Saturday, April 8, 2017

शिवसेनेचे दोन किस्से

bala thackeray in court के लिए चित्र परिणाम

रविंद्र गायकवाड या शिवसेना खासदाराच्या वर्तनामुळे माजलेले काहूर एका मर्यादेपर्यंत ठिक होते. शेवटी आपण सगळेच माणूस आहोत आणि प्रत्येकाला किंचीत जरी अधिकार मिळाला, तरी त्याचा मस्तवालपणा अधूनमधून दिसत असतो. गायकवाड त्याला अपवाद असू शकत नाहीत. म्हणूनच त्यांचे वर्तन आक्षेपार्ह असू शकते. पण त्यातून सुरू झालेले राजकारण जितके त्यांच्या विरोधकांसाठी चुकीचे आहे, त्यापेक्षाही अधिक शिवसेनेसाठी घातक आहे. दुर्दैवाने त्याचे भान सेनेच्या विद्यमान नेतृत्वाला नसावे. अन्यथा त्यांनी इतक्या टोकाला या गोष्टी जाऊ दिल्या नसत्या. मान, सन्मान आणि अहंकार यात मोठा फ़रक असतो. जिथे नियमाचे उल्लंघन होते, तिथे मानवी प्रतिक्रीया भिन्न असतात. म्हणूनच कोणीतरी थोडी माघार घेऊन विषय निकालात काढले जातात. शिवसेना ही झुंजार संघटना असल्याने तात्काळ तीव्र प्रतिक्रीया देण्यसाठीच प्रसिद्ध आहे. पण ज्या पद्धतीने गायकवाड प्रकरण हाताळले गेले, त्यात उणिव राहिलेली आहे. आरंभी एका खासदाराला वाईट वागणूक मिळाली म्हणून अन्य पक्षाचेही सदस्य सेनेच्या समर्थनाला पुढे आले. त्यातून फ़ुशारून जाण्यापेक्षा सावरणे अगत्याचे होते. पण त्याऐवजी आपल्याला सर्वपक्षीय पाठीबा मिळाला अशा समजुतीने सेनेने अहंकाराला चुचकारण्याला प्राधान्य दिले. म्हणूनच आता दिवसेदिवस हे प्रकरण अंगलट येत चालले आहे., एअर इंडियाची औकात काढण्यापर्यंत मजल गेल्यावर कोणालाही सेनेच्या पाठीशी उभे रहाणे अशक्य होते. लोकशाहीत लोकमताला व पर्यायाने जनमानसातील प्रतिमेला प्राधान्य असल्याने, कुठल्या बाबतीत प्रतिष्ठा पणाला लावावी याचे तारतम्य राखावे लागते. यापुर्वीही शिवसेनाप्रमुखांनी त्याची साक्ष अनेकदा दिलेली आहे. पण ती आजच्या सेना नेत्यांनाच आठवत नसेल, तर यापेक्षा वेगळे काहीही अपेक्षीत असू शकत नाही.

विसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात सत्तांतर झाले होते आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आलेली होती. त्यात माजी शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांना गृहमंत्रीपद मिळालेले होते. सेना सोडल्यानंतर व सेनेची सत्ता आल्यानंतर त्यांना त्याचे अनेक परिणाम भोगावे लागलेले होते. मग त्यांच्या हाती गृहखाते आल्यावर भुजबळ यांनी सुडबुद्धीने एक जुने प्रकरण उकरून काढले आणि बाळासाहेबांच्या अटकेचे फ़र्मान काढले होते. बाबरी पतनानंतर मुंबईत जी दंगल उसळली, त्या काळात ‘सामना’च्या वादग्रस्त अग्रलेखाविषयी अनेक पोलिस तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या. त्याच संदर्भात कारवाईची परवानगी सरकारकडे मागण्यात आली होती. पण शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यालाही त्यातली समस्या कळत असल्याने, त्यांनी ती फ़ाईल धुळ खात पडून ठेवलेली होती. आठ वर्षांनी ती धुळ झटकून भुजबळ यांनी त्या कारवाईला परवानगी दिली आणि त्यानुसार संपादक शिवसेनाप्रमुखाला अटक करण्याचे पाऊल मुंबई पोलिसांना उचलावे लागले होते. मात्र ही अटक सोपी नव्हती, हजारोच्या संख्येने शिवसैनिक रस्त्याव्रा विरोधाला उतरला, तर मोठेच अराजक माजले असते. ती समस्या ओळखूनच मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी त्यात विलंब लावला होता. कुठल्याही गडबडीशिवाय ही कारवाई पार पाडली जावी, यासाठी संवादाचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यातच तीनचार दिवस खर्ची पडले. शिवसैनिकांना ही कारवाई पचनी पडणार नाही, हे पोलिसांनाही ठाऊक होते. म्हणूनच त्यांची अडचण दूर करण्यात खुद्द बाळासाहेबांनीच पुढाकार घेतला होता. आपल्याला पोलिस हात लावू शकत नसल्याचे सत्य स्विकारून, शिवसेनाप्रमुखांनीच आपण महापौर बंगल्यात हजर होऊ असे कळवले आणि आपल्या पाठीराख्यांना गडबड न करण्याचा आदेश दिला होता. अर्थात कोर्टात तासभरही अटक टिकली नाही.

काही तासही बाळासाहेबांना पोलिस कोठडी बघावी लागली नाही. पण अशा स्थितीत आपला अहंकार अनेकांना त्रासदायक ठरेल आणि त्यात जनतेचे भले नसल्याचे नेमके ओळखून, त्यांनी अहंकार बाजूला ठेवत कायद्याच्या प्रतिष्ठेला प्राधान्य दिले होते. कोर्टात काही मिनीटात त्यांची अटक अवैध ठरली आणि ते विजयी मुद्रेने बाहेर पडले होते. मुद्दा इतकाच, की कायद्याशी सहकार्य केल्याने बाळासाहेब छोटे ठरले नव्हते. आपल्या अटकेचे धाडस पोलिसांनाही नसल्याचे ओळखून, त्यांनी घेतलेला निर्णय म्हणूनच ऐतिहासिक ठरला होता. सेनेचे संस्थापक बाळासाहेबांपेक्षा रविंद्र गायकवाड अधिक प्रतिष्ठेचा विषय असतो, असे आजच्या सेना नेतृत्वाला वाटत असावे. अन्यथा इतक्या टोकाला गोष्टी गेल्या नसत्या. असाच आणखी एक प्रसंग आहे, भुजबळांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा! भुजबळ विरोधी नेता असतानाच्या काळात एकेदिवशी त्यांच्या सरकारी निवासावर शिवसैनिकांचा जमाव चाल करून गेला होता. मोडतोड फ़ोडाफ़ोड झालेली होती. त्यावरून मोठे काहुर माजले. तेव्हा सत्तेत युतीच होती आणि त्या प्रकरणाला आठवडा होत आल्यावर साहेबांनी संबंधित शिवसैनिकांना पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले होते. आज त्या प्रकरणाचे काय झाले ते कोणालाही आठवतही नाही. आपल्याच पाठीराख्यांना निमूट पोलिसात हजर होऊन कारवाईला सामोरे जाण्याचा आदेश देण्याचे धाडस किती राजकीय नेते आज दाखवू शकतात? साहेबांच्या आदेशानंतर पन्नासपेक्षाही अधिक शिवसैनिकांनी पोलिसांना शरण जाण्याचे पाऊल उचलले होते. अशा प्रकरणात प्रतिष्ठा किती पणाला लावायची, याचे तारतम्य महत्वाचे असते. प्रत्येक बाबतीत तुम्ही प्रतिष्ठा पणाला लावत गेलात तर प्रतिष्ठाच शिल्लक उरत नाही. काही किरकोळ प्रकरणे असतात व त्यात दोन पावले मागे आल्याने कमीपणा येत नाही.

अनेकदा दोन पावले मागे आल्याने तुमची प्रतिष्ठा अधिक वाढत असते. उपरोक्त दोन्ही प्रकरणात साहेबांच्या शब्द व निर्णयाने कायद्याची प्रतिष्ठा राखली होती. पण त्यातून त्यांची प्रतिष्ठाही अधिक वाढलेली होती. बाळासाहेब स्वत:ला कायद्याच्या वरचे मानतात व कायदा जुमानत नाहीत, अशी त्यांच्यावर कायम टिका होत राहिली. पण प्रसंगी अशा निर्णयातून त्यांनी त्यांच्यापुढे अगतिक झालेल्या कायद्यालाही प्रतिष्ठीत करण्याने, आपली प्रतिष्ठा वाढवली होती. पर्यायाने त्यांच्यामुळे शिवसेनेलाही गुंडांचा पक्ष म्हणणार्‍यांना चपराकही बसलेली होती. राजकारणात व सर्वाजनिक जीवनात, जनमानसातील प्रतिमेला सर्वाधिक महत्व असते. त्याचे भान राखूनच शिवसेनाप्रमुखांनी निर्णय घेतले. कुठल्या विषयात प्रतिष्ठा पणाला लावायची व कुठे दोन पावले मागे यायचे, याच्या तारतम्यानेच त्यांना अढळपदी नेवून बसवले होते. रविंद्र गायकवाड तरी संसदेची प्रतिष्ठा वा विशेषाधिकाराची गोष्ट बोलू शकतात. बाळासाहेबांकडे कुठलेही घटनात्मक वा सत्तापद नव्हते. तरीही त्यांच्यासमोर कायद्यालाही नतमस्तक व्हावे लागलेले होते. त्याचेही कारण समजून घ्यायला हवे. आपल्या समोर कायदा वा सत्ता नतमस्तक होऊ शकते,. पण त्या सत्तेची प्रतिष्ठाही आपणच राखायला हवी, याचेही भान त्या माणसाला होते. म्हणूनच त्यांचा दबदबा होता. साहेब कितीही मोठे असले तरी ते प्रशासनिक अधिकारी वा कायद्याच्या प्रतिष्ठेची पायमल्ली करीत नाहीत, याचाही धाक खुद्द कायद्याच्या अंमलदारांनाही होता. गायकवाड किंवा एअर इंडियाची औकात काढणार्‍यांना त्याची पुरेशी जाणिव असती, तर हे काहूर इतके माजलेच नसते. आपण संसदसदस्य आहोत अशी कवचकुंडले काढणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, अशी कुठलीही सवलत साहेबांना नव्हती. शिवाय आपल्या प्रतिष्ठेसाठी त्यांना तेच शिवसेनाप्रमुख असल्याचेही कुणाला वारंवार सांगावे लागत नव्हते.

1 comment:

  1. शिवसेनेचे खासदार, मा. उद्धवजींचे मुख्य सल्लागार व पत्रकार संजय राऊत यांनी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक (सीएमडी) यांची 'औकात' काय आहे असा जाहीर प्रश्न विचारला आहे. त्यानुसार माहिती घेतली असता सीएमडी अश्वनी लोहाणी यांची औकात पुढीलप्रमाणे असल्याचे दिसून आले-

    मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन या चारही विषयांत एकाच दर्जाच्या अभियांत्रिकी पदव्या मिळवल्याबद्दल त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.

    त्याचप्रमाणे, 'फेअरी क्वीन्स एक्स्प्रेस'चे जगातील सर्वांत जुने वाफेचे रेल्वे इंजिन चालू स्थितीत आणल्याबद्दल त्यांचे नाव गिनिज बुकात नोंदवले गेले आहे.

    त्यांनी रेल्वेच्या दिल्ली विभागाचे डीआरएम म्हणून, राष्ट्रीय रेल म्युझियमचे संचालक म्हणून, रेल्वेतच पर्यायी इंधन विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे आयुक्त आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून, भारत पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
    एवढा कर्तबगार माणूस... हे खर असेल तर ???

    ReplyDelete