Wednesday, April 5, 2017

केजरीवाल आणि कपील

kejri kapil sharma के लिए चित्र परिणाम

काही वेळा दोन परस्पर संबंध नसलेल्या व्यक्तींमध्ये चमत्कारीक साम्य वा साधर्म्य आढळून येत असते. दोन दिल्लीकर जवळपास तसे आहेत. योगायोग असा, की दोघांचे नशिबही एकाच कालखंडात फ़ळफ़ळलेले आहे. त्यातला एक विनोदवीर म्हणून नावारूपास आला, तर दुसरा उदयोन्मुख राजकारणी म्हणून गाजला आहे. यातल्या एकाचे नाव आहे कपील शर्मा आणि दुसर्‍याचे नाव आहे अरविंद केजरीवाल. एकाने एका विनोदी नकलांच्या स्पर्धेत शिरून आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि त्याच्या गुणांची पारख असलेल्या कुणीतरी त्याच्याच नावाचा एक खास कार्यक्रम योजला. कॉमेडी नाईट्स विथ कपील अशी ही मालिका अल्पावधित खुप लोकप्रिय झाली आणि त्या यशाने कपील शर्माला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. तशीच काहीशी कहाणी दिल्लीत समाजसेवा म्हणून विविध उचापती करणार्‍या केजरीवाल यांचीही आहे. आपल्या लहानमोठ्या कामातून लोकांचे लक्ष वेधून घेणार्‍या केजरीवाल यांनी, मोठ्या चतुराईने देशभर पसरलेल्या समाजसेवी संस्था व व्यक्तींना गोळा करून, भ्रष्टाचार विरोधी मोहिमेची नांदी केली. त्यावरचा उपाय म्हणून लोकपाल कायदा होण्याची चळवळ हाती घेतली. तेव्हा केजरीवालचा चेहरा कोणाला ठाऊक नव्हता. पण व्यापारी मालाचे बाजारीकरण करण्याची कला त्याला अवगत होती. म्हणूनच त्याने अशा उत्साही लोकांना एकत्र करून तटस्थ मानल्या जाणार्‍या अण्णा हजारे यांना पुढे करून आपली मोहिम आरंभली. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमे मानल्या गेलेल्या वाहिन्या व वृत्तपत्रातील मित्रांना हाताशी धरून एक मोठा देखावा उभा केला. पुढे त्याचाच लाभ उठवत राजकारणात प्रवेश केला आणि सत्तेपर्यंत मजल मारली. दोघांचे यश व चतुराई सारखीच आहे, तसाच त्यांना झटपट इतके मोठे यश मिळण्याचा कालखंडही समान आहे. पण दोघातले दोषही सारखेच असावेत, हा आणखी एक योगायोग आहे.

दोघांमधली गुणवत्ता कोणी नाकारलेली नाही. कपील शर्मा आपल्या हजरजबाबी बोलीमुळे प्रसिद्ध आहे. कुठल्याही शब्दातून व कुठल्याही प्रसंगातून विनोद निर्माण करणे, त्याच्या हातचा मळ आहे. अगदी काहीशी तशीच कला केजरीवालनाही अवगत आहे. नसलेल्या विषयातून गदारोळ माजवणे, किंवा बेताल बेछूट आरोपातून विवाद उभे करून राजकारण खेळणे, ही केजरीवालांची हातोटी आहे. आपल्या पक्षाचा आरंभ करतानाच त्यांनी सोनियांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि भाजपाचे तात्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी, यांच्यावर कसलेही आरोप करून माध्यमात आपल्या वक्तव्यांना भरपूर प्रसिद्धी मिळेल अशी खेळी केली. त्या आरोपबाजीने केजरीवाल इतके कॅमेरात व वाहिन्यांवर गाजू लागले, की कधीकाळी अण्णा हजारे यांच्या मागे उभा असणारा अरविंद लोक विसरून गेले. किंबहूना लोक अण्णांनाही विसरून गेले आणि सगळीकडे अरविंद अरविंद असा जप सुरू झाला. त्यातूनच त्यांनी दिल्लीकरांच्या अपेक्षा जागवल्या आणि विधानसभा निवडणूकीत चांगले यश मिळवले. आपल्या गुणांप्रमाणेच अन्य मुर्खांच्या दुर्गुणांचाही चतुराईने वापर करण्यात केजरीवाल मुरब्बी असल्याने, त्यांनी कॉग्रेसच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. मग माध्यमातले मित्र हाताशी धरून आपली देशव्यापी प्रतिमाही निर्माण करून घेतली. पण उतावळेपणा व अहंकार यात गुरफ़टलेल्या केजरीवालना लौकरच प्रसिद्धीने सर्वकाही साधत नसल्याची जाण आली. कारण सत्ता सोडून पंतप्रधान व्हायला निघालेल्या या उतावळ्याला, दिल्लीकरांनीच पाणी पाजले. मग पुन्हा प्रयत्नपुर्वक त्यांनी आपल्या चुका सुधारत दिल्लीत यश मिळवले. पण जित्याची खोड म्हणतात, तशी हरदासाची कथा मुळपदावर आलीच. कपील शर्माची गोष्ट वेगळी नाही. त्यालाही आपण एकट्यानेच सर्व काही करू शकतो, अशा अहंकाराने पछाडलेले असते.

कपील शर्माचा कार्यक्रम देशव्यापी लोकप्रिय झाला, तरी तो त्याच्या एकट्यावर अवलंबून नव्हता. त्यात इतरही लहानमोठे कलाकार होते आणि त्यांच्या एकत्रित कलेमुळे ती लोकप्रियता मिळू शकलेली होती. पण कपीलला आपण कुठल्याही दगडाला घेऊन कार्यक्रम चालवू शकतो, अशा मस्तीने घेरले आणि त्यातून सहकार्‍यांचा अपमान करण्यापासून अरेरावीपर्यंत वेळ गेली. सहाजिकच त्यांच्या आपसात खटके उडू लागले. एका क्षणी बाकीच्या बहुतांश कलाकारांनी कपीलवर बहिष्कार घातला आहे. त्यांच्याअभावी अधिक नावाजलेले नकलाकार घेऊन कपीलने दोनतीन भाग करून बघितले. पण त्यातून काहीही साध्य झालेले नाही, कारण एका आठवड्यात त्या कार्यक्रमाची लोकप्रियता रसातळाला गेलेली आहे. असेच होत राहिले तर मालिका बंद करावी लागेल, असा इशारा वाहिनीला द्यावा लागला. नेमकी तशीच काहीशी अवस्था केजरीवालची आहे. आम आदमी पक्षाची स्थापना करताना मागे राहून काही जबाबदार्‍या पेलणारे व केजरीवाल यांनाच प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेऊ देणारे; अतिशय हुशार असे दोन सहकारी होते. पण यशाची नशा डोक्यात गेलेल्या केजरीवालना संघटनात्मक यशावर आपल्या एकट्याची मक्तेदारी हवी होती. म्हणूनच त्यांनी अन्य दोन्ही सहकार्‍यांचा परस्पर काटा काढण्यापर्यंत मजल मारली. योगेंद्र यादव यांच्यासारखा राजकारण व निवडणुकांचा व्यासंगी अभ्यासक आणि कायद्याचा कीस पाडून न्यायाचे लढे देणारा वकील प्रशांत भूषण; अशा दोघांशी केजरीवाल यांचा लौकरच खटका उडाला. आम आदमी पक्षाचे सर्व यश आपल्या एकट्याचे आहे आणि त्यामध्ये अन्य कोणी काडीमात्र किंमतीचा नाही, अशा अहंकारामुळेच या दोन सहकार्‍यांना केजरीवालनी पळवून लावले. त्यांच्या कुठल्याही महत्वाकांक्षा नसल्याने त्यांचे फ़ार मोठे नुकसान झालेले नाही. पण आज केजरीवालना त्याच दोघांची गरज भासत असेल.

प्रशांत भूषण यांच्यासारखा वकील हाताशी राहिलेला नाही आणि यादव यांच्यासारखा हुशार रणनितीकार सोबत राहिलेला नाही. त्याचीच किंमत केजरीवाल यांना पंजाब व गोव्यात मोजावी लागलेली आहे. आशुतोष वा आशिष खेतान यासारखे बाजारबुणगे सोबत घेऊन, केजरीवाल अतिशय हास्यास्पद होऊन गेले आहेत. वाहिन्यांवर बेताल बकवास करणारे असे सहकारी, आता केजरीवालना संकटातून बाहेर काढू शकत नाहीत. कपीलचीही गोष्ट तशीच आहे. त्यालाही दिर्घकाळ सहकार्यातून यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे सहकारी दुरावले आहेत आणि त्याचा कमाल यशस्वी झालेला शो डबघाईला आलेला आहे. दोघेही योगायोगाने दिल्लीकर आहेत आणि दोघेही आपल्याच कर्माने रसातळाला जाण्याची वेळ आलेली आहे. तिकडे कपील कसाबसा आपला शो पुढे रेटण्यासाठी धडपडतो आहे आणि केजरीवाल आपल्या पक्षाच्या लोकप्रियतेला टिकवण्यासाठी मर्कटलिला करण्यात गर्क आहे. पंजाबच्या मतदाराने त्याला नाकारले आहे आणि गोवेकरांनी वस्त्रहरण करून माघारी धाडलेले आहे. हातात आलेल्या अपुर्व संधीचे सोने करण्याची दोघांनी कशी माती केली, त्याचा हा अजब नमूना आहे. कपील वा केजरीवाल यांना आत्मकेंद्री व अहंकारी भावनेने जमिनदोस्त व्हायची पाळी आणलेली आहे. कपील आपल्या विनोदी शैलीत इतरांचा सातत्याने अवमान करीत होता, केजरीवालना तर इतरांना अपमानित करणे म्हणजेच महान राजकारण असल्याच्या समजुतीने पछाडलेले आहे. त्यामुळेच लोकांना हसणार्‍या या दोघांवर आता स्वत:च हस्यास्पद ठरायची वेळ आलेली आहे. विचित्र साम्य सांगायचे तर एकाने राजकारणाचाच विनोद करून टाकला आहे, तर दुसर्‍याच्या विनोदी कार्यक्रमाला अंतर्गत राजकारणाने शोकांतिका करून टाकलेले आहे. उतावळेपणा नशिबाला कसे गर्तेत लोटून देतो, त्याचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण असू शकत नाही.

No comments:

Post a Comment