Saturday, April 29, 2017

मुर्ख मतदाराचे शहाणपण

EVM के लिए चित्र परिणाम

लोकशाहीमध्ये जनता हीच राजा असते असे मानले जाते. कारण जनतेच्या मतांवर वा इच्छेनुसार जे कोणी निवडून येतात, ते औटघटकेचे राजे असतात. त्यांना ठराविक मुदतीसाठी सत्ता सोपवलेली असते आणि मुदत संपताच त्यांना पुन्हा मतदाराच्या कसोटीला उतरावे लागत असते. त्याला मतदान म्हणतात. अशा मतदानात जो बाजी मारतो, त्यालाच सत्ता मिळते. त्या मतदाराला म्हणूनच खुश राखावे लागते, किंवा त्याचा विश्वास संपादन करावा लागतो. ते काम सोपे नाही. हातात सत्ता आली म्हणून अरेरावी करणारे वा सत्तेमुळे अहंकाराच्या आहारी जाऊन मस्तवालपणा करणारे, त्या स्पर्धेत मागे पडत जातात. जोवर सत्ता हाती असते, तोवर त्यांची मस्ती चालू शकते. पण दुर्दैव असे असते, की सत्ता गमावल्यानंतरही अनेकांना त्या मस्तीतून वा नशेतून बाहेर पडता येत नाही. आपल्याला नाकारणारी जनता अथवा मतदारच त्या मस्तवालांना मुर्ख वाटू लागतो. सहाजिकच त्यातून असे नेते व पक्ष जनतेपासून अधिकच दुरावत जातात आणि पराभवाखेरीज त्यांच्या वाट्याला काहीही येऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या यशाकडे अशाच नजरेने बघणार्‍यांना म्हणूनच मतदार मुर्ख वाटला, किंवा वहावत गेल्याचे भास झाल्यास नवल नाही. वास्तवात अशा लोकांचा जनतेशी संबंध किती तुटला आहे, त्याचीच साक्ष असे शहाणे देत असतात. अर्थात त्यामुळे जिंकणार्‍यांचे वा जनतेचे कुठलेही नुकसान होत नाही. अशाच शहाण्यांना सत्तेपासून वंचित व्हावे लागत असते. नुसत्या शिव्याशाप देत बसण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीही रहात नाही. त्यांची एकच चुक होत असते आणि ती म्हणजे ते चुकत नसल्याचा असलेला दृढ समज होय. एकदा असा समज करून घेतला, मग चुकांखेरीज हे लोक दुसरे काही करू शकत नाहीत आणि त्याच चुकांची किंमत मोजत रहातात. महाराष्ट्रात शिवसेनेचे काहीसे तसेच होत चालले आहे.

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. तिथे आज भाजपाने आपल्याशी बरोबरी करण्यापर्यंत कशाला व कशी मजल मारली, त्याचा शोधही घेण्याची शिवसेनेला गरज वाटलेली नाही. अशा स्थितीत चंद्रपूर, परभणी व लातूरमध्ये भाजपाने इतके यश कशामुळे मिळवले, त्याचा उलगडा सेनेला कदापि होऊ शकणार नाही. म्हणून तर सेनेने त्याचे सोपे विश्लेषण केले आहे. या पालिका मतदानात सेनेला पराभव पत्करावा लागला किंवा पिछेहाट झाली, त्याला संघटना वा नेतृत्व जबाबदार नसून सामान्य मतदारच कारणीभूत असल्याचा शोध त्यांनी लावला आहे. चांगले काम वा गुणवत्ता दुर्लक्षून नुसत्या देवेंद्र व नरेंद्र यांच्या जादूला मतदार बळी पडत असल्याचा निष्कर्ष सेनेने काढला आहे. किंबहूना तसाच निष्कर्ष दिल्लीत निकाल लागण्यापुर्वीच केजरीवाल यांनी काढला आहे. त्यांनी निकालाचीही वाट बघितलेली नाही. त्यापुर्वीच भाजपाने मतदानयंत्रात गफ़लती केल्याचा आरोप करून टाकला आहे. अवघा आठवडाभर आधी दिल्लीत विधानसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त झाले. जी जागा दोन वर्षापुर्वी अफ़ाट मताधिक्याने जिंकलेली होती. तिथेच मतदाराने आपले डिपॉझीट जप्त होण्याची वेळ कशाला आणली? या प्रश्नाचे उत्तरही केजरीवालना शोधण्याची गरज भासली नाही. आधीची संधी मातीमोल केल्यानंतर चुक मान्य करून, २०१५ साली मध्यावधीत केजरीवाल उतरले होते. तेव्हा त्यांनी दिल्ली सोडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चुक झाल्याचे मान्य केले. अधिक पुढली पाच वर्ष फ़क्त दिल्लीतच राहून काम करण्याचे आश्वासन मतदाराला दिले होते. पण वर्षभरातच त्यांना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचे वेध लागले आणि म्हणूनच मतदाराने त्यांना पोटनिवडणूकीत धडा शिकवला. त्याची पुनरावृत्ती महापालिकेतही होणार आहे. पण ती चुक मानली तर दुरुस्त होणार ना?

पण केजरीवाल यांची खासियत अशी, की ते कधी चुकत नाहीत. निदान त्यांना तरी तसे वाटते. सहाजिकच चुक झाली़च तर त्याला कोणीतरी जबाबदार असायला हवे म्हणून त्यांनी पराभवाचे खापर मतदान यंत्रावर फ़ोडले आहे. शिवसेनेने इथे त्याच्याही पुढली पायरी गाठून मतदारालाच मुर्ख ठरवण्यापर्यंत मजल मारली आहे. आपला पक्ष जिंकला तर मतदान यंत्रे योग्य व चोख असतात, असे केजरीवालना वाटते. उलट आपला पराभव झाला, मग त्यांना यंत्रात गफ़लत आढळते. हेच मध्यावधी मतदानातही झालेले होते. निकालापुर्वीच केजरीवालनी यंत्रात गोंधळ असल्याची आरोळी ठोकली जोती. पण त्यांचाच अभूतपुर्व विजय झाला. सहाजिकच मतदान यंत्रात गफ़लत असल्याचा आरोप त्यांनी सोडून दिला होता. काहीशी तशीच शिवसेनेची मानसिकता दिसते. फ़रक खापर कुणाच्या माथी मारायचे, इतकाच आहे. केजरी मतदान यंत्राला गुन्हेगार मानतात, तर शिवसेना मतदारालाच चुक मानते. भाजपाला मतदान म्हणजे मोदी फ़डणवीसांचा जादूटोणा, असा सेनेचा दावा आहे. तर केजरीवालना भाजपाला मते म्हणजे डेंग्यु चिकनगुण्याला मत असे वाटते. दोन्ही आरोप वा आक्षेप कुठल्या तर्काने तपासून घ्यायचे, इतकाच प्रश्न असतो. कारण काही प्रसंगी वा काही प्रमाणात अशाही पक्षांना लोक मते देत असतात. मग तितकेच लोक शहाणे वा रोगराईचे विरोधक असतात काय? कोणाला रोगराईचे आकर्षण असते काय? केजरीवाल वा शिवसेना यांनाही लोकांनी प्रथमच केव्हातरी मते दिलेली आहेत आणि तेव्हा तरी ते पक्ष नवे असल्याने त्यांच्या खात्यात काहीही काम मांडलेले नव्हते. त्यापेक्षाही अधिक काम जुन्या पक्षांनी केलेले असणारच. तरीही नवख्या पक्षाला मते मिळाली, याचा अर्थ तेव्हा याच पक्षांनी वा नेत्यांनी जादूटोण्याचा उपयोग केलेला असू शकतो. किंवा त्यांच्यासाठी कोणीतरी यंत्रात गफ़लत केलेली असू शकते.

मतदान यंत्र वा मतदाराला मुर्ख ठरवून आपल्या चुका झाकल्या जाऊ शकतात, असे समजणार्‍यांना भवितव्य नसते. पैसे ओतून वा गफ़लती करूनच निवडणूका जिंकता आल्या असत्या, तर कॉग्रेस कधीच पराभूत होऊ शकली नसती. अन्य पक्षांना कधी सत्ता उपभोगताही आली नसती. कारण असे सर्व जादूटोणे करण्यात कॉग्रेस इतका वाकबगार पक्ष दुसरा कुठलाच नव्हता. पैसा खर्चणे असो किंवा लबाडी करणे असो, ते कॉग्रेसला अधिक अवगत होते. पण निवडणूक आयोग स्वतंत्र व स्वायत्त असल्याने कुठल्याही चलाखीने निवडणूका जिंकणे कोणाला शक्य झाले नाही. इंदिराजींनाही आपली जादू वापरून जिंकता आले, तरी पराभवाचाही सामना करावा लागलेला आहे. १९७७ सालात इंदिराजींना सत्ताभ्रष्ट करणारा मतदार मुर्ख नव्हता आणि त्यांनाच तीन वर्षात प्रचंड बहूमताने सत्तेवर आणून बसवणारा मतदार जादूला भुलला नव्हता. मतदारापेक्षा कोणीही मोठा नाही आणि त्याच्या मतांच्या शक्तीपेक्षा कुठलीही चमत्कार घडवणारी दुसरी जादू नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. तेच सत्य नाकारणार्‍यांना आपल्या भ्रमात सुखनैव वास्तव्य करता येते. पण मतदाराला वा निवडणूका जिंकता येत नाहीत. मतदाराला भुरळ पडणारा मुर्ख ठरवून आपणच त्याला दुखावून दुर करतोय, याचेही भान सुटलेल्यांना निवडणुका जिंकायच्याच नाहीत, इतके त्या जनतेच्या लक्षात येऊ शकते. तिला भुरळ घालणारे काम वा धोरण आणण्यात आपण कुठे कमी पडतोय, त्याचा शोध घेण्यात शहाणपणा असतो. पण तोच ज्यांना सुचत नाही, ते मतदाराला मुर्ख ठरवुन आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असतात. मग ते अरविंद केजरीवाल असोत किंवा शिवसेना असो. जितकी संधी मतदार देतो, त्याचे सोने करण्यातून अधिकचे यश मिळवायची बेगमी करता येते. पण त्यासाठी सत्याचा ‘सामना’ करण्याचे धैर्य अंगी असायला हवे.

2 comments:

 1. भाऊ अत्यंत आवश्यक कान ऊघडणी..
  बाळासाहेब च्या लाडक्या चे तळतंत्र ढासळत चालले आहे.. एवढ्या मोठ्या/ महत्वाच्या राज्या चा पक्ष एवढे बेजबाबदार व जणु एखाद्या लहान मुलाने आळस आल्या नंतर काहीतरी लाडाने रेघोट्या मारल्या प्रमाणे चित्र काढावे तसच झाले आहे.
  यामुळे तिन चार वर्षे पुर्वी धुर्त पणे पक्ष चालवण्यार्या जे लक्ष घर बांधण्यात गुंतले आहे काय हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो... परंतु याचे घोर परिणाम शुन्यातुन निर्माण झालेल्या पक्षाला भोगायला लागतील याची पण जाण नाही..
  भाऊ तुम्ही अत्यंत पोटतीडकेने लिहित आहात कारण शिवसेना पक्ष बांधताना तुम्ही जवळुन बघीतला आहे.
  परंतु कान तुटत आला तरी त्यांना महाराष्ट्राच्या कृष्णाने संजलीलेची टाकलेली मोहिनी पाशातुन बाहेर पडु देत नाही..
  कदाचित पक्षनेत्रुत्वाने प्रीम्याचुर रिटायरमेंट घेऊन.. पुढील पिढीला पास दिला पाहिजे... कारण कृष्ण लिलेत अडकलेल्या राज्याला मजबुरी असेल व तसेच चालावे लागत असेल..हे देव जाणे..
  AKS

  ReplyDelete