Saturday, April 22, 2017

उथळ बुद्धीचा खळखळाट

sonu nigam ajan के लिए चित्र परिणाम

सुप्रसिद्ध पाश्वगायक सोनु निगम याने भल्या पहाटे मशिदीतून दिल्या जाणार्‍या भसाड्या आवाजातील अजानविषयी नाराजी व्यक्त केल्यावर उठलेले वादळ, देशातील उथळ बुद्धीच्या खळखळाटापेक्षा अधिक काहीही असू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे सोनु निगम हा प्रसिद्ध व्यक्ती असला तरी एक भारतीय नागरिक आहे आणि त्याला भावलेली कुठलीही गोष्ट वा मत व्यक्त करण्याचा त्याला अधिकार राज्यघटनेने बहाल केलेला आहे. त्याने आपले मत ट्वीटर या सोशल माध्यमातून व्यक्त केलेले आहे. त्याचे मत ऐकण्याची किंवा वाचण्याची त्याने कोणावर सक्ती केलेली नाही. ज्यांना त्याचे मत चुकीचे वाटेल ते त्यांना नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच सोनुच्या कुठल्याही गोष्टीकडे पाठ फ़िरवण्याचाही अबाधित अधिकार आहे. पण त्याच्या अधिकारावर गदा आणायचा किंवा त्यावर आक्षेप नोंदवण्याचा अधिकार कोणालाही असू शकत नाही. कारण सोनुने केवळ आपल्याच स्वातंत्र्याचा दावा मांडलेला नाही, तर त्याच्याही विरोधात आक्षेप नोंदवणार्‍यांच्याही अधिकाराचाच दावा केलेला आहे. म्हणूनच त्याने काय म्हटले आहे, ते आधी समजून घ्यायला हवे आणि मगच त्याच्या विरोधात वा बाजूने मतप्रदर्शन करायला हवे. पण तितके भान आजकालच्या शहाण्यांना कुठे उरले आहे? आपापल्या समजुतीनुसार मत व्यक्त करणे, असा उथळ शहाणपणा समाजात बोकाळला आहे. अन्यथा हा विषय इतका वादाचा होण्याचे कारण नव्हते. पण सोनु मुस्लिमांच्या बाबतीत बोलला आणि त्याचे विधान मुस्लिमांचे लांगुलचालन करणारे नाही, म्हणताच भुंकणे सुरू झाले. विधान वा आशय काय आहे, तोही तपासण्याची कोणाला गरज वाटलेली नाही. सोनुचा अजानला विरोध नसून, त्याचे जे विकृतीकरण झाले आहे, त्याच्याच विरोधात त्याने आपले मत व्यक्त केले आहे. ते धार्मिक थोतांडाच्या विरोधातले विधान आहे.

कुठल्याही धार्मिक रुढीच्या नावाखाली आपल्या नित्यजीवनात अडथळे आणू नयेत आणि त्याचा आपल्याला व्यत्यय येऊ नये, इतकीच माफ़क अपेक्षा सोनुने केलेली आहे. मशिदीतली अजान म्हणजे नमाजासाठी मुस्लिमांना हजर होण्यासाठी केलेले आवाहन आहे. त्यासाठी भोंग्याचा वापर केल्याने परिसरातील तमाम लोकांना कर्कश आवाजाला सामोरे जावे लागते. प्रामुख्याने भल्या पहाटे पहिल्या नमाजाची अजान दिली जाते, तेव्हा अनेक लोक साखरझोपेत असतात. त्यांचीही झोपमोड होते. त्यापैकी बहुतांश लोक मुस्लिम नसतात आणि त्यांना कुठल्याही नमाजाला जाण्याची गरज नसते. पण धर्माच्या नावाने घातलेली ही साद त्यांनाही अकारण झोपेतून जागे करत असते. त्यातले अनेकजण रात्री उशिरापर्यंत कामधंदा करून अपरात्री मध्यरात्री झोपलेले असतात आणि उशिरा उठणारे असतात. पण कर्कश आवाजाने त्यांचीही झोपमोड
होऊन जाते. हा त्यांच्यावर अन्याय असतो. त्यांच्या झोपेत बाधा आणण्याचा अधिकार घटनेने कोणालाही दिलेला नाही. ही गोष्ट काही भागात मशिदीतून दिल्या जाणार्‍या अजानची असू शकते. तशीच काही भागात मंदिरात लावल्या जाणार्‍या भोंग्यातून गाजणार्‍या आरतीचीही असू शकते. त्या आरतीला ज्यांना हजर रहायचे नाही वा त्यात सहभागी होण्याचीही इच्छा नाही, त्यांच्या जीवनात असे कर्कश आवाज व्यत्यय आणतात. त्यांचा अन्य कुणाच्या धार्मिक वृत्तीला वा भक्तीला विरोध नसतो. पण त्यांच्या जगण्यात व्यत्यय आणणारा धर्म त्यांना नको आहे आणि ते त्यांच्या खाजगी जीवनावर होणारे अतिक्रमण आहे. सोनुचा आक्षेप त्यापुरता आहे. त्याने इतर कुणाच्या धर्मपालनाला वा त्यातील भक्तीला आक्षेप घेतलेला नाही. तर कुठल्याही धर्माच्या नावाखाली त्याच्या जीवनात येणार्‍या व्यत्ययावर निषेध नोंदवला आहे. हे कोणी कितपत समजून घेतले आहे? इतकी तीव्र प्रतिक्रीया उमटण्याचे कारण स्पष्ट आहे.

सोनु निगम हेच अन्य कुठल्या धर्माविषयी बोलला असता, किंवा त्याने गणेशोत्सव वा नवरात्रोत्सवाच्या भोंग्याविषयी मतप्रदर्शन केले असते, तर सेक्युलर शिरोमणी म्हणुन त्याला कोणीही डोक्यावर घेऊन नाचले असते. याचप्रकारचे अनेक आक्षेप यापुर्वी गणेशोत्सव वा नवरात्रोत्सवावर घेतले गेलेले आहेत. त्याविषयी न्यायालयानेही काही निर्णय दिलेले आहेत. लाऊडस्पिकरचा वापर किती वाजेपर्यंत व्हावा आणि त्याच्या आवाजाच्या मर्यादा किती असाव्यात, यावरही निकाल आलेले आहेत. परिक्षेच्या कालखंडात वा अपरात्री आवाज असू नयेत, असेही आक्षेप घेतले गेले आणि ते घेणार्‍यांची पाठ थोपटली गेली आहे. मग तोच नियम भल्या पहाटे मशिदीतून दिल्या जाणार्‍या अजानविषयी असल्यास काय बिघडते? लाऊडस्पिकर धर्म वा जात मानत नाही. त्यातून उमटणारे कर्कश आवाज धर्माच्या पलिकडे असतात. म्हणूनच सोनुचा आक्षेप धर्माच्या पलिकडला आहे. त्याकडे इस्लामचा विरोधक वा मुस्लिमांचा विरोध म्हणून बघण्याचे काहीही कारण नव्हते. पण ज्या उत्साहात हिंदूंच्या भावना दुखावण्यात पुरोगामीत्व सामावलेले असते, तसे इस्लाम वा अन्य बाबतीत नसते. म्हणूनच सोनुच्या वक्तव्यात ‘अजान’ आल्याने सर्व पुरोगामी त्याच्यावर तुटून पडलेले आहेत. बिगर इस्लामी धर्ममार्तंडही त्याच्यावर रागावले आहेत. पण मुद्दा धर्माचा नसून मानवी जीवनात येणार्‍य व्यत्ययाचा आहे. माणसांना होणार्‍या त्रासाचा आहे. त्याविषयी कोणी बोलत नाही. दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते. ती खरेच भोंग्यावरून दिली पाहिजे काय? इतर बाबतीत चौदाशे वर्षे जुन्या प्रथापरंपरा जपणारे व आधुनिक विज्ञानाच्या विरोधात खंबीरपणे उभे रहाणार्‍यांना भोंग्याची गरज काय? चौदाशे वर्षापुर्वी लाऊडस्पिकर नव्हते. त्यामुळे मंदिर वा मशिदीत त्याचा असा वापर होण्याचे काहीही कारण नाही. इश्वराला अशा कर्कश आवाजात जागवण्याची खरेच गरज आहे काय?

नमाज अजान वा कुठल्याही आरत्या वा भजनासाठी लाऊडस्पिकरची का गरज भासते? देवाला झोपेतून जागवण्यासाठी हा उद्योग असेल, तर तो इश्वर कसला? देव हा सर्वव्यापी व सर्वज्ञानी असेल, तर त्याचे कौतुक त्याला अशा कर्कश आवाजात ऐकवण्याची गरज कशाला भासावी? इश्वर सर्वज्ञानी आहे तर त्याचे भक्त कर्कश आवाजात कोणाला ऐकवत असतात? कशाला ऐकवत असतात? अजान वा आरती भजने ही भक्तांसाठी असतील, तर ती तिथे जमणार्‍यांनाच ऐकू आली पाहिजेत. ती सक्तीने इतरांना ऐकवण्याचे काहीही कारण नाही. ती आजकाल सक्तीने ऐकवली जातात. म्हणूनच आक्षेपार्ह ठरू लागली आहेत. ती ऐकण्याची सक्ती भसाड्या आवाजातून व ध्वनिवर्धकातून केली जाते. सोनुचा आक्षेप त्याला आहे आणि तो त्याचा एकट्याचा आक्षेप नाही. हजारो लाखो सामान्य नागरिकांचाही तोच आक्षेप आहे. असे सामान्य लोक त्रास सहन करून गप्प बसतात. सोनुसारखा एखादा समर्थ माणूस असतो, ज्याचा आवाज लाखो लोक ऐकतात. त्याने नुसतीच गाणी म्हणण्यापेक्षा अगतिक गांजलेल्या लोकांचा आवाज होऊन काही मतप्रदर्शन केले असेल, तर त्याचे म्हणूनच स्वागत व्हायला हवे. कारण इतरवेळी तो आपला स्वर वा कोणी लिहीलेले गीत म्हणत असतो. ही अशी वेळ वा घटना आहे, की सोनुसारख्या लोकप्रिय गायकाने आपला आवाज व स्वर बाजूला ठेवून; गांजलेल्या लाखो सामान्य माणसांचा स्वर आळवला आहे. थकल्याभागल्या किरकोळ विश्रांती घेणार्‍या कष्टकर्‍याचा सुर आळवला आहे. त्यासाठी त्याची पाठ प्रत्येकाने थोपटली पाहिजे. किंबहूना सोनुचे सर्वात आशयघन गीत म्हणून त्याच्या या आक्षेपाकडे बघणे योग्य ठरेल. पण उथळ बुद्धीच्या लोकांना शब्द कळत नाहीत, सूर उमजत नाहीत. त्यांना आशय कुठून कळावा? म्हणूनच दोन दिवस नुसता उथळ बुद्धीचा खळखळाट चालू आहे.

4 comments:

  1. अगदी योग्य...

    ReplyDelete
  2. भाऊ,सोनु निगम बरोबर आहे माझ्या माहिती प्रमाणे कोर्टाने ८ ते १० वर्षा पूर्वी भोंगे काढायला सांगीतले होते परंतु हिंदू दहशतवाद तसेच बडेबडे शहरोमें छोटी छोटी घटनाएं करत कुरवाळत बसुन सगळ्यांना ताप दिला व याला जबाबदार काही लोक 'गेले' बाद झाले. असो सकाळी लवकर वंदेमातरम् किंवा जन गन मन ला परवानगी मिळेल का ???

    ReplyDelete
  3. सहमत आहेे एकीकडे ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कायदे सशक्त केले पाहिजेत व दुसरीकडे समाजप्रबोधन केले पाहिजे

    ReplyDelete