वकील हा न्यायासाठी लढणारा असतो, असे आजवर मानले गेलेले आहे. पण आजकाल गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावणारे, अशीच काही लोकांची ख्याती झालेली आहे. किंबहूना न्यायाचे शिलेदार म्हणून आपल्या देशात ज्यांची माध्यमातून सातत्याने ओळख करून दिली जाते; त्यांचे कर्तृत्व बघितले तर गुन्हेगारी ही न्याय्य गोष्ट असल्याचाच कोणाचा समज होऊन जाईल. तसे नसते तर कुलभूषण जाधव या भारतीयाला पाकिस्तानात फ़ाशी ठोठावण्यात आल्यानंतर आपल्या देशातील याकुब वा अफ़जल ब्रिगेडच्या वकीलांनी आकांडतांडव करायला हवे होते. दोन वर्षापुर्वी याच कालखंडात भारतीय न्यायपालिकेत धुमाकुळ चालू होताशेकडो निरपराधांचे बळी घेणार्या याकुब मेमनला, दिवसरात्र एक करून फ़ाशीच्या फ़ंद्यातून वाचवण्यासाठी अनेक नामवंत वकीलांनी आकाशपाताळ एक केलेले होते. सर्व न्यायप्रक्रिया होऊन याकुबला फ़ाशी ठोठावण्यात आलेली होती. टाडा कोर्टापासून हायकोर्ट व सुप्रिम कोर्टात त्याच्या विरोधातल्या पुराव्याची छाननी होऊन त्याला दुर्मिळ गुन्हा म्हणूनच फ़ाशी देण्यात आलेली होती. त्याही नंतर कित्येक वर्षे राष्ट्रपतींकडे त्याचा दयेचा अर्ज धुळ खात पडल्याने तो बचावलेला होता. अखेरीस राष्ट्रपतींनी त्याचा अर्ज फ़ेटाळून लावला आणि त्याची फ़ाशी निश्चीत झाली. तरीही त्याच्या गळ्यातला फ़ाशीचा दोर काढून घेण्यासाठी देशातले डझनभर नामवंत वकील अहोरात्र धडपडले होते. त्यांनी अर्थातच याकुबला दुय्यम ठरवून फ़ाशी विरोधाचे नाटक रंगवले होते. खरोखर ते फ़ाशीचे विरोधक असते, तर त्यापैकी काहीजणांनी तरी आज कुलभूषण जाधवविषयी थोडी आत्मियता नक्की दाखवली असती. पण असे तमाम फ़ाशीचे विरोधक, आज मुग गिळून गप्प आहेत. त्यापैकी कोणीही जाधव फ़ाशी जाऊ नये, म्हणून अवाक्षर उच्चारलेले नाही.
अनेक वृत्तपत्राचे संपादक वा वकील विचारवंत याकुबसाठी अखंड अश्रू ढाळत होते. त्यांनी याकुबच्या गुन्ह्याबद्दल बोलायचे सोडून, फ़ाशीचे विरोधक असल्याने नाटक रंगवलेले होते. याकुबचा गुन्हा भयंकर आहेच. पण तरीही त्याला फ़ाशी देणे त्याहीपेक्षा अमानुष असल्याचा शोध त्यापैकी अनेकांनी लावला होता. फ़ाशी म्हणजे एका दुर्बळाने दुसर्या अधिक दुर्बळाचा घेतलेला जीव, अशी चमत्कारीक व्याख्याही करण्यापर्यंत अनेकांची अक्कल गेलेली होती. त्यांना खरेच फ़ाशीची इतकी घॄणा होती काय? असेल तर आज त्यांची झोप कशाला उडालेली नाही? कारण पाकिस्तानात कुलभूषणला फ़ाशीचीच शिक्षा झालेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याचाही दावा केला गेला आहे. पण कुठला गुन्हा व कुठले पुरावे, त्याचा किंचीतही तपशील जगासमोर येऊ शकलेला नाही. कुठल्या कायद्यान्वये व कुठल्या कोर्टात खटला चालवला गेला, त्याचाही तपशील समोर येऊ शकलेला नाही. याचा अर्थच आरोप करणार्या पाकसेनेने त्याच्यावर आरोप ठेवला आणि आरोप म्हणजेच पुरावा, खटला व सुनावणी अशा थाटात त्याला फ़ाशी जाहिर करून टाकलेली आहे. त्याच्यावरच्या खटल्याविषयी कुठली बातमी पाकिस्तानी माध्यमात आली नाही, किंवा त्यातल्या वकील न्यायाधीशाचे नावही कुणा पाकिस्तान्याला अजून सांगता आलेले नाही. म्हणजेच निव्वळ आरोप करून एक माणूस भारतीय आहे, एवढ्याच कारणास्तव त्याला फ़ासावर लटकवायचा घाट घातला गेला आहे. अशा स्थितीत भारत सरकारने वा जागतिक संस्थांनी काय करावे, हा वेगळा विषय आहे. ज्यांच्या जगण्यात फ़ाशीमुळे व्यत्यय येतो, अशा लोकांनी काय करावे असा प्रश्न आहे. फ़ाशी विरोधकांनी याकुबप्रमाणेच आताही कुलभूषणच्या फ़ाशी विरोधात पुढे यायला नको काय? पण कोणीही समोर आलेला नाही वा कोणीही पाकिस्तानचा साधा निषेधही केलेला नाही. कारण काय असावे?
याकुबच्या फ़ाशीसाठी आलेला उमाळा याकुबसाठीच होता आणि पाकिस्तानचा घातपाती मारला जाणार, म्हणूनच त्यांचा जीव कासावीस झालेला होता. फ़ाशी कोण जाणार याला महत्व होते. फ़ाशीची शिक्षा वा त्यातली अमानूषता याच्याशी या लोकांना कधीच कर्तव्य नव्हते. तसे असते तर त्यांनी आजही कुलभूषणच्या फ़ाशीसाठी पाकिस्तानचा निषेध नक्की केला असता. त्यांचे दु:ख एक पाकिस्तानी घातपाती जिहादी फ़ाशी जाणार यासाठी होते आणि तेच दु:ख अफ़जल गुरूच्या फ़ाशीच्या वेळीही दिसून आलेले होते. दुसरा मुद्दा फ़ाशी कोण देतो, यालाही त्यांच्यालेखी महत्व होते. फ़ाशी भारताने द्यायची म्हटले, मग गुन्हा असतो. कायद्याच्या व पुराव्याच्या कसोटीवर गुन्हा सिद्ध झाला असला, तरी भारतात कुणा पाकप्रेमीला शिक्षा वा फ़ाशी होणे हा भयंकर गुन्हा असतो. पण तशीच शिक्षा पाकिस्तान देणार असेल, तर त्यात गुन्हा नसतो. त्यात कुठलीही अमानुषता नसते. पुराव्याशिवायही कुणा निरपराधाला मारण्यात गैर नसते. फ़क्त मारणारा पाकिस्तानी असावा. त्यातही जिहादी असला तर उत्तमच! अशी एकूण मानसिकता झालेली आहे. म्हणूनच याकुब ब्रिगेडला कुलभूषणच्या फ़ाशीची काडीमात्र खंत वाटलेली नाही. त्यापैकी कोणी कुलभूषणच्या फ़ाशीने विचलीत झालेला नाही. कदाचित आनंदीही झालेले असतील. कारण कुलभूषण विरोधात कुठलाही पुरावा पाकिस्तान दाखवू शकलेला नाही, म्हणजेच हा माणुस निर्दोष असल्याचेच सिद्ध होत आहे. अशा निर्दोष निरपराधी व्यक्तीला पाकिस्तान हकनाक फ़ाशी देत असेल, तर जिहादी मनोवृत्तीचे लोक सुखावल्यास नवल नाही. कसाब, याकुब वा अफ़जल गुरू आणि त्यांची वकिली करणार्यांमध्ये तसूभर फ़रक नसतो. त्यांना निरपराधांचा मृत्यू व त्याच्या यातना बघण्यात कमालीचा आनंद अनुभवता येत असतो. उलट कोणी जिहादी मारेकरी शिक्षा भोगताना बघून, त्यांची झोप उडून जाते.
जिहाद ही हिंसा नाही वा घातपाती कृतीही नाही. जिहाद ही एक विकृत मनोवृत्ती आहे. त्यात निरपराधाला वा निर्दोष व्यक्तीला हालहाल करून मरण यातना देण्याचा विकृत आनंद सामावलेला असतो. तोच आनंद याकुब-कसाब यांच्यापासून त्यांच्या पाठीराख्यांना सुखावह वाटत असतो. म्हणून त्यांना कुलभूषणच्या फ़ाशीने व्यथीत केलेले नाही, तर लोक त्यातून कमालीचे सुखावलेले आहेत. फ़ाशीच्या शिक्षेविरुद्धचा त्यांचा कांगावा निव्वळ नाटक होते. त्यांच्यातला एक विकृत फ़ाशी जाणार, याच दु:खाने या सर्वांना तेव्हा रडकुंडीला आणलेले होते. ते सत्य दडपून त्यांनी फ़ाशीला अमानुष ठरवण्याच्या बौद्धिक कसरती केलेल्या होत्या. आज म्हणूनच त्यापैकी कोणाला पुढे सरसावत कुलभूषणच्या फ़ाशीला विरोध करण्याची वा त्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरजही भासलेली नाही. जगाला भले कुठलीही फ़ाशी एकच वाटत असेल. पण पुरोगामी बुद्धीमंताच्या शब्दकोषात फ़ाशीचे वेगवेगळे अर्थ आहेत. फ़ाशी कशासाठी हे दुय्यम असून, कुणाला ही बाब त्यात महत्वाची असते. निरपराधांचे बळी घेणार्याला फ़ाशी हा अमानुष गुन्हा असतो आणि निरपराधाला यातना, हा त्यांच्यासाठी न्याय असतो. ही आता एक मानसिकता झालेली आहे. जग त्यांना दोन नावांनी ओळखते. काही देशात त्या लोकांना जिहादी म्हटले जाते, तर काही देशात त्यांनाच पुरोगामी मानवतावादी म्हणूनही संबोधले जाते. उज्ज्वल निकम यांनी हा फ़रक अधिक स्पष्ट केला आहे. ज्या जिहादी नरपशू मारेकर्यांना शिक्षा होण्यासाठी उज्ज्वल निकम आपली बुद्धी पणाला लावत होते, त्यालाच वाचवण्यासाठी पुरोगामी वकील आपले सर्वस्व पणाला लावत होते. आज तेच निकम पाकिस्तानात जाऊनही निरपराध कुलभूषणला फ़ाशीतून वाचवायला सज्ज झालेत. पण पुरोगामी वकीलांची टोळी मात्र तिकडे ढुंकूनही बघायला राजी नाही. कारण न्यायाची चाड निकमांना आहे. जिहादी कसाब वा त्याच वृत्तीच्या लोकांना न्यायाची कधी चाड असते?
आपल्याकडील मेडियापण तेव्हढाच नालायक आहे टीआरपी साठी हे लोक याकूबच्या व अफझल गुरूच्या वेळेस सर्वाना जाऊन जाऊन त्यांचे मत विचारात व बाईट द्यायला सांगत असत. आता हाच मेडिया का नाही तेव्हाच्या याकूब व अफझल ब्रिगेडला जाऊन विचारात कि आता तुमचे मत कुलभूषण जाधव यांच्या बद्दल काय आहे. एकाही मेडियावाल्याने या लोकांना जाऊन विचारायची हिम्मत दाखवलेली नाही.
ReplyDeleteआपला मीडिया ????????
DeleteOver all the world 'media' is treated a 'Prostitute'. In India we give undue importance to it.
ReplyDelete