवश्यक आहे. याचे गणित मोदींनी आधीच मांडलेले आहे आणि त्यानुसार कामही सुरू केलेले आहे. पण त्यांना रोखण्याच्या गर्जना करणार्‍यांना मात्र अजून कंबर कसण्याचीही इच्छा झालेली दिसत नाही. ओडिशाचे स्थानिक निकाल व बंगालच्या पोटनिवडणूकीचा संदेशही कोणाला खडबडून जागे करू शकलेला नाही.

बंगालमध्ये २०१६ साली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. त्यात ममतांनी बाजी मारली असली, तरी कॉग्रेसला सोबत घेऊनही डाव्या आघाडीला आपली घसरगुंडी थांबवता आलेली नव्हती. मात्र अशा लढतीमध्ये भाजपाने आपल्या बळावर मिळवलेले यश लक्षणिय होते. कारण पन्नास वर्षात भाजपाला बंगाल प्रांतामध्ये एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. आज त्या विधानसभेत स्वबळावर भाजपाने मुठभर आमदार निवडून आणलेले आहेत आणि त्यांनी बारातेरा टक्के इतकी मते मिळवलेली होती. त्यापैकीच एक असलेल्या कंठी नामक मतदारसंघात कालपरवा झालेल्या पोटनिवडणूकीत पुन्हा ममतांच्या तृणमूल कॉग्रेसचाच उमेदवार निवडून आला. पण त्याच्या विरोधातल्या मतांची विभागणी थक्क करून सोडणारी आहे. तिथे सव्वा वर्षापुर्वी दुसर्‍या क्रमांकाची मते कम्युनिस्ट पक्षाने मिळवली होती आणि भाजपा तिसर्‍या क्रमांकावर होता. भाजपाने तेव्हा अवघी ९ टक्के मते मिळवली होती तर कम्युनिस्ट पक्षाला ३४ टक्के मते मिळाली होती. आज कम्युनिस्ट १० टक्के इतके खाली आले असून, भाजपाने ३१ टक्के इतकी मोठी मजल मारली आहे. थोडक्यात बंगालमध्ये कम्युनिस्ट वा डाव्यांचा मतदार चक्क भाजपाकडे झुकत चालला आहे. म्हणजेच २०१४ पर्यंत जो डाव्यांचा बालेकिल्ला वा ममताची गढी होती. तिथे आता भाजपाने पाय रोवले असून, ममताला पर्याय म्हणून तिथला मतदार भाजपाकडे बघू लागल्याचा संकेत या पोटनिवडणूकीने दिला आहे. तशीच काहीशी ओडिशातील स्थिती आहे. तिथे कॉग्रेसला तिसर्‍या क्रमांकावर ढकलून भाजपा दुस‍र्‍या क्रमांकावर आलेला आहे. याचा अर्थच २०१४ च्या यशामध्ये जी घट होईल, ती भरून काढण्याच्या दिशेने मोदींनी आधीच वाटचाल सुरू केली आहे. पण त्यांना सत्ताभ्रष्ट करण्यास उत्सुक असलेल्यांना मात्र अजून धोरण वा रणनितीही ठरवण्याची गरज भासलेली नाही.

तो माणूस सलग तीन वर्षे एकमागून एक निवडणूका आपल्याच चेहर्‍यावर किंवा लोकप्रियतेवर जिंकतो आहे. त्याला त्या यशाची किंचीतही नशा आलेली नाही. त्यातून बेभान होण्यापेक्षा तो अजूनही सावधपणे चाल करतो आहे. कुठे धोका आहे, त्याची चाचपणी करीत वाटचाल करतो आहे. पण त्याच्या विरोधातले लोक मात्र झालेल्या पडझडीचेही आत्मपरिक्षण करायला तयार नाहीत. उलट दहा वर्षे जुन्या मतांच्या बेरजा करीत नवनवी गणिते मांडून आत्मवंचना करण्यात रमलेले आहेत. आता मायावतींनी मोदी विरोधात अखिलेशला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर डाव्यांमध्येही तसे विचार पुढे येत आहेत. पण अशा आट्यापाट्या खेळत बसायला त्यांच्यापाशी तितका वेळ तरी आहे काय? असाच खेळ उत्तरप्रदेशात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येऊन ठेपली, तोवर राहुल व अखिलेश खेळत बसले होते. पण त्याचा किती उपयोग झाला? जुन्या मतदानाची आकडेमोड कागदावर करून मनाचे समाधान करून घेता आले, तरी भाजपाने मतदान वाढवून ती आकडेवारीच नामशेष करून टाकली. नेत्यांपेक्षा कुठले समाजघटक कुठल्या कारणास्तव एकत्र येऊ शकतील, त्याची समिकरणे मांडून भाजपाने इतरांचे गणित बिघडवले. ते कसे व कशामुळे बिघडले, ते शोधण्यापेक्षा हेच विरोधक मतदान यंत्राला दोष देत नसले आहेत. तेच त्यांच्या पराभूत मनोवृत्तीचे लक्षण आहे. ही मनोवृत्ती तुम्हाला लढायला प्रवृत्त करत नाही, की बळ देत नाही. पर्यायाने दुर्बळ रहातात त्यांचा पराभव अपरीहार्य असतो. खरे सांगायचे तर मोदी आजकाल आपल्या बळाइतकेच विरोधकांच्या दुर्बळतेला गृहीत धरू लागले आहेत. तसे नसते तर त्यांनी एनडीएच्या सर्व पक्षप्रमुखांना गोळा करून २०१९ च्या लढ्याचे नेतृत्व म्हणून आपली निवड करून घेतली नसती. मोदी त्या तयारीला लागलेत आणि विरोधक मात्र मतदान यंत्रात अडकून पडलेत.

3 comments:

  1. भाऊ निदान मोदींना हरविण्यासाठीतरी हे सर्व महानुभाव एकत्र येऊ दे.डोके खाली घालून काम करतील.आता काम केल्याशिवाय जनता मत देणार नाही. जनतेला आता काम हवे आहे मग ते करणारा कोण आहे याचा संबंध नाही. मी सर्व मोदि विरोधकांना शुभकामना देतो.

    ReplyDelete
  2. भाऊ,कशाला मोदीविरोधकांना जागे/सावध करण्याचा प्रयत्न करताय? राहूदे त्याना झोपून.

    ReplyDelete