Friday, October 21, 2016

बापसे बेटा सवाई

mulayam akhilesh cartoon के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशच्या निवडणूका जवळ येऊ लागल्यापासून तिथे राजकीय उलथापालथ जोरात सुरू झाली आहे. त्यात सर्वात मोठे आव्हान समाजवादी पक्षासमोर आहे. कारण गेली साडेचार वर्षे तोच पक्ष तिथे सत्तेत असून, मागल्या लोकसभेत त्यालाही मोठा फ़टका बसलेला आहे. यादव कुटुंबातील पाच व्यक्ती सोडून त्या पक्षाचा अन्य कोणी उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकला नव्हता आणि खुद्द मुलायमना दोन जागी उभे राहून पक्षाची अब्रु झाकायची वेळ आलेली होती. अशा पार्श्वभूमीवर त्याच पक्षातल्या लाथाळ्या आज चव्हाट्यावर येत असतील, तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, त्याचा नुसता अंदाजही पुरेसा असतो. सर्वसाधारणपणे सत्तेतल्या पक्षाला लोक हाकलून लावतात, असा अनुभव आहे. पण जिथे पर्याय नसेल, तिथे असलेल्या बलवान पक्षालाही दुसरी संधी दिली जात असते. उत्तरप्रदेशात तसे नाही. चार प्रमुख पक्ष मैदानात आहेत. त्यापैकी कॉग्रेसने राहुल गांधींनाच सर्व सुत्रे सोपवून स्वत:ला पांगळे करून घेतलेले अहे. सहाजिकच मैदानात आता तीनच प्रमुख पक्ष उरले आहेत. मागल्या विधानसभेचे आकडे घ्यायचे, तर मुलायम व मायावती हेच दोन बलदंड राजकीय प्रवाह होते. पण लोकसभेनंतर भाजपाने जोरदार मुसंडी मारून आव्हान उभे केले. त्यात मायावतींचा बसपा पुर्णपणे वाहून गेला. तर समाजवादी पक्षाने आपले प्रतिनिधीत्व तरी शिल्लक ठेवले. कॉग्रेसला आता फ़क्त अमेठी रायबरेली वगळता कुठेही स्थान उरलेले नाही. या स्थितीत समाजवादी पक्षाला दोन मोठे स्पर्धक समोर आहेत. शिवाय पाच वर्षाचा हिशोबही द्यायचा आहे. अशावेळी जी एकजुटीची वज्रमूठ आवश्यक असते, तीच उघडी पडली आहे. कारण कोवळ्या वयात मुख्यमंत्रीपदी बसवलेला मुलायमचा सुपुत्र अखिलेश, आता पित्यालाही दाद देईनासा झाला आहे. यादव कुळातील यादवी दिवसेदिवस धुमसत चालली आहे.

जनता पक्षातून बाहेर पडून मुलायमसिंग यांनी समाजवादी पक्षाची नव्याने चुल मांडली, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचा दबदबा नव्हता. पण पुढे आपले राजकीय बस्तान मुलायमनी बसवले, त्यानंतर त्यांचे भाऊही राजकारणार लुडबुडू लागले. पाठोपाठ वयात येणारे मुलगे व पुतणेही राजकारणात आले. परिणामी समाजवादी पक्ष कौटुंबिक मालमत्ता होऊन गेली. त्यातूनच आजची समस्या पक्षाला भेडसावते आहे. आरंभी मुलायमना विश्वासातले सहकारी हवेत म्हणून शिवपाल यादव, रामगोपाल यादव अशा भावांना नेते म्हणून सोबत घ्यावे लागले. पण सत्तेची चव चाखल्यावर प्रत्येकाला अधिक सत्ता हवी असते. तोच संघर्ष त्या दोन भावात सुरू झाला. खेरीज मते मिळावी म्हणून ज्या तडजोडी कराव्या लागतात, त्यात आझमखान वा अमरसिंग असेही जोडीदार मुलायमना संभाळायचे होते. हे कमी म्हणून की काय, दोन बायकांच्या सावत्र कुटुंबाचाही कलह राजकारणात येत गेला. आता समाजवादी पक्ष अशाच कुटुंबकलहाने ग्रासलेला आहे. २००७ सालात सत्ता सोडायची वेळ आली, तेव्हा पक्षात वादळे उठली होती. पण २०१२ मध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यावर ती वादळे विकोपास जाण्याची स्थिती मुलायमनी आपल्याच हाताने निर्माण करून ठेवलेली आहे. मोठे बहूमत मिळाले, तेव्हा त्यांनी प्रचारासाठी लाडका पुत्र अखिलेशला यात्रा काढायला संधी दिली होती. मग बहूमत मिळाल्यावर मुलायमच मुख्यमंत्री होतील ही अपेक्षा होती. तसेच करून पुत्राला दोन वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून अनुभव दिला असता, तर योग्य झाले असते. पण मुलायमनी मुलाला उच्चस्थानी बसवले आणि आझमखान वा शिवपाल यादव अशा ज्येष्ठांना मंत्रीमंडळात स्थान दिले. तिथून सगळी गडबड सुरू झाली. त्यांनी लहान म्हणून अखिलेशाला खेळवले आणि किंमत दिली नाही. पण त्यातूनच हा मुलगा राजकारणाचे डावपेच शिकून आता शिरजोर झाला आहे.

मुख्यमंत्री असूनही पिता वा त्याच्या माध्यमातून चुलता व इतर लोक ढवळाढवळ करतात, म्हणून अखिलेश अस्वस्थ होता. त्याने आपला गट पक्षात तयार केला आणि आता पित्यालाच आव्हान द्यायला उभा ठाकला आहे. खरे तर मागल्या लोकसभेतील पराभवाचे खापर माथी मारून पुत्राला मुलायमनी बाजूला करायला हवे होते. स्वत: सत्ता हाती घेतली असती, तर समाजवादी पक्षाला सावरणे शक्य झाले असते. पण तीही संधी गमावली. मुलायमनी पुत्राला कायम ठेवला आणि पक्षातली सुंदोपसुंदी तशीच चालू दिली. थोडक्यात अखिलेशला पुर्ण पाच वर्षे मुदत मिळाली आणि त्याने पक्षांतर्गत आपला तरूणांचा गट उभा केला आहे. त्याला शह देणारे राजकारण खेळणार्‍यांना गेल्या महिन्यात एका थेट कारवाईतून इशारा दिलेला होता. चुलत्याचीच महत्वाची खाती काढून घेतली आणि नंतर पित्याने हस्तक्षेप केल्यावर माघार घेतल्याचे दाखवत पित्यालाही आव्हान देण्यापर्यंत मजल मारली. समाजवादी पक्षाच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव व्हायचा आहे. त्या निमीत्त ५ नोव्हेंबरला मोठा मेळावा समारंभ योजला आहे. तर त्याला झुगारून अखिलेशने ३ तारखेपासून प्रचारयात्रा सुरू करायची घोषणा केली आहे. म्हणजेच त्या महोत्सवाला हजर न रहाणे किंवा तात्पुरती हजेरी लावून अलिप्त रहाणे; अशी अखिलेशची खेळी आहे. स्पष्ट भाषेत त्याने पित्याच्याच निर्णायक अधिकाराला आव्हान दिलेले आहे. अखिलेशच्या सोबतीला चुलता रामगोपाल व आझमखान असे मुलायमचे ज्येष्ठ सहकारीही ठामपणे उभे राहिलेले दिसत आहेत. म्हणजेच ऐन निवडणूकीच्या तोंडावर पित्याला पुत्राने राजकीय आव्हान दिले आहे. भले सत्ता गेली तरी बेहत्तर, आपण माघार घेणार नाही, असाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे असे, की निवडणूका माझ्या नेतृत्वाखाली होतील आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही मीच! मान्य नसेल तर सत्ता व बहुमत गेले तरी बेहत्तर!

ऐन निवडणूका तोंडावर आल्या असताना समाजवादी पक्षातली दुफ़ळी पक्षाला परवडणारी नाही. पण तिथे माघार घेतली तर अखिलेशचे राजकीय जीवन संपल्यात जमा आहे. उलट मुलायमसाठी विषय उत्तरप्रदेश वा कुटुंबापुरता मर्यादित नाही. मुलायमना एक राष्ट्रीय नेता म्हणून मान्यता आहे. देशातल्या या मोठ्या राज्यातच मुलायम अपेशी ठरले, तर त्यांची राष्ट्रीय प्रतिष्ठाही धुळीस मिळणार आहे. म्हणजे भाऊ व चमचे हवेत, की राष्ट्रीय नेता म्हणून असलेली मान्यता टिकवायची आहे, असा सवाल पुत्राने पित्याला प्रत्यक्ष कृतीतून विचारला आहे. लालू, नितीश वा अन्य राजकारण्यांना खेळवण्यात आयुष्य खर्ची घातलेल्या मुलायमनी, कधी घरातूनच असा धोबीपछाड दिला जाईल ही अपेक्षा केलेली नसेल. कारण मुलायम हा मुळचा पेहलवानही आहे आणि म्हणूनच अखिलेशची नवी खेळी पेहलवान पित्यासाठी धोबीपछाड म्हणावी अशीच आहे. राजकारण हा एकप्रकारचा जुगारच असतो. त्यात काय मिळणार म्हणून आशाळभूत बसणार्‍यांना सहसा मोठी बाजी मारता येत नाही. हाती असलेले काही गमावण्य़ाचे साहस करणार्‍यांनाच हा जुगार खेळता येत असतो. मुलयमनी तो अनेकदा खेळलेला आहे. पण त्यांच्या कुणा सवंगड्यांना तितकी कधी हिंमत झाली नाही. त्यांच्या कुठल्या भावानेही तसे धाडस केले नाही. अखिलेशने ते केलेले आहे. कारण या गडबडीत त्याला पुन्हा बहूमत मिळवण्याची अजिबात खात्री नाही. पण पक्षातच फ़ुट पडणार असेल, तर गटबाजीत कुणाच्या मेहरबानीवर जगण्यापेक्षा आपला स्वयंभू किल्ला उभारण्याचा त्याचा मनसुबा लपून राहिलेला नाही. उद्या कदाचित त्याला कॉग्रेस वा तत्सम पक्षांचा पाठींबाही मिळवून पुढले डावपेच खेळता येतील. त्याचे आजचे प्रतिस्पर्धी शिवपाल वा अमरसिंग इत्यादी कधी हे डाव खेळायला धजावणार नाहीत. अखिलेशच्या बाजूने त्याचे वय आहे आणि मुलायम उतारवयात आहेत. म्हणूनच बापसे बेटा सवाई असेच म्हणावे लागते.

1 comment: