Thursday, April 13, 2017

लोकपाल आंदोलनाचे र्‍हासपर्व

Image result for kejri PK

देशातील दहा विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. त्यात सर्वात लक्षणिय असा निकाल दिल्ली विधनसभेच्या राजौरी गार्डन जागेचा आहे. मागल्या खेपेस म्हणजे अवघ्या दोन वर्षापुर्वी विधानसभेसाठी मतदान झाले, तेव्हा जर्नेलसिंग या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने तब्बल ५६ टक्के मते मिळवित ही जागा जिंकली होती. पण अलिकडेच त्याने तिथला राजिनामा देऊन पंजाबमध्ये विधानसभा लढवली. गेल्या वर्षभर तरी केजरीवाल यांनी दिल्लीकरांकडे पाठ फ़िरवून पंजाब व गोवा या दोन राज्यात आपले लक्ष केंद्रीत केलेले होते. त्यासाठी त्यांचा मुक्कामही तिकडे होता आणि दिल्लीच्या अन्य मंत्र्यांसह अनेक आमदारही दिल्लीबाहेर फ़िरत होते. याच काळात दिल्लीकरांना अनेक संकटातून जावे लागलेले आहे. डेंग्यु वा चिकनगुण्या अशा आजारांच्या साथींनी दिल्लीकरांना भंडावून सोडले. तेव्हा आम आदमी पक्षाच्या सरकारचा कोणीही मंत्री दिल्लीत नव्हता. दिल्लीकर आजाराने बेजार होते आणि त्यांचा आरोग्यमंत्री गोव्यात आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मुक्काम ठोकून बसला होता. मुख्यमंत्री केजरीवाल सरकारी खर्चाने शस्त्रक्रिया करून घ्यायला बंगलोरला गेले होते आणि उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया युरोपच्या दौर्‍यावर मौज करायला गेलेले होते. असा पक्ष वा त्याचे नेते आपण विधानसभेत कशासाठी निवडले, त्याचा पश्चात्ताप दिल्लीकरांना नक्कीच झालेला असणार. पण असा मतदार वा नागरिक नेहमी वाहिन्यांवर येऊन बोलत नाही. आपल्या हाती मताची संधी येण्याच्या प्रतिक्षेत असतो. ती संधी राजौरी गार्डन पोटनिवडणूकीने दिली आणि दिल्लीकराने या पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त करूनच आपले मत व्यक्त केले आहे. हा विषय त्या एका जागेपुरता नाही तर आम आदमी पक्षासह केजरीवाल यांचे काम व शैलीवर दिल्लीकराने दिलेला निकाल आहे.

विधानसभेत ७० पैकी ६७ जागा या पक्षाने जिंकल्या होत्या आणि त्यातच याही जागेचा समावेश होता. तिथेच त्याचे आज डिपॉझीट जप्त होण्याची पाळी कशामुळे आली? याचे आत्मपरिक्षण केजरीवाल करतील अशी शक्यता अजिबात नाही. त्यापेक्षा ते मतदान यंत्रावर खापर फ़ोडून मोकळे होतील. ती आता त्यांची कार्यशैली झाली आहे. काम करायचे नाही आणि मनमानी करून प्रत्येक नियम कायद्याला आव्हान देत रहायचे, ही पद्धत झाली आहे. त्याचाच फ़टका राजौरी गार्डनमध्ये बसला आहे. डिपॉझीट जप्त याचा अर्थ केजरीवाल व त्यांच्या पक्षालाच दिल्लीकर विटला आहे. त्यांचे काम नको आणि खुलासेही नकोत, असा इशारा ताज्या निकालात लपला आहे. ५६ टक्के मतांनी जर्नेलसिंग यांना दोन वर्षापुर्वी लोकांनी निवडले, तेव्हा त्यांच्या किमान काही अपेक्षा असतात. जवळपास तसेच निकाल दिल्लीत सर्वत्र आलेले होते. म्हणजेच लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या आणि त्याचा थांगपत्ता केजरीवालना लागलेला नव्हता. हातात जितके अधिकार व जितकी साधने आहेत, त्यातून काही चांगले करून दाखवावे, अशीच ती अपेक्षा होती. पण पहिल्या दिवसापासून केजरीवाल नुसत्या तक्रारी करीत बसले, आपल्याला मोदी सरकार काम करू देत नाही. आपले प्रत्येक निर्णय रोखून धरले जातात. नियम बदलले पाहिजेत. अमूक खाते व तमूक अधिकार आपल्याकडे हवेत. राज्यपाल केंद्राचा हस्तक आहे, असल्या गोष्टी वाहिन्या वा माध्यमातील चर्चेसाघी खुसखुशीत विषय नक्की असतात. पण त्यामुळे लोकांच्या नित्यजीवनातील समस्यांचा निचरा होत नाही. केजरीवाल सतत टिव्हीवर दिसले वा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती झळकल्या; म्हणून लोकांचे जीवन सुसह्य होत नाही. त्या सुसह्यतेचा अनुभव लोकांना यावा लागतो. तो अनुभव विपरीतच नव्हता, तर पश्चात्तापाला चालना देणारा होता. त्याचेच आता मतात रुपांतर झाले आहे.

लोकसभेत दिल्लीच्या सातही जागा जिंकणार्‍या भाजपाला अवघ्या नऊ महिन्यात दिल्लीत फ़ेटाळून लावणारा दिल्लीकर; केजरीवालच्या शब्दावर विसंबून त्यांना ७० पैकी ६७ जागा देतो, ही विश्वासाची परिसीमा होती. पण त्याचा अर्थच केजरीवाल टोळीला उमजला नाही. त्यांना दिल्लीकर म्हणजे आपला गुलाम वाटला. कुठल्याही जाहिराती कराव्यात आणि कसल्याही थापा माराव्यात; दिल्लीकर निमूट ऐकून घेतो असे त्यांना वाटले. म्हणुन इतक्या बेछूटपणे या माणसाने व त्याच्या सहकार्‍यांनी दिल्लीमध्ये धिंगाणा घातला. कोर्टात मोठे वकील नेमून वा वाहिन्यांवर वाचाळवीर धाडून, टोलवाटोलवी करणे शक्य असते. पण जनतेच्या कोर्टामध्ये तारखा पडत नाहीत. एकाच सुनावणीत निकाल लागून जात असतो. तो निकाल असा आहे, की पुढल्या तीन वर्षात दिल्लीमध्ये डोळ्यात भरणारे काम केजरीवाल टोळीने करून दाखवले नाही, तर त्यांच्या आम आदमी पक्षाचा अवतारच संपवण्याचा दिल्लीकराने निर्धार केलेला आहे. मोदींना वा इतरांना शिव्याशाप देऊन दिल्लीकरांचे प्रश्न सुटत नाहीत. फ़क्त दिल्लीसाठी काम करायचे नसेल, तर पक्षाचा गाशा गुंडाळा; असा तो इशारा आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन दिल्लीकर केजरीवालना फ़र्मावतो आहे, ‘तुझे भुत आम्ही उभे केले तर आम्हीच ते गाडूनही टाकू शकतो’, असा त्यातला खरा गर्भित अर्थ आहे. देशव्यापी होण्याचे विसरून जा आणि निमूटपणे जितके अधिकार हाती आहेत, त्यात जमेल तितके काम करून दाखवा. नसेल तर जागा रिकाम्या करा, असे दिल्लीकर सांगतो आहे. नोटाबंदी, अन्य राज्यातली लुडबुड वा शेतकर्‍यांसह सैनिकांच्या मागण्यासाठी दिल्लीचे सरकार तुम्हाला सोपवलेले नव्हते, असेही यातून मतदाराने समजावण्याचा प्रयास केला आहे. आणखी तीन वर्षे बाकी आहेत, तेवढ्या मुदतीत खरे काम केले नाही, तर विषय संपणार आहे.

दिल्ली जिंकली म्हणजे आपल्या भुलथापांना आता देशातील जनता भुलणार आहे, असे केजरीवालना वाटत होते. पण तो विषय गोवा पंजाबच्या निकालांनी संपवलेला होता. आता दिल्लीतली जनताही या पक्षाच्या भुलथापांना भुलेनाशी झाली आहे. ‘पाच साल केजरीवाल’ अशी घोषणा देत दोन वर्षापुर्वी त्यांनी दिल्ली काबिज केली होती. पण वर्ष उलटले नाही, तर त्यांना अन्य राज्ये जिंकण्याचे वेध लागले. त्यासाठी दिल्लीकरांच्या पैशाचाही गैरवापर झाला. कुठल्याही भ्रष्ट पक्षाला शक्य नाही, इतका भयंकर भ्रष्टाचार या इसमाने मागल्या दोन वर्षात करून दाखवला. एकूण सहा मंत्र्यांपैकी तीन मंत्री आधीच फ़ौजदारी खटल्यामुळे हाकलावे लागले आहेत आणि आता चौथा मंत्री आर्थिक घोटाळेबाजी करण्याच्या जाळ्यात सापडला आहे. अन्य पक्षांवर दोशहरोप करीत केजरीवाल राजकारणात आले, त्यांनी इतके भ्रष्ट व विकृत नमूने मंत्रीपदासाठी कुठून निवडले, त्याचेही कोडे दिल्लीकरांना सतावत असावे. कारण इतका भ्रष्टाचार व लूटमार शीला दिक्षीत यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीतही होऊ शकलेली नव्हती, केजरीवाल आता भ्रष्टाचाराचेच प्रतिक बनले आहेत. किंबहूना त्यांच्या वर्तनाने भ्रष्टाचार विरोधात लढणार्‍या प्रत्येकाला संशयीत करून टाकले आहे. राजौरी गार्डनच्या मतदाराना तेच जगाला दाखवून द्यायचे होते. आपण दोन वर्षापुर्वी केलेली चुक सुधारण्यासाठी प्रत्येक मतदार बाहेर पडला आणि त्याने शुद्ध चरित्र सांगणार्‍या केजरीवाल व त्यांच्या पक्षापेक्षा भ्रष्ट मानली जाणारी कॉग्रेसही परवडली, असाच कौल यातून दिला आहे. लोकपाल आंदोलनाचा र्‍हास या एका माणसाने व त्याच्या साथीदारांनी अल्पावधीत करून दाखवला. त्यांनी दिल्लीतल्या चळवळी व आंदोलनांची विश्वासार्हताही निकालात काढली. राजौरी गार्डनचा ताजा निकाल प्रत्यक्षात लोकपाल आंदोलनाचे र्‍हासपर्वच म्हणावे लागेल.

1 comment:

 1. भाऊ तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे खरेच दिल्ली कर नक्कीच धडा शिकवला आहे पण कान डोळे बंद करणारा एके काहिच शिकु शकत नाही ही एक भारतावर मेहेरबानी आहे..
  कारण मिडियावाले अशाच एके पिके ला ऊचलुन धरतात व भारतात उतपात माजवतात..
  आज एके उद्या डिके सहा महिन्यात देशाचा हिरो मिडियावाले व त्यामागे लपलेली राष्ट्र विघातक शक्ती आहे...
  त्यामुळे नेहमीच भारतीय राजकारण व सरकारे हिंदोळत राहिली आहेत..
  यामागील सुत्रधार.. राष्ट्र विघातक शक्ती... चा.. बिंग फोडायला.. मोदी मानव आहेत का माहामानव .... हे काळच सांगेल..
  कारण विकास, सत्ता, पक्ष संघटन व सर्वात खतरनाक मिडियावाले बकासुर अशाच भस्मासुराला (एके पीके बेमालूम पणे जनतेची दिशाभूल करतात व राष्ट्र ऊभारणार नेतृत्वाला ईतर बागुल बुवा ऊभे करुन सहज सत्ता पालट करतात..
  कारण कणखर राष्ट्र उभारणी करणारे नेतृत्व सतत 10 ते 15 वर्षं सत्तेवर रहाणारे विदेशी शक्तीना नको आहे..
  मग अमेरिका युरोप कर्ज व तंत्रज्ञान कोणाला देणार? ..
  मोदी महामानव असतील तर या मागील शक्तींचा भांडा फोड करतील..
  कारण भारतीय जनता कधीही धोका खावु शकते व कोणातही कणखर / सर्व समावेशक नेता केवळ 5 वर्षे कराणखर भुमिका घेऊन सुध्दा वाजपेयी सरकार सारखा चुनाव हारु शकतो. जाती राज्य स्थानिक मुद्दे व स्वार्थी साऊथ रेसीडेन्ट नाॅन इंडियन (यानी कधीच कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला लोकसभा निवडणूकीत साथ दिली नाही. जयललीता एनटीआर चेहरे पुढे करुन स्वार्थी पणा चालु आहे. अशा स्वार्थी जनतेला प्रत्येक भारतीयांनी जिथे तिथे जाब विचारला पाहिजे ) कधीही धोका खाऊन सक्षम राष्ट्रीप्रमी सरकारला सुरुंग लावुन पाच वर्षे चे वर राज्य करुन दिले नाही.
  आता युपी राज्यांत योगी बिजेपी कसे राज्य करतो यावर 2019 लोकसभेचे बिजेपी चे भविष्य ठरवले जनमानसात ठसवले व मग फसवले जाऊ शकते..
  मोदी हारवण्यात हे मुद्दे तयार करत आहेत. खरच हे सर्व मिडियावाले एकसुरात करतात..
  व राजदीप, प्रसुन, आर्णब, केतकर, व इतर अनेक ऐका सुरात बिजेपी विरोधी मोर्चा सांभाळतात.
  आठवा प्रमोद महाजन गेले म्हणजे बिजेपी संपला अशी आवई हाॅस्पीटल मध्ये आंतीम घटका मोजताना उठवुन 2009 ची लोकसभा निवडणूक ची बीजेपी हारण्याची बिजे रोवली होती व घोटाळ्यत आपली हप्ता वसुली केली होती..
  या सर्वांचा कधीतरी खुप वेळ होण्या पुर्वी पडदा फोड व्हायला पाहिजे.
  यामुळे रात्र वैर्याची आहे हे मोदी व टिमने विसरता कामा नये..
  अमुल

  ReplyDelete