Tuesday, April 4, 2017

श्रीकृष्ण आणि रोमियो

Image result for prashant bhushan romeo

प्रशांत भूषण हे सुप्रिम कोर्टातील मोठे नामवंत वकील आहेत. त्यांच्या अनेक भूमिका कायम वादग्रस्त राहिल्या आहेत. पुर्वीपासून त्यांनी मानवी हक्क व त्यासारख्या अनेक विषयात सुप्रिम कोर्टात अनेक महत्वाचे खटले भरलेले आहेत आणि याचिकाही सादर केलेल्या आहेत. अगदी अलिकडे नोटाबंदीनंतर राहुल गांधी यांनी संसदेतच भूकंप घडवण्याचा दिलेल्या इशार्‍याचेही मुख्यकेंद्र प्रशांत भूषणच होते. सहारा कंपनीच्या कुठल्या संगणक नोंदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना काही कोटी दिल्याची नोंद असल्याचे आयकर खात्याच्या धाडीत आढळलेले होते. मात्र अधिक तपास करता, त्यात तथ्य नसल्याचे आढळून आल्याने पुढील तपास होऊ शकला नाही. पण तशी माहिती कुठून तरी भूषण यांच्या हाती लागली आणि त्यांनी सुप्रिम कोर्टात याचिका सादर करून, अधिक तपासाची मागणी केलेली होती. ती फ़ेटाळून लावण्यात आली होती. भूषण यांनी आपल्या याचिकेत दम असल्याचे सिद्ध करण्यासाठी अन्य काही दखलपात्र पुरावे आणावेत, असे कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांनी राहुल गांधींना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी त्याच बिनबुडाच्या बातमीचा आधार घेऊन संसदेत भूकंप घडवण्याची गर्जना केलेली होती. तो भूकंप झाला नाही, तरी त्याचे हादरे संसदेपासून शेकडो मैल दूर उत्तरप्रदेशात कॉग्रेसला बसले आणि त्यांच्यासह समाजवादी पक्षाचेही घरघराणे जमिनदोस्त होऊन गेले. असे प्रशांत भूषण चमत्कारीक गोष्टी बोलण्यासाठी व खुसपट काढण्यासाठीही ख्यातनाम आहेत. आता त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नव्या कारवाईवर चमत्कारीक भाष्य करून नवा वाद निर्माण केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी रोमियो विरोधी पथकांची स्थापना उत्तरप्रदेशात करून, मुलीमहिलांची छेड काढण्याला पायबंद घालण्याचे पाऊल उचलले आहे. त्या नावाला भूषण यांनी आक्षेप घेतला आहे.

रोमियो हे शेक्सपियरच्या नाटकातील पात्र आहे. या खुप जुन्या नाटकातला प्रेमी रोमियो हा ज्युलिएट नावाच्या मुलीवर प्रेम करत असतो आणि त्यासाठी त्या दोन्ही प्रेमीजीवांनी केलेल्या त्याग वा सहन केलेला विरह, अशी ती नाट्यकथा आहे. या नाटकातील कथेमुळे भारतात रोमियो प्रसिद्ध झालेला नाही. त्या नाटकात प्रेमवीर रंगवला आहे आणि इतक्या उघडपणे भारतीय समाजजीवनात प्रेमाचे प्रदर्शन मांडले जात नव्हते. म्हणूनच तशा पद्धतीने आपल्या प्रेमाचे प्रदर्शन मांडणार्‍या उठवळ तरूणांना, रोडरोमियो किंवा रोमियो असा शब्द दिर्घकाळ वापरला गेलेला आहे. मुलीवर एकतर्फ़ी प्रेम करणारे वा तिच्या मनाविरुद्ध प्रेमाचे चाळे करून दाखवणार्‍यांनाच रोमियो असे संबोधले गेले आहे. पण इतक्या सर्वसामान्य भारतीय जीवनाशी प्रशांत भूषण वा तत्सम बुद्धीमंतांचा कधी संबंध येत नाही. म्हणूनच भारतीय समाजात रोमियो कुठल्या अर्थाने वा संदर्भाने वापरला जाणारा शब्द आहे, त्याचा भूषणसारख्यांना थांगपत्ता नसतो. त्यांना भारतातला रोमियो आणि शेक्सपियरच्या नाटकातला रोमियो, यातला फ़रकही ठाऊक नाही. म्हणूनच ते दुखावले गेले आहेत. रोमियो तर ज्युलिएटला सतावत नव्हता, किंवा तिची छेड काढत नव्हता. मग तरूण मुलींना सतावणार्‍यांच्या बंदोबस्तासाठी योजलेल्या पोलिस पथकाला रोमियोचे नाव कशाला? असा प्रश्न या शहाण्यांनी उपस्थित केला आहे. तिथेच थांबले असते तर भूषण यांच्या बुद्धीचा कदाचित र्‍हास झाला असता. म्हणूनच मुलींची छेड काढण्याविरोधी असलेल्या पोलिस पथकाला योग्य नाव त्यांनी सुचवले आहे. ते नाव श्रीकृष्णाचे आहे. कारण श्रीकृष्ण महिलांची छेड काढायचा आणि तसे शेकड्यांनी पौराणिक संदर्भ उपलब्ध आहेत. मजेची गोष्ट म्हणजे असेच अन्य बाबतीतले पौराणिक संदर्भ विचारात घेण्याची वेळ आली, मग भूषण सारख्या मंडळींना पुराण कालबाह्य वाटत असते.

श्रीकृष्ण हा रासलिला करायचा आणि गोकुळ वा मथुरेतला मुली महिलांची छेड काढायचा, यावर यांचा विश्वास दिसतो. म्हणूनच छेड काढणार्‍या गुंडांच्या बंदोबस्तासाठीच्या पथकाचे नाव श्रीकृष्ण बंदोबस्त पथक असावे, असे भूषण यांनी सुचवले आहे. असे काही सुचवताना त्यांना पुराणकथा भाकड वाटत नाही. पण अयोध्येत रामाचा अमूकच जागी जन्म झाला, किंवा मुळात रामायणातील लंकेला जाणारा सेतू बांधला गेला, याबाबतीत मात्र भूषण दुसर्‍या टोकाला जाऊन विरोधात उभे रहातात. आदित्यनाथ यांना विरोध करायचा असला, मग रासलिला खरी असते आणि त्यातला श्रीकृष्ण मुलींचे छेड काढणारा टवाळ असतो. पण मर्यादा पुरूषोत्तम राम मात्र त्याच निकषावर खरा नसतो. ही पुरोगामी असण्याची खास लक्षणे असतात. आपल्या सोयीचे असेल वा हिंदूंना दुखावणारे असेल, तेव्हा पुराणाचा संदर्भ हवा असतो. पण पुरोगामी पवित्रा खोटा पडू लागला, मग पुराणकथा भाकड होतात. यातून एक गोष्ट सहज लक्षात येते, की मुद्दा हिंदूंच्या भावनेला दुखावण्याचा असतो. जितक्या सहजतेने भूषण यांनी श्रीकृष्णाची रोमियोशी तुलना केलेली आहे, तशी तुलना त्यांना अन्य धर्माच्या श्रद्धेय व्यक्तीमत्वाशी करता येईल काय? तितकी हिंमतही त्यांच्याकडून होणार नाही. मग असे संदर्भ काढून अन्य कोणाच्या दुखण्यावरची खपली काढण्यातून काय साधले जाते? मुद्दा रोमियो कोण व कुठल्या कथेत होता, ही बाब महत्वाची नाही. तर उत्तरप्रदेशच्या तरूण मुली व त्यांची राजरोस काढली जाणारी छेड; हा गंभीर मुद्दा आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य आहे. त्यासाठी नेमलेल्या पोलिस पथकाला कुठले नाव दिले, त्याला अजिबात महत्व नाही. पाहिजे तर त्याला प्रशांत भूषण पथक असेही नाव देता येईल. मुद्दा त्या पथकाने मुलींवर होणार्‍या अत्याचाराला आळा घालण्याचा आहे. त्यात भूषण यांना कसली अडचण आहे?

कदाचित मुलींचे छेड काढणे, हा देशातील कुठल्याही गुंड मस्तवाल मुलांचा पुरूषांचा मुलभूत अधिकार असल्याची समजूत भूषण यांनी करून घेतली असावी. काश्मिरात वा अन्यत्र कुठेही घातपात वा हिंसाचार करणार्‍या जिहादी लोकांविषयी त्यांना अशीच आपुलकी आहे. याकुब मेमन वा अफ़जल गुरू यांच्यावर गुन्हे सिद्ध झाल्यावरही त्यांचा गळा फ़ाशीतून सोडवण्यासाठी झटलेल्या गोतावळ्यातील भूषण एक वकील आहेत. त्यांना मुलींची छेड काढली जाणे, त्यांच्यावर बलात्कार होणे वा चेहर्‍यावर एसीड फ़ेकले जाणे, याबद्दल किंचीतही राग संताप नाही. असे गुन्हे करणार्‍यांवर चुकून अनाठायी अन्याय होऊ नये, अशी त्यांची धारणा आहे. हजारो, शेकडो मुलींवर नित्यनेमाने अत्याचार होत असतात आणि त्यांची पोलिसात दखलही घेतली जात नाही, असा अनुभव आहे. त्यामुळेच निवडणूक प्रचारात हा विषय गाजत होता आणि त्याच्याही आधीपासून योगी आदित्यनाथ यांनी, आपल्या अनुयायी तरूणांना अशा पद्धतीची पथके स्थापन करून मुलींच्या सुरक्षेला उभे करण्यापर्यंत मजल मारली होती. आता तेच मुख्यमंत्री झाल्याने त्यांनी सरकार व पोलिसी यंत्रणेद्वारे मुली महिलांना संरक्षण देण्याचा पवित्रा घेतलेला आहे. त्यात भूषण सारख्यांना पोटदुखी व्हाय़चे काही कारण नाही. कायदा हा कठोर शिक्षेमुळेच उपयुक्त ठरत असतो. त्यापेक्षाही कायद्याचा धाक अधिक प्रभावी असतो. सहाजिकच एखाददुसर्‍या तरूणावर अन्याय झाला वा कारवाईत चुका झाल्याने काही बिघडत नाही. एकविसाव्या शतकात मुलींना मुक्तपणे समाजात वावरण्याचे भय उरले नाही, म्हणजे झाले. आज त्याचीच वानवा झाली आहे. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात वा कुठल्याही दुर्गम खेड्यात गुन्हेगारांचा धाक आहे आणि मुलीमहिलांना घरातही सुरक्षित वाटेनासे झालेले आहे. सुरक्षेची शाश्वती निर्माण करताना नाव कुठले याला महत्व नसून, टवाळ व गुन्हेगारांना भयभीत करण्याचीच खरी गरज आहे. अगदी त्यासाठी भूषण सारख्यांनाही घराबाहेर पडायची भिती वाटली तरी बेहत्तर!

3 comments:

  1. भाऊ,हे सगळ बघता हा अखिल भारतीय रोड-रोमियो संघटनेचा अध्यक्ष वाटतो

    ReplyDelete
  2. prashant bhushan virodhi pathak, he naav yogya ahe

    ReplyDelete