हरयाणा राज्यातील कित्येक एकर जमिनीचा घोटाळा समोर आणला गेला व त्यात सोनियांच्या जावयाचे नाव आले, तेव्हा एकूण कॉग्रेस पक्ष व प्रवक्ते त्याच्या बचावाला सिद्ध झालेले होते. तेव्हा तो कॉग्रेस अध्यक्षाचा जावई असण्यापेक्षा एक खाजगी नागरिक व व्यावसायिक असल्याचेही सांगितले जात होते. त्याच्या व्यवहाराचे राजकारण करू नका, असे सल्ले दिले जात होते. पण देशात सत्तांतर झाल्यावर बहूधा जावईबापू रॉबर्ड वाड्रा यांचा व्यवसाय दिवाळखोरीत निघाला असावा. अन्यथा त्यांनी राजकीय विषयात लुडबुडण्याचे काही कारण नव्हते. हल्ली अधूनमधून वाड्रा राजकीय वक्तव्ये करू लागले आहेत. त्यातून त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचे वेध लागलेले दिसतात. अन्यथा त्यांनी अशी वक्तव्ये केली नसती. खरेतर त्यांनी स्वत:वर होत असलेल्या विविध आरोपाच्या बाबतीत खुलासे केले असते आणि प्रसंगी त्याचे समर्थन करण्यात पुढाकार घेतला असता, तरी देशाचे व कॉग्रेसचे थोडेफ़ार कल्याण व्हायला हातभारच लागला असता. पण जेव्हा अशा गोष्टी उजेडात येतात, तेव्हा ह्या जावईबापूंची दातखिळी बसलेली असते आणि नसत्या बाबतीत मात्र त्यांना आपले पांडित्य सांगण्याची सुरसुरी येत असते. आताही पाकिस्तानात एका भारतीयाला फ़ाशी सुनावली गेली, हा विषय व्यावसायिक नाही किंवा कुठल्या जमिनी बळकावण्याचा नाही. तो आंतरराष्ट्रीय संबंधांचा विषय आहे. त्यात वाड्रा यांनी आपले मतप्रदर्शन करण्याची काय गरज होती? कुलभूषण जाधव यांना गतवर्षी पाकिस्तानने इराणमधून पळवून नेले व त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला, तेव्हापासून भारत सरकार त्या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे. असे असताना वाड्रा यांनी कुत्सितपणे केलेली विधाने संतापजनक आहेत. निषेधाचा सूर लावणे तात्कालीन गोष्ट असते. पण बाकीचे सोपस्कार चालूच असतात. त्यात इतरांनी किती नाक खुपसावे?
परराष्ट्रनिती हा पोरखेळ नाही. कुलभूषण जाधव याला पाकच्या लष्करी कोर्टाने फ़ाशी सुनावली आहे. ही बातमी आता उघड झाली. पण त्याला अटक झाल्यापासून इतके दिवस वाड्रा किंवा त्यांच्या सासूबाई कधी त्याविषयात बोलले होते काय? दरम्यान भारत सरकारने तेरा वेळा जाधवला भेटण्यास भारतीय वकीलाला संमती मिळावी, असा प्रयत्न केलेला आहे. पण पाकने त्याला दाद दिलेली नाही. त्या प्रत्येक प्रसंगी वाड्रा किंवा कॉग्रेस पक्षाने काय केले? सोनियांच्या जावयावर आरोप झाले तर सर्व शक्तीनिशी बचावाला धावून जाणारी कॉग्रेसची फ़ौज, गेल्या वर्षभरात कुलभूषण जाधव याच्या अटकेविषयी किती व काय बोलली आहे? अशा लोकांना व त्यांच्या खास जावयांना आज अचानक जाधवचा पुळका येण्याचे म्हणूनच नवल वाटते. दरम्यान वाड्राचे साले किंवा मेहुणे राहुल गांधी कुठे आहेत? जगातल्या कुठल्याही अन्यायाच्या विरोधात लढायचे इशारे देणारे राहुल आज गायब आहेत आणि त्यांच्या वतीने वाड्रा मुक्ताफ़ळे उधळत आहेत काय? करण्यासारखे खुप असते आणि आपल्या कुवतीचा अंदाज असेल, तर वाड्रांनाही खुप काही करता येईल. त्यांनी आपले मेहुणे व सासुबाईंना व्यत्ययाच्या राजकारणातून बाहेर काढण्यात पुढाकार घेतला, तरी भारत सरकारला खुप काही करता येईल. ते सोडून अशा नसत्या विषयावर आपले पांडित्य सांगण्याची गरज नाही. कारण कुलभूषण जाधव याला पाकिस्तानच्या तुरूंगातून व ताब्यातून परत आणणे, म्हणजे सासुबाईंच्या कुणा आश्रित मुख्यमंत्र्याच्या राज्यात गरीबाच्या ताब्यात असलेली जमिन हिसकावून घेण्यासारखे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक कायद्यांच्या जंगलातून वाट काढावी लागत असते. त्यामुळेच कुणा भारतीय नौसैनिकाच्या जीवाची आपल्यालाच अधिक काळजी असल्याचे नाटक, वाड्रा यांनी रंगवण्याचे अजिबात कारण नाही.
चोराच्या उलट्या बोंबा कशासाठी म्हणतात, त्याचे उत्तर अशा वागण्यातून मिळत असते. आज कॉग्रेसला व त्याहूनही अधिक पक्षाध्यक्षांच्या जावयाला भारतीय नागरिक व सैनिकांचा मोठा पुळका आलेला आहे. पण यांचेच राज्य असताना सीमेवर हेमराज नावाच्या एका भारतीय सैनिकाचे मस्तक पाकिस्तान्यांनी कापून नेलेले होते. तर त्यावेळी वाड्रांना भारत सरकारने काय करायला हवे किंवा काय केले नाही, त्याची अजिबात माहिती नव्हती. तेव्हा हे उद्योगपती विविध राज्यातील गरीबांच्या जमिनी बळकावण्यात आणि त्यातून आपले उखळ पांढरे करून घेण्यात गर्क होते. हेमराजची पत्नी टाहो फ़ोडून रडत होती, तिचे सांत्वन करायला जाण्याची बुद्धी राहुलना झाली नाही किंवा वाड्राच्या पत्नी प्रियंका गांधींना झाली नाही. हेमराजची गोष्ट निदान भारताच्या अखत्यारीतली होती. जाधवविषयी इतका पुळका वाड्राला आलेला आहे, त्याला सर्वजीत नाव तरी आठवते काय? कित्येक वर्षे पाक तुरूंगात खितपत पडलेल्या या भारतीय नागरिकाला हाल हाल करून ठार मारण्यात आले. त्याची बहीण इथे दारोदार फ़िरत होती आणि सोनियांच्या कृपेने चालणार्या मनमोहन सरकारच्या पायर्या झिजवत होती. आजही सर्वजीतची तीच बहिण दलबीर कौर त्याच आवेशात जाधवचीही बहिण होऊन आवाज उठवते आहे. यातला फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. दलबीरचा भाऊ पाकच्या छळवादातून बचावला नाही. शेवटी त्याचा छिन्नविछिन्न मृतदेहच मायभूमीत परतला होता. पण आपला भाऊ संपल्यावर दलबीरची आत्मियता संपलेली नाही. फ़ाशीची बातमी झळकल्यापासून सगळ्या वाहिन्यांवर पोटतिडकीने बोलताना दलबीर दिसत होती आणि अतिशय स्पष्ट शब्दात तिची वेदना व्यक्त करीत होती. जाधवला कुठल्या गुन्ह्यासाठी नाही तर केवळ भारतीय असण्यासाठीच पाकिस्तान सुळावर चढवतो आहे, असा सणसणित आरोप तिने केला आहे.
आपला एक गरीब भाऊ मारला गेला आणि तो पाकिस्तानच्या पापी कृत्यामुळे मारला गेला, म्हणून दलबीर मागे हटलेली नाही. पाकिस्तानच्या पोलिस वा लष्कराच्या तावडीत फ़सणार्या प्रत्येक भारतीयाला आपला भाऊच समजून तिने दाखवलेली आस्था, वाड्राच्या दुकानदारी आपुलकीपेक्षा अधिक शुचिर्भूत आहे. अधिक शुद्ध व पवित्र आहे. त्यात कुठलेही राजकारण नाही किंवा कसलाही मतलब नाही. देशाविषयी आस्था व देशबंधूबद्दलची आपुलकी, अशी कृतीतून व्यक्त होत असते. त्यासाठी बाजारू प्रेमाचे नाटक करण्याची गरज नसते. हे अर्थातच सोनियांच्या जावयाला कळणारे नाही. सत्ता व राजकारणातून आपापले व्यवसाय व लाभ हुडकत हयात घालवणार्यांना, फ़ाशी झालेले वा आत्माहुती देणारे यांच्या त्यागाची महत्ता कशी समजावी? वाड्रा किंवा राहुल गांधी यांच्यासारख्यांनी कुलभूषण सारख्या भारतीयांच्या विषयात बोलायचे टाळले, तरी फ़ार मोठी देशसेवा होऊ शकेल. कारण त्यांच्या खानदानाने देशसेवा जितकी बाजारू करून टाकली, तितके भारतीय सैनिक वा नागरिक अजून बाजारू झाले नाहीत. किंबहूना अशा नाटकी लोकांच्या मगरी अश्रूंची कुणा भारतीयाला गरज नाही. कारण असे अश्रू म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे असतात. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिक वा भारतीय लष्कराच्या हौतात्म्याचेही राजकीय भांडवल करीत, करोडो रुपयांची मालमत्ता जमा करण्यातच धन्यता मानलेली आहे. त्यांच्याकडून असले आपुलकीचे शब्द अधिक यातनामय असतात. अशा आपुलकीपेक्षा पाकिस्तानचे शत्रूत्वही अधिक सुसह्य असते. वाड्रा नामक जावईबापूंनी लावलेला शोध बघता, त्यातला बोध महत्वाचा आहे. आता हे लोक शहिदांच्याही हौतात्म्याचे राजकीय भांडवल करायला पुन्हा पुढे सरसावलेले आहेत. त्यांना सर्वजीतविषयी आपुलकी नव्हती, तर कुलभूषण जाधवविषयी कशाला आस्था असेल?
भाऊ सणसणीत मुस्काटात हाणलीत.बरे झाले त्याच लायकीचे हे लोक आहेत
ReplyDelete