दिल्लीच्या महापालिका निकालानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षात एकजुटीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात मतविभागणीचा जुनाच सिद्धांत पुढे करण्यात आला आहे. अशारितीने मतविभागणी झाली नसती, तर भाजपाला इतके मोठे यश मिळाले नसते, हा त्यामागचा युक्तीवाद आहे. जणू नव्याने काही सिद्धांत मांडला असावा, अशी होत चर्चा ऐकताना हसू येते. कारण ती चर्चा करणारे वा त्यात तावातावाने बोलणारे कोणी दुधखुळे नाहीत. त्यांनी मागल्या दोनतीन दशकातील राजकारण जवळून बघितले आहे. पन्नास वर्षातले राजकारण व निवडणुका अभ्यासलेल्या आहेत. सहाजिकच मतविभागणीनेच आजवरच्या इतिहासात कुठल्या तरी एका पक्षाला मोठे यश मिळत गेले, ही बाब खुप जुनी आहे. नेहरूंच्या काळापासून कॉग्रेस कधीही निम्मेहून अधिक मते मिळवून सत्तेत आली, असे झालेले नाही आणि मोदींपेक्षाही कमी टक्केवारीत सोनियांच्या काळातील कॉग्रेसने देशाची सत्ता उपभोगली’ हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे. म्हणूनच मोदी वा आजचा भाजपा मतविभागणीमुळे जिंकतो, यात नवे काहीच नाही. तेच भारतीय निवडणुकात जिंकण्याचे वा हरण्याचे शास्त्र झालेले आहे. मग हा मतविभागणीचा युक्तीवाद आला कुठून? तर आपला पराभव लपवण्याची ती केविलवाणी कसरत आहे. आज जी चर्चा मोदी वा भाजपाच्या विजयाचे विश्लेषण करताना होत असते, तीच चर्चा तब्बल अर्धशतकापुर्वीची आहे. तेव्हा त्याला शह देण्याचा पहिला सिद्धांत महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मांडला व यशस्वी करून दाखवला गेला होता. १९५७ च्या दुसर्या सार्वत्रिक निवडणूकीत सर्व मतभेद बाजूला ठेवून बिगरकॉग्रेस पक्ष एकत्र आले आणि त्यांच्यासमोर कॉग्रेसचा महाराष्ट्रात सुपडा साफ़ झाला होता. तेव्हा भाजपा उदयास आला नव्हता किंवा मोदींनी राजकारणात प्रवेशही केलेला नव्हता.
१९५० च्या दशकात भाषावार प्रांतरचना करण्यात आली, तेव्हा मराठी भाषिकांवर अन्याय झाला होता. मराठी भाषिक राज्य नाकारून गुजराती व मराठी लोकांचे एक द्विभाषिक राज्य म्हणून मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. त्याच्या विरोधात आंदोलन सुरू झाले होते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फ़ेडरेशनने सहभागी व्हावे, म्हणूनही प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांची एक मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन कॉग्रेसला पराभूत करण्याची कल्पना सर्वप्रथम मांडली. तत्व आणि विचारांचे मतभेद खुंटीला टांगून एकत्र या, असा सल्ला त्यांनीच दिला होती. प्रबोधनकारांनी ती मुलाखत प्रसिद्ध केल्यावर महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे पक्ष एकवटले होते. हिंदू महासभेपासून कम्युनिस्ट समाजवादी पक्षापर्यंत जमलेली ही एकजुट, कॉग्रेसला पराभूत करून गेली होती. कारण त्यांच्या मतांची विभागणीच कॉग्रेसला मोठे यश मिळवून देत होती. त्याच संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ नावाचाही एक पक्ष होता, त्यालाच आज भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखले जात असते. त्यानंतर दिर्घकाळ अशी एकजुट कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी होत राहिली आणि मतविभागणी हाच त्यातला प्रमुख मुद्दा होता. मात्र अशा रितीने कॉग्रेसला पराभूत केल्यावर आघाडीतले पक्ष कधी एकत्र नांदले नाहीत आणि अल्पावधीतच त्यांनी फ़ाटाफ़ुट करून मतदाराचा नित्यनेमाने भ्रमनिरास केलेला आहे. त्यालाच कंटाळून त्यापैकी एक असलेल्या जनसंघीयांनी, पुढल्या काळात कॉग्रेसला पर्याय होण्यासाठी कंबर कसली. त्यालाच आज भाजपा म्हणतात. मोदींनी त्याच मार्गाने कॉग्रेसमुक्त भारत म्हणून हा पल्ला गाठलेला आहे. तर आता त्यांच्याच विरोधात जुने कॉग्रेसविरोधक आघाडीसाठी त्या जुन्या एकजुटीचा सिद्धांत मांडत आहेत. कशी मजा आहे ना?
कालपरवापर्यंत जे लोक कॉग्रेसला मतविभागणीचा लाभ मिळू नये, म्हणून आघाड्या करत होते आणि मोडतही होते, तेच आता भाजपाच्या विरोधातली मतांची बेरीज मांडून नवेच काही केल्याची भाषा बोलत आहेत. त्यांना कोणाला पराभूत करायचे आहे आणि कशासाठी पराभूत करायचे आहे, त्याचाही थांगपत्ता लागलेला नाही. ज्या पक्षांनी आयुष्यभर कॉग्रेसच्या विरोधात आघाड्या करण्यात धन्यता मानली व आपली बुद्धी खर्ची घातली, त्यांना आता तोच प्रयोग भाजपाच्या विरोधात करायचा आहे. पण तसे असेल आणि त्याचे नेतृत्व कॉग्रेसच करणार असेल, तर मुळात काही दशकापुर्वी कॉग्रेसला संपवण्याची भाषा या पक्षांनी कशाला केलेली होती? त्यातले काही पक्ष अधूनमधून कॉग्रेस सोबतही गेलेले आहेत. कायम त्यांनी कॉग्रेसला सत्तेत राखायचा प्रयत्न केला असता, तर भाजपाला इतके यश मिळाले नसते वा मोदींना पंतप्रधानपदी विराजमान होता आलेच नसते. सेक्युलर म्हणून त्यांना कॉग्रेस जिंकलेली हवी असेल, तर त्याच कॉग्रेसला खिळखिळी करण्यासाठी त्यांनीच यापुर्वी मोदी वा भाजपाला साथ तरी कशाला दिली होती? तेव्हा मतविभागणीचा लाभ उठवत कॉग्रेस कायम सत्तेत येत राहिलेली होती. अशा सेक्युलर कॉग्रेसचे खच्चीकरण करायला याच पक्षांनी १९९० नंतरच्या काळात भाजपाशी हातमिळवणी कशाला केलेली होती? त्यांनी भाजपाला तेव्हा साथ दिली नसती, तर तो पक्ष आज इतका संघटित झाला नसता किंवा स्वबळावर सत्ता संपादन करू शकला नसता. पण तसे झाले नाही. काल कॉग्रेसला पाडण्यासाठी यांनीच भाजपाशी हातमिळवणी केली आणि आता भाजपा सत्तेत आला, तर त्याला संपवण्यासाठी ते कॉग्रेसला मदत करायला निघाले आहेत. मग या पक्षांना काय हवे आहे? की त्यांना राजकारण म्हणजे लोकभावनेशी निव्वळ खेळ करण्यातच रस आहे? भाजपाला पाडून काय साधायचे आहे? पुन्हा कॉग्रेस सत्तेत हवी आहे काय?
भाजपाला पाडून जनता दल वा कम्युनिस्ट पक्ष यांना आपला पक्ष सत्तेत आणायचा असेल, तरी हरकत नाही. त्यासाठी कंबर कसून कामाला लागावे. पुढल्या एक दोन दशकात तितका पल्ला गाठता येऊ शकेल. भाजपाने दोनतीन दशके तशी मेहनत घेऊन स्वपक्षाचा अनेक राज्यात विस्तार केला आणि आज स्वबळावर बहूमत संपादन केलेले आहे. कुठल्याही स्थितीत कॉग्रेसशी हातमिळवणी करायची नाही व पर्याय म्हणून उभे रहायचे, हा सिद्धांत समोर ठेवून भाजपाने हा पल्ला गाठलेला आहे. तेच अन्य कुठलाही पक्ष करू शकतो. निवडणूका तात्कालीन असतात. पक्ष संघटनेचे काम अखंड चालू असते. भाजपाने तेच लक्षात घेऊन काम केल्याने त्याला इतका मोठा पल्ला गाठता आला. जिथे शक्य होईल तिथे व जेव्हा आवश्यक असेल तिथे, अन्य पक्षांच्या मदतीने कॉग्रेस विरोधात राहून आपल्या पक्षाचा विस्तार भाजपा करीत गेला. परिणामी कॉग्रेसला पर्याय निर्माण झाला. आघाडी ही मतविभागणी टाळण्यापुरती न करता, आपल्या पक्षाचा विस्तार करून कॉग्रेसला पर्याय होण्याचे उद्दीष्ट भाजपाला इथपर्यंत घेऊन आले आहे. कॉग्रेस असो किंवा अन्य सेक्युलर पक्षांनाही तसे करणे शक्य आहे. अर्थात तोंडाची वाफ़ दवडून वा वाचाळतेने तो पल्ला गाठता येणार नाही. कष्ट घ्यावे लागतील, कार्यकर्ते गोळा करावे लागतील आणि अखंड मेहनत घ्यावी लागेल. तर भाजपाला पराभूत करणे अशक्य नाही. त्यात नुसती मतविभागणी टाळून काहीही होणार नाही. ती तात्पुरती गोष्ट आहे. कायम निवडणुका जिंकणे वा लोकमताचा पाठींबा मिळत रहाणे अगत्याचे असते. अन्यथा निवडणूका जिंकण्यासाठी केलेल्या आघाड्या, ही राजकीय भुरटेगिरी असते आणि आजकाल मतदार त्याला फ़सत नाही. म्हणूनच अखिलेश-राहुल एकत्र येऊन काहीही साध्य झाले नाही. मग तोच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर कितीसा उपयोगी ठरेल?
No comments:
Post a Comment