Saturday, October 1, 2016

पर्रीकरांनी शब्द पाळला

Image result for parrikar doval

युद्धक्षेत्रातला एक हेर हा शंभर सैनिकांपेक्षा भेदक व प्रभावी असतो. म्हणूनच बुधवारच्या घटनेकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज आहे. केवळ धाडसी कमांडो ही अशा कारवाईसाठी पुरेशी सामग्री नसते. त्यांना घुसून झटपट कारवाईसाठी आवश्यक अशी नेमकी माहिती व तपशील हाताशी असावे लागतात. ते अनेक मार्गाने मिळवता येतात. आजकाल तंत्रज्ञानाने मैलोगणती दूर असूनही छायचित्रे घेणारे कॅमेरे वा ध्वनीलहरी पकडणारी यंत्रे उपलब्ध आहेत. पण मानवी हालचाली वा त्यांच्या मनातल्या घडामोडी, प्रत्यक्ष मानवालाच पकडता येतात. म्हणूनच आजच्याही जमान्यात मानवी हेर ही मोठी सुविधा असते. प्रामुख्याने शत्रूच्या गोटातील मोक्याच्या जागी असलेला हेर, तोफ़खान्यापेक्षाही मोठी सुविधा असते. अमेरिकेने अबोटाबाद येथील बंदिस्त बंगल्यात दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेनला शोधून काढला तरी तिथे किती माणसे आहेत आणि कुठली हत्यारे आहेत, याची माहिती मिळवण्यासाठी मानवी साधनेच वापरावी लागली होती. त्यासाठी ओसामाच्या त्या बंदिस्त कंपाऊंडमध्ये पोहोचलेला पोलिओचा डॉक्टर नंतर पकडला गेला व आज तुरूंगात खितपत पडलेला आहे. त्याने दिलेल्या नेमक्या माहितीच्या आधारेच अमेरिकन कमांडो अल्पावधीत इतकी मोठी धाडसी कारवाई करू शकले होते. मग जवळपास तितक्याच धाडसाची व अल्पावधीत उरकलेली भारतीय पथकाची कामगिरी, कोणामुळे यशस्वी होऊ शकली, त्याचा उहापोह कशाला होत नाही? कारण तो उहापोह अशा हेरांना गोत्यात घालणारा ठरू शकतो. म्हणून कारवाईची माहिती देणार्‍या भारतीय सेनादलाने छावण्यांची माहिती कुठून मिळाली, त्याविषयी संपुर्ण गोपनीयता पाळलेली आहे. पण त्याचे धागेदोरे आपण शोधून काढू शकतो. त्यासाठी थोडे मागे जावे लागेल. काही जुन्या बातम्यांचा आढावा घ्यावा लागेल.

दिड वर्षापुर्वी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एक विधान केले आणि ते गाजले होते. भारताच्या दोन माजी पंतप्रधानांनी पाकिस्तानातील आपल्या डीप असेटना दगा दिला, असे ते विधान होते. डीप असेट म्हणजे शत्रूच्या गोटात आतपर्यंत पोहोचलेले आपले हस्तक होय. मोरारजी देसाई व इंद्रकुमार गुजराल यांनी भारतीय हेरखात्याचे मोठे नुकसान केले. त्यांनी निर्बंध आणल्यामुळे भारताला पाकिस्तानातील अनेक हस्तकांना वार्‍यावर सोडावे लागले होते. जेव्हा अशा हस्तकांना तुम्ही वार्‍यावर सोडता किंवा उघडे पडू देता; तेव्हा ते शत्रूच्या सुडाचे बळी होतात. भारताच्या पाकिस्तानातील हस्तकांची तीच गत झाली आणि पाकिस्तनातून मिळू शकणारी महत्वाची माहिती हाती येण्याचा झराच आटून गेला. पण त्याच कालखंडात पाकिस्तानने भारतामध्ये आपल्या हस्तकांचे मोठे जाळे विणले. आज इथे अतिशय उजळमाथ्याने जगणारे, पण सतत पाकिस्तानला लाभदायक ठरेल अशा भूमिका घेणार्‍यांची नावे, इथे सांगण्याची गरज नाही. कधी ते नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांच्या समर्थनाला उभे रहातील, कधी याकुब मेमनच्या फ़ाशी विरोधात गदारोळ करतील. कधी इशरत जहानच्या चकमकीवरून वादळ उभे करतील, तर कधी काश्मिरातील दंगलखोर जमावाचे समर्थन करताना दिसतील. विविध पेशातले वा समाजघटकातले हे लोक कळत नकळत पाकिस्तानला मदत करत असतात. कधी त्यांना हे माहिती असते तर कधी राजकीय भूमिका विचारांच्या आहारी जाऊन ते अनवधानाने तसे वागतात. त्यांना पाकिस्तानचे डीप असेट मानले जाते. असेट म्हणजे साधन, ही हेरगिरीतली उपमा आहे. असेच लोक पाकिस्तानातही आपल्याला मदत करणारे असू शकतात. पण त्यांना शोधून, पटवून वा अनवधानाने अशा कामात ओढावे लागते. अशी माणसे तयार करण्यात काही वर्षे व पैसेही खर्च होत असतात.

गुजराल व मोरारजी यांच्या खुळेपणाने असे भारताचे हस्तक मारले गेले आणि पुढल्या काळात तसे हस्तक निर्माण करण्याची प्रक्रीयाही थंडावली. म्हणूनच पाकिस्तान अशा उचापतीमध्ये भारतापेक्षा सरस ठरू लागला होता. आज पाकिस्तानच्या कलाकारांची वकिली करायला आपले अनेक बुद्धीमंत पुढे आले आहेत. पण पाकिस्तानच्या तशाच पक्षपाती भूमिकेचा निषेध करताना हेच बुद्धीमंत मौन धारण करताना दिसतील. ही तफ़ावत पर्रीकर यांनी बोलून दाखवली होती आणि त्याची भरपाई लौकरच करू, असेही त्याच कार्यक्रमात बोलून दाखवले होते. त्याची सनसनाटी माजवताना वक्तव्याच्या दुसर्‍या भागा्कडे दुर्लक्ष करण्यात आले. पहिल्या भागचा गवगवा झाला. पण पर्रीकरांच्या वक्तव्याचा दुसरा भाग महत्वाचा होता. नव्याने असे असेट निर्माण करण्याचा विषय त्यांनी बोलून दाखवला, त्याला आता दिड वर्ष उलटून गेले आहे. या काळात पाकिस्तानात भारताचे किती असेट तयार झाले व कामाला लागले; याची माहिती कोणी पत्रकार परिषद घेऊन सांगणार नाही. त्याची प्रचिती परिणामातून मिळू शकते. बुधवारच्या कारवाईसाठी नेमकी माहिती उपलब्ध झाली, याचा अर्थ ती माहिती घेणारे, मिळवणारे व पुढे योग्य भारतीयांपर्यत पाठवणारे लोक पाकिस्तानात आता तयार झाले आहेत. विश्वास ठेवून कृती करावी, इतकी पक्की माहिती असे हस्तक देऊ शकतात, इतके पक्के जाळे विणले गेले, असाच त्याचा अर्थ होतो. पण हे कोणी उघड बोलणार नाही. पाकिस्तानला आज धडकी भरली आहे, त्याचे तेच खरे कारण आहे. इतकी नेमकी माहिती भारतीय कमांडो पथकापर्यंत पोहोचलीच कशी, हा पाकला सतावणारा प्रश्न आहे. कारण कोणीतरी हेरखात्यातले, लष्करातले किंवा अगदी जिहादी गोटातले हा तपशील देऊ शकतात. हे पाकला नेमके कळते. पण असे भारताला फ़ितूर झालेले कोण आहेत, त्याचा थांगपत्ता नसणे ही खरी भयभीत करणारी गोष्ट आहे.

पाकिस्तान नुसता भारतीय हल्ल्याने बिथरलेला नाही किंवा हल्ल्याने भयभीत झालेला नाही. त्यांची जिहादी व लष्करी हालचालींची नेमकी माहिती भारताकडे पोहोचती करणारे गद्दार कोण, ही पाकची याक्षणी चिंता आहे. असे लोक कुठल्याही पेशातले वा विभागातले असू शकतात. जसे आपल्याकडे समाजसेवी, पत्रकार, प्राध्यापक वा राजकीय नेते पाकप्रेमाचा उमाळा दाखवतात, तसेच अनेकजण पाकिस्तानात असू शकतात. मात्र भारताइतकी तिथे लोकशाही नसल्याने, त्यापैकी कोणी खुलेआम भारत वा भारतीयाविषयी आस्था दाखवण्याची हिंमत करू शकत नाही. म्हणजेच त्याला भारताला सतत शिव्या मोजून वा भारतीयाविषयी द्वेषमूलक बोलूनच महत्वाच्या जागी शिरकाव मिळवला पाहिजे. म्हणजेच तोंडावर तो भारताचा कट्टर वैरी दिसणार, पण पडद्याआड भारताचा हस्तक असणार. मग त्याला गद्दार म्हणून ओळखणे अवघड काम नाही काय? तर असे शेकड्यांनी लोक सध्या पाकिस्तानात तयार झालेले असणार. अन्यथा अशी कुठली धाडसी कारवाई व पाकला धमकावण्याची हिंमत मोदीही करू शकले नसते. आज पाक मोदींना वा भारतीय सेनेला घाबरलेला नाही, तर त्यांच्यातच असलेल्या भारतीय हस्तकांच्या कारवायांच्या भयाने बिथरला आहे. आपल्यात कोण गद्दार आहे, त्याची शंका प्रत्येकाला दुसर्‍याकडे संशयाने बघायला भाग पाडणारी झाली आहे. कुणावर आणि किती विश्वास ठेवायचा, अशी समस्या पाकला भेडसावते आहे. एका बाजूला अशा रितीने पाकिस्तानात आपले डीप असेट निर्माण करतानाच, भारतातील मोक्याच्या जागी बसलेल्या पाकिस्तानी असेटना निकामी सुद्धा करण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे. पलिकडून भारताला मिळणारी माहिती खात्रीची आणि इथल्या पाक हस्तकांकडून तिकडे जाणारी माहिती बेभरवशी असल्यास, चिंता पाकलाच सतावणार ना? पर्रीकरांच्या दिड वर्षापु्र्वीच्या विधानावर गदारोळ करणार्‍यांना अजून त्यांनी काय म्हटले तेच कळलेले नाही.

2 comments:

  1. घरभेद्यांचे नाक कापले ह्यात भारतीय सेनेच्या पराक्रमाला इवला पराक्रम असे म्हणता आणि ह्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानात जी कारवाई केली त्या तोडीची कामगिरी म्हणता. नक्की मी कन्फ्युझ्ड आहे कि आपण?

    ReplyDelete