पंजाब हरल्यापासून केजरीवाल यांनी मतदान यंत्राला शिव्याशाप देण्याचा उद्योग आरंभला होता. थोडक्यात दिल्लीत येऊ घातलेले संकट ओळखून त्यांनी पराभवाचे खापर आपल्या माथी फ़ुटू नये, याचीच तयारी केलेली होती. पण त्याच्या उपयोग झालेला नाही. आता तर त्यांच्याच पक्षातले अनेकजण व त्यांचेच निकटवर्तिय शंका घेऊ लागले आहेत. मात्र यातून काही शिकण्याची केजरीवाल यांची तयारी नाही, हीच त्यांची खरी समस्या आहे. ही समस्या त्यांना ठाऊक नाही, असेही मानायचे कारण नाही. आपणे कुठे फ़सलो आहोत आणि कशामुळे पराभव ओढवून आणला आहे, त्याची पुर्ण जाणिव केजरीवाल यांना आहे. किंबहूना तोच धोका त्यांनी दोन वर्षापुर्वी दिल्ली विधानसभा जिंकल्यावर जाहिरपणे सांगितला होता. योगायोग असा, की जो धोका त्यांनी आपले सहकारी योगेंद्र यादव यांना रामलिला मैदानावरून ऐकवला होता, तोच आज केजरीवालना आठवेनासा झाला आहे. ७० पैकी ६७ जागा आम आदमी पक्षाने जिंकल्यावर पुन्हा एकदा केजरीवाल यांचा रामलिला मैदानावर शपथविधी पार पडला होता. नंतरच्या समारंभात भाषण करताना केजरीवाल यांनी जाहिरपणे अहंकार घातक असल्याचा इशारा आपल्या पक्ष सहकार्यांना दिला होता. भाजपाचा दिल्लीतील दारूण पराभव केवळ अहंकारामुळे झाला, असेच केजरीवाल जाहिरपणे म्हणाले होते. लोकसभा जिंकल्यावर इतरांचे आमदार फ़ोडणे, कुणालाही पक्षात आणून उमेदवारी देणे व मतदाराला आपला गुलाम समजण्याची वृत्ती भाजपाला भोवली; असे त्या भाषणात केजरीवाल यांनी सांगितले होते. त्यांनी तसे बोलण्याचे कारणही स्पष्ट होते. त्यांचे निकटचे सहकारी व राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव, यांनी पुढल्या काळात उत्तरप्रदेश व अन्य राज्यात विधानसभा जिंकण्याची भाषा केली होती. त्याला केजरीवाल यांनी अहंकार संबोधून यादवांचे कान जाहिरपणे उपटले होते.
दिल्लीत आपने अभूतपुर्व यश मिळवल्यानंतर योगेंद्र यादव यांनी तसे मतप्रदर्शन केले होते. अर्थात त्यामागे यादव यांचा अहंकार होता, असे कोणी म्हणू शकत नाही. कारण यादव यांचे व्यक्तीमत्व अतिशय संयत असून, त्यांनी उत्साहात तसे विधान केलेले असू शकते. त्याविषयी केजरीवाल खाजगीत या सहकार्याला समज देऊ शकले असते. पण त्याऐवजी त्यांनी रामलिला मैदानावरच्या शपथविधी समारंभातच यादवांचे कान उपटले होते. ती आम आदमी पक्षातल्या अहंकारी मनोवृत्तीचे नांदी होती. अशी भाषा पक्षाचा सर्वेसर्वा म्हणून आपणच बोलू शकतो. यादवांना तो अधिकार नाही, असेच केजरीवालना सांगायचे होते. दरम्यान त्या निवडणूक प्रचारात पक्षाची लोकप्रिय घोषणा होती, ‘पाच साल केजरीवाल’! त्यालाही यादव व प्रशांत भूषण यांचा विरोध होता. कारण आम आदमी पक्ष व्यक्तिनिष्ठ होऊ लागला, अशी भिती त्यांना वाटू लागली होती. तसे त्यांनी अनेकांना बोलूनही दाखवले होते. म्हणूनच केजरीवाल यांनी नवा पक्ष आपली खाजगी मालमत्ता असल्याचा जाहिर इशाराच सहकार्यांना दिला होता. त्याला विरोध होताच त्या विसंवादी सहकार्यांना गचांडी धरून बाहेर हाकलण्यात आले. थोडक्यात ज्या अहंकाराच्या विरोधात केजरीवाल इशारा देत होते, त्याची बाधा अन्य कोणापेक्षाही त्यांनाच झालेली होती. त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. ज्यांनी आरंभीच्या काळात पक्षात येण्यापेक्षा माध्यमात राहून आम आदमी पक्षासाठी छुपी लढाई के,ली असे नवे लोक वा जुने पत्रकार आम आदमी पक्षात दाखल झाले होते. आशुतोष वा आशिष खेतान अशा तोंडपुज्या कर्तृत्वहीन लोकांनी केजरीवाल भोवती एक कोंडाळे तयार केले होते. मग जगाशी या माणसाचा संपर्क तुटत गेला. अशा लोकांनी आपल्या मतलबासाठी केजरीवालांचा अहंकार फ़ुलवण्यापेक्षा अधिक काहीही केले नाही. आज त्याचेच परिणाम समोर आले आहेत.
दुसर्यांदा केजरीवालनी विधानसभेत यश मिळवले आणि पक्षाची सर्व सुत्रे त्यांच्या हाती केंद्रीत झाली. आपणही मोदी झाल्याचे भास त्यांना होऊ लागले तर नवल नाही. म्हणूनच त्यांनी प्रचारक असलेल्या खेतान व आशुतोष यांच्यावर विसंबून रहाण्याचा पवित्रा घेतला. त्यांनीच पंजाबमध्ये विधानसभेची तयारी सुरू केली आणि लौकरच तिथे पक्षात फ़ाटाफ़ुट झाली. प्रचारात अशा गोष्टी घडल्या, की वारंवार केजरीवालना माफ़ी मागावी लागत होती. अशा उचापतींना लगाम घालणारे तुल्यबळ सहकारी यादव, भूषण वा कुमार विश्वास दुरावले होते. त्याचा एकत्रित परिणाम दिल्लीवर होऊ लागला. इतर राज्यात व देशव्यापी राजकारणासाठी लागणारा पैसा जमवण्याची यंत्रणा, म्हणून मग दिल्ली सरकारच्या खजिन्याचा वापर बिनदिक्कत सुरू झाला. पक्षाचे नेते, त्यांचे नातेवाईक वा केजरीवालांचे सहकारी यांच्यासाठी दिल्लीचा खजिना खुला करण्यात आला. त्याचा हिशोब विचारला, मग भाजपा वा मोदी सरकार काम करू देत नसल्याचा कांगवा करणे; हा एकमेव कार्यक्रम होऊन बसला. त्यातून मग दिल्लीकराचे भीषण हाल सुरू झाले. पण त्याची पर्वा कोणाला होती? जी तत्वे किंवा नव्या भूमिका घेऊन राजकारणात केजरीवाल आलेले होते, त्याला झिडकारून अन्य कुठल्याही पक्षाला लाजवील, असा भ्रष्टाचार केजरीवाल करीत गेले. त्यांचा आदर्श बघून त्यांचे मंत्री व आमदार धुमाकुळ घालू लागले. मात्र त्यांच्या वागण्यावर कोणीही प्रश्न विचारण्याची बिशाद नव्हती. अहंकाराचा यापेक्षा मोठा दाखला नसेल. सर्व नियम, कायदे वा सभ्यता धाब्यावर बसवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. एकूणच आपल्या अहंकाराच्या भोवर्यात सापडून केजरीवाल व त्यांचे निकटवर्तिय जनतेचा पुरता भ्रमनिरास करत गेले. अहंकार इतका शिरजोर झाला होता, की जनमताची पर्वाच राहिलेली नव्हती. त्याचा साक्षात्कार पालिका मतदानात झाला आहे.
सावध करू धजणारे यादव-भूषण असे सहकारी दुरावले आणि भाट चमचे घेरून बसल्याने चुका सांगणाता कोणी उरला नाही. आपापले मतलब साधणारे अहंकार फ़ुलवत राहिले आणि केजरीवाल यांची वास्तवाशी फ़ारकत होत गेली. लोकमत क्षुब्ध असल्याचे दिसत असूनही त्यांना बघता आले नाही. कारण सहकारीच दिशाभूल करीत होते. पराभव आपल्या नाकर्तेपणामुळे झाला नसून यंत्राची लबाडी त्याला कारण असल्याचा फ़सवा बचाव त्यातूनच आलेला आहे. सोपी मिमांसा लौकर पटणारी असली तरी खरी नसते आणि त्यामुळे होणारे परिणाम टाळता येत नसतात. ती स्वत:ची फ़सवणूक असते. दिल्ली जिंकली म्हणून अन्य राज्ये सहज जिंकणे शक्य नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागेल वा संघटना उभारावी लागेल; अशीच भूमिका रामलिला मैदानावर मांडणारे केजरीवाल अहंकार धोका असल्याचे सांगत होते. पण आज आपलेच शब्द त्यांना आठवत नाहीत. दुर्दैव असे, की ज्या योगेंद्र यादवना हा इशारा जाहिरपणे केजरीवालनी दिलेला होता, तेच यादव आता दिल्ली पालिकांचे निकाल लागल्यावर तोच इशारा केजरीवालांना देत आहेत. दिल्लीतले पाय भक्कम करण्यापुर्वीच अन्य राज्यात जाऊ नये, हा आपलाच इशारा विसरून केजरीवाल अन्य राज्यात मुलूखगिरी करायला गेले. मात्र पायाखालची जमीनही ठिसूळ करून बसले आहेत. लोकसभेने दिलेला धडा शिकले, कारण ते्व्हा निदान हा माणूस आत्मकेंद्री झालेला नव्हता. दोन वर्षाची सत्ता उपभोगल्यावर हा माणूस आता इतका आत्मकेद्री झाला आहे, की त्याला वास्तवाचे भान पुरते सुटले आहे. दिल्लीची सत्ता विसरून जा, स्वत: स्थापन केलेल्या पक्षातील आपली हुकूमत टिकवून ठेवण्याचीही मारामारी करावी लागणार आहे. कारण यादव-भूषण यांचा दाबून टाकलेला प्रतिवादी आवाज, आता अनेक तोंडातून पक्षाच्या आतूनच उमटू लागला आहे. विचारतो आहे, ‘आपका भविष्य क्या है?’
No comments:
Post a Comment