Wednesday, April 19, 2017

खरे श्रेय हमीदभाईंना !

triple talaq के लिए चित्र परिणाम

अर्धशतकापुर्वी हमीद दलवाई यांना मुस्लिम विचारवंत सुधारक म्हणून महाराष्ट्र ओळखत होता. तितकी त्यांची उर्वरीत भारतात ओळख झालेली नव्हती. मराठी भाषिक पत्रकार व मुस्लिम धर्मात सुधारणा करायला उत्सुक असा उमदा तरूण अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. अनेक समाजवादी विचारवंत व नेत्यांनीही हमीदना मनमोकळा पाठींबा दिला होता. त्यांना त्यासाठी चळवळ उभारण्यासही हातभार लावला होता. त्यामुळेच मुस्लिम समाजातील सर्वात पिडीत घटक असलेल्या तलाकशुदा महिलांचा विषय हमीदभाईंनी हाती घेतला होता. किंबहूना समान नागरी कायद्याची लढाई त्यांनी पुकारली होती. कुमार सप्तर्षी वा तत्सम युवक क्रांती दलाच्या तरूणांनी त्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. मुठभर का होईना, सुशिक्षीत मुस्लिम महिला त्यात सहभागी झाल्या होत्या आणि त्यामुळे हमीदभाई मुस्लिम धर्मांध वर्गात शत्रू म्हणून गणले जात होते. कारण त्यांनी फ़क्त धर्मातील सुधारणेला हात घातला नव्हता. तर मुस्लिम समाजाला वेठीस ठेवणार्‍या मुल्लामौलवींच्या मक्तेदारीलाच आव्हान उभे करण्याचा पवित्रा घेतला होता. त्या समाज सुधारक चळवळीतले अनेक तरूण आज वार्धक्याकडे झुकलेले आहेत. हमीदभाईंचा चार दशकापुर्वी़च मृत्यू झाला आणि त्यानंतर तलाकपिडीत महिलांचा विषय केवळ सेमिनार वा व्याख्यान, लेखांचा होऊन गेला. त्यातली चळवळ क्रमाक्रमाने ओसरत गेली. त्याला केवळ हमीदभाईंचा मृत्यू इतके़च कारण नव्हते. तर ज्या पुरोगामी वर्गाने वा संघटनांनी हमीदभाईंना बळ दिलेले होते, तेच पुढल्या काळात हमीदभाईंना विसरून त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेल्या मुल्लामौलवींचे पुरस्कर्ते होऊन गेले. गेल्या दोन दशकात मुल्लामौलवींचे प्रमाणपत्र मिळवण्याइतकी पुरोगामीत्वाची अधोगती होऊन गेली. म्हणून आज त्यापैकी कोणी तिहेरी तलाक या विषयावर बोलतानाही दिसत नाही.

गेल्या काही महिन्यात हा विषय सुप्रिम कोर्टाने काढला व ही मध्ययुगीन प्रथा महिलांना सामाजिक न्याय नाकारणारी असल्याने निकालात काढण्याचा विचार पुढे आला आहे. त्यात कोर्टाच्या विचारणेला मोदी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक मुस्लिम महिला व त्यांचे आप्तस्वकीय खुलेपणाने तलाक विरोधात बोलू लागले आहेत. हमीदभाईंनी अर्धशतकापुर्वी पेरलेल्या बीजालाच फ़ुटलेली ही जोरदार पालवी आहे. पण त्यांचे तात्कालीन सहकारी सवंगडी त्याविषयी अवाक्षर आज बोलत नाहीत. ज्या संघटना संस्थांनी हमीदभाईंना बळ दिलेले होते, त्यापैकी कोणीही आज या मुस्लिम महिलांच्या समर्थनाला पुढे आलेला दिसत नाही. फ़ार कशाला, अशा सामाहिक सुधारणेत कोर्ट वा सरकारने ढवळाढवळ करू नये, अशीच नवी पुरोगामी भूमिका समोर आणली जात आहे. किंबहूना हमीद दलवाई आज हयात असते तर किती सुखावले असते, त्याचे वर्णन करता येत नाही. पण त्यांचाच वारसा सांगणार्‍या बहुतेक पुरोगाम्यांना आज हमीदचे नाव राजकारणासाठी हवे असले, तरी त्यांचा विचार मात्र अजिबात नको आहे. उलट हमीदभाईंनी मौलवींच्या बरोबरीने ज्या संघ वा हिंदूत्ववादाला विरोध केला, त्यांचे पठीराखे मात्र आज हमीदचा विचार हिरीरीने मांडताना दिसत आहेत. कारण ज्या पंतप्रधानाने तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला आहे, तो संघाचा जुना प्रचारक असून सत्तेतील पक्षही संघाच्या मुशीतून आलेला आहे. पण त्याच पक्षाने व त्याच्या सरकारने हमीदभाईंचा विषय उचलून धरला आहे. ते ध्येय पुर्ततेस नेण्याचा चंग बांधला आहे. मात्र त्याच ध्येयाच्या कडव्या विरोधात हमीदचेच जुने सह्कारी उभे ठाकले आहेत. यालाच पुरोगामी दिवाळखोरी म्हणता येईल. कारण त्यांना तलापिडीत मुस्लिम महिलांना मुक्ती मिळण्यापेक्षाही भाजपाचा त्यात समावेश असल्याने मौलवींचे मत योग्य वाटू लागले आहे.

संघ वा भाजपा म्हणजे हिंदूत्व आणि आपण हिंदूत्वाचे विरोधक असल्याने, त्यांच्या विरोधत उभा राहिल त्याच्या पाठीशी उभे ठाकणे, म्हणजेच धर्मनिरपेक्षता असल्या जंजाळात प्रथम समाजवादी लोक फ़सत गेले. जनता पक्षाच्या कालखंडात सर्व पक्ष एकवटले होते, त्यात संघप्रणित जनसंघही समाविष्ट झाला होता. पण सत्तेत येताच समाजवादी मंडळींनी संघा़चे खुसपट काढून जनता पक्ष मोडून टाकला. मग उरलेल्या जनता पक्षातून जनसंघाचे लोक बाजूला झाले व त्यांनी भारतीय जनता पक्ष अशी वेगळी चुल मांडली. तेव्हापासून समाजवाद्यांनी भाजपाशी वैर मांडले आणि पुढल्या काळात भाजपा व संघ म्हणेल त्याला कडाडून विरोध, अशी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या होऊन गेली. म्हणूनच १९८० नंतरच्या काळात समान नागरी कायद्याची मागणी संघाने उचलून धरताच, समाजवादी कंबर कसून त्या मागणीच्या विरोधात उभे ठाकले. वास्तविक स्वातंत्र्योत्तर काळातली हीच समान नागरी कायद्याची मागणी समाजवाद्यांचीच होती. त्याविरोधात मुस्लिम मुल्लामौलवी समाजवाद्यांच्या विरोधात असत. पण १९८० नंतरच्या काळात तीच मागणी संघाने उचलून धरताच, संघाला विरोध म्हणून समान नागरी कायद्याला विरोध करण्यात धर्मनिरपेक्षता शोधली गेली. तेच समाजवादी मग मुल्लामौलवींच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. पुढल्या काळात संघाने हिंदूत्वाच नारा लावताच समाजवादी व अन्य पुरोगामी आपण सेक्युलर असण्याचे प्रमाणपत्र मुल्लामौलवींकडून घेऊ लागले. १९९० नंतर मुलायमनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष तर मुस्लिमांचा पक्ष म्हणूनच ओळखला जाऊ लागला. मुलायमना मुल्ला मुलायम अशीही उपाधी लावली गेली. थोडक्यात आता पुरोगामीत्व आणि कडवा इस्लाम, यात फ़रक राहिलेला नाही आणि तलाकपिडित महिलांना संघाच्या आश्रयाला जाण्याची नामुष्की आलेली आहे. हे चित्र बघून हमीदभाईंना काय वाटले असते?

Image may contain: 3 people, people standing, outdoor and text

ज्या संघाच्या धार्मिकतेला व हिंदूत्वाला हमीदभाईंनी कडाडून विरोध करतानाच मुस्लिम धर्मातही सुधारणांना चालना देण्यासाठी कंबर कसली होती, तो अजेंडा आजकाल संघाचा झालेला बघून हमीदभाईंना आनंद तर नक्कीच झाला नसता. आपले सहकारी मुल्लामौलवींच्या इतके आहारी गेलेले बघून हमीदभाई किती दुखावले असते? पण त्याची कोणाला फ़िकीर आहे? संघाचा द्वेष इतका प्रभावशाली अजेंडा झालेला आहे, की आपण मध्ययुगीन इस्लामचे गुलाम होत चाललो आहोत आणि इस्लामी दहशतवादाचेही समर्थन करू लागलो आहोत, याचेही भान पुरोगामी म्हणवणार्‍यांना राहिलेले नाही. यापेक्षा पुरोगामीत्वाची कुठली शोकांतिका असू शकते? आपल्या जुन्या व मूलभूत अजेंड्य़ालाच विरोध करण्यापर्यंत ज्यांची दिवाळखोरी जाऊन पोहोचली आहे. त्यांना कुठले भवितव्य असू शकते? उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आज भगवी वस्त्रे परिधान करणारा हिंदूत्ववादी योगी विराजमान झाला आहे आणि तोच हमीदभाईंचा अजेंडा घेऊन तलाकपिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्याची भाषा बोलतो आहे. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्याच्या दारी जाणार्‍या मुस्लिम महिला व त्यांचे आप्तस्वकीय, या भगव्या वस्त्रातल्या योग्याकडून सामाजिक न्यायाची अपेक्षा बाळगू लागले आहेत. त्यांना रोखण्याची मुस्लिम मौलवींना हिंमत राहिलेली नाही. ज्या मौलवी व शरीयतवादी नेत्यांनी हमीदभाईंना वाळीत टाकायची भाषा केली होती, तेच आज मुस्लिम महिलांच्या उठावासमोर शरण येताना दिसत आहेत. तो योगी आदित्यनाथ वा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय नसून, हमीदभाईंनी पेरलेल्या सामाजिक सुधारणांच्या बीजाला आलेले अमाप पीक आहे. पण त्याचे श्रेयही घेण्याची शुद्ध हमीदभाईच्या सवंगडी वा अनुयायांना उरलेले नाही. एकूण पुरोगामी विचार व पाठीराख्यांची यापेक्षा मोठी कुठली शोकांतिका असू शकते?

2 comments:

  1. भाऊ!
    हे श्रेय हमिद भाईंचे राहीले नाही. कारण हमिद यांच्यानंतर ती सुधारणांची चळवळ संपली होती ना.
    हे श्रेय आता तर निखालसपणे संघ व भा ज प चे च आहे, ज्यांनी कुचेष्टा, विरोध सगळं सहन करून भारतीय समाजाच्या भल्याचाच विचार करून स्वत:च्या कार्याची दिशा ठरविली आहे.
    योग्य दिशेने बदल हा संघाचा स्थायी भाव आहे.

    संघाचे हिन्दूत्व किती व्यापक आहे याचा नमुना आता दिसत आहे. " सर्वेअपी सुखिन: संतू" हेच संघाच धेय्य (अजेंडा) आहे.

    आपल्या आताच्या सर्वच लेखांत भा ज प, मोदी, संघ यांचे श्रेय विरोधकांच्या व माध्यमांच्या चुकांना व मुर्खपणाला देण्यावर आपला भर राहिला आहे. ते काही अंशी बरोबर असले तरी संपूर्ण सत्य नाही.
    संघ ९० वर्षे कार्यरत आहे तो, विरोधकांच्या चुकांवर नव्हे तर, स्वत:च्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन सतत कार्यकरणा-या कार्यकर्त्यांचे संघटन केले म्हणून.
    आता त्याचा लाभ भा ज पा च्या रुपाने राजकीय क्षेत्रातही होत आहे.

    सुरेन्द्र गाडगीळ.




    ReplyDelete
  2. धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी म्हणजे बावळटपणा चा कळस आहे. स्वताहाच्या देशाचे समाजाचे वाटोळे करतात हे लोक.

    ReplyDelete