Sunday, April 16, 2017

भारतात मुस्लिम संदर्भहीन होतोय

indian muslim leaders के लिए चित्र परिणाम

सध्या कॉग्रेसने मतदान यंत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केलेले आहे आणि त्यामुळे विरप्पा मोईली यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही विचलीत झाला आहे. त्याने आपल्याच पक्षाच्या अशा वागण्याची पराभूत मनोवृत्ती अ्शी संभावना केलेली आहे. कारण घोटाळा यंत्रामध्ये नसून, आपल्यापासून मतदार दुरावतोय आणि असेच चालू राहिले तर कॉग्रेसचे पुनरुज्जीवन शक्य नाही, हे त्यांनी ओळखले आहे. ते पुनरुज्जीवन केवळ राहुल गांधी यांच्या नाकर्तेपणामुळे अशक्य आहे, अशातलाही भाग नाही. त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे सहासात दशकांपासून चालू असलेले पुरोगामीत्वाचे इस्लामी थोतांड निकालात निघाले आहे. याचे भान मोईलींना आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर मोदींनी भाजपाला बहूमत मिळवून दिले होते आणि त्यात सर्वात मोठा दणका उत्तरप्रदेशातल्या पुरोगामी पक्षांना बसला होता. त्यानंतर पुढले पाऊल ताज्या विधानसभा निवडणूकीत टाकले गेले आहे. त्यात पुरोगामी इमला ढासळला आहे. तो इमला म्हणजे भारतात मुस्लिम १८-१९ टक्के असून त्यांच्या विरोधात कोणीही सत्तेपर्यंत पोहोचू शकत नसल्याचा एक भ्रम होता. तोच भ्रमाचा भोपळा नरेंद्र मोदींनी निकालात काढला आहे. पण नुसते निवडणुकीतून हे मुस्लिम थोतांड निघालेले नाही. खुद्द मुस्लिम समाजातही असलेला वेगळेपणाचा भ्रम निकालात निघतो आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्यास भाजपाला कधीच मुस्लिम मते मिळणार नाहीत व म्हणूनच सत्तेची स्वप्नेही भाजपाने बघू नयेत; हा आवडता पुरोगामी सिद्धांत होता. तो २०१४ सालात निकाली निघाला होता.  २०१७ सालात उत्तरप्रदेशच्या विधानसभा निकालांनी मुस्लिम एकगठ्ठा भाजपा विरोधात मतदान करतात, हाही भ्रम निकालात काढला आहे. यातून प्रथमच मुस्लिम समाजमनावर मौलवीच राज्य करतात, ह्या भ्रमाला भूईसपाट करून टाकले आहे.

मुस्लिम महिला ह्या प्रामुख्याने गरीबीतून येतात आणि त्यांचे तलाकच्या हत्याराचा वापर करून शोषण होत असते. त्यांना न्याय देण्याचा कधीच प्रयत्न झाला नाही. सतिप्रथा राजा राममोहन रॉय यांच्या चळवळीने निकालात काढली, असे मानले जाते. पण त्याच्या मागे ब्रिटीश सत्ता ठामपणे उभी राहिली नसती, तर सतीप्रथा संपली नसती. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात भारतातले सेक्युलर सरकार कधीही इथल्या मुस्लिम शोषित महिलांच्या न्यायासाठी, अशा मागण्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. तो काळ आता संपला आहे. मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुस्लिम महिलांना तशी आशा प्रथमच वाटली आणि त्यांनी ठामपणे तिहेरी तलाकचा लढा आरंभला होता. त्यात कोर्टानेही पुढाकार घेतला आणि मोदी सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. विधानसभेच्या कालखंडात भाजपाला त्याचा मोठा फ़टका बसेल अशी पुरोगाम्यांची अपेक्षा फ़ोल ठरली आणि आता तोच मुद्दा कळीचा होऊन बसला आहे. कारण मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने भाजपाला मतदान केले आणि आजवर आपल्याला मौलवींच्या जाळ्यात बंदिस्त करणार्‍या पुरोगाम्यांना नाकारले. थोडक्यात मुस्लिमांच्या भावना म्हणजे मौलवी किंवा मुस्लिम धर्ममार्तंड, ही कल्पनाच मोदींनी पुसून टाकली. जोवर मुस्लिम धर्मांधांचे चोचले पुरवणारे सत्तेत आहेत, तोवर तिहेरी तलाक वा मुस्लिम महिलांचे शोषण संपणार नसल्याचे लक्षात आल्यामुळेच, मुस्लिम महिलांनी उत्तरप्रदेशात मोठ्या संख्येने मोदींचे समर्थन केले. एकही मुस्लिम उमेदवार नसतानाही म्हणूनच भाजपाला इतक्या अधिक जागा मिळू शकल्या. पण प्रकरण तिथेच संपलेले नाही. मुस्लिम समाज मौलवींच्या हातून निसटत असल्याची जाग त्याच धर्मांध मुस्लिम नेत्यांना आलेली आहे.

उत्तरप्रदेशचे निकाल व तिहेरी तलाकच्या गोष्टींनी मुस्लिम समाजात मोठी उलथापालथ चालू झाली असून, यापुढे मुस्लिम मते व त्यांची संख्या निवडणुकीवर प्रभाव पाडू शकत नाही, हा सिद्धांत मांडला गेला आहे. म्हणूनच पुरोगामी पक्षांचा आडोसा घेऊन मुस्लिम धर्मांधतेचे चाळे चालवणार्‍यांना दणका बसला आहे. भारत सेक्युलर देश असून तिथे मुस्लिमांचे वेगळे चोचले करण्याची गरज नाही, हे मोदींनी निकालातूनच सिद्ध केले आहे. सहाजिकच त्याचे भान पुरोगाम्यांना आलेले नसले, तरी मुस्लिम समाजातच वावरणार्‍या धार्मिक नेते व धर्मांध राजकारणी यांना त्याची जाणिव झाली आहे. मजेची गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीपुर्वी कुठलाही राजकीय पक्ष वा नेता आपल्याकडे पाठींबा मागायला कसा आला नाही, याची चिंता जामा मशीदीचे इमाम बुखारी यांना सतावत होती. यातच एक गोष्ट लक्षात येते, की मुस्लिम मतांची मक्तेदारी सांगणार्‍यांचे दिवाळे वाजलेले आहे. पण तिथेच ही गोष्ट संपलेली नाही. आपल्या धार्मिक वेगळेपणाचा रुबाब करून सतत बहुसंख्य हिंदू समाजाला ओलिस ठेवायचे राजकारण करणार्‍यांची जमिनच खचली आहे. कारण ज्या मुस्लिम मतांच्या बळावर हा इमला उभा होता, तोच ढासळत चालला आहे. कारण मुस्लिमातच आता अनेक गट तट पडले असून, एकसंघ जनसमुह म्हणून कार्यरत होण्यासारखी स्थिती शिल्लक उरलेली नाही. महिलांनी मतदानातून मौलवी व धर्मांध नेत्यांची सत्ता झुगारली आहेच. पण आलेल्या निकालानंतर विविध मुस्लिम पंथ व घटक हिंदूंच्या भावनांची कदर करण्याच्या प्रयत्नांना लागले आहेत. त्यापैकी शिया पंथाने गोमांस बंदीला पाठींबा देऊन टाकला आहे, तर तिहेरी तलाक बंद करण्याचा प्रस्तावही आपल्या संघटनेत संमत करून घेतला आहे. सहाजिकच अवघा मुस्लिम समाज एकगठ्ठा असल्याच्या कल्पनेलाच पुरता तडा गेलेला आहे.

गेली काही वर्षे भाजपाचे एक ज्येष्ठ नेता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुस्लिमातील विविध गटांना व पंथांना परस्पर विरोधी लढवून त्यांची शक्ती क्षीण करण्याविषयी मतप्रदर्शन केलेले होते. पण त्याकडे कोणी गंभीरपणे बघितलेले नव्हते. आता ते प्रत्यक्षात येताना दिसत आहे. आजवर हिंदू समाजातील विविध जातीपाती व त्यांच्या बेबनावाला खतपाणी घालून, इतक्या मोठ्या लोकसंख्येला विविध गटात विभागलेले होते. त्यामुळेच तुलनेने नगण्य असलेल्या मुस्लिम मतांचा गठ्ठा निर्णायक वाटत होता वा भासत होता. त्यात तथ्यही होते. हिंदू समाजाचे विविध घटक व जाती राजकारणासाठी एकजुट होऊ शकत नाहीत. पण इस्लामला धोका म्हटल्यावर मुस्लिम मात्र सर्व भेदभाव विसरून एकवटतात, हे सत्य होते. मोदी-शहा जोडगोळीने यातल्या निवडक जाती व समाजघटकांची मोट बांधून, हिंदूची व्होटबॅन्क तयार केली आणि दुसरीकडे मुस्लिमांचा राजकीय एकजिनसीपणा निकालात काढलेला आहे. तलाकपिडेचा आधार घेऊन मुस्लिम महिलांना वेगळे पाडण्यात काहीसे यश आले आहे, त्यालाच जोडून शिया व सुन्नी यांच्यातला बेबनावही आता चव्हाट्यावर आलेला आहे. त्याचे भान आल्याने आता सुन्नी मुस्लिम नेत्यांनाही धडकी भरली आहे. म्हणून तर सुन्नी मुस्लिम पर्सनल बोर्डाचे उपाध्यक्ष सय्यद सादिक यांनी कोर्टाच्या हस्तक्षेपाशिवाय तिहेरी तलाक निकालात काढला जाऊ शकतो, अशी ग्वाही एका मुलाखतीतून दिली आहे. हे त्यांचे व्यक्तीगत मत मानण्याचे कारण नाही. मुस्लिम समाज व त्याची लोकसंख्या पुर्वीसारखी एकजुट व एकजिनसी राहिलेली नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. किंबहूना यापुढे मुस्लिम मते व लोकसंख्येचे भांडवल करून लोकशाही व सरकारला ओलिस ठेवता येणार नसल्याची जाणिवही झाली आहे. खरे सांगायचे तर आजपर्यंत गठ्ठा मतांवर जगायची सवय लागलेल्यांना घाम फ़ुटला आहे.

सेक्युलर वा पुरोगामी म्हणजे मुस्लिमांचे लांगुलचालन, अशा समजूतीला धक्का बसला आहे. हिंदू बहुसंख्यांकांच्या मनातून ही संकल्पना काढून टाकण्यात मोदी-शहा यशस्वी झाले आहेत. जे मुस्लिमांच्या विरोधात भडकावू भाषणाने साध्य झाले नव्हते, तेच निवडणूकीत मुस्लिम मतांना निकामी करून मोदींनी सिद्ध केले आहे. मुस्लिम असल्याने राजकीय दादागिरी करण्याची सवलत त्यातून संपली आहे. यापुढे भारतीय नागरिक म्हणून मुस्लिमांनाही जगावे लागणार आहे आणि मुस्लिम असल्याचे धमकावत जगण्याचे दिवस संपलेले आहेत. कारण आता मुस्लिमांचा विरोध असल्याचे सांगून अडवणूक करण्याचा काळ मागे पडला आहे. त्यामुळेच देशात अनेक जागी वंदे मातरम म्हणण्याविषयीचा आग्रह धरला जात आहे. गोवध बंदीची मागणी वाढत चालली आहे. त्याच्यावर कट्टर हिंदूत्वाचा शिक्का मारून बदनामी करून भागणार नाही. कारण त्याचा हिंदूत्वाशी संबंध नसून, मुस्लिम अरेरावीच्या विरोधात उठणारा तो आवाज आहे. त्याचा धर्माशी संबंध नाही. तर हिंदूंच्याही भावना व धारणांची जपणूक होण्याचा तो आग्रह आहे. त्याला विरोध करील त्याची पुढल्या निवडणूकीत खैर नसेल, असाच त्याचा अर्थ आहे. अशा प्रत्येक उठावातून मुस्लिमांचे लांगुलचालन म्हणजे देशद्रोह असल्याची धारणा वाढीस लावली जात आहे. जितकी त्या भावनेची हेटाळणी होईल, तितके लहानसहान हिंदू समाजघटक एकवटत जाणार आहेत. त्याचे फ़लित काय असते, त्याची प्रचिती उत्तरप्रदेशच्या निकालांनी आलेली आहे. त्याचा अर्थ असा, की जिथे मुस्लिमांची संख्या अधिक असेल तिथले बहुतेक हिंदू समाजघटक एकजिनसी मतदान करू लागले आहेत. जे पक्ष व नेते मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात पुढाकार घेतील, त्यांचा सफ़ाया करण्याचा संदेश त्यातून आपोआप दिला जात असतो. अर्थात त्याला मात्र धर्मांधता म्हणता येणार नाही.

मागली सत्तर वर्षे या देशात सतत मुस्लिमांचे लांगुलचालन झाले आणि आता तर भारतमाता किंवा वंदेमातरमही हिंदूत्व ठरवले गेले. त्यावरची ही संतप्त प्रतिक्रीया आहे. सामान्य हिंदू समाजाकडून मुस्लिमांवर व्यक्त होणारा तो राग वा विरोध नसून, पुरोगामीत्वाला जिहादी बनवणार्‍या प्रवृत्तीवरचा राग आहे. त्यामुळे मुस्लिम मते व लोकसंख्याच राजकारणात संदर्भहीन होत चालली आहे. त्यातून भारतीय समाज एक संदेश मुस्लिमांना देतो आहे. तुमचे भारतीय नागरिक म्हणून स्वागत आहे. पण मुस्लिम म्हणून वेगळेपणा जपायचा असेल, तर तुम्हाला दुय्यम ठरवले जाईल. भारतीय कायदे व धोरणे जितकी हिंदूंना लागू होतात, तितकीच मुस्लिमांना होतील व त्याचा सन्मान मुस्लिमांनीही राखला पाहिजे. थोडक्यात तुम्ही मुस्लिम म्हणूनच हिंदूंशी वागत धार्मिक शत्रुत्वच जोपासायचे असेल, तर हिंदूंनाही धर्म म्हणून एकजुट होऊन मैदानात यावे लागेल. किंबहूना आम्ही हिंदू म्हणून एकजुट होतोय, असाच संदेश या मतदान व निकालातून दिला जातो आहे. त्याचेच प्रतिबिंब मग न्यायालयात पडणार आहे आणि कायदा व राजकारणातही पडणार आहे. मुस्लिम समाज जितका मुख्यप्रवाहात मिसळून जाईल, तितके हे राजकीय धार्मिक कंगोरे संपुष्टात येत जातील. धर्माच्या नावाने मागण्या वा भेदभाव संपवण्यात राजकीय नेते व बुद्धीमंत अपेशी ठरल्याने सामान्य जनतेनेच हा विषय आपल्या हाती घेतल्याचे हे लक्षण आहे. हा विषय गोहत्या, गोमांस भक्षण वा तिहेरी तलाक यांच्यापुरता मर्यादित नाही. तो हिंदूंनाही सन्मानाने जगण्याची संधी मागणारा व मुस्लिम समाजाचे लांगुलचालन संपवण्याचा आग्रह आहे. त्याने मुस्लिमधिष्ठीत राजकारणाचा पायाच उध्वस्त करून टाकला आहे. जितके लौकर पुरोगाम्यांना हे लक्षात येऊन ते सुधारतील, तितके त्यांचे राजकारण बलशाली होऊ शकेल. उलट जितके मुस्लिमांचे लांगुलचालन पुरोगामी अधिक करतील, तितके मुस्लिमही संदर्भहीन होत जातील. कारण मुस्लिमधार्जिण्या राजकारणाची भूमीच खचत चालली आहे. कॉग्रेस, समाजवादी, बसपा यांना मतदान यंत्राने पराभूत केलेले नाही. त्यांच्या मुस्लिम पक्षपाती राजकारणाला मतदारच मुठमाती देत चालला आहे आणि अशा मतदाराची संख्या प्रत्येक मतदानातून वाढत चालली आहे.

3 comments:

  1. Bhau The best... analysing the record breaking win in UP election... How other than BJP parties done languchalan ( लंगुचलन मुस्लिमांचे भाजप व्यतीरीक्त ईतर राजकीय पक्षांनी (काॅग्रेस, सपा, शरद पावरांचा एनसीपी) गेली अनेक दशके केले केले त्यामुळे कशी हिंन्दु सामान्य मतदारांच्या मनात घालमेल व दुर्लक्षित मोठा समाज म्हणुन दुय्यम सिटिझन शीप तयार झाली होती त्याला मोदी शहा जोड गोळीने आत्मविश्वास दिला व हिन्दु व्होट बँक केली. Must read... its message to other parties to change such ल॔गुचालन. पण काॅग्रेस चे दलाल ( ज्यांना मतदारांत काहिच महत्व नाही पण मोठ्या काँग्रेस नेतृत्व कडे शेपुट हालवत) गुमराह करतात त्यामुळे कोणताही धडा शिकु शकत नाहित..
    परंतु भाऊ.. मुस्लिमांनी पण भाजपला मते दिल्या मुळे एवढे मोठे यश युपी मध्ये मिळाले हे एक मिडियाचे यशापासुन चुकीचा संदेश भाजप व मोदी शहा जोड गोळीने घेण्याचे आमिष आहे व आपल्या सारख्या ( तुमचे 12 ऑगस्ट 2012 पासुन सतत 60 दिवस प्रसारित केलेले लेख वाचणार्याला न पटणारे आहेत..
    हे कदाचित मिडिया व विदेशी शक्ती च्या थिंक टँक चे मोदी शहा जोड गोळी ला गुमराह करण्याचा एक डाव आहे पण आशा प्रलोभनांना मोदी फसतात का हे मोदी एक महामानव आहेत का नाहीत हे काळच ठरवेल....
    अमुल

    ReplyDelete
  2. मुस्लिमांनीसुद्धा भाजपला मते दिली हा मिडीयाचा खोटा प्रचार चालू आहे.पण उ.प्र.मधील भाजपच्या लाटेत इतर पक्ष वाहून गेल्यानंतर मुस्लिमसमाज मात्र तर्काला पोचला आहे एवढे बाकी खरे.

    ReplyDelete
  3. फार छान मांडणी भाऊ !!

    ReplyDelete