Thursday, April 27, 2017

दो साल, केजरी बेहालआम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०१४ सालात आपल्या पदाचा राजिनामा देऊन लोकसभा निवडणूकीत उडी घेतली, तेव्हा त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रवक्ते नेते मोठ्या उत्साहात होते. कुठल्याही वाहिनीवर किंवा चर्चेत लोकसभा जिंकल्यासारख्या आवेशातच ते प्रतिक्रीया देत असत. एकूणच माध्यमातील पुरोगामी पत्रकारांनाही तेव्हा केजरीवाल यांच्याविषयी कमालीचे आकर्षण होते. अनेकांना तर केजरीवालनी नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखल्याची स्वप्नेही पडू लागलेली होती. अशावेळी एक जाणता अनुभवी पत्रकार विनोद शर्मा, यांनी त्या पक्षाला दिलेला इशारा आठवतो. तसे शर्मा हे कॉग्रेसधार्जिणे पत्रकार आहेत आणि ही वस्तुस्थिती ते सहसा लपवितही नाहीत. त्यांनी हवेत गिरक्या घेणार्‍या ‘आप’नेत्यांना माध्यमांविषयी गंभीर इशारा दिलेला होता. हे पत्रकार जितके डोक्यावर घेतात, तितकेच कधीतरी जमिनीवर आदळून टाकतात, असा तो इशारा होता. तो रास्तही होता. कारण आम आदमी पक्ष हे खरेतर माध्यमांचेच अपत्य आहे. कुठल्याही राजकीय संघटना वा कार्याशिवायच त्याचा भारतीय राजकारणात अवतार झालेला आहे. अण्णाप्रणित लोकपाल आंदोलनातून केजरीवाल यांनी रामलिला मैदान हा आपला बालेकिल्ला करून टाकला होता. मात्र लौकरच पत्रकारांचा पाठींबा केजरीवालना महागात पडू लागला आणि त्यालाही त्यांनी शत्रू करून टाकले होते. आज त्याचीच मोठी किंमत त्यांना दिल्लीत मोजावी लागते आहे. दिल्लीची सत्ता अजून त्यांच्या हाती असली तरी सिंहासन डळमळीत झाले आहे. कारण सत्तेत येऊन दोन वर्षे उलटली असताना, सार्वजनिक पातळीवर त्यांच्या सरकारवर मतदारानेच अविश्वास व्यक्त केला आहे. अर्थात त्यालाही खुद्द केजरीवालच जबाबदार आहेत. कारण त्यांनीच ही निवडणूक त्यांच्यावरचा विश्वास प्रस्ताव करून टाकला होता.

दिल्ली हे नगर राज्य असून, त्याची विभागणी तीन महापालिका क्षेत्रात झालेली आहे. त्यामुळेच केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवणारा सर्व मतदार यात मतदान करत होता. त्यातच आम आदमी पक्षाला नाकारले गेले असेल, तर त्याला जनतेचा विश्वास गमावणेच म्हटले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मतदान पालिकेसाठी असतानाही केजरीवालनी अकारण त्याला स्वत:वरील कौल ठरवण्याचा घाट घातला होता. सर्व प्रचार साहित्य वा पोस्टर्सवर केजरीवाल झळकत होते. त्यानेही बिघडत नाही. कारण तेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचा विक्षिप्तपणा म्हणजेच त्या पक्षाचे धोरण वा कार्यक्रम झालेले आहेत. म्हणूनच पालिकेतही त्यांचाच फ़ोटो प्रसिद्ध करून पक्षाने मते मागितल्यास काहीही गैर नाही. पण एका ठळक जाहिरातीत केजरीवाल यांनी भाजपानेते विजयेंद्र गुप्ता हवेत की केजरीवाल; असा प्रश्न मतदाराला विचारला होता. मग ही निवड दोन पक्षापेक्षाही दोन व्यक्तीतली होऊन गेली ना? जर आता मतदाराने भाजपा म्हणजे गुप्ता यांना कौल दिला असेल, तर तो केजरीवाल यांच्या विरोधातला कौल मानावाच लागणार ना? अर्थात इतका साधा तर्क केजरीवाल मान्य करतील अशी अजिबात शक्यता नाही. तो त्यांचा पिंड नाही. आपण चुकत नाही आणि अन्य सर्वजण चुकतच असतात, अशी केजरीवाल व त्यांच्या सवंगड्यांची खात्री आहे. त्यामुळेच आता मतदान यंत्रे चुकलेली असू शकतात, किंवा कागदी मतदान होऊन असाच निर्णय आला तरी त्यांनी मतदार मुर्ख असल्याचा दावा केला असता. केजरीवालना त्यातून सुटका नाही. त्यांच्या मनात आले तर सूर्यही पश्चीमेकडून उगवू शकतो. तसा उगवण्याची अजिबात गरज नाही. केजरीवाल पश्चीमेलाच पुर्व घोषित करतील आणि त्या दिशेला पश्चीम ठरवण्यामागे भाजपाशी अवघ्या भूगोलानेच संगनमत केल्याचा आरोपही केजरीवाल करू शकतात. भ्रमिष्टाशी कोणी तर्काने वा बुद्धीने वाद घालू शकत नसतो.

महापालिकेच्या निवडणूकीत आज आम आदमी पक्षाची धुळधाण उडाली, त्याला अन्य कोणी जबाबदार नसून खुद्द केजरीवाल त्यातले पहिल्या क्रमांकाचे आरोपी आहेत. कारण त्यांना लोकमताची किंमत ठाऊक आहे. पण तेच लोकमत उलटले तर होणारा उत्पात अजून उमजलेला नाही. आपण कुठल्याही थापा माराव्यात आणि जनतेने निमूटपणे ऐकावे; अशी त्यांनी समजूत करून घेतली आहे. म्हणूनच पंजाबच्या पराभवानंतर त्यांनी यंत्रावर दोषारोप करून सत्य नाकारण्याची हिंमत दाखवली होती. पण वास्तवात पंजाबमध्ये केजरीवाल गेलेच नसते व त्यांनी पोरकटपणा केलाच नसता; तर यापेक्षा अधिक चांगले यश त्यांच्या पक्षाला मिळाले असते. दिल्लीतही जितकी सत्ता हाती आलेली होती, त्यातून एक आदर्श कार्यशैली उभी करून, त्यांना पुढल्या पाच वर्षात राजकारणातला पर्याय उभा करता आला असता. पण आत्मकेंद्री माणसे कधीच सत्याकडे डोळे उघडून बघू शकत नाहीत. अल्पावधीत यश मिळाल्यामुळे केजरीवाल इतके भरकटत गेले, की त्यांना जनतेला हुलकावण्या देऊन निवडणूक जिंकणे शक्य व सोपे वाटू लागले. त्याचाच हा परिणाम आहे. आधी कॉग्रेसच्या पाठींब्यावर मिळालेली सत्ता लाथाडून लोकसभेत उतरल्याचा फ़टका दिल्लीतही बसला होता. मग मध्यावधीत पुर्ण पाच वर्षे दिल्लीतच काम करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी मते मागितली,. तर लोकांनी नवख्या नेत्याला क्षमा केलेली होती. पण केजरीवालना मतदार मुर्ख वाटला आणि वर्षभरातच त्यांनी पंजाब, गोवा किंवा गुजरात अशा राज्यातल्या मोहिमा काढून दिल्लीकडे पाठ फ़िरवली. दिल्लीकर कचरा, सफ़ाई वा रोगराईने बेजार झाला असतानाही थापा मारून त्यांनी सारवासारव केली. आज त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली आहे. आपण प्रेम किती मनपुर्वक करतो आणि तितक्याच त्वेषाने दणकाही देतो, याचा साक्षात्कार दिल्लीकराने या नेत्याला घडवला आहे.

ताज्या निकालाचा अर्थ केवळ केजरीवाल वा त्यांच्या पक्षापुरता मर्यादित नाही. अवघ्या दोन वर्षापुर्वी निर्विवाद ६७ जागा व ५४ टक्के मते मिळालेल्या त्या पक्षाला मतदाराने आज २७ टक्के इतके खाली आणून ठेवले आहे. याचा अर्थ जो अधिकचा मतदार लोकसभेनंतरही यांच्यामागे आलेला होता, त्याचा भ्रमनिरास झालेला आहे. नाचता येईना अंगण वाकडे, या नितीला दिल्लीकराने लाथाडले आहे. त्याच्यापुढे नतमस्तक होऊन माफ़ी मागण्यातून जे काही साधले जाईल, तेही तक्रारी करून होऊ शकणार नाही. म्हणूनच ताज्या निकालांना मतदान यंत्राची चलाखी ठरवून केजरीवाल मतदाराचीच अवहेलना करीत आहेत. देशातील प्रत्येक लोकशाही संस्था वा यंत्रणा भ्रष्ट आणि केजरीवाल तितका प्रामाणिकपणाचा पुतळा, हे ऐकायला दिल्लीकरही कंटाळले आहेत. त्यांचा इशारा समजून घेतला नाही, तर लौकरच या माणसाला आपल्या पक्षाचाही गाशा गुंडाळावा लागणार आहे. आताच निकाल सुरू झाल्यावर त्या पक्षातल्या अनेकांनी केजरीवाल यांच्यावर प्रश्नचिन्ह लावायला आरंभ केला आहे. त्यांना विश्वासात घेऊन सावरले नाही, तर लौकरच दिल्लीतली सत्ताही ढासळू लागणार आहे. ज्या पक्षाला भवितव्य नसते आणि ते दाखवण्यात नेतृत्व तोकडे पडते, तिथून पलायन सुरू होत असते. लौकरच आम आदमी पक्षातून आमदारांची व कार्यकर्त्यांची गळती सुरू होईल. त्यांना धमकावून पक्षात टिकवता येणार नाही. विजयाकडे घेऊन जाणार्‍या नेत्याचा धाक असतो आणि पराभवाला सामोरे जाण्याची हिंमत दाखवणारा नेताही पक्षाला भविष्य देऊ शकतो. केजरीवाल यांच्यात दोन्ही गोष्टी नाहीत. म्हणूनच यापुढे त्यांना व पर्यायाने त्यांच्या पक्षाला भवितव्य उरलेले नाही. किती दिवस व किती काळ इतकाच प्रश्न आहे. यश मिळवणे सोपे आणि पचवणे अवघड असते. केजरीवाल यांनी अल्पावधीतच त्याची प्रचिती आणुन दिली आहे.

1 comment:

 1. भाऊ!
  किती निर्भत्सना कराल?
  अहो, केजरीचे सांतवन करणे आवश्यक आहे.
  निवडणूका हारण्याचा उच्चांक करणा-या चि. राहुलचा आदर्श ठेव, असा उपदेश देणे गरजेचे आहे.
  केजरीचा जन्म जग्त कल्याणासाठीच झाला आहे. त्याच्यावर फक्त दिल्लीकरांचा अधिकार नाही, हे सत्य दिल्लीकरांना उमजले आहे. म्हणूनच त्यांनी केजरीला दिल्लीतून मुक्त केले आहे. असा या निकालांचा "व्यापक" अर्थ आहे.
  तुम्ही पत्रकार असल्यामुळे सत्य दडपताय.

  हा हा हा हा. . . . . .

  ReplyDelete