Tuesday, April 18, 2017

विरोधी पक्षांसारखी पत्रकारिता"पत्रकार" हा विरोधी पक्षासारखा असावा - डॉ. आंबेडकर

१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्यानिमीत्ताने अनेकजण सोशल मीडियात त्यांना आदरांजली वहात असतात वा त्यांचे विचारही प्रसृत करत असतात. असेच हे एक वाक्य कोणीतरी टाकले होते. मला ते खुप आवडले आणि मनात घर करून राहिले. घटनेची निर्मिती करताना हा महापुरूष कोणता आशय भारतीय समाजात लोकशाही रुजवण्याचा मूलभूत मांडत होता, त्याची साक्षच अशा वाक्यातून मिळत असते. बाबासाहेबांची यासारखी अनेक वाक्ये वा वक्तव्ये आपल्याला अजून मार्गदर्शन करीत असतात. सवाल इतकाच असतो, की आपण त्यातले शब्द कितपत समजून घेतो आणि आशय कितीसा समजून घेतो. शब्द हे आशयवाही असतात. संदर्भ वा प्रसंगानुसार त्याचे अर्थ बदलत असतात. त्यामुळेच महापुरूषांनी कथन केलेले सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळात शब्दाची जाण असायला हवी, याचा मात्र बहुतेकांना विसर पडतो. हे विधान बाबासाहेबांनी कधी केले माहित नाही. पण आजच्या कालखंडाताल ते अचुक लागू पडणारे आहे. कारण तीच आजच्या राजकारणाची व सार्वजनिक जीवनाची मोठी समस्या होऊन बसली आहे. उपरोक्त विधान नमूद करणार्‍याचा काय हेतू होता ते ठाऊक नाही. पण माध्यमे किंवा पत्रकारिता आज विरोधी पक्षाच्या भूमिकेत उभी असलेली दिसतात आणि त्याचेच समर्थन करण्यासाठी बाबासाहेबांनाही हेच आवडले असते; असेही भासवण्याचा त्यामागचा हेतू असू शकतो. तसे असेल तर बाबासाहेबांना सुचवायचा आशय त्यात विसरला गेला, असे म्हणावे लागेल. त्यांनी पत्रकार विरोधी पक्षा‘सारखा’ असावा असे म्हटलेले आहे. पत्रकार वा पत्रकारिताच विरोधी पक्ष असायला हवी, असे म्हटलेले नाही. त्यातला ‘सारखा’ हा शब्द आज कितीसा अनुभवास येत असतो? प्रत्यक्षात माध्यमे वा पत्रकारिताच आज विरोधी पक्ष झाल्यासारखी वागताना दिसत नाहीत काय?

बारकाईने घडामोडी बघितल्या तर गेल्या दिडदोन दशकात भारतात माध्यमांचा व पर्यायाने पत्रकारितेचा अफ़ाट विस्तार होऊन गेला आहे. सामान्य माणसाकडे येणारी प्रत्येक माहिती माध्यमाच्या मार्गाने नियंत्रित करणार्‍या मोठ्या यंत्रणा उभ्या राहिल्या आहेत. अशा यंत्रणांचे नियंत्रण करणार्‍या अफ़ाट गुंतवणूकीच्या कंपन्या आकारास आलेल्या असून, त्यात मालकाच्या इशार्‍यानुसारच पत्रकार खेळवला जात असतो. त्याला कुठलेही वैचारिक वा अविष्कार स्वातंत्र्य उरलेले नाही. मग तो सत्ताधारी आहे की विरोधी पक्षासारखा आहे, असे कोण म्हणू शकतो? एकाच घटनेचे विविध वृत्तपत्रातील वर्णन वा विश्लेषण बारकाईने वाचले-ऐकले, तर त्यात तपशीलाची मोठी तफ़ावत आढळून येत असते. म्हणजे जी माहिती आहे, ती सामान्य माणसापर्यंत जशीच्या तशी येऊ शकत नाही. ज्या यंत्रणेकडून आली, त्यात गुंतलेल्या लोकांना हवी तशीच ही माहिती येत असते. गुजरात दंगल आणि त्यापुर्वी देशाच्या कानाकोपर्‍यात झालेल्या अन्य दंगलीमध्ये किंचीतही फ़रक नसताना; त्या दंगलीचा खलनायक म्हणून नरेंद्र मोदींना पेश करण्यात जवळपास संपुर्ण माध्यमे वा पत्रकारिता गुंतली होती. याविषयात शंका वा प्रश्न विचारण्यावरही आक्षेप घेतले जात होते. अखेरीस बारा वर्षांनी २०१४ च्या लोकसभा निकालांनी त्यावर पडदा पडला. पण दरम्यान दोन गोष्टी होऊन गेल्या. माध्यमे व पत्रकारिता यांची विश्वासार्हता पुर्णपणे लयास गेली आणि त्या उत्साही अजेंडाबाज पत्रकारितेच्या आहारी गेल्याने, विरोधी पक्षही नामशेष होत गेला. आज भारतामध्ये पत्रकारिता ही विरोधी पक्षासारखी राहिलेली नसून, तीच खराखुरा विरोधी पक्ष होऊन गेली आहे आणि पर्यायाने देशात सत्ताधारी पक्ष असला तरी राजकारणात मात्र राजकीय विरोधी पक्ष शिल्लक उरलेला नाही. यातून खर्‍या लोकशाहीला पत्रकारांनी व त्यांच्या आहारी गेलेल्या राजकीय नेत्यांनी धोका निर्माण केला आहे.

बारा वर्षातल्या राजकारण व पत्रकारितेचा सुक्ष्म अभ्यास केला, तर या कालखंडात भाजपासह कुठल्याही पक्षाचा अजेंडा त्या पक्षाला ठरवता आलेला नाही. सर्व पक्षांचा अजेंडाच माध्यमातले मुठभर लोक ठरवत होते आणि पक्ष व नेते त्यासमोर शरणागत झालेले आहेत. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय क्षितीजावर उदय झाल्यानंतर भाजपा त्यातून बाहेर पडला, तरी बाकीचे तमाम राजकीय विरोधक अजूनही पत्रकारांचेच अनुयायी होऊन राहिले आहेत. आज मोदी खुप प्रचंड व अक्राळविक्राळ झाल्यासारखे वाटतात किंवा अजिंक्य असल्याची एक भिती माध्यमातूनच व्यक्त होते आहे. पण वास्तवात तसे काहीही नसून, त्यांना आव्हान देऊ शकेल असा कुठलाही राजकीय पक्ष शिल्लक उरलेला नाही. राजकीय पक्ष याचा अर्थ त्याची संघटना व पक्षाची धोरणे ठरवून भूमिका घेणारे नेतृत्व होय! आताही उत्तरप्रदेशात भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळवून गेल्यावर राष्ट्रीय पातळीवर मोदींना आव्हान द्यायला एकजुट वा आघाडी करण्याची कल्पना आधी माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांनी मांडली व विरोधी पक्ष त्या दिशेने विचार करू लागले आहेत. त्याआधी कॉग्रेस व समाजवादी यांच्यासह मायावतींनी एकजूट केल्यास मोदींना रोखता येण्याची कल्पना पत्रकारांनीच मांडली होती. त्यापैकी मायावती दूर राहिल्या. भाजपाने एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नसल्याचा गवगवा या अजेंडा माध्यमांनीच विरोधकांच्या माथी मारला आणि त्याच भोवती त्यांना केंद्रीत व्हायला भाग पाडले. त्यातून हिंदू धृवीकरण करण्यास विरोधी पक्षांना पत्रकारांनीच भाग पाडले. थोडक्यात मोदी सत्तेच्या विरोधातला प्रमुख पक्ष आज माध्यमे किंवा पत्रकारच होऊन बसला आहे. त्यांनी अजेंडा निश्चीत करावा आणि विविध बिगर भाजपा पक्षांनी निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे त्यानुसार वागावे, अशी स्थिती होऊन गेली आहे. तिथेच सगळी गल्लत होऊन बसली आहे.

पत्रकार विरोधी पक्षासारखा राहिला नसून, तोच विरोधी पक्ष बनला आहे. मात्र त्याच्यापाशी कार्यकर्त्यांची संघटना नाही की माणसांचे बळ नाही. पण त्याच माध्यमांकडून मिळणार्‍या अफ़ाट प्रसिद्धीमुळे मोदीविरोधी पक्षांनाही कार्यकर्ता वा संघटनांची गरज वाटेनाशी झाली आहे. माध्यमातूनच बहुतेक राजकीय पक्ष आजकाल चालवले जात आहेत. संघटनाकौशल्य वा जनतेत असलेली प्रतिमा, अशी आता नेत्यांची पात्रता शिल्लक उरलेली नसून, माध्यमातून झळकणारे प्रवक्तेच विविध पक्षाचे नेते म्होरके होऊन बसले आहेत. सहाजिकच अशा संघटनाहीन वाचाळवीरांना संघटनेच्या बळावर पराभूत करणे अमित शहा वा नरेंद्र मोदींसाठी किरकोळ काम होऊन गेले आहे. ही बाबासाहेबांची अपेक्षा नव्हती. सत्तेच्या विरोधात लढणारे विरोधी संघटित पक्ष आणि सत्तेच्या बळावर विरोधी आवाज चिरडणार्‍या सत्ताधार्‍याला आव्हान देणारा पत्रकार; अशी बाबासाहेबांची कल्पना होती. पत्रकार विरोधी पक्षासारखा त्यांना हवा होता. पत्रकारानेच विरोधी पक्ष व्हावे, अशी त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती. पण पत्रकार व पत्रकारिताच विरोधी पक्षाची जागा व्यापत गेली आणि गेल्या दोन दशकात भारतातील विरोधी पक्ष नेस्तनाबूत होऊन गेला आहे. किंबहूना राजकीय महत्वाकांक्षेने धुंद झालेल्या काही मुठभर संपादक पत्रकारांनी विरोधी पक्षांचे संघटनात्मक कंबरडेच मोडून टाकलेले आहे. अशा विरोधी पक्ष झालेल्या, कुठलेही संघटनात्मक बळ नसलेल्या पत्रकारितारूपी विरोधाची दखलही मोदी घेत नाहीत. तिथेच लोकशाही निकामी होत चालली आहे. विरोधी राजकारण जितके माध्यमाधिष्ठीत होत गेले, तितके मग मोदींचे बळ वाढत गेले आहे. वास्तवात मोदींना राजकीय आव्हानच उरलेले नाही. प्रत्यक्षात तितके मोदी मोठे झालेले नाहीत, तर विरोधी पक्षच माध्यमांनी इतका खुजा व दुबळा करून टाकला आहे, की त्याला राजकारणात जागाच शिल्लक ठेवलेली नाही.

2 comments:

  1. बरोबर भाऊ काही नुसतच भुंकतायत काही बौद्धिक दिवाळखोरीत आहेत एक बोट छाटत फिरतोय तसेच काही स्वतःला अजुन पॅावरबाज व तेल लावलेले पैलवान समजतायत

    ReplyDelete