Sunday, April 9, 2017

प्रामाणिक यंत्रे, बदमाश माणसे

Image result for evms

विश्वनाथ नावाचा एक क्रिकेटपटू अत्यंत शैलीदार फ़लंदाज होता. काही सामन्यात त्यानेही भारताचे नेतृत्व केलेले होते. १९७८ च्या सुमारास भारतात इंग्लंडचा नवखा क्रिकेट संघ भारताच्या दौर्‍यावर आला असताना, विश्वनाथ कर्णधार होता. माईक ब्रियर्लीच्या त्या संघात आयन बोथम हा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू होता. त्याचा एक झेल घेतला गेला आणि तो बाद असल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. तर त्या निर्णयावर विश्वनाथने आक्षेप घेतला. आपण घेतलेला झेल खरा नसल्याचे सांगत, त्याने बोथमला जीवदान दिलेले होते. चेंडू हाती येण्यापुर्वी जमिनीला लागलेला होता, अशी प्रामाणिक कबुली देऊन विश्वनाथने बोथमला पुन्हा खेळू देण्याची पंचाला विनंती केली होती. त्या डावात बोथमने मग शतक झळकवले आणि भारताला त्याच सामन्यात पराभव पचवावा लागला होता. थोडक्यात कोसळणार्‍या इंग्लिश फ़लंदाजीला जीवदान देण्याचा प्रामाणिकपणा, भारतीय कर्णधाराने दाखवला होता. प्रामाणिकपणाची व्याख्या अशी असू शकते. आपल्याच अनवधानाने केलेल्या अपीलाला पंचाने स्विकारले, तरी विश्वनाथने खेळातील सभ्यता राखून बोथमला जीवदान दिले होते. बदल्यात पराभव पत्करला होता. आज तितकी सभ्यता व प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये राहिलेला नाही, किंवा सार्वजनिक जीवनातही राहिलेला नाही. किंबहूना आता तर बदमाशी म्हणजेच सभ्यता वा प्रामाणिकपणा असल्याचा छातीठोक दावा करणारेही महाभाग उदयास आलेले आहेत. त्यात सर्वात वरचा क्रमांक भारतीय राजकारणाला शुद्ध करायला आलेल्या अरविंद केजरीवाल व त्यांच्या टोळीचा लागतो. कारण सदोदीत खोटे कसे बोलावे आणि रेटून खोटारडेपणा कसा करावा, त्याची प्रात्यक्षिकेच हा माणुस अहोरात्र देत असतो. ‘राजनिती किचड है, तो उसमे उतरके उसे साफ़ करना पडेगा’ अशी भाषा वापरत राजकारणात आलेल्या केजरीवालनी आता भल्याभल्या बदमाशांनाही लाजेने मान खाली घालण्याची पाळी आणली आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहूमत मिळेल आणि सत्ताही मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. आरंभीच्या मतचाचण्यांनी त्याची ग्वाही दिलेली होती. पण मतदान होऊन निकाल लागण्यापर्यंत आपल्या उचापतींतून केजरीवाल यांनी पक्षाची प्रतिष्ठा व पत पुरती धुळीस मिळवली. परिणामी त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी आता मतदानयंत्रात गफ़लत असल्याचा शोध लावला आहे. उत्तरप्रदेशच्या निकालांनी हादरलेल्या बहूजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी सर्वात आधी तसा आरोप निकाल लागताच केला होता. मग दोन दिवस उलटल्यावर केजरीवाल यांनी तो उचलून धरला आणि आता त्यावरून काहूर माजले आहे. कारण पंजाब गमावल्यानंतर दिल्लीतही आपला पाया ढासळला असल्याच्या भितीने या भामट्याला पछाडले आहे. दिल्ली हे नागरी राज्य असून त्याची तीन महापालिकात विभागणी झालेली आहे. त्यासाठी दोन आठवड्यात मतदान व्हायचे असून, दोन वर्षात दिल्लीच्या कारभाराचे दिवाळे वाजवले, त्याची किंमत केजरीवालना मोजावी लागणार आहे. तो पराभव समोर दिसत असताना मतदान यंत्रात गफ़लत करून भाजपा दिल्ली जिंकणार असल्याचा कांगावा केजरीवाल यांना करायचा आहे. त्यातही काही नवे नाही. त्यांचा असा आरोपही नवा नाही. कारण दोन वर्षापुर्वी त्यांनी असाच आरोप केला होता. पण त्यांच्यापाशी विश्वनाथ सारखा प्रामाणिकपणा नव्हता. म्हणूनच हा भामटा तेव्हाचे निवडणूक निकाल लागताच आपले आरोप पुर्णपणे विसरून गेला होता. केजरीवाल यांच़्या आरोपात किंचीत तथ्य असते, तर त्यांनी तेव्हाच दिल्लीचे मुख्यमंत्रीपद नाकारून, नव्या मतदानाची मागणी केली असती. पण आपल्याला जिंकून देणारे निकाल आल्यावर केजरीवाल आपलेच आरोप विसरून गेले होते आणि आता पराभवाचे भय भेडसावू लागल्यावर त्यांना जुनाच आरोप आठवला आहे.

दोन वर्षापुर्वी दिल्ली विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूका घेण्यात आल्या. त्याच्या काही दिवस आधी दिल्ली कंटोनमेन्ट बोर्डाच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यात केजरीवालच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, तेव्हा त्यांनी मतदान यंत्रात गफ़लत असल्याचा दावा केला होता. आज त्यांचा जो आरोप आहे, तोच तसाच्या तसा आरोप त्यांनी दिल्ली विधानसभेच्या मतदानाला आठवडा शिल्लक असताना केला होता. त्या आरोपात तथ्य असते, तर केजरीवाल व आम आदमी पक्ष विधानसभेत ७० पैकी ६७ जागा जिंकू शकला नसते. कारण इतक्या यशाची अपेक्षा त्यांनीही केलेली नव्हती. देशात यापुर्वी कुठल्या पक्षाने संपादन केलेले नसेल, असे यश त्यात केजरीवालनी मिळवले होते. ७० पैकी ६७ आमदार व ५२ टक्के मते त्यांच्या पक्षाला मिळाली होती. आधीचा आरोप खरा असता व त्याविषयी केजरीवालना खात्री असती, तर त्यांनी तेव्हाचाही निकाल फ़ेटाळून लावायला होता. आपल्याला अपेक्षेच्या पलिकडे मिळालेली मतेही यंत्रातील गफ़लत म्हणून नाकारायला हवी होती. पण तसे झाले नाही. त्यांच्या पक्षाला इतके अनपेक्षित यश मिळाल्यावर मात्र त्यांना तो लोकशाहीचा विजय वाटला. यापेक्षा भामटेगिरी दुसरी असू शकत नाही. तशी संतप्त प्रतिक्रीया तात्कालीन निवडणूक आयुक्त कुरेशी यांनीही दिलेली होती. कुरेशी व केजरीवाल अशा दोघांच्या ट्वीटचे नमूने आजही उपलब्ध आहेत. खरेतर तेव्हा कोणीही असा आरोप केल्यास वा आक्षेप घेतल्यास लोकांचा विश्वास बसला असता. कारण केजरीवाल यांनी असे कुठलेही कर्तृत्व गाजवले नव्हते, की लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना मते व जागा बहाल कराव्यात. तेव्हा इतका संशयास्पद निवडणूक निकाल यापुर्वी कुठलाच लागलेला नव्हता. कौल आपल्याला मिळाला मग तीच व्यवस्था व यंत्रे योग्य असतात, हा दावाच भामटेगिरीचा पुरावा असतो.

जी कहाणी केजरीवालची आहे, तीच मायावती वा अन्य पक्षांचीही आहे. २००७ सालात उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत कुणालाच बहूमत मिळण्याची शक्यता व्यक्त झाली नव्हती. किंवा मतचाचण्याही तशी शक्यता दाखवत नव्हत्या. तरीही मायावतींना एकहाती बहूमत मिळाले आणि तेव्हाही यंत्रातूनच मतदान झालेले होते. मग २०१२ सालात पुन्हा विधानसभेची निवड झाली, तेव्हा मायावतींना पाडून समाजवादी पक्ष जिंकला. तेव्हाही कुणाला बहूमताची अपेक्षा नव्हती. पण मुलायमच्या पक्षाने बहूमत जिंकले. तेव्हाही मतदान यंत्रे अचुक होती. आताही पंजाबमध्ये भाजपा आघाडीत असूनही अकाली दलाचा पराभव झालेला आहे. गोव्यात तर भाजपाचेच सरकार होते. तरी तिथे भाजपाने बहूमत गमावलेले आहे. या दोन्ही राज्यात यंत्रांचा गोंधळ करून भाजपाला यश मिळवता आलेच असते. निवडणूक आयोग भाजपाला फ़ायदा देण्यासाठी गफ़लत करणार असेल, तर अन्य राज्यात त्याने उत्तरप्रदेशची पुनरावृती कशाला केली नाही? वेगवेगळ्या राज्यात यंत्रांनी भिन्न स्वरूपाची गल्लत कशी केली असेल? पण भामट्यांना अशा तर्कशुद्ध खुलाश्याची गरज नसते. बंगाल वा तामिळनाडूतही भाजपाला मोठा नाही तरी लक्षणिय विजय गतवर्षी मिळवता आलाच असता. तामिळनाडू वा केरळात दोनचार जागी आपले आमदार निवडून आणण्याची चतुराई यंत्रातून नक्कीच करता आली असती. सत्ताधारी पक्षालाच अशा गफ़लती करता येत असतील, तर प्रत्येक राज्यात सत्तेतला पक्षच पराभूत कशाला झाला आहे? जेव्हा लाखो यंत्रे वापरली जातात, तेव्हा त्यातला किरकोळ काही यंत्रात गफ़लत होऊ शकते. शास्त्र विज्ञान कितीही प्रगत असले तरी त्यातही चुका राहू शकतात. उत्पादन केलेले प्रत्येक यंत्र तितकेच अचूक असत नाही. सहाजिकच हजारात एखादे यंत्र गफ़लत करू शकते. त्यामुळे सर्व यंत्रे गडबडीची ठरत नसतात.

केजरीवाल यांच्या पक्षाच्या एका मंत्र्याने खोटे प्रमाणपत्र सादर केले, म्हणून त्या पक्षाचा प्रत्येक आमदार वा मंत्री तसाच खोटी प्रमाणपत्रे सादर करणारा ठरवता येत नाही. त्यांच्याच दुसर्‍या मंत्र्याने साधे शिधापत्रक मिळवून देण्यासाठी महिलांचे लैंगिक शोषण केले. म्हणून केजरीवाल यांच्यासकट प्रत्येक मंत्री वा आमदारावर तसाच्या तसा आरोप ठेवून त्यांना हाकलून लावायचे काय? ही यंत्रे सामान्य गरजेची आहेत. याहीपेक्षा अधिक सुटसुटीत व अचुक यंत्रे अवकाशात पाठवली जातात. प्रत्येक यंत्र अचुक असल्याची तपासणी करून घेतलेले असले, तरी त्यातही गडबडी होतात. म्हणूनच कल्पना चावला ज्या यानाने गेली त्याला अपघात झाला. पण त्यामुळे सर्वच्या सर्व अवकाश याने गफ़लतीचीच बनवली आहेत, म्हणून अवकाश मोहिम रद्द करता येत नाही. जेव्हा अशा चुका वा गफ़लती आढळून येतात, तेव्हा त्यात झालेली चुक सुधारून नव्या सोयी केल्या जातात. कुठलीही व्यवस्था चुका सुधारण्यातूनच विकसित होत असते. आजवरच्या मतपत्रिकांच्या निवडणुकातही असे आरोप झाले आहेत. त्यातूनच अधिकाधिक बिनचुक व्यवस्था म्हणून मतदान यंत्राचा वापर सुरू झालेला आहे. मानवी हस्तक्षेपाला किमान संधी राहिल, अशी व्यवस्था त्यामुळेच विकसित करावी लागलेली आहे. आणि गफ़लतीचाच विषय असेल, तर आरोपकर्त्यांचेच चारित्र्य तपासून बघता येईल. जिथे म्हणून पळवाट काढून गफ़लत करण्याची संधी असेल, तिथे त्याचा पुरेपुर लाभ उठवणारेच कांगावा करीत आहेत. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना किती गफ़लती केल्या आहेत? त्याची प्रत्येक वेळी कोर्टातच झाडाझडती होत राहिली आहे. मायावती वा मुलायम त्यापेक्षा सोवळे नाहीत. त्यांना अशा गफ़लती यंत्रात दिसत असतील, तर नवल नाही. मनि वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणतात. सत्ता हाती असताना त्यांनी ज्या गफ़लती केल्यात, तेच भुत आता त्यांच्या मानगुटीवर बसलेले असावे.

उत्तरप्रदेशात वा उत्तराखंडात भाजपाला मिळालेल्या अपुर्व यशाची कारणमिमांसा वेगळी आहे. आजवर या दोन्ही राज्यात पन्नास टक्केपेक्षा कमी मतदान व्हायचे. तेच गणित अमित शहांनी बदलून टाकलेले आहे. त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवली व आपल्या अधिकाधिक मतदाराना घराबाहेर काढण्यावर भर दिल्याने भाजपाला असे मोठे यश मिळालेले आहे. नुसत्या यंत्रात गफ़लत करून कुठल्याही पक्षाच्या चिन्हा समोरचे बटन दाबून भाजपाला मते फ़िरवता आली असती, तर समाजवादी पक्षाला २९ टक्के व मायावतींना २२ टक्के मते तरी कशाला मिळाली असती? भाजपालाही एकूण टक्केवारीत ४३ टक्केपर्यंत अडकण्याची गरज नव्हती. भाजपाही ७०-८० टक्के मते मिळवताना दिसला असता. अगदी कुठल्याही संगणकात चुका होतात, म्हणून संगणकीय व्यवस्था चुकीची ठरवता येत नाही. खरेच इतके शक्य वाटत असेल तर अशा लोकांनी आपल्यालाही नेत्रदीपक यश मिळाले, तेव्हा त्याचाही इन्कार करण्याची हिंमत दाखवायला हवी होती. अशा तक्रारी कागदी मतपत्रिका असतानाही बिगर कॉग्रेसी पक्षांनी केल्या होत्या. आज त्यातले अनेक पक्ष नामशेष होऊन गेले आहेत. आणिबाणीनंतरच्या निवडणूका इंदिराजी हरल्या नसत्या, किंवा नंतर जनता पक्षाचा असा दारूण पराभव झाला नसता. सुदैवाने आजही निवडणूक आयोग स्वयंभू व स्वायत्तपणे काम करीत आहे. म्हणूनच अशा शंका काढत बसण्यापेक्षा आपण जनमानसातून कशामुळे दुरावलो, त्याचे आत्मपरिक्षण अशा पराभूतांनी करणे अगत्याचे आहे. आयोगानेही केजरीवालना तोच सल्ला दिलेला आहे. यंत्रातल्या चुका काढून सुटका होणार नाही, की पुढले यश संपादन करता येणार नाही. कांगावखोरीने प्रसिद्धी जरूर मिळते. पण ज्या मतदाराने चमत्कार घडवलेला असतो, त्याला गुन्हेगार ठरवून जिंकता येत नाही. हा यंत्राचा कौल नसून मतदाराचा असल्याचे स्विकारले, तरच त्या मतदाराला जिंकण्याच्या दिशेने पाऊल पडू शकेल. अन्यथा यापेक्षाही मोठ्या पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की येईल. विश्वनाथने त्या सामन्यात पराभव स्विकारताना दाखवलेला प्रामाणिकपणा म्हणूनच मोलाचा असतो. कारण तो पुढल्या पिढीला यशाच्या वाटेवर घेऊन जातो. म्हणून आज भारत जगातला अजिंक्य संघ होऊ शकला. कारण त्यांच्या आधीच्या पिढीत विश्वनाथ सारखा प्रामाणिक कर्णधार झाला.

No comments:

Post a Comment