Friday, April 28, 2017

विनोद खन्ना मरते नही

vinod khanna के लिए चित्र परिणाम

अमिताभ बच्चन आजही लोकप्रिय अभिनेता आहे आणि त्याच्या चित्रपट कारकिर्दीला आता अर्धशतकाचा काळ पुर्ण झाला आहे. त्याचा समकालीन व प्रतिस्पर्धी मानला गेलेला अभिनेता विनोद खन्ना याचे गुरूवारी कर्करोगाने निधन झाले. त्यानिमीत्ताने तीन चार दशकापुर्वीच्या चित्रपट सृष्टीतील संघर्षाचा उहापोह झाला. वास्तविक गेले काही महिने विनोद खन्ना मृत्यूशी झुंज देत होता आणि त्याचे खंगलेल्या देहयष्टीचे एक छायाचित्र कुठेतरी प्रसिद्ध झाले होते. ते बघूनच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. ज्याला तगड्या शरीरयष्टीचा जवानमर्द म्हणून लोकांनी दिर्घकाळ बघितले, त्याची अशी केविलवाणी छबी कोणालाही आवडणारी नव्हती. चित्रपटाचे जगच भ्रामक असते. त्यातला हिरो किंवा नायक हे काल्पनिक पात्र असते. त्याचा पराक्रम वा भावनाही देखावा असतो. त्या पडद्यावरील व्यक्तीमत्वाच्या प्रेमात पडलेले चहाते व प्रेक्षक खर्‍या व्यक्तीला ओळखतही नसतात. तरीही त्याच्या प्रेमात पडलेले असतात. प्रत्येक पिढीचे असे हिरो झाले व काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. पण म्हणून हे वेड संपत नाही. तीच तर माणूसपणाची ओळख आहे. आपल्याला वास्तव जगातल्या गोष्टींपेक्षाही कल्पनेतल्या वा भ्रामक जगाविषयी मोठे आकर्षण असते. वास्तवाची नावड त्या कल्पनेला आपल्या मनात घर करून देते आणि विनोद खन्ना वा अमिताभ त्याची प्रतिके असतात. आजच्या कालखंडात सलमान खान, शाहरुख वा अमिर, अक्षय तशी प्रतिके असतात. जेव्हा विनोद खन्नाने या जगाचा निरोप घेतला, तेव्हाची पिढी बाहूबली व कटप्पाच्या संघर्षात मग्न होती आणि मागल्या पिढीतल्या या बाहूबली नायकाची अवस्थाही तिला ठाऊक नव्हती. फ़िकीरही नव्हती. ही पिढी बाहूबलीवर जीव ओवाळून टाकत असताना, विनोद खन्ना अखेरचे श्वास घेतोय, म्हणून मागल्या पिढीतले अनेकजण शोकमग्न झालेले होते.

मानवी जीवनातील हीच शोकांतिका असते. प्रत्येक पिढी आपापले नायक घेऊन जन्माला येते किंवा जन्माला घालत असते. असे नायक राजकारणातले असतात, कधी ते क्रिडाक्षेत्रातले असतात, कधी राजकारणातले असतात. त्यातले काही कालमर्यादेत बंदिस्त झालेले असतात, तर काही कालखंडाच्या सीमा ओलांडूनही टिकून रहाणारे असतात. नायक असतात, तसेच खलनायकही असतात. समाजाला नेहमी अशा जोडीची गरज असते. मानवी जीवन हे चित्रपट वा कादंबरीसारखेच असते. नायकाचे उदारीकरण करण्यासाठी मोठी भूमिका खलनायकाला पार पाडावी लागत असते. खलनायकाच्या अभावी नायक फ़िका पडू शकतो. त्याच्या पराक्रमाला वा पुरूषार्थाला पैलू पाडायचे काम शिव्याशाप घेत खलनायकाला पार पाडावे लागत असते. म्हणूनच अनेकदा नायक अजरामर होतात, तसेच त्यांना त्या अढळपदापर्यंत घेऊन जाणारे खलनायकही अजरामर होऊन जातात. जोवर शिवरायांचे नाव असते तोवर अफ़जल खानाला मरण नसते. महात्मा गांधींचे कौतुक आहे तोपर्यंत नथूराम गोडसे मरत नसतो. यामागे त्यांचे प्रयास अजिबात नसतात. जगातले व जीवनातले नायक व खलनायक शोधून भजणारा सामान्य माणुस, त्याला जबाबदार असतो. विनोद खन्नाला आजचे चित्रपट शौकीन विसरून गेले आहेत. पण त्याच्या शोकांत मृत्यूने इतर अनेकांना त्यातला महानायक आठवला. त्याने अशा सामान्य माणसाच्या मनात निर्माण करून ठेवला, त्या नायकाने अकस्मात मनोभूमीच्या मंचावर पदार्पण केले आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावरून सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रीया उमटल्या. त्यांचा आडोसा घेऊन झालेल्या तात्कालीन तरूणांचे वादावादीच्या आठवणी निघाल्या. पण विनोद खन्ना मरत नसतात. कारण ते जीवंत नसतातच. ते प्रेक्षक व चहात्यांच्या मनातली एक भ्रामक प्रतिमा असते.

तुमच्या आमच्या मनातला विनोद खन्ना आजच्या पिढीला ठाऊकही नसतो. कारण तो त्यांच्या कल्पनाविश्वातच नसतो. १९७०-८० च्या काळात कल्पनाविश्वात रममाण झालेल्या पिढीचा विनोद खन्ना पडद्यावरचा असतो. त्याच्याशी आपली कधी भेटही झालेली नसते आणि तोही आपल्याला ओळखत नसतो. त्याच्या भूमिका व अभिनय आपल्याला इतका भावलेला असतो, की त्याच प्रतिमांच्या प्रेमात आपण अडकून पडलेले असतो. पडद्यावर विशी तिशीतली भूमिका रंगवणारा विनोद प्रत्यक्षात चाळीशी पन्नाशीच्या घरात गेलेला होता. पण आपण त्याला तिशीच्या आतला समजून स्विकारलेला असतो. ते जितके भ्रामक असते, तितकाच विनोद आपल्या कल्पनाविश्वात एक भ्रामक स्थान बळकावून बसलेला असतो. तो कधी म्हातारा होत नाही किंवा त्याला कुठली रोगबाधाही होऊ शकत नाही. म्हणूनच काही दिवसांपुर्वी त्याची खंगलेली शरीरयष्टी कुठल्या छायाचित्रात समोर आली, तेव्हा अनेकजण विचलीत होऊन गेले. तुम्ही आम्ही म्हातारे होत असतो, आपल्या भोवतालचे जगही आमुलाग्र बदलून जात असते. पण कल्पनाविश्वात रमण्याच्या कालखंडात स्विकारलेल्या प्रतिमा बदलण्याची शंकाही सहन होणारी नसते. विनोद खन्ना त्या जगातला असतो. शाहरूख वा दिलीपकुमारही त्याच जगातला असतो. आपल्यासाठी ते वास्तवातले नसतात, आपल्या कल्पनेतले असतात. त्या कल्पनेला धक्का लागणे आपल्याला असह्य होऊन जाते. तीच प्रतिक्रीया विनोदच्या निधनानंतर उमटलेली आहे. त्याच्या निधनाचे दु:ख किती आणि आपल्या कल्पनेतला विनोद आज अस्तित्वात नसल्याची वेदना किती, याचाही प्रत्येकाने विचार करून बघावा. खरा विनोद खन्ना मागल्या अनेक वर्षात पडद्यावर आला नाही, त्याची आपल्याला फ़िकीर नव्हती. कारण तो ज्यांच्या मनात कल्पनेत होता, तिथेच व्यवस्थित सुखरूप होता. मग तो मरेल कसा?

विनोदचा मृत्यू कर्करोगाने झाला आणि तसेच काहीसे कथानक ‘आनंद’ चित्रपटातले आहे. त्यात कर्करोगाने बाधीत झालेल्या आनंद नावाच्या तरूणाभोवती कथा गुंफ़ली आहे. त्यातला डॉक्टर म्हणून भूमिका करणारा अमिताभ म्हणतो, ‘आनंद मरते नाही’. जे त्या कथानकातल्या राजेश खन्नाचे आहे, तेच आपल्या जीवनात विनोद खन्नाचे आहे. हे नायक खलनायक आपल्या जीवनाचे वास्तविक अंग नसतात. आपल्या कल्पनाविश्वातली महत्वाची पात्रे असतात. आपल्या जीवनातील घडामोडी व व्यवहाराशी त्यांचा थेट कुठलाही संबंध येत नसतो. पण त्यांच्या प्रत्तिमांचा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो. कोणी अभिनेता अ्सतो कोणी राजकीय नेता असतो. कोणी लेखक खेळाडू असतो, तर कोणी तितका प्रसिद्ध नसलेला पण अवतीभवतीच्या परिसरातलाही असू शकतो. त्यांचे असणे कल्पनेत असते आणि म्हणूनच त्यांचे नसणे काल्पनिक असले तरी सहन होत नाही. आयुष्य म्हणजे सुसह्य आठवणींचा साठा असतो. त्यातली कुठलीही आठवण गमावण्याची माणसाला कमालीची भिती वाटत असते. अडचण, संकट, वेदना वा दु:खाच्या क्षणी, अशा आठवणी सुखदायी फ़ुंकर घालत असतात. विनोद खन्नाच्याच एका चित्रपटातले त्याच्यावर चित्रित झालेले गीत आहे. ‘हम तुम्हे चाहते है ऐसे, मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे!’ विनोद खन्ना वा तसे अनेकजण जगताना तसेच आपल्याला हवे असतात. रोजच्या दु:खात विरंगुळा देणारे असे लोक गमावण्याचे भय-दु:ख असह्य असते. ते बुडत्याला काडीचा आधार असल्यासारखे आपल्या जीवनात असतात. ते मरत नसतात. त्यांना मरणे शक्य नसते. कारण ते आपल्या कल्पनाविश्वात कायमस्वरूपी अमर असतात. त्यांना वास्तव जगातल्या रोगबाधा होत नाहीत वा म्हातारपणही येऊ शकत नाही. ते आपले नायक असतात. ते आपल्या जीवनातील सुखद आठवणींचा साठा असतात.

6 comments:

  1. सुयोग फणसळकरApril 28, 2017 at 4:41 AM

    भाऊ
    अप्रतिम लेख

    ReplyDelete
  2. Regret to note that the country mourns a Bollywood oldie but does not shed that many tears for Capt Ayush Yadav , who died for us at 23. Something seriously wrong with this nation.

    ReplyDelete